फिलेमोन १:१-२५
१ ख्रिस्त येशूसाठी तुरुंगात कैदी असलेला पौल आणि आपला बांधव तीमथ्य यांच्याकडून, आमचा प्रिय सहकारी फिलेमोन
२ आणि आमची बहीण अफ्फिया, आमचा सोबतीचा सैनिक अर्खिप्प, तसेच, तुझ्या घरात भेटणारी मंडळी या सर्वांना:
३ देव जो आपला पिता, आणि प्रभू येशू ख्रिस्त यांच्याकडून तुम्हा सर्वांना अपार कृपा आणि शांती लाभो.
४ माझ्या प्रार्थनांमध्ये मी जेव्हा जेव्हा तुझा उल्लेख करतो तेव्हा तेव्हा मी माझ्या देवाचे उपकार मानतो,
५ कारण तुझ्या विश्वासाबद्दल आणि प्रभू येशू ख्रिस्त व सर्व पवित्र जन यांच्यासाठी* असलेल्या तुझ्या प्रेमाबद्दल मला नेहमीच ऐकायला मिळते.
६ तू सहविश्वासू बांधवांसोबत बाळगत असलेल्या विश्वासामुळे, ख्रिस्ताद्वारे आपल्याला लाभलेल्या सर्व आशीर्वादांची तुला जाणीव व्हावी, अशी मी प्रार्थना करतो.
७ कारण तू दाखवत असलेल्या प्रेमाबद्दल जेव्हा मी ऐकले, तेव्हा मला खूप आनंद झाला व सांत्वन मिळाले. माझ्या बांधवा, तुझ्याद्वारे पवित्र जनांच्या मनाला* उभारी मिळाली आहे.
८ याच कारणामुळे, मला ख्रिस्ताचा प्रेषित या नात्याने तू योग्य ते करावे असा आदेश देण्याचा अधिकार असला,
९ तरी मी तुला प्रेमाच्या आधारावर विनंती करण्याचे जास्त पसंत करेन. कारण मी, पौल, एक वडीलधारा माणूस आहे आणि आता तर ख्रिस्त येशूसाठी तुरुंगात कैदी आहे.
१० मी ज्याचा तुरुंगात* असताना वडील बनलो, त्या माझ्या लेकरासाठी, अनेसिमसाठी मी तुला विनंती करत आहे.
११ तो पूर्वी तुझ्यासाठी निरुपयोगी असा होता, पण आता तो तुझ्यासाठी आणि माझ्यासाठीही उपयोगी आहे.
१२ मी त्याला, हो, माझ्या काळजाच्या तुकड्याला तुझ्याकडे परत पाठवत आहे.
१३ सुवार्तेसाठी मला झालेल्या या कैदेदरम्यान, माझी सेवा करण्यासाठी तुझ्याजागी त्याला ठेवून घ्यायला खरेतर मला आवडले असते;
१४ पण, मला तुझ्या परवानगीशिवाय काहीही करण्याची इच्छा नाही. कारण, हे चांगले कृत्य तू बळजबरीने नाही, तर तुझ्या स्वतःच्या इच्छेने करावे, असे मला वाटले.
१५ कोण जाणे, कदाचित यासाठीच तो काही काळ* तुझ्यापासून दुरावला असेल, की तो सर्वकाळासाठी तुला परत मिळावा;
१६ यापुढे एक दास म्हणून नाही, तर दासापेक्षाही जास्त, एक प्रिय बांधव म्हणून. माझ्यासाठी तर तो एक प्रिय बांधव आहेच, पण माझ्यापेक्षाही तो तुझ्यासाठी आणखी जास्त प्रिय असा बांधव आहे, कारण तो तुझा दासच नाही तर प्रभूच्या सेवेत तुझा सहकारीदेखील आहे.
१७ तेव्हा, जर तू मला आपला मित्र* समजत असशील, तर जितक्या प्रेमाने तू माझे स्वागत केले असते, तितक्याच प्रेमाने त्याचेही स्वागत कर.
१८ शिवाय, जर त्याने तुझे काही नुकसान केले असेल, किंवा जर त्याच्यावर तुझे काही कर्ज असेल, तर ते माझ्या हिशोबात जोड.
१९ मी, पौल, स्वतःच्या हाताने हे लिहित आहे: मी त्याची परतफेड करीन. अर्थात, तू तर आपल्या जीवनासाठीही माझा ऋणी आहेस, हे वेगळे सांगायला नको.
२० तेव्हा, माझ्या बांधवा, प्रभूच्या सेवेत माझे एवढे साहाय्य कर, म्हणजे ख्रिस्ताच्या संबंधाने माझ्या मनाला* उभारी मिळेल.
२१ तू माझ्या सांगण्यानुसार वागशील याची मला खातरी आहे. म्हणूनच मी तुला लिहित आहे, कारण मी जे सांगितले त्यापेक्षाही तू जास्त करशील हे मला माहीत आहे.
२२ पण त्यासोबतच, माझ्या मुक्कामासाठी तयारी करून ठेव, कारण तुमच्या प्रार्थनांनुसार मी तुमच्याकडे परत येईन* अशी आशा मी बाळगतो.
२३ ख्रिस्तासोबत ऐक्यात असलेला माझा सोबतीचा कैदी एपफ्रास तुला नमस्कार सांगतो.
२४ तसेच मार्क, अरिस्तार्ख, देमास आणि लूक हे माझे सहकारीदेखील तुला नमस्कार सांगतात.
२५ तू दाखवत असलेल्या चांगल्या वृत्तीमुळे,* तुझ्यावर प्रभू येशू ख्रिस्ताची अपार कृपा असो.
तळटीपा
^ किंवा “यांच्याबद्दल.”
^ शब्दशः “आतड्यांना,” मनातल्या गहिऱ्या भावनांना सूचित करते.
^ शब्दशः “बंधनांत.”
^ शब्दशः “तासभर.”
^ शब्दशः “भागीदार.”
^ वचन ७ मधील तळटीप पाहा.
^ किंवा “तुमच्यासाठी माझी सुटका होईल.”
^ शब्दशः “आत्मा.”