मत्तय १०:१-४२

  • येशूचे बारा प्रेषित (१-४)

  • सेवाकार्यासाठी सूचना (५-१५)

  • शिष्यांचा छळ होईल (१६-२५)

  • माणसाचे नव्हे, तर देवाचे भय बाळगा (२६-३१)

  • शांती आणण्यासाठी नाही, तर तलवार चालवण्यासाठी (३२-३९)

  • येशूच्या शिष्यांचा स्वीकार (४०-४२)

१०  मग त्याने आपल्या बारा शिष्यांना बोलावले आणि त्यांना अशुद्ध आत्म्यांवर अधिकार दिला, जेणेकरून ते या अशुद्ध आत्म्यांना काढून टाकू शकतील; तसेच, सर्व प्रकारचे रोग व दुखणी बरी करण्याचा अधिकारही त्याने त्यांना दिला. २  त्याच्या बारा प्रेषितांची* नावे अशी: पहिला, शिमोन ज्याला पेत्र असेही म्हटले आहे आणि त्याचा भाऊ अंद्रिया; जब्दीचा मुलगा याकोब आणि त्याचा भाऊ योहान; ३  फिलिप्प व बर्थलमय, थोमा आणि जकात वसूल करणारा मत्तय; अल्फीचा मुलगा याकोब; तद्दय; ४  शिमोन कनानी;* आणि ज्याने पुढे येशूचा विश्‍वासघात केला तो यहूदा इस्कर्योत. ५  या बारा जणांना येशूने पुढील सूचना देऊन पाठवले: “विदेश्‍यांच्या प्रदेशात व कोणत्याही शोमरोनी शहरात जाऊ नका; ६  तर, केवळ इस्राएलच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरांकडे जा. ७  जात असताना अशी घोषणा करा: ‘स्वर्गाचं राज्य जवळ आलं आहे.’ ८  आजाऱ्‍यांना बरं करा, मेलेल्यांना जिवंत करा, कुष्ठरोग्यांना शुद्ध करा, दुरात्मे काढा. तुम्हाला फुकट मिळालं आहे, तुम्हीही फुकट द्या. ९  तुमच्या बटव्यात* सोन्याचे, चांदीचे किंवा तांब्याचे पैसे घेऊ नका, १०  किंवा प्रवासासाठी शिदोरी, दोन जोड कपडे, जास्तीचे जोडे किंवा काठी सोबत घेऊ नका; कारण कामकऱ्‍याला त्याचं भोजन मिळावं हे योग्यच आहे. ११  कोणत्याही शहरात किंवा गावात गेल्यावर तिथे कोण योग्य आहे हे शोधून काढा आणि तिथून निघेपर्यंत त्याच्याकडेच मुक्काम करा. १२  एखाद्या घरात गेल्यावर घरातल्या लोकांना नमस्कार करा आणि त्यांना शांती मिळो अशी सदिच्छा व्यक्‍त करा. १३  ते घर योग्य असेल, तर त्यांना शांती लाभेल; पण जर योग्य नसेल, तर ती शांती तुमच्याकडे परत येईल. १४  जर कोणी तुमचं स्वागत केलं नाही किंवा तुमचं ऐकून घेतलं नाही, तर त्या घरातून किंवा शहरातून बाहेर निघताना आपल्या पायांची धूळ झटकून टाका. १५  मी तुम्हाला खरं सांगतो, न्यायाच्या दिवशी या शहरापेक्षा सदोम आणि गमोरा देशाला अधिक सोपं जाईल. १६  पाहा! लांडग्यांमध्ये मेंढरांना पाठवावं तसं मी तुम्हाला पाठवत आहे; म्हणून, सापांसारखे चतुर व कबुतरांसारखे भोळे असा. १७  लोकांपासून सांभाळून राहा, कारण ते तुम्हाला न्यायालयांच्या स्वाधीन करतील आणि त्यांच्या सभास्थानांत तुम्हाला फटके मारतील. १८  आणि त्यांना व विदेश्‍यांना साक्ष मिळावी म्हणून माझ्यामुळे तुम्हाला राज्यपालांच्या व राजांच्या समोर आणलं जाईल. १९  पण, जेव्हा तुम्हाला त्यांच्यासमोर नेलं जाईल तेव्हा कसं बोलावं किंवा काय बोलावं याची काळजी करू नका; तुम्ही काय बोलावं हे त्या वेळी तुम्हाला सुचेल; २०  कारण बोलणारे केवळ तुम्ही नसून, तुमच्या पित्याचा पवित्र आत्मा* तुमच्याद्वारे बोलत असतो. २१  शिवाय, भाऊ भावाला व बाप आपल्या मुलाला ठार मारण्यासाठी धरून देईल आणि मुले आईवडिलांविरुद्ध उठतील व त्यांना ठार मारण्यासाठी धरून देतील. २२  आणि माझ्या नावामुळे सर्व लोक तुमचा द्वेष करतील, पण जो शेवटपर्यंत धीर धरेल,* त्यालाच वाचवलं जाईल.* २३  जेव्हा ते एका शहरात तुमचा छळ करतील तेव्हा दुसऱ्‍या शहरात पळून जा, कारण मी तुम्हाला खरं सांगतो, मनुष्याचा पुत्र येईपर्यंत इस्राएलच्या सर्व शहरांचा दौरा पूर्ण करणं तुम्हाला शक्य होणार नाही. २४  विद्यार्थी आपल्या शिक्षकापेक्षा किंवा गुलाम आपल्या मालकापेक्षा श्रेष्ठ नसतो. २५  विद्यार्थी शिक्षकासारखा आणि गुलाम मालकासारखा झाला तर तेवढं पुरे आहे. लोकांनी घराच्या मालकालाच बालजबूल* म्हटलं, तर ते घरच्यांनादेखील म्हणणार नाहीत का? २६  म्हणून त्यांना भिऊ नका. कारण अशी कोणतीही झाकलेली गोष्ट नाही जी उघडकीस येणार नाही आणि अशी कोणतीही गुप्त गोष्ट नाही जी उजेडात येणार नाही. २७  मी तुम्हाला जे अंधारात सांगतो त्याविषयी उजेडात बोला आणि तुमच्या कानांत कुजबुजलेलं, घरांच्या छतांवरून घोषित करा. २८  आणि जे शरीर नष्ट करतात, पण जीवन नष्ट करू शकत नाहीत* त्यांना भिऊ नका; तर जो गेहेन्‍नात* जीवन आणि शरीर दोन्ही नष्ट करू शकतो त्याचं भय बाळगा. २९  एका पैशाला* दोन चिमण्या विकल्या जातात की नाही? तरीपण, यांपैकी एकही तुमच्या पित्याच्या नकळत जमिनीवर पडत नाही. ३०  खरंतर, तुमच्या डोक्यावरचे सगळे केससुद्धा मोजलेले आहेत. ३१  म्हणून, भिऊ नका; पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुमचं मोल जास्त आहे. ३२  तर मग, जो कोणी माझ्यावर विश्‍वास असल्याचं लोकांसमोर स्वीकारतो त्याला मीसुद्धा स्वर्गातील माझ्या पित्यासमोर स्वीकारेन. ३३  पण, जो कोणी लोकांसमोर मला नाकारतो, त्याला मीसुद्धा स्वर्गातील माझ्या पित्यासमोर नाकारेन. ३४  मी पृथ्वीवर शांती आणण्यासाठी आलो असं समजू नका; मी शांती आणण्यासाठी नाही, तर तलवार चालवण्यासाठी आलो आहे. ३५  कारण मुलाविरुद्ध बाप, आईविरुद्ध मुलगी आणि सासूविरुद्ध सून अशी फूट पाडण्यासाठी मी आलो आहे. ३६  खरोखर, मनुष्याच्या घरचेच लोक त्याचे शत्रू होतील. ३७  ज्याचं माझ्यापेक्षा आपल्या बापावर किंवा आईवर जास्त प्रेम आहे तो माझा शिष्य होण्यास योग्य नाही; आणि ज्याचं माझ्यापेक्षा आपल्या मुलावर किंवा मुलीवर जास्त प्रेम आहे तो माझा शिष्य होण्यास योग्य नाही. ३८  आणि जो कोणी आपला वधस्तंभ* घेऊन माझ्यामागे चालत नाही तो माझा शिष्य होण्यास योग्य नाही. ३९  जो कोणी आपला जीव* वाचवण्याचा प्रयत्न करतो तो त्यास गमावेल आणि जो कोणी माझ्यासाठी आपला जीव* गमावतो त्याला तो मिळेल. ४०  जो कोणी तुमचा स्वीकार करतो तो माझाही स्वीकार करतो आणि जो कोणी माझा स्वीकार करतो, तो ज्याने मला पाठवलं त्याचाही स्वीकार करतो. ४१  जो एखाद्या संदेष्ट्याचा, संदेष्टा असल्यामुळे स्वीकार करतो त्याला संदेष्ट्याला मिळणारं प्रतिफळ मिळेल; तसंच, जो कोणी एखाद्या नीतिमान मनुष्याचा, नीतिमान असल्यामुळे स्वीकार करतो, त्याला नीतिमान मनुष्याला मिळणारं प्रतिफळ मिळेल. ४२  मी तुम्हाला खरं सांगतो, जो कोणी या शिष्यांपैकी एकाला, तो माझा शिष्य असल्यामुळे पेलाभर थंड पाणी प्यायला देईल, त्याला त्याचं प्रतिफळ मिळाल्याशिवाय राहणार नाही.”

तळटीपा

शब्दार्थसूची पाहा.
म्हणजे, “आवेशी असलेला.”
कदाचित एक प्रकारचा कमरपट्टा ज्यात पैसे ठेवले जायचे.
किंवा “पित्याची क्रियाशील शक्‍ती.” शब्दार्थसूची पाहा.
किंवा “धीर धरतो.”
किंवा “त्याचेच तारण होईल.”
दुरात्म्यांचा राजा किंवा शासक असलेल्या सैतानाला दिलेले एक नाव.
किंवा “जीवनाची आशा हिरावून घेऊ शकत नाहीत.”
शब्दार्थसूची पाहा.
शब्दशः “असारियन,” एका दिवसाच्या मजुरीचा सोळावा भाग.
शब्दार्थसूची पाहा.
किंवा “आपले जीवन.”
किंवा “आपले जीवन.”