मत्तय ११:१-३०

  • बाप्तिस्मा देणाऱ्‍या योहानची प्रशंसा (१-१५)

  • पश्‍चात्ताप न करणाऱ्‍या पिढीचा धिक्कार (१६-२४)

  • नम्र लोकांना ज्ञान प्रकट केल्याबद्दल पित्याची स्तुती (२५-२७)

  • येशूचे जू वाहायला सोपे (२८-३०)

११  आपल्या बारा शिष्यांना सूचना देऊन झाल्यानंतर, येशू त्यांच्या शहरांत शिकवायला व राज्याची घोषणा करायला निघाला. २  पण, योहानने ख्रिस्ताच्या कार्यांविषयी तुरुंगात ऐकले तेव्हा त्याने आपल्या शिष्यांना त्याच्याकडे पाठवले ३  आणि असे विचारले: “जो येणार होता तो तूच आहेस का, की आम्ही दुसऱ्‍याची वाट पाहावी?” ४  तेव्हा येशूने त्यांना असे उत्तर दिले: “तुम्ही जे काही ऐकत आहात व पाहत आहात ते जाऊन योहानला सांगा: ५  आंधळे आपल्या डोळ्यांनी पाहत आहेत, लंगडे चालत आहेत, कुष्ठरोगी शुद्ध केले जात आहेत, बहिऱ्‍यांना ऐकू येत आहे, मेलेल्यांना जिवंत केलं जात आहे आणि गोरगरिबांना आनंदाचा संदेश सांगितला जात आहे. ६  ज्याला माझ्यात अडखळण्याचं कारण सापडत नाही* तो मनुष्य सुखी!” ७  ते तिथून जात असताना येशू जमलेल्या लोकांशी योहानबद्दल बोलू लागला: “ओसाड प्रदेशात तुम्ही काय पाहायला गेला होता? वाऱ्‍याने हेलकावणारी गवताची काडी? ८  मग काय पाहायला गेला होता? मऊ मखमली कपडे* घातलेला माणूस? असे कपडे घालणारे तर राजमहालात असतात. ९  तर मग, खरंच, काय पाहायला गेला होता तुम्ही? संदेष्ट्याला? हो, मी तुम्हाला सांगतो, जो संदेष्ट्यांहूनही श्रेष्ठ त्याला. १०  हा तोच आहे ज्याच्याबद्दल असं लिहिण्यात आलं: ‘पाहा! मी माझ्या दूताला तुझ्यापुढे* पाठवत आहे. तो तुझ्यापुढे जाऊन तुझ्यासाठी मार्ग तयार करेल.’ ११  मी तुम्हाला खरं सांगतो, स्त्रियांपासून जन्मलेल्यांमध्ये बाप्तिस्मा देणारा योहान याच्यापेक्षा श्रेष्ठ कोणी आलेला नाही; पण, स्वर्गाच्या राज्यात जो अगदी लहान तो त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. १२  बाप्तिस्मा देणाऱ्‍या योहानच्या दिवसांपासून आतापर्यंत लोक स्वर्गाच्या राज्याचं ध्येय गाठण्यासाठी जोर लावून प्रयत्न करत आहेत आणि जे असे प्रयत्न करत आहेत ते त्यास प्राप्त करतात. १३  कारण संदेष्ट्यांच्या आणि नियमशास्त्राच्या सर्व भविष्यवाण्या योहानच्या काळापर्यंत होत्या; १४  आणि तुम्ही हे मान्य केलं किंवा केलं नाही, तरी ‘संदेष्ट्यांनी ज्याच्याविषयी सांगितलं होतं तो एलीया’ हाच आहे. १५  ज्याला कान आहेत त्याने ऐकावं. १६  या पिढीची तुलना मी कोणाशी करू? बाजारात बसलेल्या लहान मुलांसारखी ही पिढी आहे. ते आपल्या सोबत्यांना हाक मारून म्हणतात: १७  ‘आम्ही तुमच्यासाठी बासरी वाजवली, पण तुम्ही नाचला नाहीत; आम्ही मोठ्याने रडलो, पण तुम्ही छाती बडवून शोक केला नाही.’ १८  त्याचप्रमाणे, योहान खातपीत आला नाही, तरी ‘त्याच्यात दुरात्मा आहे,’ असं लोक म्हणतात. १९  मनुष्याचा पुत्र खातपीत आला आणि तरी लोक म्हणतात, ‘पाहा! हा खादाड आणि दारुडा! जकातदारांचा आणि पापी लोकांचा मित्र!’ पण, बुद्धी ही कार्यांद्वारे* सिद्ध होते.”* २०  मग, ज्या शहरांमध्ये त्याने सर्वात जास्त अद्‌भुत कृत्ये केली होती त्यांनी पश्‍चात्ताप केला नाही म्हणून तो त्यांचा धिक्कार करू लागला: २१  “हे खोराजिन! तुझा धिक्कार असो! हे बेथसैदा! तुझा धिक्कार असो! कारण तुमच्यामध्ये जी अद्‌भुत कार्ये घडली ती सोर व सीदोन इथे घडली असती, तर त्यांनी केव्हाच गोणपाट घालून व राखेत बसून पश्‍चात्ताप केला असता. २२  मी तर तुम्हाला सांगतो न्यायाच्या दिवशी सोर व सीदोन यांना तुमच्यापेक्षा सोपं जाईल. २३  आणि हे कफर्णहूम! तुला काय स्वर्गापर्यंत उंचावलं जाईल? नाही, तू खाली कबरेत* जाशील. कारण तुझ्यामध्ये जी अद्‌भुत कार्ये घडली ती सदोममध्ये घडली असती, तर ते आजपर्यंत राहिले असते. २४  मी तर तुला सांगतो, न्यायाच्या दिवशी सदोम देशाला तुझ्यापेक्षा सोपं जाईल.” २५  त्या प्रसंगी येशू म्हणाला: “हे पित्या, आकाशाच्या आणि पृथ्वीच्या प्रभू, मी जाहीरपणे तुझी स्तुती करतो, कारण तू या गोष्टी ज्ञानी आणि बुद्धिमान लोकांपासून गुप्त ठेवून बालकांना प्रकट केल्या आहेत. २६  हो पित्या, कारण तुला हेच योग्य वाटलं.” २७  येशूने असेही म्हटले, “माझ्या पित्याने सर्व गोष्टी माझ्या स्वाधीन केल्या आहेत आणि पित्याशिवाय कोणीही पुत्राला पूर्णपणे ओळखत नाही; तसंच, पित्यालाही कोणी पूर्णपणे ओळखत नाही; केवळ पुत्र आणि ज्या कोणाला तो पित्याविषयीचं ज्ञान प्रकट करू इच्छितो, तोच पित्याला ओळखतो. २८  अहो कष्ट करणाऱ्‍या व ओझ्याने दबलेल्या सर्व लोकांनो, माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विश्रांती देईन. २९  माझं जू आपल्या खांद्यावर घ्या आणि माझ्याकडून शिका, कारण मी सौम्य मनाचा आणि नम्र आहे आणि तुमच्या जिवाला* विश्रांती मिळेल. ३०  कारण माझं जू वाहायला सोपं व माझं ओझं हलकं आहे.”

तळटीपा

किंवा “जो माझ्याविषयी कोणतीही शंका घेत नाही.”
किंवा “महागडी वस्त्रे.”
शब्दशः “तुझ्या मुखापुढे.”
किंवा “परिणामांद्वारे.”
किंवा “नीतिमान ठरते.”
किंवा “हेडीसमध्ये.” अर्थात, मृत्यूनंतर सर्व मानव जिथे जातात असे लाक्षणिक ठिकाण. शब्दार्थसूची पाहा.
किंवा “तुम्हाला.”