मत्तय १२:१-५०

  • येशू, “शब्बाथाचा प्रभू” (१-८)

  • वाळलेल्या हाताचा मनुष्य बरा होतो (९-१४)

  • देवाचा परमप्रिय सेवक (१५-२१)

  • पवित्र आत्म्याच्या साहाय्याने दुरात्मे काढणे (२२-३०)

  • ज्याची क्षमा नाही असे पाप (३१, ३२)

  • फळांवरून झाडाची परीक्षा (३३-३७)

  • योनाचे चिन्ह (३८-४२)

  • अशुद्ध आत्मा परत येतो (४३-४५)

  • येशूची आई आणि भाऊ (४६-५०)

१२  त्या वेळी, येशू शब्बाथाच्या* दिवशी शेतांतून चालला होता. त्याच्या शिष्यांना भूक लागल्यामुळे ते धान्याची कणसे तोडून खाऊ लागले. २  ते पाहून, परूशी त्याला म्हणाले: “पाहा! तुझे शिष्य, शब्बाथाच्या दिवशी जे नियमानुसार योग्य नाही, ते करत आहेत.” ३  तो त्यांना म्हणाला: “दावीद आणि त्याच्यासोबत असलेल्या माणसांना भूक लागली तेव्हा त्याने काय केलं ते तुम्ही वाचलं नाही का? ४  तो देवाच्या घरात गेला आणि त्याने व त्याच्याबरोबर असलेल्या माणसांनी समर्पित भाकरी* खाल्ल्या. असं करणं नियमशास्त्राच्या विरुद्ध होतं. कारण फक्‍त याजकांनाच त्या भाकरी खाण्याची परवानगी होती. ५  किंवा मग, शब्बाथाच्या दिवशी याजक मंदिरात काम करतात आणि तरीसुद्धा ते निर्दोष राहतात हे तुम्ही नियमशास्त्रात वाचलं नाही का? ६  मी तर तुम्हाला सांगतो, जो मंदिरापेक्षा महान तो इथे आहे. ७  पण, ‘मला यज्ञ नको, दया हवी,’ याचा अर्थ जर तुम्हाला समजला असता तर निर्दोष असलेल्यांना तुम्ही दोष लावला नसता. ८  कारण मनुष्याचा पुत्र शब्बाथाचा प्रभू आहे.” ९  तिथून निघाल्यावर तो त्यांच्या सभास्थानात गेला, १०  आणि पाहा! तिथे वाळलेल्या* हाताचा एक माणूस होता. तेव्हा, येशूवर आरोप लावण्याच्या हेतूने त्यांनी त्याला विचारले: “शब्बाथाच्या दिवशी एखाद्याला बरं करणं नियमानुसार योग्य आहे का?” ११  तो त्यांना म्हणाला: “तुमच्याजवळ जर एक मेंढरू आहे आणि ते शब्बाथाच्या दिवशी खड्ड्यात पडलं, तर तुमच्यापैकी असा कोण आहे जो लगेच त्याला धरून बाहेर काढणार नाही? १२  मेंढरापेक्षा माणसाचं मोल किती जास्त आहे! तर मग, शब्बाथाच्या दिवशी चांगलं काम करणं नक्कीच नियमानुसार योग्य आहे.” १३  मग तो त्या माणसाला म्हणाला: “आपला हात लांब कर.” आणि त्याने तो लांब केला तेव्हा तो त्याच्या दुसऱ्‍या हातासारखाच बरा झाला. १४  पण, परूशी लोक बाहेर जाऊन येशूला ठार मारण्याचा कट करू लागले. १५  हे समजल्यावर, तो तिथून निघून गेला. पुष्कळ लोकही त्याच्यामागे गेले आणि त्याने त्या सर्वांना बरे केले, १६  पण आपल्याविषयी कोणालाही सांगू नये असे त्याने त्यांना बजावून सांगितले. १७  अशा रीतीने यशया संदेष्ट्याद्वारे जे सांगण्यात आले होते, ते पूर्ण झाले: १८  “पाहा! माझा सेवक, ज्याला मी निवडलं आहे, माझा परमप्रिय, ज्याच्याविषयी मी* संतुष्ट आहे! मी त्याला आपला पवित्र आत्मा* देईन आणि न्याय काय असतो हे तो विदेश्‍यांना दाखवेल. १९  तो भांडणतंटा किंवा आरडाओरडा करणार नाही आणि मुख्य रस्त्यांवर कोणाला त्याचा आवाज ऐकू येणार नाही. २०  तो न्यायाला विजयी करेपर्यंत गवताची वाकलेली काडी तोडणार नाही आणि मिणमिणती वात विझवणार नाही. २१  खरोखर, राष्ट्रे त्याच्या नावाची आशा धरतील.” २२  मग त्यांनी दुरात्म्याने पीडित असलेल्या एका आंधळ्या व मुक्या माणसाला येशूजवळ आणले आणि त्याने त्याला बरे केले आणि तो मुका माणूस बोलू व पाहू लागला. २३  हे पाहून जमलेल्या लोकांना फार आश्‍चर्य वाटले आणि ते म्हणू लागले: “दावीदचा पुत्र हाच तर नसावा?” २४  हे ऐकून परूशी लोक म्हणाले: “हा माणूस दुरात्म्यांचा अधिकारी बालजबूल* याच्या साहाय्याने दुरात्मे काढतो.” २५  त्यांचे विचार ओळखून तो त्यांना म्हणाला: “ज्या राज्यात फूट पडते ते राज्य नष्ट होतं आणि ज्या शहरात किंवा घरात फूट पडते तेसुद्धा टिकू शकत नाही. २६  त्याचप्रमाणे, सैतानानेच जर सैतानाला काढलं तर त्याच्यात फूट पडली आहे; मग त्याचं राज्य कसं काय टिकेल? २७  आणि जर मी बालजबूलच्या साहाय्याने दुरात्मे काढतो, तर तुमचे शिष्य कोणाच्या साहाय्याने दुरात्मे काढतात? म्हणून तेच तुमचा न्याय करतील. २८  पण, जर मी देवाच्या पवित्र आत्म्याच्या* साहाय्याने दुरात्मे काढतो, तर मात्र देवाच्या राज्याने तुम्हाला गाठलं आहे.* २९  एखाद्याला जर बलवान माणसाच्या घरात शिरून त्याची मालमत्ता लुटायची असेल, तर आधी त्याला त्या बलवान माणसाला बांधून ठेवावं लागणार नाही का? ३०  जो कोणी माझ्या बाजूने नाही तो माझ्याविरुद्ध आहे आणि जो कोणी माझ्यासोबत गोळा करत नाही तो विखरून टाकतो. ३१  म्हणून मी तुम्हाला म्हणतो, माणसांनी कोणत्याही प्रकारचं पाप किंवा निंदा केली तर त्यांना क्षमा केली जाईल. पण, जो कोणी पवित्र आत्म्याची* निंदा करतो त्याला क्षमा केली जाणार नाही. ३२  उदाहरणार्थ, जो कोणी मनुष्याच्या पुत्राविरुद्ध काही बोलतो त्याला क्षमा केली जाईल; पण जो कोणी पवित्र आत्म्याविरुद्ध* बोलतो त्याला क्षमा केली जाणार नाही; या जगाच्या व्यवस्थेत* नाही आणि येणाऱ्‍या जगाच्या व्यवस्थेतही* नाही. ३३  एकतर तुमचं झाड चांगलं आणि त्याचं फळ चांगलं असेल, किंवा मग तुमचं झाड कुजकं आणि त्याचं फळ कुजकं असेल. कारण झाडाची परीक्षा त्याच्या फळांवरूनच होते. ३४  अरे विषारी सापाच्या पिल्लांनो! तुम्ही वाईट असताना चांगल्या गोष्टी कशा बोलणार? कारण अंतःकरणात जे भरलेलं असतं तेच तोंडातून बाहेर पडतं. ३५  चांगला मनुष्य आपल्या चांगल्या भांडारातून चांगल्या गोष्टी बाहेर काढतो, तर वाईट मनुष्य आपल्या वाईट भांडारातून वाईट गोष्टी बाहेर काढतो. ३६  मी तुम्हाला सांगतो, माणसांनी बोललेल्या प्रत्येक व्यर्थ गोष्टीसाठी त्यांना न्यायाच्या दिवशी हिशोब द्यावा लागेल; ३७  कारण तुमच्या शब्दांनी तुम्ही नीतिमान किंवा दोषी ठराल.” ३८  मग काही शास्त्री व परूशी त्याला म्हणाले: “गुरुजी, आम्हाला तुमच्या हातून एखादं चिन्ह पाहायचं आहे.” ३९  त्याने त्यांना उत्तर दिले: “दुष्ट आणि व्यभिचारी* पिढी सतत चिन्ह मागत राहते, पण योना संदेष्ट्याच्या चिन्हाशिवाय दुसरं कोणतंही चिन्ह त्या पिढीला दिलं जाणार नाही. ४०  कारण ज्या प्रकारे योना तीन दिवस आणि तीन रात्री एका मोठ्या माशाच्या पोटात होता, त्याच प्रकारे मनुष्याचा पुत्र तीन दिवस आणि तीन रात्री पृथ्वीच्या पोटात राहील. ४१  न्यायाच्या वेळी निनवेचे लोक या पिढीबरोबर उठतील आणि तिला दोषी ठरवतील, कारण त्यांनी योनाच्या उपदेशावरून पश्‍चात्ताप केला होता. पण पाहा! योनापेक्षा जो महान तो इथे आहे. ४२  न्यायाच्या वेळी, दक्षिणेच्या राणीला या पिढीबरोबर उठवलं जाईल आणि ती या पिढीला दोषी ठरवेल, कारण शलमोनचं ज्ञान ऐकण्यासाठी ती अतिशय दुरून* आली होती. पण पाहा! शलमोनपेक्षा जो महान तो इथे आहे. ४३  जेव्हा एखाद्या मनुष्यातून अशुद्ध आत्मा बाहेर निघतो तेव्हा तो राहण्याची जागा शोधत निर्जल ठिकाणांतून फिरतो, पण त्याला ती सापडत नाही. ४४  मग तो म्हणतो, ‘मी जिथून निघालो त्या माझ्या घरी परत जाईन,’ पण तिथे आल्यावर त्याला ते घर रिकामं व झाडूनपुसून स्वच्छ केलेलं आणि सजवलेलं दिसतं. ४५  तेव्हा तो जातो आणि आपल्यापेक्षा दुष्ट अशा आणखी सात दुरात्म्यांना घेऊन येतो आणि त्या मनुष्यात शिरून ते तिथेच राहू लागतात; अशा रीतीने त्या मनुष्याची अवस्था आधीपेक्षाही वाईट होते. या दुष्ट पिढीच्या बाबतीतही असंच घडेल.” ४६  तो जमलेल्या लोकांशी बोलत असताना त्याची आई आणि भाऊ त्याच्याशी बोलण्यासाठी बाहेर वाट पाहत उभे होते. ४७  म्हणून एक जण येऊन त्याला म्हणाला: “पाहा! तुमची आई आणि तुमचे भाऊ बाहेर उभे आहेत आणि त्यांना तुमच्याशी बोलायचं आहे.” ४८  तेव्हा येशूने त्याला उत्तर दिले: “माझी आई आणि माझे भाऊ कोण?” ४९  मग आपल्या शिष्यांकडे हाताने इशारा करून तो म्हणाला: “पाहा! माझी आई आणि माझे भाऊ हेच आहेत! ५०  कारण जो कोणी स्वर्गातील माझ्या पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो तोच माझा भाऊ, तीच माझी बहीण आणि तीच माझी आई.”

तळटीपा

शब्दार्थसूची पाहा.
किंवा “समक्षतेच्या भाकरी.” शब्दार्थसूची पाहा.
किंवा “लकवा मारल्यामुळे लुळ्या झालेल्या.”
किंवा “माझा जीव.”
किंवा “क्रियाशील शक्‍ती.” शब्दार्थसूची पाहा.
दुरात्म्यांचा राजा किंवा शासक असलेल्या सैतानाला दिलेले एक नाव.
किंवा “देवाच्या क्रियाशील शक्‍तीच्या.” शब्दार्थसूची पाहा.
किंवा “देवाचं राज्य आलं आहे आणि तुम्हाला कळलंदेखील नाही.”
किंवा “देवाच्या क्रियाशील शक्‍तीची.” शब्दार्थसूची पाहा.
किंवा “देवाच्या क्रियाशील शक्‍तीविरुद्ध.” शब्दार्थसूची पाहा.
किंवा “सध्याच्या काळात.” शब्दार्थसूची पाहा.
किंवा “येणाऱ्‍या काळातही.” शब्दार्थसूची पाहा.
किंवा “विश्‍वासघातकी.”
शब्दशः “पृथ्वीच्या टोकापासून.”