मत्तय १३:१-५८
-
राज्याविषयीची उदाहरणे (१-५२)
-
बी पेरणारा (१-९)
-
येशू उदाहरणे का द्यायचा? (१०-१७)
-
बी पेरणाऱ्याच्या उदाहरणाचा अर्थ (१८-२३)
-
गहू आणि जंगली गवत (२४-३०)
-
मोहरीचा दाणा आणि खमीर (३१-३३)
-
उदाहरणांचा वापर केल्यामुळे भविष्यवाणीची पूर्णता (३४, ३५)
-
गहू आणि जंगली गवताच्या उदाहरणाचा अर्थ (३६-४३)
-
लपवलेला खजिना आणि मौल्यवान मोती (४४-४६)
-
मासे पकडण्याचे जाळे (४७-५०)
-
भांडारातील नव्या व जुन्या गोष्टी (५१, ५२)
-
-
येशूच्या गावचे लोक त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीत (५३-५८)
१३ त्या दिवशी घरातून बाहेर निघून येशू समुद्रकिनारी बसला होता.
२ तेव्हा त्याच्याभोवती इतके लोक जमले की तो जाऊन एका नावेत बसला आणि सर्व लोक किनाऱ्यावर उभे राहिले.
३ मग त्याने उदाहरणांच्या साहाय्याने त्यांना बऱ्याच गोष्टी सांगितल्या. तो म्हणाला: “पाहा! एक शेतकरी पेरणी करायला निघाला.
४ तो पेरणी करत असताना, काही बी रस्त्याच्या कडेला पडले आणि पक्ष्यांनी येऊन ते खाऊन टाकले.
५ तर काही बी खडकाळ जमिनीवर पडले, जिथे जास्त माती नव्हती. माती खोल नसल्यामुळे ते लगेच उगवले,
६ पण, सूर्य वर येताच कडक उन्हामुळे रोपं वाळून गेली कारण त्यांनी मूळ धरलं नव्हतं.
७ आणि काही बी काटेरी झुडपांत पडले आणि ती झुडपं वाढल्यावर त्यांनी रोपांची वाढ खुंटवली.
८ पण, काही बी चांगल्या जमिनीवर पडले आणि कुठे शंभरपट, कुठे साठपट तर कुठे तीसपट असं पीक येऊ लागलं.
९ ज्याला कान आहेत त्याने ऐकावं.”
१० मग शिष्य त्याच्याजवळ येऊन त्याला म्हणाले: “तू त्यांच्याशी उदाहरणांच्या साहाय्याने का बोलतोस?”
११ त्याने त्यांना उत्तर दिले: “स्वर्गाच्या राज्याची पवित्र रहस्ये समजून घेण्याचं वरदान तुम्हाला देण्यात आलं आहे, पण त्यांना मात्र दिलेलं नाही.
१२ कारण ज्याच्याजवळ आहे त्याला आणखी देण्यात येईल आणि त्याच्याजवळ भरपूर होईल; पण ज्याच्याजवळ नाही त्याच्याकडून जे आहे तेसुद्धा काढून घेतलं जाईल.
१३ म्हणूनच, मी त्यांच्याशी उदाहरणांच्या साहाय्याने बोलतो; कारण ते पाहत असूनही त्यांना दिसत नाही, ऐकत असूनही त्यांना ऐकू येत नाही आणि सांगितलेल्या गोष्टींचा अर्थ समजत नाही.
१४ त्यांच्या बाबतीत यशयाची भविष्यवाणी पूर्ण होत आहे. त्याने म्हटले होते: ‘तुम्ही ऐकाल तर खरं, पण तुम्हाला अर्थ कळणार नाही, आणि तुम्ही पाहाल तर खरं, पण तुम्हाला दिसणार नाही.
१५ कारण या लोकांची मने कठोर झाली आहेत, ते ऐकून न ऐकल्यासारखं करतात आणि त्यांनी आपले डोळे मिटून घेतले आहेत, यासाठी की त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहू नये आणि आपल्या कानांनी ऐकू नये आणि त्यांच्या मनाने याचा अर्थ समजून घेऊ नये आणि त्यांनी मागे फिरू नये व मी त्यांना बरं करू नये.’
१६ पण तुम्ही मात्र सुखी आहात कारण तुमचे डोळे पाहतात आणि तुमचे कान ऐकतात.
१७ कारण मी तुम्हाला खरं सांगतो, तुम्ही पाहत असलेल्या गोष्टी पाहण्याची आणि तुम्ही ऐकत असलेल्या गोष्टी ऐकण्याची अनेक संदेष्ट्यांनी व नीतिमान मनुष्यांनी इच्छा बाळगली होती, पण त्यांना त्या पाहता व ऐकता आल्या नाहीत.
१८ आता बी पेरणाऱ्या शेतकऱ्याच्या उदाहरणाचा अर्थ काय ते ऐका.
१९ एखादा जेव्हा राज्याचं वचन ऐकतो पण त्याचा अर्थ समजून घेत नाही, तेव्हा तो दुष्ट* येऊन त्याच्या हृदयात जे पेरण्यात आलं आहे ते हिरावून घेतो. हा मनुष्य रस्त्याच्या कडेला पडलेल्या बीसारखा आहे.
२० खडकाळ जमिनीवर पेरलेल्या बीसारखा असलेला मनुष्य वचन ऐकताच ते आनंदाने स्वीकारतो.
२१ पण, वचनाने त्याच्यात मूळ न धरल्यामुळे काही काळ तो टिकून राहतो आणि वचनामुळे एखादं संकट आल्यास किंवा छळ झाल्यास तो लगेच अडखळून पडतो.
२२ काटेरी झुडपांत पेरलेल्या बीसारखा असलेला मनुष्य वचन तर ऐकतो, पण जगाच्या व्यवस्थेच्या* चिंता आणि पैशाची फसवी ताकद यांमुळे वचनाची वाढ खुंटते आणि ते निष्फळ ठरतं.
२३ चांगल्या जमिनीत पेरलेल्या बीसारखा मनुष्य मात्र वचन ऐकतो, त्याचा अर्थ समजून घेतो आणि निश्चितच फळ देतो; कोणी शंभरपट, कोणी साठपट तर कोणी तीसपट.”
२४ मग त्याने त्यांना आणखी एक उदाहरण देऊन म्हटले: “स्वर्गाचं राज्य एका अशा मनुष्यासारखं आहे ज्याने आपल्या शेतात चांगलं बी पेरलं.
२५ मग माणसं झोपेत असताना त्याचा एक शत्रू गव्हात जंगली गवताचं बी पेरून गेला.
२६ पुढे गव्हाची रोपं वाढून दाणे आले, तेव्हा शेतात जंगली गवतही दिसू लागलं.
२७ म्हणून शेताच्या मालकाचे दास त्याच्याकडे येऊन म्हणाले, ‘मालक, तुम्ही आपल्या शेतात चांगलं बी पेरलं होतं ना? मग, हे जंगली गवत कसं काय उगवलं?’
२८ तो त्यांना म्हणाला, ‘हे काम एका शत्रूचं आहे.’ तेव्हा ते त्याला म्हणाले, ‘आम्ही जाऊन ते गोळा करावं, अशी तुमची इच्छा आहे का?’
२९ तो म्हणाला, ‘नको, कारण गवत गोळा करताना तुम्ही त्यासोबत गहूपण उपटाल.
३० म्हणून कापणीपर्यंत दोन्ही सोबत वाढू द्या. मग कापणीच्या वेळी मी कापणी करणाऱ्यांना सांगेन की आधी जंगली गवत गोळा करून जाळून टाकण्यासाठी त्याच्या पेंढ्या बांधा आणि मग गहू माझ्या कोठारांत जमा करा.’”
३१ त्याने त्यांना आणखी एक उदाहरण देऊन म्हटले: “स्वर्गाचं राज्य एका माणसाने आपल्या शेतात पेरलेल्या मोहरीच्या दाण्यासारखं आहे.
३२ खरंतर तो सर्व बियांपेक्षा लहान असतो. पण वाढल्यावर त्याचं रोप सर्व भाज्यांपेक्षा मोठं होऊन त्याचं झाड होतं आणि आकाशातील पक्षी त्याच्या फांद्यांत आपली घरटी करतात.”
३३ त्याने त्यांना आणखी एक उदाहरण दिलं: “स्वर्गाचं राज्य खमिरासारखं* आहे, जे एका स्त्रीने तीन मापे पिठामध्ये घातलं आणि त्यामुळे सगळं पीठ फुगलं.”
३४ या सर्व गोष्टी येशूने जमलेल्या लोकांना उदाहरणांच्या साहाय्याने सांगितल्या. खरंतर, तो कधीही उदाहरणांशिवाय त्यांच्याशी बोलत नव्हता.
३५ हे यासाठी घडले की संदेष्ट्याद्वारे सांगितलेले वचन पूर्ण व्हावे. ते असे: “मी आपलं तोंड उघडून उदाहरणं देईन; सुरुवातीपासून* गुप्त असलेल्या गोष्टी मी घोषित करीन.”
३६ मग लोकांना निरोप दिल्यानंतर तो घरात गेला. तेव्हा त्याचे शिष्य त्याच्याजवळ येऊन म्हणाले: “जंगली गवताच्या उदाहरणाचा अर्थ आम्हाला समजावून सांग.”
३७ तो त्यांना म्हणाला: “चांगलं बी पेरणारा, मनुष्याचा पुत्र आहे.
३८ शेत म्हणजे जग. चांगलं बी म्हणजे राज्याचे पुत्र, तर जंगली गवत सैतानाचे पुत्र आहेत.
३९ आणि ते पेरणारा शत्रू, सैतान* आहे. कापणी म्हणजे या जगाच्या व्यवस्थेची समाप्ती* आणि कापणी करणारे देवदूत आहेत.
४० म्हणून ज्या प्रकारे जंगली गवत गोळा करून जाळून टाकलं जातं, त्याच प्रकारे या जगाच्या व्यवस्थेच्या समाप्तीला* घडेल.
४१ मनुष्याचा पुत्र आपल्या देवदूतांना पाठवेल आणि ते त्याच्या राज्यातून अडखळायला लावणाऱ्या सर्व गोष्टी आणि अनीतीने वागणाऱ्या लोकांना गोळा करतील.
४२ आणि ते त्यांना आगीच्या भट्टीत टाकून देतील. तिथे ते रडतील आणि दात खातील.
४३ त्या वेळी नीतिमान जन आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे तेजस्वीपणे चमकतील. ज्याला कान आहेत त्याने ऐकावं.
४४ स्वर्गाचं राज्य शेतात लपवलेल्या अशा खजिन्यासारखं आहे, जो एका माणसाला सापडला आणि त्याने तो लपवून ठेवला; आणि त्याला इतका आनंद झाला की त्याने जाऊन आपल्याजवळ असलेलं सर्वकाही विकून टाकलं आणि ते शेत विकत घेतलं.
४५ तसंच, स्वर्गाचं राज्य मौल्यवान मोत्यांच्या शोधात देशोदेशी फिरणाऱ्या एका व्यापाऱ्यासारखं आहे.
४६ त्याला अतिशय मौल्यवान असा मोती सापडला तेव्हा तो निघून गेला आणि आपल्याजवळ असलेलं सर्वकाही विकून त्याने तो मोती विकत घेतला.
४७ तसंच, स्वर्गाचं राज्य समुद्रात टाकलेल्या अशा एका जाळ्यासारखं आहे ज्यात सर्व प्रकारचे मासे अडकले.
४८ जाळं पूर्ण भरल्यानंतर त्यांनी ते किनाऱ्यावर आणलं आणि बसून चांगले मासे भांड्यांमध्ये जमा केले, तर खराब मासे फेकून दिले.
४९ जगाच्या व्यवस्थेच्या समाप्तीला* असंच घडेल. देवदूतांना पाठवलं जाईल आणि ते दुष्टांना नीतिमानांपासून वेगळं करतील
५० व त्यांना आगीच्या भट्टीत टाकतील. तिथे ते रडतील आणि दात खातील.
५१ तुम्हाला या सर्व गोष्टींचा अर्थ समजला का?” ते त्याला म्हणाले: “हो.”
५२ मग तो त्यांना म्हणाला: “लोकांना शिकवणारा प्रत्येक शिक्षक, ज्याला स्वर्गाच्या राज्याबद्दल शिकवण्यात आलं आहे, तो अशा एका घरमालकासारखा आहे जो आपल्या भांडारातून नव्या व जुन्या गोष्टी बाहेर काढतो.”
५३ ही सर्व उदाहरणे सांगून झाल्यानंतर येशू तिथून निघाला.
५४ मग आपल्या गावी आल्यावर तो त्यांच्या सभास्थानात जाऊन त्यांना शिकवू लागला. तेव्हा त्यांना खूप आश्चर्य वाटले आणि ते म्हणाले: “या माणसाला हे ज्ञान आणि ही अद्भुत कार्ये करण्याचं सामर्थ्य कुठून मिळालं?
५५ हा त्या सुताराचाच मुलगा आहे ना? आणि याच्या आईचं नाव मरीया आहे ना? याकोब, योसेफ, शिमोन व यहूदा हे याचेच भाऊ आहेत ना?
५६ आणि याच्या सर्व बहिणी आपल्यासोबत नाहीत का? मग याला हे सर्व कुठून मिळालं?”
५७ म्हणून त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. पण येशू त्यांना म्हणाला: “संदेष्ट्याचा सगळीकडे आदर केला जातो, फक्त त्याच्या स्वतःच्या गावात आणि स्वतःच्या घरात केला जात नाही.”
५८ त्यांच्या अविश्वासामुळे त्याने तिथे फारशी अद्भुत कार्ये केली नाहीत.
तळटीपा
^ किंवा “सैतान.”
^ किंवा “सध्याच्या काळाच्या.” शब्दार्थसूची पाहा.
^ अर्थात, पीठ फुगवण्यासाठी वापरला जाणारा पदार्थ, यीस्ट. शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा कदाचित, “जगाच्या स्थापनेपासून.”
^ शब्दशः “दियाबल.” म्हणजे, निंदा करणारा.
^ किंवा “सध्याच्या काळाची समाप्ती.” शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा “सध्याच्या काळाच्या समाप्तीला.” शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा “सध्याच्या काळाच्या समाप्तीला.” शब्दार्थसूची पाहा.