मत्तय १४:१-३६

  • बाप्तिस्मा देणाऱ्‍या योहानचे डोके कापले जाते (१-१२)

  • येशू पाच हजारांना जेवू घालतो (१३-२१)

  • येशू पाण्यावर चालतो (२२-३३)

  • गनेसरेत येथे लोकांना बरे करणे (३४-३६)

१४  त्या वेळी प्रांताधिकारी हेरोद* याने येशूविषयी ऐकले २  तेव्हा तो आपल्या सेवकांना म्हणाला: “हा बाप्तिस्मा देणारा योहान आहे. त्याला मेलेल्यांतून उठवण्यात आलं आहे. म्हणूनच तो ही सर्व अद्‌भुत कार्ये करत आहे.” ३  हेरोदने आपला भाऊ फिलिप्प याची बायको हेरोदिया हिच्यामुळे योहानला अटक केली होती आणि त्याला बांधून तुरुंगात डांबले होते. ४  कारण योहानने त्याला बऱ्‍याच वेळा म्हटले होते: “तू हेरोदियाला आपली पत्नी बनवलं हे कायद्यानुसार योग्य नाही.” ५  खरेतर, योहानला ठार मारण्याची हेरोदची इच्छा होती, पण त्याला लोकांची भीती होती कारण ते योहानला संदेष्टा समजत होते. ६  मग, हेरोदच्या वाढदिवसाच्या सोहळ्यात हेरोदियाची मुलगी नाचली, तेव्हा हेरोद इतका खूश झाला ७  की त्याने शपथ घेऊन, ती जे काही मागेल ते तिला दिले जाईल असे वचन दिले. ८  तेव्हा आपल्या आईच्या सांगण्यावरून ती म्हणाली: “मला एका थाळीत, बाप्तिस्मा देणाऱ्‍या योहानचं डोकं आणून द्या.” ९  राजाला दुःख झाले, पण शपथ घेतली असल्यामुळे आणि त्याच्यासोबत जेवायला बसलेल्या लोकांमुळे त्याने तिला ते देण्याची आज्ञा दिली. १०  आणि त्याने तुरुंगात माणसे पाठवून योहानचे डोके कापले. ११  मग त्याचे डोके एका थाळीत आणून त्या मुलीला देण्यात आले आणि तिने ते आपल्या आईकडे नेले. १२  नंतर त्याच्या शिष्यांनी येऊन त्याचा मृतदेह तिथून नेला व पुरला; मग ते येशूकडे आले आणि त्यांनी त्याला सगळी हकिगत सांगितली. १३  हे ऐकल्यावर, एकांत मिळावा म्हणून येशू नावेत बसून एका निर्जन ठिकाणी निघून गेला. पण लोकांना हे समजले तेव्हा ते नगरांतून पायी त्याच्यामागे गेले. १४  तो किनाऱ्‍याजवळ आला तेव्हा लोकांचा मोठा समुदाय पाहून त्याला त्यांचा कळवळा आला आणि त्याने त्यांच्यातील आजारी लोकांना बरे केले. १५  पण संध्याकाळ झाल्यावर त्याचे शिष्य त्याच्याजवळ आले आणि म्हणाले: “हे निर्जन ठिकाण आहे आणि खूप उशीरही झाला आहे; म्हणून लोकांना पाठवून दे म्हणजे ते आसपासच्या गावांत जाऊन स्वतःसाठी काही खायला विकत घेतील.” १६  पण, येशू त्यांना म्हणाला: “त्यांना जायची गरज नाही; तुम्हीच त्यांना खायला द्या.” १७  ते त्याला म्हणाले: “आमच्याजवळ फक्‍त पाच भाकरी आणि दोन मासे आहेत.” १८  तो म्हणाला: “ते इकडे माझ्याकडे आणा.” १९  मग त्याने लोकांना गवतावर बसायला सांगितले. त्यानंतर त्या पाच भाकरी आणि दोन मासे घेऊन त्याने वर आकाशाकडे पाहिले आणि धन्यवाद देऊन भाकरी मोडल्या आणि शिष्यांना दिल्या आणि शिष्यांनी त्या लोकांना दिल्या. २०  मग, सर्व जण पोटभर जेवले, आणि त्यांनी उरलेले अन्‍न गोळा केले तेव्हा बारा टोपल्या भरल्या. २१  जेवणाऱ्‍यांमध्ये जवळजवळ पाच हजार पुरुष, तसेच स्त्रिया व लहान मुलेही होती. २२  मग लगेच त्याने आपल्या शिष्यांना नावेत बसून आपल्यापुढे पलीकडच्या किनाऱ्‍यावर जायला सांगितले आणि तो लोकांना निरोप देऊ लागला. २३  लोकांना पाठवून दिल्यानंतर येशू डोंगरावर प्रार्थना करण्यासाठी निघून गेला. संध्याकाळ झाली तेव्हा तो तिथे एकटाच होता. २४  इकडे शिष्यांची नाव किनाऱ्‍यापासून काही किलोमीटर* दूर गेली होती आणि लाटांमुळे हेलकावे खात होती कारण वारा विरुद्ध दिशेचा होता. २५  पण रात्रीच्या चौथ्या प्रहरी* तो समुद्रावर चालत त्यांच्याकडे आला. २६  शिष्यांनी त्याला समुद्रावर चालताना पाहिले तेव्हा ते घाबरले आणि म्हणाले: “हा काहीतरी भास आहे!” आणि ते घाबरून ओरडू लागले. २७  पण येशू लगेच त्यांच्याशी बोलला आणि म्हणाला: “हिंमत धरा! मी आहे, घाबरू नका.” २८  पेत्रने त्याला उत्तर दिले: “प्रभू तू असशील तर मला पाण्यावरून तुझ्याजवळ येण्याची आज्ञा कर.” २९  तो म्हणाला: “ये!” तेव्हा पेत्र नावेतून उतरला आणि पाण्यावरून चालत येशूजवळ जाऊ लागला. ३०  पण वादळाकडे पाहून तो घाबरला आणि बुडायला लागला; तेव्हा तो ओरडून म्हणाला: “प्रभू, मला वाचव!” ३१  येशूने लगेच आपला हात पुढे करून त्याला धरले आणि म्हटले: “अरे अल्पविश्‍वासी,* तू शंका का घेतली?” ३२  ते नावेत चढल्यानंतर वादळ शांत झाले. ३३  तेव्हा, जे नावेत होते त्यांनी त्याला नमन करून म्हटले: “तू खरोखरच देवाचा पुत्र आहेस.” ३४  मग ते पलीकडे गनेसरेतच्या भागात आले. ३५  तिथल्या लोकांनी त्याला ओळखून आसपासच्या सर्व प्रदेशात निरोप पाठवला. तेव्हा लोक सगळ्या आजारी माणसांना त्याच्याजवळ आणू लागले. ३६  आणि आम्हाला फक्‍त तुमच्या कपड्यांच्या काठाला स्पर्श करू द्या अशी विनंती ते त्याला करू लागले; तेव्हा ज्यांनी ज्यांनी स्पर्श केला ते सर्व पूर्णपणे बरे झाले.

तळटीपा

अर्थात, हेरोद अंतिपा, शब्दार्थसूची पाहा.
शब्दशः “कित्येक स्टेडिया.” स्टेडियम हे अंतर मोजण्याचे रोमन माप असून एक स्टेडियम १८५ मीटर (६०६.९५ फूट) इतके होते.
अर्थात, पहाटे ३ वाजेपासून सूर्योदयापर्यंत, म्हणजे पहाटे सहा वाजेपर्यंत.
किंवा “कमी विश्‍वास असलेल्या माणसा.”