मत्तय १८:१-३५

  • राज्यात सर्वात मोठा कोण? (१-६)

  • अडखळणे (७-११)

  • वाट चुकलेल्या मेंढराचे उदाहरण (१२-१४)

  • भावाला परत कसे मिळवावे? (१५-२०)

  • क्षमा करायला तयार नसलेल्या दासाचे उदाहरण (२१-३५)

१८  त्या वेळी, शिष्य येशूच्या जवळ येऊन म्हणाले: “स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा कोण?” २  तेव्हा येशूने एका लहान मुलाला आपल्याजवळ बोलावले आणि त्याला त्यांच्यामध्ये उभे केले ३  आणि म्हटले: “मी तुम्हाला खरं सांगतो, जोपर्यंत तुम्ही मागे फिरून* लहान मुलांसारखे होणार नाही, तोपर्यंत तुम्हाला स्वर्गाच्या राज्यात मुळीच जाता येणार नाही. ४  म्हणून, जो कोणी स्वतःला या लहान मुलासारखं नम्र करेल तोच स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा असेल; ५  आणि जो कोणी अशा एखाद्या लहान मुलाला माझ्या नावाने स्वीकारतो तो मलाही स्वीकारतो. ६  पण माझ्यावर विश्‍वास असलेल्या अशा लहानांपैकी एकालाही जो अडखळायला लावतो त्याच्या गळ्यात, गाढव ओढतो तसा जात्याचा दगड* बांधून त्याला खोल समुद्रात टाकून दिलं जावं, हेच त्याच्यासाठी चांगलं ठरेल. ७  अडखळणांमुळे* या जगाची किती दुर्दशा होईल! अर्थात अडखळणे येतील हे अटळ आहे, पण ज्या मनुष्याद्वारे अडखळण येतं त्याची खूप वाईट स्थिती होईल! ८  म्हणून, जर तुझा हात किंवा पाय तुला अडखळायला लावत असेल, तर तो कापून फेकून दे. दोन हात किंवा दोन पायांसहित सर्वकाळाच्या अग्नीत टाकलं जाण्यापेक्षा, अधू किंवा लंगडं होऊन जीवनात जाणं तुझ्यासाठी अधिक चांगलं आहे. ९  तसंच, जर तुझा डोळा तुला अडखळायला लावत असेल तर तो उपटून फेकून दे. कारण दोन डोळे असून गेहेन्‍नाच्या* अग्नीत टाकलं जावं, यापेक्षा एकच डोळा असून जीवनात जाणं तुझ्यासाठी अधिक चांगलं आहे. १०  या लहानांपैकी एकालाही कधी तुच्छ लेखू नका, कारण मी तुम्हाला सांगतो, की त्यांचे देवदूत नेहमी स्वर्गात माझ्या पित्यासमोर असतात. ११  * १२  तुम्हाला काय वाटतं? एखाद्या माणसाजवळ शंभर मेंढरं असली आणि त्यांपैकी जर एक मेंढरू वाट चुकलं, तर तो नव्याण्णव मेंढरांना तसंच डोंगरावर सोडून त्या वाट चुकलेल्या एका मेंढराला शोधायला जाणार नाही का? १३  आणि जर त्याला ते सापडलं, तर मी तुम्हाला खातरीने सांगतो, की वाट न चुकलेल्या नव्याण्णव मेंढरांपेक्षा त्याला त्या एका मेंढराबद्दल जास्त आनंद होईल. १४  त्याच प्रकारे, या लहानांपैकी एकाचाही नाश व्हावा अशी माझ्या* स्वर्गातील पित्याची इच्छा नाही. १५  तुझ्या भावाने काही पाप केल्यास, एकांतात जाऊन त्याच्याशी बोल आणि त्याचा दोष त्याला दाखव.* जर त्याने तुझं ऐकलं, तर तू आपल्या भावाला मिळवलं आहे. १६  पण त्याने जर ऐकलं नाही, तर मग आपल्यासोबत आणखी एकदोन जणांना घेऊन त्याच्याकडे जा, म्हणजे दोन किंवा तीन जणांच्या साक्षीने* प्रत्येक गोष्ट सिद्ध केली जाईल. १७  जर त्याने त्यांचं ऐकलं नाही, तर मंडळीशी बोल. आणि जर त्याने मंडळीचंही ऐकलं नाही, तर मग त्याला विदेशी किंवा जकातदार याच्यासारखं समजलं जावं. १८  मी तुम्हाला खरं सांगतो, तुम्ही पृथ्वीवर ज्या गोष्टी बांधाल त्या स्वर्गात आधीच बांधलेल्या असतील आणि तुम्ही पृथ्वीवर ज्या गोष्टी मोकळ्या कराल त्या स्वर्गात आधीच मोकळ्या केलेल्या असतील. १९  तसंच, मी तुम्हाला खरं सांगतो, तुमच्यापैकी दोघांनी जर पृथ्वीवर एखाद्या महत्त्वाच्या गोष्टीसंबंधी एकमताने प्रार्थना केली, तर स्वर्गात राहणारा माझा पिता त्यांच्यासाठी त्या प्रार्थनेचं उत्तर देईल. २०  कारण जिथे दोघं किंवा तिघं माझ्या नावाने एकत्र जमतात, तिथे मी त्यांच्यामध्ये असतो.” २१  मग पेत्र येऊन त्याला म्हणाला: “प्रभू, माझा भाऊ माझ्याविरुद्ध पाप करत असल्यास, मी त्याला किती वेळा क्षमा करावी? सात वेळा?” २२  येशूने त्याला म्हटले: “मी तुला सांगतो, सात वेळा नाही, तर ७७ वेळा त्याला क्षमा कर. २३  “म्हणूनच, स्वर्गाचं राज्य अशा एका राजासारखं आहे, ज्याने आपल्या दासांकडून हिशोब घ्यायचं ठरवलं. २४  जेव्हा तो त्यांच्याकडून हिशोब घेऊ लागला, तेव्हा त्याच्यापुढे अशा एका माणसाला आणण्यात आलं ज्याच्यावर त्याचं सहा कोटी दिनारांचं* कर्ज होतं. २५  पण हे कर्ज फेडण्याची त्याची ऐपत नसल्यामुळे, मालकाने त्याला, त्याची बायको व मुले, तसंच त्याच्या मालकीच्या सर्व वस्तू विकून ते कर्ज फेडावं असा हुकूम केला. २६  तेव्हा तो दास मालकाच्या पाया पडून म्हणाला, ‘मला आणखी थोडा वेळ द्या, मी तुमचं सर्व कर्ज फेडीन.’ २७  तेव्हा मालकाला त्याचा कळवळा आला आणि त्याने त्याचं कर्ज माफ करून त्याला जाऊ दिलं. २८  पण तो दास बाहेर गेल्यावर त्याला त्याच्या सोबतीचा एक दास भेटला, ज्याच्यावर त्याचं शंभर दिनारांचं* कर्ज होतं. तेव्हा त्याने त्याला धरलं आणि त्याचा गळा दाबून त्याला म्हटलं, ‘माझे पैसे आताच्या आता परत कर.’ २९  त्याच्या सोबतीचा दास त्याच्या पाया पडून गयावया करू लागला आणि म्हणाला: ‘मला आणखी थोडा वेळ दे, मी तुझे सगळे पैसे परत करीन.’ ३०  पण तो ऐकायला तयार नव्हता, उलट त्याने जाऊन त्याच्या सोबतीच्या दासाला त्याचं पूर्ण कर्ज फेडेपर्यंत तुरुंगात टाकलं. ३१  इतर दासांनी हे सर्व पाहिलं तेव्हा त्यांना खूप वाईट वाटलं आणि त्यांनी त्यांच्या मालकाकडे जाऊन घडलेली सर्व हकिगत त्याला सांगितली. ३२  तेव्हा त्याच्या मालकाने त्याला बोलावून म्हटलं: ‘अरे दुष्ट दासा! तू माझ्यापुढे गयावया केली तेव्हा मी तुझं सगळं कर्ज माफ केलं. ३३  मग, जशी मी तुला दया दाखवली तशीच तूही तुझ्या सोबतीच्या दासाला दाखवायला नको होती का?’ ३४  तेव्हा मालक अतिशय संतापला आणि तो दास सर्व कर्ज फेडत नाही तोपर्यंत त्याने त्याला तुरुंगातील शिपायांच्या हाती सोपवून दिलं. ३५  त्याच प्रकारे, जर तुमच्यापैकी प्रत्येकाने आपल्या भावाला मनापासून क्षमा केली नाही, तर स्वर्गातील माझा पितासुद्धा तुमच्याशी असाच व्यवहार करेल.”

तळटीपा

किंवा “स्वतःत बदल करून.”
शब्दार्थसूची पाहा.
किंवा “पाप करायला प्रवृत्त करणाऱ्‍या कारणांमुळे.” शब्दशः “अडखळायला लावणाऱ्‍या दगडांमुळे.”
शब्दार्थसूची पाहा.
बायबलच्या काही प्राचीन हस्तलिखितांमध्ये हे वचन आढळत नाही आणि त्यामुळे ते देवप्रेरित वचनांचा भाग नाही हे स्पष्ट आहे.
किंवा कदाचित, “तुमच्या.”
शब्दशः “आणि त्याची चूक सुधार.”
शब्दशः “तोंडून.”
अर्थात, चांदीची नाणी. शब्दशः “दहा हजार तालान्त इतकं.” शब्दार्थसूची पाहा.
शब्दार्थसूची पाहा.