मत्तय २२:१-४६
२२ पुन्हा एकदा येशू त्यांना उदाहरणे देऊन म्हणाला:
२ “स्वर्गाचं राज्य अशा एका राजासारखं आहे, ज्याने आपल्या मुलाच्या लग्नाची मेजवानी दिली.
३ आणि ज्यांना लग्नाच्या मेजवानीचं आमंत्रण देण्यात आलं होतं त्यांना बोलावण्यासाठी त्याने आपल्या दासांना पाठवलं, पण ते यायला तयार नव्हते.
४ मग त्याने आणखी काही दासांना असं म्हणून पाठवलं, ‘आमंत्रित लोकांना सांगा: “पाहा! जेवण तयार आहे, मी माझे बैल आणि धष्टपुष्ट पशू कापले आहेत आणि सर्व तयारी झाली आहे. तेव्हा, मेजवानीला चला.”’
५ पण त्यांनी जराही लक्ष दिलं नाही, उलट कोणी आपल्या शेतात तर कोणी आपल्या व्यापारासाठी निघून गेले;
६ आणि बाकीच्या लोकांनी त्याच्या दासांना धरून त्यांचा अपमान केला आणि त्यांना ठार मारलं.
७ तेव्हा राजाला खूप राग आला आणि त्याने आपलं सैन्य पाठवून त्या खुन्यांचा नाश केला आणि त्यांचं शहर जाळून टाकलं.
८ मग तो आपल्या दासांना म्हणाला, ‘लग्नाची मेजवानी तर तयार आहे, पण आमंत्रित लोक लायक नव्हते.
९ म्हणून, शहरातील मुख्य रस्त्यांवर जा आणि जो कोणी तुम्हाला दिसेल त्याला लग्नाच्या मेजवानीचं आमंत्रण द्या.’
१० तेव्हा, त्याचे दास बाहेर रस्त्यांवर गेले आणि जो कोणी सापडेल, मग तो चांगला असो किंवा वाईट, त्या सर्वांना त्यांनी एकत्र केलं; आणि लग्नाचं सभागृह, मेजवानीला आलेल्या लोकांनी भरून गेलं.
११ राजा पाहुण्यांना पाहायला आत आला तेव्हा त्याची नजर अशा एका माणसावर गेली, ज्याने लग्नाचा पोशाख घातला नव्हता.
१२ तेव्हा तो त्याला म्हणाला, ‘लग्नाचा पोशाख न घालता तू आत कसा काय आलास?’ त्याला काहीही उत्तर देता आलं नाही.
१३ तेव्हा राजा आपल्या सेवकांना म्हणाला, ‘याचे हातपाय बांधून याला बाहेर अंधारात टाकून द्या. तिथे तो रडेल आणि दात खाईल.’
१४ कारण आमंत्रण मिळालेले लोक तर बरेच आहेत, पण निवडलेले फार कमी.”
१५ तेव्हा परूशी लोक निघून गेले आणि त्याला बोलण्यात कसे पकडता येईल, याविषयी त्यांनी कट केला.
१६ मग, त्यांनी आपल्या शिष्यांना आणि हेरोदच्या पक्षाच्या सदस्यांना त्याच्याकडे पाठवले. ते येशूला म्हणाले: “हे गुरू, तुम्ही नेहमी खरं तेच बोलता आणि देवाचा मार्ग अगदी खरेपणाने शिकवता हे आम्हाला माहीत आहे; तसंच, तुम्ही कोणाची मर्जी मिळवण्याचा प्रयत्न करत नाही कारण तुम्ही कोणाचं तोंड पाहून बोलत नाही.
१७ तेव्हा आम्हाला सांगा, कैसराला* कर देणं नियमानुसार योग्य आहे की नाही? तुम्हाला काय वाटतं?”
१८ पण येशूने त्यांचा दुष्ट हेतू ओळखून म्हटले: “अरे ढोंग्यांनो, माझी परीक्षा पाहण्याचा प्रयत्न का करता?
१९ मला कराचं नाणं दाखवा.” तेव्हा त्यांनी त्याला एक दिनाराचं* नाणं आणून दिलं.
२० तो त्यांना म्हणाला: “हे चित्र आणि यावर लिहिलेलं नाव कोणाचं आहे?”
२१ ते म्हणाले: “कैसराचं.” तेव्हा तो त्यांना म्हणाला: “तर मग, जे कैसराचं आहे ते कैसराला द्या, पण जे देवाचं आहे ते देवाला द्या.”
२२ हे ऐकून ते थक्क झाले आणि त्याला सोडून निघून गेले.
२३ त्याच दिवशी, पुनरुत्थान* नाही असे म्हणणारे सदूकी लोक त्याच्याजवळ आले आणि त्यांनी त्याला विचारले:
२४ “गुरुजी, मोशेने सांगितलं आहे की ‘मूल नसलेल्या एखाद्या माणसाचा मृत्यू झाला, तर त्याच्या भावाने त्याच्या बायकोशी लग्न करावं आणि आपल्या भावाचा वंश चालवावा.’
२५ आमच्या इथे सात भाऊ होते. पहिल्याचं लग्न झालं आणि तो मेला. पण त्याला मूल नव्हतं, त्यामुळे त्याची बायको त्याच्या भावाची झाली.
२६ दुसऱ्या आणि तिसऱ्या भावासोबत, आणि नंतर सातही जणांसोबत असंच झालं.
२७ शेवटी, त्या स्त्रीचाही मृत्यू झाला.
२८ तर मग, पुनरुत्थान झाल्यावर ती त्या सात भावांपैकी कोणाची बायको होईल? कारण त्या सातही जणांनी तिच्याशी लग्न केलं होतं.”
२९ येशूने त्यांना उत्तर दिले: “तुमचा गैरसमज झाला आहे, कारण तुम्हाला शास्त्रवचनांचं ज्ञान नाही आणि तुम्ही देवाचं सामर्थ्यदेखील जाणत नाही;
३० कारण पुनरुत्थान झाल्यावर पुरुष लग्न करत नाहीत आणि स्त्रियांचंही लग्न करून दिलं जात नाही, तर ते स्वर्गातल्या देवदूतांसारखे असतात.
३१ मेलेल्यांच्या पुनरुत्थानाबद्दल देवाने सांगितलेले हे शब्द तुम्ही वाचले नाहीत का:
३२ ‘मी अब्राहामचा देव, इसहाकचा देव आणि याकोबचा देव आहे’? तो मेलेल्यांचा नाही तर जिवंतांचा देव आहे.”
३३ हे ऐकल्यावर लोक त्याच्या शिकवणीवरून चकित झाले.
३४ त्याने सदूकी लोकांना कशा प्रकारे निरुत्तर केले, हे परूश्यांनी ऐकले तेव्हा ते सर्व मिळून त्याच्याजवळ आले.
३५ आणि त्यांच्यापैकी नियमशास्त्राचा जाणकार असलेल्या एकाने त्याची परीक्षा पाहण्यासाठी असे विचारले:
३६ “गुरू, नियमशास्त्रातली सर्वात महत्त्वाची आज्ञा कोणती?”
३७ तो त्याला म्हणाला: “‘तू आपला देव यहोवा* याच्यावर आपल्या पूर्ण मनाने आणि आपल्या पूर्ण जिवाने* आणि आपल्या पूर्ण बुद्धीने प्रेम कर.’
३८ हीच सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली आज्ञा आहे.
३९ तिच्यासारखीच दुसरी आज्ञा ही आहे: ‘तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखंच प्रेम कर.’
४० संपूर्ण नियमशास्त्र आणि संदेष्ट्यांची सगळी लिखाणे याच दोन आज्ञांवर आधारित आहेत.”
४१ मग, परूशी एकत्र जमलेले असताना येशूने त्यांना विचारले:
४२ “ख्रिस्ताबद्दल तुम्हाला काय वाटतं? तो कोणाचा पुत्र आहे?” ते त्याला म्हणाले: “दावीदचा.”
४३ त्याने त्यांना विचारले: “तर मग, देवाच्या प्रेरणेने दावीद त्याला प्रभू म्हणून संबोधून असं का म्हणतो, की
४४ ‘यहोवा* माझ्या प्रभूला म्हणतो: “मी तुझ्या शत्रूंना तुझ्या पायाखाली तुडवेपर्यंत माझ्या उजव्या हाताला बस”’?
४५ मग, जर दावीद त्याला प्रभू म्हणतो, तर तो त्याचा पुत्र कसा काय असू शकतो?”
४६ तेव्हा, कोणी त्याला एका शब्दानेही उत्तर देऊ शकले नाही, आणि त्या दिवसापासून त्याला काही विचारण्याचेही कोणी धाडस केले नाही.
तळटीपा
^ किंवा “रोमी सम्राटाला.” शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दार्थसूची पाहा.