मत्तय २४:१-५१
२४ मग येशू मंदिरातून बाहेर जात असताना त्याचे शिष्य त्याच्याजवळ येऊन त्याला मंदिराच्या इमारती दाखवू लागले.
२ तेव्हा तो त्यांना म्हणाला: “तुम्ही या सर्व गोष्टी पाहात आहात ना? मी तुम्हाला खरं सांगतो, या ठिकाणी एकाही दगडावर दगड राहणार नाही, प्रत्येक दगड खाली पाडला जाईल.”
३ तो जैतुनांच्या डोंगरावर बसलेला असताना, शिष्य एकांतात त्याच्याजवळ येऊन म्हणाले: “आम्हाला सांग, या गोष्टी केव्हा होतील आणि तुझ्या उपस्थितीचं* आणि जगाच्या व्यवस्थेच्या समाप्तीचं* चिन्ह काय असेल?”
४ येशूने त्यांना उत्तर दिले: “तुम्हाला कोणी फसवू नये म्हणून सावध असा,
५ कारण माझ्या नावाने बरेच जण येतील आणि ‘मी ख्रिस्त आहे,’ असं म्हणून अनेकांना फसवतील.
६ तुम्ही लढायांचा आवाज आणि लढायांविषयीच्या बातम्या ऐकाल. पण सांभाळा, घाबरून जाऊ नका, कारण या गोष्टी घडणं आवश्यक आहे, पण इतक्यात अंत येणार नाही.
७ कारण एका राष्ट्रावर दुसरं राष्ट्र आणि एका राज्यावर दुसरं राज्य हल्ला करेल, आणि ठिकठिकाणी दुष्काळ पडतील व भूकंप होतील.
८ या सर्व गोष्टी संकटांची* केवळ सुरुवात असेल.
९ तेव्हा लोक तुमचा छळ करण्यासाठी तुम्हाला अधिकाऱ्यांच्या स्वाधीन करतील आणि तुम्हाला ठार मारतील, आणि माझ्या नावामुळे सर्व राष्ट्रे तुमचा द्वेष करतील.
१० तसंच, तेव्हा बरेच लोक अडखळतील* आणि एकमेकांचा विश्वासघात करतील व एकमेकांचा द्वेष करतील.
११ पुष्कळ खोटे संदेष्टे उठून अनेकांना फसवतील;
१२ आणि अनीती वाढल्यामुळे पुष्कळांचं प्रेम थंड होईल.
१३ पण जो शेवटपर्यंत धीर धरेल* त्यालाच वाचवलं जाईल.*
१४ आणि सर्व राष्ट्रांना साक्ष मिळावी म्हणून राज्याचा हा आनंदाचा संदेश सर्व जगात घोषित केला जाईल, आणि त्यानंतर अंत येईल.
१५ म्हणून दानीएल संदेष्ट्याने सांगितलेली ओसाडीची घृणास्पद वस्तू जेव्हा पवित्र स्थानात उभी असलेली तुम्ही पाहाल (वाचणाऱ्याने समजून घ्यावे),
१६ तेव्हा जे यहूदीयात आहेत त्यांनी डोंगरांकडे पळून जाण्यास सुरुवात करावी.
१७ घराच्या छतावर असलेल्या माणसाने आपल्या घरातून काही वस्तू घेण्यासाठी खाली येऊ नये,
१८ आणि शेतात असलेल्या माणसाने आपले बाह्य वस्त्र घेण्यासाठी परत जाऊ नये.
१९ त्या दिवसांत गरोदर आणि अंगावर पाजणाऱ्या स्त्रियांची फार दुर्दशा होईल!
२० तुम्हाला हिवाळ्यात किंवा शब्बाथाच्या दिवशी पळून जावं लागू नये म्हणून प्रार्थना करत राहा;
२१ कारण तेव्हा, जगाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत आलं नाही आणि पुन्हा कधीही येणार नाही असं मोठं संकट येईल.
२२ खरं पाहता, जर ते दिवस कमी करण्यात आले नाहीत, तर कोणत्याही मनुष्याचा निभाव लागणार नाही; पण निवडलेल्या लोकांसाठी ते दिवस कमी केले जातील.
२३ तेव्हा जर कोणी तुम्हाला म्हटलं, की ‘पाहा! ख्रिस्त इथे आहे,’ किंवा ‘तिथे आहे!’ तर त्यावर विश्वास ठेवू नका.
२४ कारण खोटे ख्रिस्त आणि खोटे संदेष्टे उठतील आणि लोकांना, इतकंच काय तर निवडलेल्या लोकांनाही फसवण्यासाठी मोठमोठी चिन्हे आणि चमत्कार करतील.
२५ पण पाहा! मी तुम्हाला आधीच सांगून ठेवलं आहे.
२६ म्हणून, जर लोक तुम्हाला म्हणाले, की ‘पाहा! तो ओसाड प्रदेशात आहे,’ तर बाहेर जाऊ नका; किंवा ‘पाहा! तो आतल्या खोल्यांमध्ये आहे,’ तर त्यांच्यावर विश्वास ठेवू नका.
२७ कारण वीज जशी पूर्वेकडे चमकून पश्चिमेपर्यंत चकाकत जाते, तशीच मनुष्याच्या पुत्राची उपस्थितीदेखील* असेल.
२८ जिथे प्रेत आहे तिथे गिधाडे जमा होतील.
२९ त्या दिवसांतील संकटानंतर लगेच सूर्य अंधकारमय होईल आणि चंद्र प्रकाश देणार नाही, आणि तारे आकाशातून पडतील व आकाशातील शक्तींना हादरे बसतील.
३० मग, मनुष्याच्या पुत्राचं चिन्ह आकाशात दिसेल आणि पृथ्वीवर सर्व वंशांचे लोक दुःखाने छाती बडवून घेतील, आणि ते मनुष्याच्या पुत्राला आकाशातील ढगांवर सामर्थ्याने व मोठ्या वैभवाने येताना पाहतील.
३१ आणि तो आपल्या देवदूतांना कर्ण्याच्या मोठ्या आवाजासहित पाठवेल आणि ते आकाशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत त्याच्या निवडलेल्या लोकांना चारही दिशांतून* गोळा करतील.
३२ आता अंजिराच्या झाडाच्या या उदाहरणावरून एक गोष्ट समजून घ्या: अंजिराच्या झाडाच्या कोवळ्या फांदीला जेव्हा पालवी फुटते तेव्हा उन्हाळा जवळ आला आहे हे तुम्ही ओळखता.
३३ त्याच प्रकारे तुम्हीदेखील या सर्व गोष्टी पाहाल तेव्हा तो दाराशीच आहे हे ओळखा.
३४ मी तुम्हाला खरं सांगतो, या सर्व गोष्टी पूर्ण होईपर्यंत ही पिढी मुळीच नाहीशी होणार नाही.
३५ आकाश आणि पृथ्वी नाहीशी होतील पण माझे शब्द पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाहीत.
३६ त्या दिवसाबद्दल आणि त्या वेळेबद्दल कोणालाही माहीत नाही, स्वर्गातल्या देवदूतांना नाही आणि पुत्रालाही नाही; केवळ पित्याला माहीत आहे.
३७ कारण नोहाच्या दिवसांत जसं होतं तसंच मनुष्याच्या पुत्राच्या उपस्थितीच्या* काळातही घडेल.
३८ कारण जलप्रलय येण्याआधीच्या काळात, नोहा जहाजात* गेला त्या दिवसापर्यंत लोक खातपीत होते, स्त्रीपुरुषांची लग्न होत होती
३९ आणि जलप्रलय येऊन ते सर्व त्यात वाहून जाईपर्यंत त्यांनी लक्ष दिलं नाही. तसंच मनुष्याच्या पुत्राच्या उपस्थितीच्या काळातही घडेल.
४० तेव्हा जर दोन माणसं शेतात असतील, तर एकाला घेतलं जाईल आणि दुसऱ्याला सोडून दिलं जाईल.
४१ दोन स्त्रिया जात्यावर दळत असतील, तर एकीला घेतलं जाईल आणि दुसरीला सोडून दिलं जाईल.
४२ म्हणून जागृत राहा, कारण तुमचा प्रभू कोणत्या दिवशी येत आहे हे तुम्हाला माहीत नाही.
४३ पण एक गोष्ट लक्षात असू द्या: चोर कोणत्या प्रहरी* येणार आहे हे जर घराच्या मालकाला माहीत असतं, तर तो जागाच राहिला असता आणि त्याने त्याला आपलं घर फोडू दिलं नसतं.
४४ म्हणून तुम्हीही तयार राहा, कारण तुम्ही विचारही केला नसेल अशा वेळी मनुष्याचा पुत्र येत आहे.
४५ मग, आपल्या घरातील सेवकांना योग्य वेळी अन्न पुरवण्यासाठी मालकाने ज्याला नेमलं, असा विश्वासू आणि बुद्धिमान* दास खरोखर कोण आहे?
४६ मालक परत आल्यावर तो त्याला असं करताना आढळला, तर तो दास आशीर्वादित ठरेल!
४७ मी तुम्हाला खरं सांगतो, तो त्याला आपल्या सर्व मालमत्तेवर नियुक्त करेल.
४८ पण जर त्या दुष्ट दासाने कधी आपल्या मनात असं म्हटलं, की ‘माझ्या मालकाला परत यायला उशीर लागत आहे,’
४९ आणि जर तो आपल्या सोबतीच्या दासांना मारहाण करू लागला आणि अट्टल दारुड्यांसोबत खाऊपिऊ लागला,
५० तर त्याने अपेक्षाही केली नसेल अशा दिवशी आणि त्याने कल्पनाही केली नसेल अशा वेळी त्याचा मालक येईल,
५१ आणि तो त्याला सर्वात कडक अशी शिक्षा देईल आणि ढोंगी लोकांमध्ये त्याला वाटा देईल* आणि तिथे तो रडेल आणि दात खाईल.
तळटीपा
^ शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा “सध्याच्या काळाच्या समाप्तीचं.” शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दशः “बाळाच्या जन्माच्या वेळी स्त्रीला येणाऱ्या कळांची.”
^ किंवा “आपला विश्वास गमावतील.”
^ किंवा “धीर धरतो.”
^ किंवा “त्याचंच तारण होईल.”
^ शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दशः “वाऱ्यांतून.”
^ शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दशः “पेटी.” हे चौकोनी कोपरे आणि सपाट बूड असलेल्या पेटीच्या आकाराच्या एका लांबुळक्या जहाजाला सूचित करते.
^ किंवा “रात्री कोणत्या वेळी.”
^ किंवा “समजदार.”
^ किंवा “ढोंगी लोकांसारखीच त्याची अवस्था करेल.”