मत्तय २५:१-४६

  • ख्रिस्ताच्या उपस्थितीचे चिन्ह (१-४६)

    • दहा कुमारींचे उदाहरण (१-१३)

    • तालान्तांचे उदाहरण (१४-३०)

    • मेंढरे आणि बकऱ्‍या (३१-४६)

२५  स्वर्गाचं राज्य दहा कुमारींसारखं आहे, ज्या आपले दिवे घेऊन वराला भेटायला निघाल्या. २  त्यांपैकी पाच मूर्ख होत्या आणि पाच समजदार* होत्या. ३  कारण मूर्ख कुमारींनी दिवे तर घेतले, पण सोबत तेल घेतलं नाही, ४  पण समजदार कुमारींनी मात्र दिव्यांसोबत भांड्यांत तेलही घेतलं. ५  वराला यायला उशीर होऊ लागला तेव्हा त्या सर्व पेंगू लागल्या आणि झोपल्या. ६  मग मध्यरात्री अशी हाक आली: ‘पाहा, वर येत आहे! त्याला भेटायला बाहेर चला.’ ७  तेव्हा त्या सर्व कुमारी उठल्या आणि आपले दिवे नीट करू लागल्या. ८  मग मूर्ख कुमारी समजदार कुमारींना म्हणू लागल्या, ‘तुमच्यातलं थोडं तेल आम्हाला द्या, कारण आमचे दिवे विझू लागले आहेत.’ ९  पण समजदार कुमारी त्यांना म्हणाल्या: ‘आमच्याजवळ असलेलं तेल कदाचित आपल्या सर्वांना पुरणार नाही. म्हणून तुम्ही विकणाऱ्‍यांकडे जाऊन ते विकत घ्या.’ १०  त्या तेल विकत घ्यायला जात असतानाच वर आला. तेव्हा ज्या कुमारी तयार होत्या त्या वरासोबत लग्नाच्या मेजवानीला आत गेल्या आणि दार बंद करण्यात आलं. ११  नंतर बाकीच्या कुमारीही आल्या आणि म्हणू लागल्या, ‘प्रभू, प्रभू, आमच्यासाठी दार उघड!’ १२  पण त्याने त्यांना उत्तर दिलं: ‘मी तुम्हाला खरं सांगतो, मी तुम्हाला ओळखत नाही.’ १३  म्हणून सतत जागृत राहा, कारण तो दिवस आणि ती वेळही तुम्हाला माहीत नाही. १४  स्वर्गाचं राज्य अशा एका माणसासारखं आहे ज्याने परदेशी जाण्याआधी आपल्या दासांना बोलावलं आणि आपली संपत्ती त्यांना सोपवली. १५  त्याने एकाला पाच तालान्त,* दुसऱ्‍याला दोन तालान्त आणि आणखी एकाला एक तालान्त, असे ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे दिले आणि तो परदेशी गेला. १६  ज्याला पाच तालान्त मिळाले होते, त्याने लगेच जाऊन त्यांवर व्यापार केला आणि आणखी पाच तालान्त मिळवले. १७  त्याच प्रकारे, ज्याला दोन तालान्त मिळाले होते त्याने आणखी दोन मिळवले. १८  पण ज्याला फक्‍त एक तालान्त मिळाला होता त्याने जाऊन आपल्या मालकाचे पैसे* जमिनीत लपवून ठेवले. १९  बऱ्‍याच काळानंतर त्या दासांचा मालक आला आणि त्याने त्यांच्याकडून हिशोब मागितला. २०  तेव्हा ज्याला पाच तालान्त मिळाले होते तो पुढे आला आणि त्याने आणखी पाच तालान्त आणून मालकाला म्हटलं, ‘मालक, तुम्ही मला पाच तालान्त दिले होते, हे पाहा, मी आणखी पाच मिळवले आहेत.’ २१  त्याचा मालक त्याला म्हणाला: ‘शाब्बास, चांगल्या व विश्‍वासू दासा! तू थोड्या गोष्टींविषयी विश्‍वासू ठरला. मी तुला पुष्कळ गोष्टींवर अधिकार देईन. आपल्या मालकाच्या आनंदात सहभागी हो.’ २२  मग ज्याला दोन तालान्त मिळाले होते तो पुढे येऊन म्हणाला, ‘मालक, तुम्ही मला दोन तालान्त दिले होते; पाहा, मी आणखी दोन मिळवले आहेत.’ २३  त्याचा मालक त्याला म्हणाला: ‘शाब्बास, चांगल्या व विश्‍वासू दासा! तू थोड्या गोष्टींविषयी विश्‍वासू ठरला. मी तुला पुष्कळ गोष्टींवर अधिकार देईन. आपल्या मालकाच्या आनंदात सहभागी हो.’ २४  शेवटी ज्याला एक तालान्त मिळाला होता तो पुढे येऊन म्हणाला: ‘मालक, तुम्ही कठोर आहात हे मला माहीत होतं. तुम्ही जिथे पेरणी केली नाही तिथे कापणी करता आणि जिथे विखरले नाही तिथून धान्य गोळा करता. २५  म्हणून मला भीती वाटली आणि मी तुमचा तालान्त जमिनीत लपवून ठेवला. हे घ्या तुमचे पैसे.’ २६  तेव्हा मालकाने त्याला म्हटले: ‘अरे दुष्ट आणि आळशी दासा, मी जिथे पेरणी केली नाही तिथे कापणी करतो आणि जिथे विखरले नाही तिथून धान्य गोळा करतो, हे तुला माहीत होतं ना? २७  मग, तू माझा पैसा* सावकाराकडे ठेवायचा असतास, म्हणजे परत आल्यावर तो मला व्याजासहित मिळाला असता. २८  म्हणून याच्याकडचा तालान्त घ्या आणि ज्याच्याजवळ दहा तालान्त आहेत त्याला तो द्या. २९  कारण ज्याच्याजवळ आहे त्याला आणखी देण्यात येईल आणि त्याच्याजवळ भरपूर होईल. पण ज्याच्याजवळ नाही, त्याच्याकडे जे आहे तेसुद्धा काढून घेतलं जाईल. ३०  आणि या निरुपयोगी दासाला बाहेर अंधारात टाकून द्या. तिथे तो रडेल आणि दात खाईल.’ ३१  जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवात येईल आणि सर्व देवदूत त्याच्यासोबत येतील, तेव्हा तो आपल्या वैभवी राजासनावर बसेल. ३२  सर्व राष्ट्रांना त्याच्यापुढे जमवलं जाईल आणि जसा मेंढपाळ मेंढरांना बकऱ्‍यांपासून वेगळं करतो तसा तो लोकांना एकमेकांपासून वेगळं करेल. ३३  आणि तो मेंढरांना आपल्या उजव्या हाताला, तर बकऱ्‍यांना डाव्या हाताला ठेवेल. ३४  मग जे राजाच्या उजवीकडे असतील त्यांना तो म्हणेल: ‘माझ्या पित्याने आशीर्वादित केलेल्यांनो, या! जगाच्या स्थापनेपासून तुमच्यासाठी तयार करण्यात आलेल्या राज्याचं वतन घ्या. ३५  कारण मी उपाशी होतो तेव्हा तुम्ही मला खायला दिलं, मी तहानलेला होतो तेव्हा तुम्ही मला पाणी दिलं. मी अनोळखी होतो तरी तुम्ही मला आपल्या घरात घेतलं; ३६  मी उघडा होतो* तेव्हा तुम्ही मला कपडे दिले. मी आजारी पडलो तेव्हा तुम्ही माझी काळजी घेतली, तुरुंगात होतो तेव्हा तुम्ही मला भेटायला आला.’ ३७  मग ते नीतिमान लोक त्याला म्हणतील: ‘प्रभू, आम्ही तुला उपाशी असलेला पाहून केव्हा खायला दिलं, किंवा तहानलेला पाहून केव्हा पाणी दिलं? ३८  तू अनोळखी असताना आम्ही केव्हा तुला घरात घेतलं, किंवा उघडा आहेस हे पाहून केव्हा कपडे दिले? ३९  आम्ही तुला आजारी, किंवा तुरुंगात पाहून केव्हा भेटायला आलो?’ ४०  तेव्हा राजा त्यांना उत्तर देईल: ‘मी तुम्हाला खरं सांगतो, या माझ्या भावांपैकी सर्वात लहानासाठी तुम्ही जे काही केलं ते माझ्यासाठीच केलं.’ ४१  मग त्याच्या डावीकडे असलेल्यांना तो म्हणेल: ‘अरे शापित लोकांनो, माझ्यापुढून निघून जा आणि सैतान* व त्याच्या दूतांसाठी तयार केलेल्या सर्वकाळाच्या अग्नीत जा. ४२  कारण मी उपाशी होतो, पण तुम्ही मला खायला दिलं नाही; मी तहानलेला होतो, पण तुम्ही मला पाणी दिलं नाही. ४३  मी अनोळखी होतो पण तुम्ही मला आपल्या घरात घेतलं नाही; उघडा होतो पण तुम्ही मला कपडे दिले नाहीत. मी आजारी पडलो आणि तुरुंगात होतो, पण तुम्ही माझी काळजी घेतली नाही.’ ४४  मग तेसुद्धा त्याला म्हणतील: ‘प्रभू, आम्ही तुला उपाशी किंवा तहानलेला, अनोळखी किंवा उघडा, आजारी किंवा तुरुंगात असलेला पाहून तुझी सेवा केली नाही, असं केव्हा घडलं?’ ४५  तेव्हा तो त्यांना उत्तर देईल: ‘मी तुम्हाला खरं सांगतो, यांपैकी सर्वात लहानासाठी तुम्ही जे केलं नाही, ते माझ्यासाठीही केलं नाही.’ ४६  हे लोक सर्वकाळाचा नाश होण्यासाठी जातील* तर नीतिमान लोक सर्वकाळाचं जीवन उपभोगण्यासाठी जातील.”

तळटीपा

किंवा “बुद्धिमान.”
तालान्त हे वजन आणि पैसे मोजण्याचे हिब्रू लोकांचे सर्वात मोठे माप होते. पहिल्या शतकात, एक ग्रीक तालान्त सुमारे २०.४ किलोग्राम चांदीच्या नाण्यांइतके होते. शब्दार्थसूची पाहा.
शब्दशः “चांदी.”
शब्दशः “चांदी.”
किंवा “माझ्या अंगावर पुरेसे कपडे नव्हते.”
शब्दशः “दियाबल.” म्हणजे, निंदा करणारा.
शब्दशः “छाटून टाकले जातील.” अर्थात, जीवनातून.