मत्तय २८:१-२०
२८ शब्बाथानंतर, आठवड्याचा पहिला दिवस उजाडत असताना मग्दालीया मरीया आणि दुसरी मरीया येशूची कबर पाहण्यासाठी आल्या.
२ आणि पाहा! मोठा भूकंप झाला होता कारण यहोवाचा* दूत स्वर्गातून उतरला होता आणि कबरेच्या दारावरील दगड लोटून तो त्यावर बसला होता.
३ त्याचे रूप चमकणाऱ्या विजेसारखे होते आणि त्याचे कपडे बर्फासारखे शुभ्र होते.
४ त्याला पाहून पहारेकरी भीतीने थरथर कापू लागले आणि मेलेल्या माणसांसारखी त्यांची स्थिती झाली.
५ पण देवदूत त्या स्त्रियांना म्हणाला: “भिऊ नका, कारण ज्याला वधस्तंभावर* मृत्युदंड देण्यात आला, त्या येशूला तुम्ही शोधत आहात हे मला माहीत आहे.
६ तो इथे नाही कारण त्याने म्हटल्याप्रमाणे त्याला उठवण्यात आलं आहे. या, आणि त्याला जिथे ठेवण्यात आलं होतं ती जागा पाहा.
७ मग लगेच जाऊन त्याच्या शिष्यांना सांगा, की त्याला मेलेल्यांतून उठवण्यात आलं आहे, कारण पाहा! तो तुमच्यापुढे गालीलात जात आहे. तुम्ही त्याला तिथे पाहाल. पाहा! मी हाच संदेश सांगण्यासाठी आलो आहे.”
८ तेव्हा स्मारक कबरेजवळून निघून त्याच्या शिष्यांना ही बातमी सांगायला त्या धावत निघाल्या. त्या फार घाबरलेल्या होत्या पण अतिशय आनंदितही होत्या.
९ आणि पाहा! येशू त्यांना भेटला आणि म्हणाला: “तुम्हाला शांती असो!” तेव्हा त्याच्याजवळ जाऊन त्यांनी त्याचे पाय धरले आणि त्याला नमन केले.
१० तेव्हा येशू त्यांना म्हणाला: “भिऊ नका! तर जाऊन माझ्या बांधवांना ही बातमी सांगा म्हणजे ते गालीलात जातील आणि तिथे ते मला पाहतील.”
११ त्या जात असताना पहारेकऱ्यांपैकी काही जण शहरात गेले आणि त्यांनी घडलेली सगळी हकिगत मुख्य याजकांना सांगितली.
१२ मग त्यांनी वडीलजनांसोबत मिळून सल्लामसलत केल्यानंतर, सैनिकांना भरपूर चांदीची नाणी दिली
१३ आणि म्हटले: “असं म्हणा, की ‘आम्ही रात्री झोपेत असताना त्याच्या शिष्यांनी येऊन त्याला चोरून नेले.’
१४ आणि ही गोष्ट राज्यपालाच्या कानावर गेलीच, तर आम्ही त्याला सर्वकाही समजावून सांगू,* तुम्हाला चिंता करण्याची काही गरज नाही.”
१५ तेव्हा त्यांनी ती चांदीची नाणी घेऊन त्यांना सांगितल्याप्रमाणे केले, आणि हीच गोष्ट यहुद्यांमध्ये पसरली आणि आजपर्यंत सांगितली जाते.
१६ इकडे, अकरा शिष्य गालीलात येशूने त्यांना जिथे भेटायचे ठरवले होते त्या डोंगरावर गेले.
१७ त्याला पाहिल्यावर त्यांनी त्याला नमन केले, पण काहींच्या मनात शंका आली.
१८ येशू त्यांच्याजवळ येऊन त्यांच्याशी बोलला. तो त्यांना म्हणाला: “स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला देण्यात आला आहे.
१९ म्हणून, जा आणि सर्व राष्ट्रांच्या लोकांना शिष्य करा आणि त्यांना पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या* नावाने बाप्तिस्मा द्या,
२० व मी तुम्हाला आज्ञा दिलेल्या सर्व गोष्टी त्यांना पाळायला शिकवा. आणि पाहा! जगाच्या व्यवस्थेच्या समाप्तीपर्यंत* मी नेहमी तुमच्यासोबत असेन.”
तळटीपा
^ शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दशः “त्याचं मन वळवू.”
^ किंवा “देवाच्या क्रियाशील शक्तीच्या.” शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा “सध्याच्या काळाच्या समाप्तीपर्यंत.” शब्दार्थसूची पाहा.