मत्तय ४:१-२५
४ मग, पवित्र आत्म्याने येशूला ओसाड प्रदेशात नेले आणि तिथे सैतानाने* त्याची परीक्षा घेतली.
२ त्याने चाळीस दिवस व चाळीस रात्री उपास केल्यानंतर त्याला भूक लागली.
३ तेव्हा परीक्षा घेणारा त्याच्याजवळ आला आणि त्याला म्हणाला: “तू जर देवाचा पुत्र असशील, तर या दगडांना भाकरी व्हायला सांग.”
४ पण, त्याने उत्तर दिले: “‘मनुष्याने केवळ भाकरीनेच नाही, तर यहोवाच्या* तोंडून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगावे,’ असं लिहिलं आहे.”
५ मग सैतानाने त्याला पवित्र नगरात नेले आणि मंदिराच्या भिंतीवर एका उंच ठिकाणी उभे केले.
६ तो त्याला म्हणाला: “तू जर देवाचा पुत्र असशील, तर खाली उडी टाक, कारण असं लिहिलं आहे: ‘तो आपल्या दूतांना तुझ्यासाठी आज्ञा देईल,’ आणि, ‘तुझा पाय दगडावर आपटू नये म्हणून ते तुला हातांवर झेलून घेतील.’”
७ येशू त्याला म्हणाला: “असंही लिहिलं आहे: ‘तुझा देव यहोवा* याची परीक्षा पाहू नकोस.’”
८ मग सैतानाने त्याला एका अतिशय उंच डोंगरावर नेले आणि जगातली सर्व राज्ये व त्यांचे वैभव त्याला दाखवले.
९ तो त्याला म्हणाला: “तू एकदा माझ्या पाया पडून माझी उपासना केलीस, तर हे सर्व मी तुला देईन.”
१० मग येशूने त्याला म्हटले: “अरे सैताना! चालता हो! कारण असं लिहिलं आहे: ‘तू केवळ तुझा देव यहोवा* याचीच उपासना कर आणि केवळ त्याचीच पवित्र सेवा कर.’”
११ मग सैतान त्याला सोडून निघून गेला आणि पाहा! देवदूत येऊन त्याची सेवा करू लागले.
१२ नंतर, योहानला अटक झाली आहे हे ऐकल्यावर येशू गालीलात निघून गेला.
१३ पुढे, नासरेथ सोडून तो कफर्णहूमात राहू लागला, जे जबुलून व नफतालीच्या प्रांतांत गालील समुद्राजवळ आहे.
१४ अशा प्रकारे यशया संदेष्ट्याद्वारे जे सांगण्यात आले होते ते पूर्ण झाले; ते असे:
१५ “हे जबुलून व नफतालीच्या प्रदेशा, यार्देन नदीच्या पलीकडे समुद्रकिनाऱ्यावरील विदेश्यांच्या गालीला!
१६ अंधारात बसलेल्या लोकांना मोठा प्रकाश दिसला आणि मृत्युछायेच्या प्रदेशात बसलेल्यांवर प्रकाशाचा उदय झाला.”
१७ तेव्हापासून येशू असा प्रचार करू लागला: “पश्चात्ताप करा, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलं आहे.”
१८ मग गालील समुद्राजवळून जात असताना त्याला पेत्र म्हटलेला शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया हे दोघे दिसले. ते समुद्रात जाळे टाकत होते, कारण ते मासे धरणारे होते.
१९ तेव्हा तो त्यांना म्हणाला: “माझ्यामागे या, म्हणजे मी तुम्हाला माणसं धरणारे करीन.”
२० हे ऐकताच त्यांनी आपली जाळी टाकून दिली आणि ते त्याच्यामागे चालू लागले.
२१ तिथून पुढे गेल्यावर त्याला आणखी दोघे भाऊ दिसले, जब्दीचा मुलगा याकोब आणि त्याचा भाऊ योहान. ते आपल्या वडिलांसोबत म्हणजेच जब्दीसोबत नावेत जाळी नीट करत होते. तेव्हा येशूने त्यांना बोलावले.
२२ ते लगेच आपली नाव व आपले वडील यांना सोडून त्याच्यामागे गेले.
२३ मग येशू त्यांच्या सभास्थानांत शिकवत, राज्याबद्दलचा आनंदाचा संदेश घोषित करत आणि लोकांचे सर्व प्रकारचे आजार व सर्व प्रकारची दुखणी बरी करत सबंध गालीलात फिरला.
२४ तेव्हा, सूरियाच्या संपूर्ण प्रदेशात त्याची कीर्ती पसरली आणि लोक त्याच्याजवळ वेगवेगळ्या प्रकारचे आजार व दुखणी असलेल्यांना, दुरात्म्यांनी* पीडित असलेल्यांना, फेफरेकऱ्यांना* व लकवा मारलेल्यांना घेऊन आले आणि त्याने त्यांना बरे केले.
२५ यामुळे असे झाले, की गालील व दकापलीस* आणि यरुशलेम व यहूदीया, तसेच यार्देन नदीच्या पलीकडे असलेल्या प्रदेशातून मोठ्या संख्येने लोक त्याच्यामागे जाऊ लागले.
तळटीपा
^ शब्दशः “दियाबल.” म्हणजे, निंदा करणारा.
^ शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दार्थसूची पाहा.
^ अर्थात, ज्यांना फीट येण्याचा आजार आहे.
^ किंवा “दहा शहरांचा प्रदेश.” शब्दार्थसूची पाहा.