मत्तय ६:१-३४

  • डोंगरावरील उपदेश (१-३४)

    • ढोंगीपणा टाळा (१-४)

    • प्रार्थना कशी करावी? (५-१५)

      • आदर्श प्रार्थना (९-१३)

    • उपास (१६-१८)

    • पृथ्वीवर व स्वर्गात संपत्ती साठवणे (१९-२४)

    • चिंता करू नका (२५-३४)

      • आधी राज्य मिळवण्याचा प्रयत्न करा (३३)

 सांभाळा, लोकांनी आपल्याला पाहावं या उद्देशाने त्यांच्यासमोर चांगली कामं* करू नका; नाहीतर स्वर्गातील तुमच्या पित्याकडून तुम्हाला कोणतंही प्रतिफळ मिळणार नाही. २  त्यामुळे, तुम्ही दानधर्म करता तेव्हा लोकांनी आपली वाहवा करावी म्हणून ढोंगी लोकांप्रमाणे सभास्थानांत व रस्त्यांवर गाजावाजा* करू नका. मी तुम्हाला खरं सांगतो, त्यांना त्यांचं पूर्ण प्रतिफळ मिळालं आहे. ३  पण तुम्ही मात्र दानधर्म करता तेव्हा तुमचा उजवा हात काय करतो हे तुमच्या डाव्या हाताला कळायला नको, ४  म्हणजे तुमचं दानधर्म गुप्त राहील. आणि तुमचा पिता जो गुप्त गोष्टीही पाहू शकतो तो तुम्हाला प्रतिफळ देईल. ५  तसंच, तुम्ही प्रार्थना करता तेव्हा ढोंगी लोकांप्रमाणे करू नका; कारण लोकांनी आपल्याला पाहावं म्हणून सभास्थानांत व चौकांत उभे राहून प्रार्थना करायला त्यांना आवडतं. मी तुम्हाला खरं सांगतो, त्यांना त्यांचं पूर्ण प्रतिफळ मिळालं आहे. ६  पण, तुम्ही जेव्हा प्रार्थना करता तेव्हा आतल्या खोलीत जा, दार लावून घ्या व तुमच्या अदृश्‍य पित्याला* प्रार्थना करा. मग, तुमचा पिता जो गुप्त गोष्टीही पाहू शकतो तो तुम्हाला प्रतिफळ देईल. ७  प्रार्थना करताना तुम्ही विदेश्‍यांप्रमाणे त्याच त्या गोष्टी पुन्हापुन्हा बोलू नका; कारण आपण पुष्कळ बोललो तर आपली प्रार्थना ऐकली जाईल असं त्यांना वाटतं. ८  तेव्हा त्यांच्यासारखे होऊ नका, कारण तुम्हाला कशाची गरज आहे हे तुमच्या पित्याला तुम्ही मागण्याआधीच माहीत असतं. ९  तेव्हा अशा प्रकारे प्रार्थना करा: ‘हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझं नाव पवित्र मानलं जावो. १०  तुझं राज्य येवो. तुझी इच्छा जशी स्वर्गात पूर्ण होत आहे, तशी पृथ्वीवरही होवो. ११  आमची रोजची भाकर आज आम्हाला दे. १२  आणि जसं आम्ही आमच्या कर्जदारांना माफ केलं आहे, तसं तूदेखील आमची कर्जे* माफ कर. १३  आम्हाला मोहास बळी पडू देऊ नको,* तर त्या दुष्टापासून वाचव.’* १४  कारण जर तुम्ही इतरांच्या चुकांची क्षमा केली, तर तुमचा स्वर्गीय पिताही तुम्हाला क्षमा करेल; १५  पण, जर तुम्ही इतरांच्या चुकांची क्षमा केली नाही, तर तुमचा स्वर्गीय पिताही तुम्हाला क्षमा करणार नाही. १६  तुम्ही उपास करता तेव्हा ढोंगी लोकांप्रमाणे चेहरा उदास करण्याचं सोडून द्या, कारण आपण उपास करत आहोत हे लोकांना दिसावं म्हणून ते मुद्दामहून आपल्या स्वरूपाकडे दुर्लक्ष करतात. मी तुम्हाला खरं सांगतो, त्यांना त्यांचं पूर्ण प्रतिफळ मिळालं आहे. १७  पण तू मात्र उपास करताना आपल्या डोक्याला तेल लाव आणि आपलं तोंड धू, १८  म्हणजे तू उपास करत आहेस हे माणसांना नाही, तर केवळ तुझ्या अदृश्‍य* पित्याला दिसेल. आणि तुझा पिता जो गुप्त गोष्टीही पाहू शकतो तो तुला प्रतिफळ देईल. १९  पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवू नका, जिथे कसर* व गंज लागून ती नष्ट होते आणि चोर घरफोडी करून ती लुटतात. २०  त्याऐवजी स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती साठवा; तिथे कसर व गंज लागून ती नष्ट होत नाही आणि चोर घरफोडी करून ती लुटत नाहीत. २१  कारण जिथे तुझं धन, तिथे तुझं मनही असेल. २२  डोळा हा शरीराचा दिवा आहे. म्हणून जर तुमची नजर एकाग्र* असेल, तर तुमचं संपूर्ण शरीर प्रकाशमय होईल. २३  पण जर तुमची नजर ईर्ष्येने भरलेली* असेल, तर मात्र तुमचं पूर्ण शरीर अंधकारमय होईल. आणि जर तुमच्यात असलेला प्रकाशच अंधकारमय झाला, तर तो अंधकार किती मोठा असेल! २४  कोणीही दोन मालकांची सेवा करू शकत नाही; कारण तो एकतर एका मालकाचा द्वेष करेल आणि दुसऱ्‍यावर प्रेम करेल; किंवा एका मालकाशी एकनिष्ठ राहून दुसऱ्‍याला तुच्छ लेखेल. तुम्ही एकाच वेळी देवाची आणि धनाची सेवा करू शकत नाही. २५  म्हणूनच मी तुम्हाला सांगतो: काय खावं किंवा काय प्यावं अशी आपल्या जिवाबद्दल, किंवा काय घालावं अशी आपल्या शरीराबद्दल चिंता करण्याचं सोडून द्या. अन्‍नापेक्षा जीव आणि कपड्यांपेक्षा शरीर जास्त महत्त्वाचं नाही का? २६  आकाशातल्या पक्ष्यांकडे लक्ष द्या; ते पेरणी करत नाहीत, कापणी करत नाहीत किंवा कोठारांत धान्य साठवत नाहीत; तरीही तुमचा स्वर्गातील पिता त्यांना खाऊ घालतो. तुमचं मोल त्यांच्यापेक्षा जास्त नाही का? २७  चिंता करून कोणी आपलं आयुष्य हातभर वाढवू शकतो का? २८  तसंच, काय घालावं याची चिंता का करता? रानातल्या फुलांकडून धडा घ्या, ती कशी वाढतात; ती कष्ट करत नाहीत किंवा सूतही कातत नाहीत; २९  पण मी तुम्हाला सांगतो, की शलमोननेसुद्धा आपल्या सर्व वैभवात या फुलांसारखा सुंदर पेहराव केला नव्हता. ३०  रानातली झाडंझुडपं, जी आज आहेत आणि उद्या भट्टीत टाकली जातील, त्यांना जर देव इतकं सुंदर सजवतो, तर अरे अल्पविश्‍वासी* लोकांनो, तो तुम्हाला घालायला कपडे देणार नाही का? ३१  त्यामुळे, ‘काय खावं?,’ ‘काय प्यावं’ किंवा ‘काय घालावं?’ याची कधीही चिंता करू नका, ३२  कारण जगातले लोक या गोष्टी मिळवण्याची धडपड करत आहेत. तुम्हाला या सर्व गोष्टींची गरज आहे हे तुमच्या स्वर्गातील पित्याला माहीत आहे. ३३  तेव्हा, आधी देवाचं राज्य आणि त्याचं नीतिमत्त्व मिळवण्याचा प्रयत्न करत राहा, म्हणजे या सर्व गोष्टीही तुम्हाला मिळतील. ३४  म्हणून, उद्याची चिंता कधीही करू नका, कारण उद्याचा दिवस नव्या चिंता घेऊन उगवेल. ज्या दिवसाची चिंता त्या दिवसाला पुरे.

तळटीपा

किंवा “नीतिमत्त्वाचे आचरण.”
शब्दशः “आपल्यापुढे कर्णा वाजवू नका.”
किंवा “गुप्त ठिकाणी वसणाऱ्‍या.”
किंवा “पापे.”
शब्दशः “मोहात पाडू नकोस.”
किंवा “सोडव.”
किंवा “गुप्त ठिकाणी वसणाऱ्‍या.”
किंवा “कीड.”
किंवा “निर्दोष.” शब्दशः “साधी.”
शब्दशः “वाईट; दुष्ट.”
किंवा “कमी विश्‍वास असलेल्या.”