मत्तय ७:१-२९
७ तुमचे दोष काढले जाऊ नयेत म्हणून इतरांचे दोष काढण्याचं सोडून द्या;
२ कारण ज्या प्रकारे तुम्ही इतरांचा न्याय करत आहात त्याच प्रकारे तुमचाही न्याय केला जाईल, आणि ज्या मापाने तुम्ही इतरांना मापून देत आहात, त्याच मापाने तेही तुम्हाला मापून देतील.
३ तर मग, तुझ्या स्वतःच्या डोळ्यातला ओंडका न बघता तू तुझ्या भावाच्या डोळ्यातली बारीकशी काडी का बघतोस?
४ किंवा तुझ्या स्वतःच्या डोळ्यात ओंडका असताना, ‘मला तुझ्या डोळ्यातली काडी काढू दे,’ असं तू आपल्या भावाला कसं काय म्हणू शकतोस?
५ अरे ढोंगी माणसा! आधी स्वतःच्या डोळ्यातला ओंडका काढ, म्हणजे मग तुझ्या भावाच्या डोळ्यातली काडी तुला स्पष्ट दिसेल.
६ जे पवित्र, ते कुत्र्यांना देऊ नका आणि तुमचे मोती डुकरांपुढे टाकू नका, नाहीतर ते त्यांना पायांखाली तुडवतील आणि उलटून तुमच्यावर हल्ला करतील.*
७ मागत राहा म्हणजे तुम्हाला दिलं जाईल; शोधत राहा म्हणजे तुम्हाला सापडेल; आणि ठोठावत राहा म्हणजे तुमच्यासाठी उघडलं जाईल;
८ कारण जो कोणी मागतो त्याला दिलं जाईल, जो कोणी शोधतो त्याला सापडेल आणि जो कोणी ठोठावतो त्याच्यासाठी उघडलं जाईल.
९ खरोखर, तुमच्यापैकी असा कोण आहे जो आपल्या मुलाने भाकर मागितल्यास त्याला दगड देईल?
१० किंवा त्याने मासा मागितल्यास त्याला साप देईल? कोणीही असं करणार नाही.
११ तुम्ही जर पापी असूनही आपल्या मुलांना चांगल्या गोष्टी द्यायचं तुम्हाला कळतं, तर मग तुमचा स्वर्गातील पिता त्याच्याकडे मागणाऱ्यांना किती विशेषकरून चांगल्या गोष्टी देईल!
१२ तेव्हा, ज्या गोष्टी इतरांनी आपल्यासाठी कराव्यात असं तुम्हाला वाटतं त्या सर्व गोष्टी तुम्हीही त्यांच्यासाठी केल्या पाहिजेत. हेच नियमशास्त्राचं व संदेष्ट्यांच्या लिखाणांचं सार आहे.
१३ अरुंद दरवाजाने आत जा, कारण नाशाकडे जाणारा दरवाजा रुंद आणि रस्ता पसरट आहे व त्यातून जाणारे बरेच जण आहेत;
१४ तर जीवनाकडे जाणारा दरवाजा अरुंद आणि रस्ता अडचणीचा आहे व फार कमी लोकांना तो सापडतो.
१५ खोट्या संदेष्ट्यांपासून जपून राहा. कारण ते मेंढरांच्या वेषात तुमच्याकडे येतात, पण आतून ते क्रूर लांडगे आहेत.
१६ तुम्ही त्यांच्या फळांवरून त्यांना ओळखाल. काटेरी झुडपांना द्राक्षे किंवा अंजीर कधी लागतात का?
१७ त्याचप्रमाणे, प्रत्येक चांगलं झाड चांगलं फळ देतं, पण किडलेलं झाड खराब फळ देतं.
१८ चांगल्या झाडाला कधी खराब फळ येऊ शकत नाही आणि किडलेल्या झाडाला कधी चांगलं फळ येऊ शकत नाही.
१९ जे चांगलं फळ देत नाही, असं प्रत्येक झाड कापून आगीत टाकलं जातं.
२० खरोखर, त्या माणसांच्या फळांवरूनच तुम्ही त्यांना ओळखाल.
२१ मला ‘प्रभू, प्रभू,’ म्हणणारा प्रत्येक जण स्वर्गाच्या राज्यात जाणार नाही, तर स्वर्गातील माझ्या पित्याच्या इच्छेप्रमाणे करणाराच त्या राज्यात जाईल.
२२ त्या दिवशी पुष्कळ लोक मला म्हणतील: ‘प्रभू, प्रभू, आम्ही तुझ्या नावाने संदेश दिले नाहीत का? तुझ्या नावाने दुरात्मे काढले नाहीत का? आणि तुझ्या नावाने अनेक अद्भुत कृत्ये केली नाहीत का?’
२३ पण, मी त्यांना स्पष्टपणे सांगेन: ‘अरे वाईट कामं करणाऱ्यांनो! मी तुम्हाला कधीच ओळखत नव्हतो, माझ्यापुढून निघून जा!’
२४ म्हणून, जो कोणी माझे हे शब्द ऐकून त्याप्रमाणे वागतो तो अशा एका बुद्धिमान माणसासारखा आहे ज्याने आपलं घर खडकावर बांधलं.
२५ मग मुसळधार पाऊस येऊन पूर आला आणि वादळी वारे त्या घरावर आदळले, पण ते घर कोसळलं नाही, कारण ते खडकावर बांधण्यात आलं होतं.
२६ याउलट, जो कोणी माझे हे शब्द ऐकून त्याप्रमाणे वागत नाही, तो अशा एका मूर्ख माणसासारखा आहे ज्याने आपलं घर वाळूवर बांधलं.
२७ मग मुसळधार पाऊस येऊन पूर आला आणि वादळी वारे त्या घरावर आदळले, तेव्हा ते घर कोसळलं व जमीनदोस्त झालं.”
२८ येशूचे हे बोलणे संपल्यावर लोक त्याची शिकवण्याची पद्धत पाहून थक्क झाले,
२९ कारण तो त्यांच्या शास्त्र्यांप्रमाणे नाही, तर अधिकार असलेल्या व्यक्तीप्रमाणे त्यांना शिकवत होता.
तळटीपा
^ शब्दशः “तुम्हाला फाडून टाकतील.”