मार्क १:१-४५
-
बाप्तिस्मा देणारा योहान घोषणा करतो (१-८)
-
येशूचा बाप्तिस्मा (९-११)
-
सैतान येशूची परीक्षा घेतो (१२, १३)
-
येशू गालीलात प्रचार करू लागतो (१४, १५)
-
पहिल्या शिष्यांची निवड (१६-२०)
-
येशू अशुद्ध आत्म्याला काढतो (२१-२८)
-
कफर्णहूममध्ये येशू अनेकांना बरे करतो (२९-३४)
-
येशू एकांत ठिकाणी जाऊन प्रार्थना करतो (३५-३९)
-
येशू एका कुष्ठरोग्याला बरे करतो (४०-४५)
१ देवाचा पुत्र, येशू ख्रिस्त याच्याबद्दल असलेल्या आनंदाच्या संदेशाची सुरुवात:
२ यशया संदेष्ट्याच्या पुस्तकात असे लिहिले होते: “(पाहा! मी माझ्या दूताला तुझ्यापुढे* पाठवत आहे, तो तुझ्यासाठी मार्ग तयार करेल.)
३ ओसाड प्रदेशात घोषणा करणाऱ्या एकाचा आवाज ऐकू येत आहे: ‘यहोवासाठी* मार्ग तयार करा! त्याच्यासाठी रस्ते मोकळे करा.’”
४ त्याप्रमाणे, बाप्तिस्मा* देणारा योहान ओसाड प्रदेशात आला आणि पापांच्या क्षमेसाठी पश्चात्तापाचे चिन्ह म्हणून बाप्तिस्मा घ्या, अशी घोषणा करू लागला.
५ आणि यहूदीयाच्या प्रदेशातील आणि येरुशलेममधील सर्व लोक त्याच्याकडे जाऊ लागले; आणि आपल्या पापांची उघडपणे कबुली देऊन त्यांनी त्याच्याकडून यार्देन नदीत बाप्तिस्मा घेतला.
६ योहान उंटाच्या केसांचे कपडे घालायचा आणि कमरेला चामड्याचा पट्टा बांधायचा. टोळ व रानातले मध हेच त्याचे अन्न होते.
७ तो अशी घोषणा करायचा: “जो माझ्या मागून येत आहे त्याला माझ्यापेक्षा जास्त अधिकार आहे आणि खाली वाकून त्याच्या जोड्यांचे बंद सोडण्यासही मी योग्य नाही.
८ मी तुम्हाला पाण्याने बाप्तिस्मा दिला, पण तो तुम्हाला पवित्र आत्म्याने* बाप्तिस्मा देईल.”
९ त्याच दिवसांत, गालीलच्या नासरेथहून येशू आला आणि योहानने त्याला यार्देन नदीत बाप्तिस्मा दिला.
१० येशू पाण्यातून वर येताच त्याला आकाश उघडताना आणि पवित्र आत्मा* कबुतरासारखा आपल्यावर उतरताना दिसला.
११ आणि स्वर्गातून असा आवाज ऐकू आला: “तू माझा परमप्रिय पुत्र आहेस; तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे.”
१२ त्यानंतर लगेच पवित्र आत्म्याने त्याला ओसाड प्रदेशात जाण्यास प्रवृत्त केले.
१३ त्यामुळे तो चाळीस दिवस तिथे राहिला आणि तिथेच सैतानाने त्याची परीक्षा घेतली. तो जंगली पशूंसोबत राहत होता आणि देवदूत त्याची सेवा करत होते.
१४ मग योहानला अटक झाल्यानंतर येशू गालीलमध्ये गेला आणि असे म्हणून देवाबद्दल आनंदाचा संदेश सांगू लागला:
१५ “नेमलेली वेळ आली आहे आणि देवाचे राज्य जवळ आले आहे. म्हणून पश्चात्ताप करा आणि या आनंदाच्या संदेशावर विश्वास ठेवा.”
१६ गालील समुद्राजवळून जात असताना येशूला शिमोन आणि शिमोनचा भाऊ अंद्रिया हे समुद्रात जाळी टाकताना दिसले, कारण ते मासे धरणारे होते.
१७ तो त्यांना म्हणाला: “माझ्यामागे या, म्हणजे मी तुम्हाला माणसं धरणारे करीन.”
१८ हे ऐकताच त्यांनी आपली जाळी टाकून दिली आणि ते त्याच्यामागे चालू लागले.
१९ तिथून थोडे पुढे गेल्यावर त्याला जब्दीचा मुलगा याकोब आणि त्याचा भाऊ योहान हे दिसले. ते त्यांच्या नावेत जाळी नीट करत होते.
२० त्यांना पाहताच येशूने त्यांना बोलावले. तेव्हा ते आपले वडील जब्दी यांना नावेतच मजुरांसोबत सोडून त्याच्यामागे चालू लागले.
२१ मग ते कफर्णहूमला गेले.
शब्बाथाचा दिवस सुरू होताच, तो सभास्थानात जाऊन शिकवू लागला.
२२ आणि त्याची शिकवण्याची पद्धत पाहून लोक थक्क झाले, कारण तो शास्त्र्यांप्रमाणे नाही, तर अधिकार असलेल्या व्यक्तीप्रमाणे त्यांना शिकवत होता.
२३ त्याच वेळी, अशुद्ध आत्म्याच्या प्रभावाखाली असलेला एक मनुष्य त्यांच्या सभास्थानात होता आणि तो ओरडून म्हणाला:
२४ “हे नासरेथच्या येशू, आमचं तुझ्याशी काय घेणंदेणं? तू काय आमचा नाश करण्यासाठी आला आहेस? तू कोण आहेस हे मला पक्कं माहीत आहे. तू देवाचा पवित्र जन आहेस!”
२५ पण, येशूने त्याला धमकावून म्हटले: “शांत राहा, आणि त्याच्यातून बाहेर निघ!”
२६ तेव्हा अशुद्ध आत्म्याने त्या माणसाच्या शरीराला पिळवटून काढले आणि मोठ्याने किंचाळत तो त्याच्यातून बाहेर निघाला.
२७ हे पाहून सर्व लोक इतके चकित झाले, की ते आपसात चर्चा करू लागले: “हे आहे तरी काय? ही कोणती नवीनच शिकवण्याची पद्धत?* हा तर अशुद्ध आत्म्यांनासुद्धा अधिकाराने आज्ञा देतो आणि तेही त्याचं ऐकतात.”
२८ तेव्हा त्याच्याबद्दलची बातमी पाहतापाहता गालीलच्या संपूर्ण प्रदेशात चारही दिशांना पसरली.
२९ मग सभास्थानातून निघून ते याकोब आणि योहानसोबत, शिमोन आणि अंद्रिया यांच्या घरी गेले.
३० तिथे शिमोनची सासू तापाने आजारी पडली होती आणि त्याबद्दल त्यांनी लगेच येशूला सांगितले.
३१ येशूने जवळ जाऊन तिच्या हाताला धरले आणि तिला उठवले. तेव्हा, तिचा ताप उतरला आणि ती त्यांची सेवा करू लागली.
३२ संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर, लोक त्याच्याकडे सर्व आजारी लोकांना व दुरात्म्यांनी पीडित असलेल्यांना आणू लागले;
३३ आणि संपूर्ण शहरच त्यांच्या दारासमोर जमले.
३४ तेव्हा त्याने वेगवेगळे आजार असलेल्या लोकांना बरे केले आणि अनेक दुरात्म्यांना काढले. पण, तो ख्रिस्त आहे* हे त्या दुरात्म्यांना माहीत असल्यामुळे त्याने त्यांना बोलू दिले नाही.
३५ दुसऱ्या दिवशी पहाटे, अंधार असतानाच तो उठून बाहेर गेला आणि एका एकांत ठिकाणी जाऊन प्रार्थना करू लागला.
३६ पण, शिमोन आणि इतर जण त्याला शोधू लागले
३७ आणि त्यांना तो सापडला तेव्हा ते म्हणाले: “सर्व जण तुला शोधत आहेत.”
३८ तेव्हा तो म्हणाला: “आपण दुसरीकडे, आसपासच्या गावांत जाऊ या, म्हणजे मला तिथेही प्रचार करता येईल, कारण यासाठीच मी आलो आहे.”
३९ मग तो तिथून निघाला आणि त्यांच्या सभास्थानांत शिकवत व दुरात्मे काढत सबंध गालीलात फिरला.
४० मग एक कुष्ठरोगी त्याच्याकडे आला आणि त्याच्यापुढे गुडघे टेकून अशी विनवणी करू लागला: “तुमची इच्छा असेल, तर तुम्ही मला शुद्ध करू शकता.”
४१ तेव्हा येशूला त्याचा कळवळा आला आणि त्याने आपला हात पुढे करून त्याला स्पर्श केला आणि म्हणाला: “माझी इच्छा आहे! शुद्ध हो.”
४२ त्याच क्षणी त्याचा कुष्ठरोग नाहीसा होऊन तो शुद्ध झाला.
४३ मग येशूने त्याला लगेच पाठवून दिले आणि अशी कडक ताकीद दिली
४४ की, “हे बघ, कुणाला काहीही सांगू नकोस, तर जाऊन स्वतःस याजकाला दाखव आणि त्यांना साक्ष मिळावी म्हणून शुद्ध होण्यासाठी मोशेने सांगितलेल्या गोष्टी अर्पण कर.”
४५ पण, तिथून निघाल्यानंतर, तो माणूस सगळ्यांना त्याविषयी सांगू लागला. आणि त्याने ही घटना सगळीकडे इतकी पसरवली की येशूला उघडपणे कोणत्याही शहरात जाणे कठीण झाले. त्यामुळे तो शहराबाहेर एकांत ठिकाणांत राहू लागला. तरीसुद्धा लोक सगळीकडून त्याच्याकडे येतच राहिले.
तळटीपा
^ शब्दशः “तुझ्या मुखापुढे.”
^ शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा “देवाच्या क्रियाशील शक्तीने.” शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा “देवाची क्रियाशील शक्ती.” शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा “नवीनच शिकवण.”
^ किंवा कदाचित, “तो कोण आहे.”