मार्क ११:१-३३

  • यरुशलेममध्ये येशूचा विजयोत्सवाने प्रवेश (१-११)

  • अंजिराच्या झाडाला शाप (१२-१४)

  • येशू मंदिर शुद्ध करतो (१५-१८)

  • वाळलेल्या अंजिराच्या झाडापासून धडा (१९-२६)

  • येशूच्या अधिकाराविषयी प्रश्‍न (२७-३३)

११  ते यरुशलेमजवळ आल्यावर जैतुनांच्या डोंगरावरील बेथफगे व बेथानी इथे पोचले तेव्हा येशूने दोन शिष्यांना पुढे पाठवले, २  आणि त्यांना सांगितले: “समोरच्या गावात जा आणि तिथे जाताच तुम्हाला गाढवाचं एक पिल्लू बांधलेलं दिसेल. त्याच्यावर आतापर्यंत कोणी बसलेलं नाही. ते सोडून इकडे आणा. ३  आणि जर कोणी तुम्हाला म्हटलं, की ‘त्याला का सोडता?’ तर म्हणा, ‘प्रभूला याची गरज आहे आणि तो लगेचच ते इकडे परत पाठवेल.’” ४  तेव्हा ते गेले आणि त्यांना रस्त्याच्या कडेला एका दाराजवळ गाढवाचे पिल्लू बांधलेले आढळले. ते त्यांनी सोडले. ५  पण तिथे उभे असलेले काही लोक त्यांना म्हणाले: “तुम्ही गाढवाच्या पिल्लाला का सोडत आहात?” ६  त्यांनी येशूने सांगितल्याप्रमाणेच उत्तर दिले, तेव्हा त्या लोकांनी त्यांना जाऊ दिले. ७  मग त्यांनी गाढवाच्या पिल्लाला येशूजवळ आणले आणि त्यांनी आपली बाह्‍य वस्त्रे त्याच्यावर टाकली आणि येशू त्याच्यावर बसला. ८  बऱ्‍याच जणांनी रस्त्यावरही आपली बाह्‍य वस्त्रे पसरली, तर इतरांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांच्या फांद्या तोडून त्या रस्त्यावर पसरल्या. ९  आणि पुढे जाणारे आणि मागून येणारे लोक अशी घोषणा करत होते: “आम्ही प्रार्थना करतो, याचा उद्धार होवो! यहोवाच्या* नावाने येणारा आशीर्वादित असो! १०  आमचा पिता दावीद याचं येणारं राज्य आशीर्वादित असो! स्वर्गात राहणाऱ्‍या देवा, आम्ही प्रार्थना करतो, याचा उद्धार होवो!” ११  मग तो यरुशलेम शहरात आला आणि मंदिरात गेला. तिथे त्याने आसपासच्या सर्व गोष्टींवर नजर टाकली. पण, आधीच उशीर झालेला असल्यामुळे तो बारा शिष्यांसोबत बेथानीला निघून गेला. १२  दुसऱ्‍या दिवशी ते बेथानीहून निघाले तेव्हा त्याला भूक लागली. १३  त्याला दुरून अंजिराचे एक हिरवेगार झाड दिसले. तेव्हा, फळ मिळेल या आशेने तो झाडाजवळ गेला. पण जवळ गेल्यावर त्याला पानांशिवाय काहीही दिसले नाही कारण तो अंजिरांचा मोसम नव्हता. १४  म्हणून तो त्या झाडाला म्हणाला: “यापुढे कोणीही तुझं फळ खाणार नाही.” शिष्य हे ऐकत होते. १५  मग ते यरुशलेमला आले. तिथे येशू मंदिरात गेला आणि जे लोक मंदिराच्या आत खरेदी-विक्री करत होते त्या सर्वांना त्याने तिथून हाकलून लावले, आणि त्याने पैसे बदलून देणाऱ्‍यांचे मेज आणि कबुतरे विकणाऱ्‍यांची बाके उलटून टाकली. १६  आणि त्याने कोणालाही मंदिरातून भांड्यांची ने-आण करू दिली नाही. १७  मग, तो त्यांना शिकवू लागला आणि म्हणाला: “‘माझ्या घराला सर्व राष्ट्रांकरता प्रार्थनेचं मंदिर म्हणतील,’ असं लिहिलेलं नाही का? पण तुम्ही तर ही लुटारूंची गुहा करून टाकली आहे.” १८  मुख्य याजकांनी आणि शास्त्र्यांनी हे ऐकले, तेव्हा ते त्याला ठार मारण्याचा मार्ग शोधू लागले. त्यांना त्याची भीती वाटत होती, कारण सर्व लोक त्याच्या शिकवणीमुळे थक्क व्हायचे. १९  संध्याकाळ झाल्यावर ते शहरातून बाहेर गेले. २०  पण दुसऱ्‍या दिवशी पहाटे तिथून जात असताना त्यांना अंजिराचे ते झाड मुळापासून वाळून गेल्याचे दिसले. २१  पेत्रला आदल्या दिवसाची गोष्ट आठवून तो त्याला म्हणाला: “रब्बी,* पाहा! तू ज्याला शाप दिला होतास ते अंजिराचं झाड वाळलं आहे.” २२  तेव्हा येशूने त्यांना उत्तर दिले: “देवावर विश्‍वास ठेवा. २३  मी तुम्हाला खरं सांगतो, की जर कोणी या डोंगराला म्हटले, की ‘इथून उपटून समुद्रात टाकला जा,’ आणि जर त्याने मनात कोणतीही शंका न धरता, आपल्या बोलण्याप्रमाणे नक्की होईल असा विश्‍वास बाळगला, तर त्याच्यासाठी ते खरोखरच घडेल. २४  म्हणूनच, मी तुम्हाला सांगतो की प्रार्थनेत तुम्ही ज्या गोष्टी मागता, त्या तुम्हाला मिळाल्याच आहेत असा विश्‍वास धरा, म्हणजे तुम्हाला त्या मिळतील. २५  आणि जेव्हा तुम्ही प्रार्थना करायला उभे राहता, तेव्हा तुमच्या मनात कोणाविरुद्ध काहीही असल्यास त्याला क्षमा करा, म्हणजे तुमचा स्वर्गातील पितासुद्धा तुमच्या चुकांची तुम्हाला क्षमा करेल.” २६  * २७  मग ते पुन्हा यरुशलेमला आले. आणि तो मंदिरात फिरत असताना मुख्य याजक व शास्त्री आणि वडीलजन तिथे आले २८  आणि त्याला म्हणाले: “तू कोणत्या अधिकाराने या गोष्टी करतोस? या सर्व गोष्टी करण्याचा अधिकार कोणी दिला तुला?” २९  येशू त्यांना म्हणाला: “मी तुम्हाला एक प्रश्‍न विचारतो. मला त्याचं उत्तर द्या, मग मीही तुम्हाला सांगेन की कोणत्या अधिकाराने मी या गोष्टी करतो. ३०  योहानने दिलेला बाप्तिस्मा स्वर्गापासून होता की माणसांपासून? उत्तर द्या.” ३१  तेव्हा ते आपसात चर्चा करू लागले आणि म्हणाले, “‘स्वर्गापासून’ असं म्हटलं तर तो आपल्याला म्हणेल, की ‘मग तुम्ही त्याच्यावर विश्‍वास का ठेवला नाही?’ ३२  आणि ‘माणसांपासून’ असं म्हणण्याचं धाडस तरी कसं करावं?” खरेतर, त्यांना लोकांची भीती होती, कारण योहान खरोखरच संदेष्टा होता, असं ते सर्व मानत होते. ३३  म्हणून ते येशूला म्हणाले: “आम्हाला माहीत नाही.” तेव्हा येशू त्यांना म्हणाला: “मग मी कोणत्या अधिकाराने या गोष्टी करतो हे मीही तुम्हाला सांगणार नाही.”

तळटीपा

शब्दार्थसूची पाहा.
किंवा “गुरू.”
बायबलच्या काही प्राचीन हस्तलिखितांमध्ये हे वचन आढळत नाही आणि त्यामुळे ते देवप्रेरित वचनांचा भाग नाही हे स्पष्ट आहे.