मार्क १२:१-४४
१२ मग तो उदाहरणे देऊन त्यांच्याशी बोलू लागला आणि म्हणाला, “एका मनुष्याने द्राक्षमळा लावला आणि त्याच्याभोवती कुंपण घातलं व त्यात द्राक्षे तुडवण्यासाठी द्राक्षकुंड खणलं आणि पहाऱ्यासाठी एक मचाण बांधलं.* मग माळ्यांना आपल्या द्राक्षमळ्याचा ठेका देऊन तो परदेशी गेला.
२ फळांचा हंगाम आला तेव्हा त्याने द्राक्षमळ्याच्या फळांपैकी काही फळे मागण्यासाठी एका दासाला माळ्यांकडे पाठवलं.
३ पण त्यांनी त्याला धरून बेदम मारलं व रिकाम्या हाती परत पाठवलं.
४ मग त्याने आणखी एका दासाला त्यांच्याकडे पाठवलं, पण त्यांनी त्याचं डोकं फोडलं आणि त्याला अपमानित केलं.
५ त्यानंतर त्याने पुन्हा एकाला पाठवलं, पण त्यांनी त्याला मारून टाकलं. पुढे त्याने इतर अनेकांना पाठवलं, पण त्यांपैकी काहींना त्यांनी मारहाण केली, तर काहींना ठार मारलं.
६ त्याच्याजवळ आता आणखी एक जण उरला होता, त्याचा लाडका मुलगा. म्हणून शेवटी त्याने असा विचार करून त्याला त्यांच्याकडे पाठवलं, की ‘निदान ते माझ्या मुलाचा तरी मान राखतील.’
७ पण, ते माळी आपसात म्हणू लागले, ‘हा तर वारस आहे. चला आपण त्याला मारून टाकू म्हणजे त्याच्या वारशाची जमीन आपली होईल.’
८ म्हणून, त्यांनी त्याला धरून मारून टाकलं आणि त्याला द्राक्षमळ्याच्या बाहेर फेकून दिलं.
९ मग, द्राक्षमळ्याचा मालक काय करेल? तो येऊन माळ्यांना ठार मारेल आणि द्राक्षमळ्याचा ताबा दुसऱ्यांना देईल.
१० तुम्ही कधी शास्त्रात हे वाचलं नाही का: ‘बांधकाम करणाऱ्यांनी जो दगड नाकारला तोच कोपऱ्याचा मुख्य दगड* बनला आहे;
११ हे यहोवाने* घडवून आणलं आहे आणि आमच्या दृष्टीत ते अद्भुत आहे’?”
१२ आपल्याला मनात ठेवूनच येशूने हे उदाहरण दिले, हे त्याच्या विरोधकांच्या लक्षात आल्यामुळे त्याला धरण्याची* त्यांची इच्छा होती, पण ते लोकांना घाबरत होते. म्हणून त्याला सोडून ते तिथून निघून गेले.
१३ मग त्याला बोलण्यात पकडण्यासाठी त्यांनी काही परूश्यांना आणि हेरोदच्या पक्षाच्या सदस्यांना त्याच्याकडे पाठवले.
१४ ते येशूकडे येऊन त्याला म्हणाले: “हे गुरू, तुम्ही नेहमी खरं तेच बोलता हे आम्हाला माहीत आहे, आणि तुम्ही कोणाची मर्जी मिळवण्याचा प्रयत्न करत नाही, कारण तुम्ही कोणाचं तोंड पाहून बोलत नाही, तर देवाचा मार्ग अगदी खरेपणाने शिकवता. तेव्हा आम्हाला सांगा, कैसराला* कर देणं नियमानुसार योग्य आहे की नाही?
१५ आम्ही तो द्यावा की नाही?” त्यांचा ढोंगीपणा ओळखून येशू त्यांना म्हणाला: “माझी परीक्षा पाहण्याचा प्रयत्न का करता? मला दिनाराचं* नाणं दाखवा.”
१६ तेव्हा त्यांनी त्याला दिनाराचं नाणं आणून दिलं. तो त्यांना म्हणाला: “हे चित्र आणि यावर लिहिलेलं नाव कोणाचं आहे?” ते म्हणाले: “कैसराचं.”
१७ तेव्हा येशू त्यांना म्हणाला: “जे कैसराचं आहे ते कैसराला द्या, पण जे देवाचं आहे ते देवाला द्या.” हे ऐकून ते थक्क झाले.
१८ आता, पुनरुत्थान* नाही असे म्हणणारे सदूकी* लोक त्याच्याजवळ आले आणि त्यांनी त्याला विचारले:
१९ “गुरुजी, मोशेने आमच्यासाठी असं लिहून ठेवलं आहे, की एखाद्याच्या भावाचा मृत्यू झाला, आणि त्याची बायको मागे राहिली, पण त्यांना मूलबाळ नसले, तर त्याच्या भावाने त्याच्या बायकोशी लग्न करावं आणि आपल्या भावाचा वंश चालवावा.
२० एका कुटुंबात सात भाऊ होते. पहिल्याचं लग्न झालं, पण तो मेला तेव्हा त्याला मूल नव्हतं.
२१ मग दुसऱ्याने तिच्याशी लग्न केलं पण तोसुद्धा मूलबाळ नसतानाच मेला आणि तिसऱ्याच्या बाबतीतही असंच झालं.
२२ आणि सातही भाऊ मूलबाळ न होताच मरण पावले. शेवटी त्या स्त्रीचाही मृत्यू झाला.
२३ मग, पुनरुत्थान झाल्यावर ती त्या सात भावांपैकी कोणाची बायको होईल? कारण त्या सातही जणांनी तिच्याशी लग्न केलं होतं.”
२४ येशू त्यांना म्हणाला: “याच कारणामुळे तुमचा गैरसमज झालेला नाही का? कारण, तुम्हाला शास्त्रवचनांचं ज्ञान नाही आणि तुम्ही देवाचं सामर्थ्यदेखील जाणत नाही.
२५ कारण मेलेल्यांतून उठल्यावर, पुरुष लग्न करत नाहीत आणि स्त्रियांचंही लग्न करून दिलं जात नाही, तर ते स्वर्गातल्या देवदूतांसारखे असतात.
२६ पण, मेलेल्यांना पुन्हा उठवण्याविषयी, मोशेच्या पुस्तकातल्या झुडपाच्या अहवालात तुम्ही वाचलं नाही का? तिथे देवाने मोशेला म्हटलं: ‘मी अब्राहामचा देव, इसहाकचा देव आणि याकोबचा देव आहे.’
२७ तो मेलेल्यांचा नाही तर जिवंतांचा देव आहे. तुमचा मोठा गैरसमज झाला आहे.”
२८ शास्त्र्यांपैकी एक जण त्यांचा वाद ऐकून आणि येशूने त्यांना किती चांगले उत्तर दिले हे पाहून पुढे आला आणि त्याने त्याला विचारले: “सर्व आज्ञांपैकी सर्वात पहिली* आज्ञा कोणती?”
२९ येशूने उत्तर दिले: “पहिली आज्ञा ही आहे: ‘हे इस्राएल ऐक, यहोवा* आपला देव हा एकच यहोवा* आहे,
३० आणि तू आपला देव यहोवा* याच्यावर आपल्या पूर्ण मनाने आणि आपल्या पूर्ण जिवाने* आणि आपल्या पूर्ण बुद्धीने आणि आपल्या पूर्ण शक्तीने प्रेम कर.’
३१ दुसरी आज्ञा ही आहे: ‘तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखंच प्रेम कर.’ या दोन आज्ञांपेक्षा महत्त्वाची दुसरी कोणतीच आज्ञा नाही.”
३२ तो शास्त्री त्याला म्हणाला: “गुरुजी तुम्ही बोलला ते योग्य आणि खरं आहे. ‘तो एकच आहे आणि त्याच्याशिवाय दुसरा कोणी नाही,’
३३ आणि त्याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण बुद्धीने आणि पूर्ण शक्तीने प्रेम करणं आणि आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखंच प्रेम करणं, हे सगळ्या होमार्पणांपेक्षा आणि बलिदानांपेक्षा जास्त मोलाचं आहे.”
३४ त्या शास्त्र्याने सुज्ञपणे दिलेले उत्तर ऐकून येशू त्याला म्हणाला: “तू देवाच्या राज्यापासून जास्त दूर नाहीस.” त्यानंतर त्याला आणखी काही विचारण्याचे कोणाचे धाडस झाले नाही.
३५ नंतर, मंदिरात शिकवत असताना येशू म्हणाला: “ख्रिस्त दावीदचा पुत्र आहे असं शास्त्री कसं काय म्हणतात?
३६ पवित्र आत्म्याच्या* प्रेरणेने दावीदने स्वतःच असं म्हटलं होतं, ‘यहोवा* माझ्या प्रभूला म्हणतो: “मी तुझ्या शत्रूंना तुझ्या पायाखाली तुडवेपर्यंत माझ्या उजव्या हाताला बस.”’
३७ जर दावीद त्याला प्रभू म्हणतो, तर तो त्याचा पुत्र कसा काय असू शकतो?”
लोकांचा मोठा समुदाय आनंदाने त्याचे ऐकत होता.
३८ मग शिकवत असताना तो पुढे म्हणाला: “शास्त्र्यांपासून सांभाळून राहा. त्यांना लांबलांब झगे घालून मिरवणं, बाजारांत लोकांकडून नमस्कार घेणं,
३९ आणि सभास्थानांत पुढच्या* आसनांवर व मेजवान्यांत सर्वात महत्त्वाच्या जागांवर बसायला आवडतं.
४० ते विधवांची मालमत्ता* हडपतात आणि लोकांना दाखवण्यासाठी लांबलचक प्रार्थना करतात. त्यांना जास्त कठोर शिक्षा मिळेल.”
४१ मग तो मंदिरात अशा एका ठिकाणी जाऊन बसला, जिथून दानपात्रे दिसत होती. आणि लोक त्यांत कशा प्रकारे पैसे टाकत आहेत हे तो पाहू लागला. बरेच श्रीमंत लोक दानपात्रांत पुष्कळ नाणी टाकत होते.
४२ मग एक गरीब विधवा आली आणि तिने फार कमी किमतीची दोन छोटीशी नाणी* दानपात्रात टाकली.
४३ तेव्हा त्याने आपल्या शिष्यांना जवळ बोलावून त्यांना म्हटले: “मी तुम्हाला खरं सांगतो की दानपात्रांत पैसे टाकणाऱ्या इतर सर्वांपेक्षा या गरीब विधवेने जास्त पैसे टाकले.
४४ कारण त्या सर्वांनी त्यांच्याजवळ असलेल्या जास्तीच्या पैशांतून टाकले, पण तिने मात्र आपल्या गरजेतून, म्हणजे पोट भरण्यासाठी तिच्याजवळ होते नव्हते ते सर्व टाकले.”
तळटीपा
^ किंवा “माळा बांधला.”
^ शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा “अटक करण्याची.”
^ किंवा “रोमी सम्राटाला.” शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा “सर्वात महत्त्वाची.”
^ शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा “देवाच्या क्रियाशील शक्तीच्या.” शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा “सर्वात चांगल्या.”
^ किंवा “घरे.”
^ शब्दशः “दोन लेप्टा, म्हणजे एक क्वॉड्रन.”