मार्क १५:१-४७
१५ पहाट होताच मुख्य याजक, वडीलजन व शास्त्री यांनी, म्हणजे खरेतर संपूर्ण न्यायसभेने* आपसात सल्लामसलत केली आणि येशूला बांधून ते त्याला तिथून घेऊन गेले व त्यांनी त्याला पिलातच्या स्वाधीन केले.
२ तेव्हा पिलातने त्याला विचारले: “तू यहुद्यांचा राजा आहेस का?” त्याने उत्तर दिले: “तुम्ही स्वतःच तसं म्हणत आहात.”
३ पण, मुख्य याजक त्याच्यावर बरेच आरोप लावत होते.
४ म्हणून पिलातने त्याला पुन्हा विचारले: “तू काहीच कसं बोलत नाहीस? पाहा, ही माणसं तुझ्याविरुद्ध किती आरोप लावत आहेत!”
५ पण येशूने आणखी काहीच उत्तर दिले नाही. यामुळे, पिलातला खूप आश्चर्य वाटले.
६ दरवर्षी त्या सणाच्या वेळी, लोकांच्या विनंतीनुसार कोणत्याही एका कैद्याची सुटका करण्याची पिलातची रीत होती.
७ त्या वेळी, बरब्बा नावाचा एक मनुष्य इतर बंडखोरांसोबत तुरुंगात होता. त्या बंडखोरांनी सरकारविरुद्ध बंड केले होते आणि लोकांची हत्या केली होती.
८ तेव्हा, पिलातने त्याच्या रीतीप्रमाणे करावे म्हणून लोकसमुदाय त्याच्यापुढे येऊन विनंती करू लागला.
९ त्याने त्यांना विचारले: “मी यहुद्यांच्या राजाची सुटका करावी अशी तुमची इच्छा आहे का?”
१० कारण मुख्य याजकांनी द्वेषामुळे येशूला धरून दिले होते हे पिलातला माहीत होते.
११ पण मुख्य याजकांनी, येशूच्याऐवजी बरब्बाची सुटका करावी अशी विनंती करण्यासाठी लोकांना भडकवले.
१२ पिलातने त्यांना पुन्हा एकदा विचारले: “मग, तुम्ही ज्याला यहुद्यांचा राजा म्हणता त्याचं मी काय करू?”
१३ ते पुन्हा मोठ्याने ओरडून म्हणाले: “त्याला वधस्तंभावर* खिळा!”*
१४ तेव्हा पिलात त्यांना म्हणाला: “पण, का? त्याने कोणतं वाईट काम केलं आहे?” तरीसुद्धा, ते आणखीनच ओरडू लागले: “त्याला वधस्तंभावर खिळा!”*
१५ मग लोकांना खूश करण्यासाठी त्याने त्यांच्यासाठी बरब्बाची सुटका केली; पण येशूला चाबकाचे फटके मारून त्याने त्याला वधस्तंभावर खिळण्यासाठी सैनिकांच्या हाती दिले.
१६ मग सैनिकांनी येशूला अंगणात, म्हणजे राज्यपालाच्या भवनात नेले आणि त्यांनी सर्व सैनिकांना तिथे जमवले.
१७ आणि त्यांनी त्याला जांभळे वस्त्र घातले आणि काट्यांचा मुकुट गुंफून त्याला तो घातला.
१८ मग ते मोठ्याने ओरडून म्हणू लागले: “यहुद्यांच्या राजाचा जयजयकार असो!”*
१९ तसेच, ते वेताच्या काठीने त्याच्या डोक्यावर मारू लागले व त्याच्यावर थुंकू लागले आणि त्यांनी गुडघे टेकून त्याला नमन केले.
२० शेवटी, त्याची अशी थट्टा केल्यावर त्यांनी त्याच्या अंगावर घातलेले जांभळे वस्त्र काढले आणि त्याला पुन्हा त्याचा झगा घालून वधस्तंभावर खिळण्यासाठी घेऊन गेले.
२१ त्या वेळी, शेतांकडून येणारा शिमोन नावाचा एक मनुष्य रस्त्याने जात होता. तो कुरेनेचा रहिवासी आणि आलेक्सांद्र व रूफ यांचा पिता होता. तेव्हा, सैनिकांनी येशूचा वधस्तंभ उचलून नेण्यासाठी त्याला भाग पाडले.
२२ मग त्यांनी त्याला गुलगुथा, या ठिकाणी आणले, ज्याचा अर्थ “कवटीची जागा” असा होतो.
२३ तिथे त्यांनी त्याला गंधरस* मिसळलेला द्राक्षारस प्यायला दिला, पण त्याने तो प्यायला नकार दिला.
२४ मग त्यांनी त्याला वधस्तंभावर खिळले आणि त्याच्या कपड्यांपैकी कोणी कोणते घ्यावे, हे ठरवण्यासाठी चिठ्ठ्या टाकून ते आपसात वाटून घेतले.
२५ त्यांनी त्याला वधस्तंभावर खिळले तेव्हा सकाळचे सुमारे नऊ वाजले होते.*
२६ आणि त्याच्याविरुद्ध असलेला आरोप लिहून वधस्तंभावर लावण्यात आला. त्यावर असे लिहिले होते: “यहुद्यांचा राजा.”
२७ शिवाय, त्यांनी येशूसोबत दोन चोरांनाही वधस्तंभांवर लटकवले, एकाला त्याच्या उजवीकडे आणि दुसऱ्याला डावीकडे.
२८ *—
२९ तेव्हा तिथून येणारे-जाणारे लोक डोके हलवून त्याची निंदा करत होते आणि असे म्हणत होते: “काय, मंदिर पाडून तीन दिवसांत पुन्हा उभं करणार होतास ना?
३० मग आता वधस्तंभावरून खाली येऊन स्वतःला वाचव!”
३१ त्याच प्रकारे मुख्य याजक आणि शास्त्री आपसात त्याची अशी थट्टा करू लागले: “याने दुसऱ्यांना वाचवलं; पण याला स्वतःला वाचवता येत नाही!
३२ आता इस्राएलचा राजा, ख्रिस्त याने वधस्तंभावरून खाली यावं, म्हणजे आम्ही ते पाहून विश्वास ठेवू.” तसेच, वधस्तंभांवर त्याच्या बाजूला असलेले चोरदेखील त्याची निंदा करत होते.
३३ मग, दुपारी सुमारे बारा वाजेपासून* ते सुमारे तीन वाजेपर्यंत* पृथ्वीवर अंधार पसरला.
३४ तीन वाजले, तेव्हा येशू मोठ्याने ओरडून म्हणाला: “एली, एली, लामा साबाखतानी?” ज्याचा अर्थ असा होतो, “माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास?”
३५ हे ऐकून तिथे उभे असलेले काही लोक म्हणू लागले: “पाहा! तो एलीयाला हाक मारत आहे.”
३६ तेवढ्यात कोणीतरी धावत जाऊन एक बोळा आणला आणि तो आंबट द्राक्षारसात बुडवून एका वेताच्या टोकावर ठेवला व त्याला चोखायला देऊन तो म्हणाला: “असू दे! एलीया याला खाली उतरवायला येतो का ते पाहू या.”
३७ पण येशूने मोठ्याने ओरडून प्राण सोडला.*
३८ तेव्हा, मंदिराच्या पवित्र स्थानाचा पडदा वरपासून खालपर्यंत फाटून त्याचे दोन भाग झाले.
३९ जेव्हा त्याच्यासमोर जवळच उभ्या असलेल्या सैन्याच्या अधिकाऱ्याने त्याच्या मृत्यूच्या वेळी घडलेल्या घटना पाहिल्या तेव्हा तो म्हणाला, “हा खरोखरच देवाचा पुत्र होता.”
४० बऱ्याच स्त्रियासुद्धा दुरून पाहत होत्या; त्यांच्यामध्ये मग्दालीया मरीया, धाकटा याकोब व योसे यांची आई मरीया व सलोमी या होत्या.
४१ येशू गालीलात असताना या स्त्रिया त्याच्यासोबत असायच्या आणि त्याची सेवा करायच्या. तसेच त्याच्यासोबत यरुशलेमहून आलेल्या इतर अनेक स्त्रियादेखील तिथे होत्या.
४२ दुपार टळून गेली होती, आणि तो तयारीचा म्हणजेच शब्बाथाचा आदला दिवस होता.
४३ तेव्हा, अरिमथाई इथला योसेफ तिथे आला. तो न्यायसभेचा एक प्रतिष्ठित सदस्य होता आणि तोदेखील देवाच्या राज्याची वाट पाहत होता. तो हिंमत करून पिलातकडे गेला आणि त्याने येशूचा मृतदेह आपल्याला द्यावा अशी त्याला विनंती केली.
४४ पण येशू इतक्यात कसा काय मेला याचे पिलातला आश्चर्य वाटले. म्हणून त्याने सैन्याच्या अधिकाऱ्याला बोलावून येशू खरोखरच मेला का, असे त्याला विचारले.
४५ मग सैन्याच्या अधिकाऱ्याकडून खातरी करून घेतल्यानंतर त्याने येशूचा मृतदेह योसेफला दिला.
४६ योसेफने उत्तम प्रतीचे मलमलीचे कापड विकत आणले आणि येशूचे शरीर खाली उतरवून ते त्या कापडात गुंडाळले व खडकात खोदलेल्या एका कबरेत* ठेवले. मग, त्याने मोठा दगड लोटून कबरेचे दार बंद केले.
४७ पण मग्दालीया मरीया व योसेची आई मरीया, त्याला ठेवण्यात आले होते त्या जागेकडे बराच वेळ पाहत राहिल्या.
तळटीपा
^ शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा “वधस्तंभावर मृत्युदंड द्या!”
^ किंवा “वधस्तंभावर मृत्युदंड द्या!”
^ किंवा “यहुद्यांच्या राजा, नमस्कार!”
^ किंवा “गुंगीचा पदार्थ.” शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दशः “तिसरा तास होता.”
^ बायबलच्या काही प्राचीन हस्तलिखितांमध्ये हे वचन आढळत नाही आणि त्यामुळे ते देवप्रेरित वचनांचा भाग नाही हे स्पष्ट आहे.
^ शब्दशः “सहाव्या तासापासून.”
^ शब्दशः “नवव्या तासापर्यंत.”
^ किंवा “अखेरचा श्वास घेतला.”
^ किंवा “स्मारक कबरेत.”