मार्क २:१-२८
२ पण काही दिवसांनंतर तो पुन्हा कफर्णहूमला आला आणि तो घरात आहे अशी बातमी सगळीकडे पसरली.
२ आणि घरात इतके लोक जमले की पाय ठेवायलासुद्धा जागा नव्हती, अगदी दाराजवळसुद्धा लोकांची गर्दी होती. मग तो त्यांना देवाचे वचन सांगू लागला.
३ तेव्हा लोक लकवा मारलेल्या* एका मनुष्याला घेऊन आले; त्याला चौघांनी उचलून आणले होते.
४ पण, लोकांच्या गर्दीमुळे ते त्याला थेट येशूजवळ घेऊन जाऊ शकत नव्हते; त्यामुळे ज्या ठिकाणी येशू होता त्या ठिकाणी त्यांनी छताचा काही भाग उघडला आणि लकवा मारलेला मनुष्य झोपला होता ती खाट त्यांनी तिथून खाली सोडली.
५ त्यांचा विश्वास पाहून येशूने त्या लकवा मारलेल्या मनुष्याला म्हटले: “मुला, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.”
६ तेव्हा, तिथे बसलेले काही शास्त्री मनातल्या मनात असा विचार करू लागले:
७ “असं कसं बोलू शकतो हा मनुष्य? हा तर देवाची निंदा करत आहे. देवाशिवाय आणखी कोण पापांची क्षमा करू शकतो?”
८ पण, लगेच त्यांच्या मनातील विचार ओळखून येशू त्यांना म्हणाला: “तुम्ही आपल्या मनात असा विचार का करता?
९ ‘तुझ्या पापांची क्षमा झाली आहे,’ असं म्हणणं जास्त सोपं आहे, की ‘ऊठ आणि आपली खाट उचलून चालायला लाग,’ असं म्हणणं जास्त सोपं आहे?
१० पण, मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे हे तुम्हाला कळावं म्हणून . . .” तो त्या लकवा मारलेल्या मनुष्याला म्हणाला:
११ “मी तुला सांगतो, ऊठ, आपली खाट उचल आणि घरी जा.”
१२ तेव्हा तो उठला आणि लगेच आपली खाट उचलून त्या सर्वांच्या देखत बाहेर चालत गेला. हे पाहून सगळ्यांना फार आश्चर्य वाटले आणि त्यांनी असे म्हणून देवाचा गौरव केला: “यापूर्वी आम्ही कधीच असं काही पाहिलं नव्हतं.”
१३ मग, पुन्हा एकदा येशू समुद्रकिनाऱ्यावर गेला. तेव्हा, सर्व लोक त्याच्यामागे येऊ लागले आणि तो त्यांना शिकवू लागला.
१४ तिथून जात असताना त्याला अल्फीचा मुलगा लेवी, जकात नाक्यावर बसलेला दिसला. येशू त्याला म्हणाला: “माझ्यामागे ये आणि माझा शिष्य हो.” तेव्हा, तो उठला आणि त्याच्यामागे चालू लागला.
१५ नंतर, येशू लेवीच्या घरात जेवायला बसला होता, तेव्हा बरेच जकातदार आणि पापी लोकही येशू व त्याचे शिष्य यांच्याबरोबर जेवायला बसले होते. कारण त्यांच्यापैकी बरेच जण त्याचे शिष्य बनले होते.
१६ पण, जेव्हा परूशी* लोकांमधील शास्त्र्यांनी त्याला पापी लोकांसोबत व जकातदारांसोबत जेवताना पाहिले तेव्हा ते त्याच्या शिष्यांना म्हणू लागले: “हा जकातदारांसोबत आणि पापी लोकांसोबत कसा काय जेवतो?”
१७ येशूने हे ऐकले तेव्हा तो त्यांना म्हणाला: “जे निरोगी असतात त्यांना वैद्याची गरज नसते, तर आजाऱ्यांना असते. मी नीतिमान लोकांना नाही, तर पापी लोकांना बोलवायला आलो आहे.”
१८ योहानचे शिष्य आणि परूशी लोक उपास करायचे. त्यामुळे ते त्याच्याजवळ आले आणि म्हणाले: “योहानचे आणि परूश्यांचे शिष्य उपास करतात, मग तुमचे शिष्य उपास का करत नाहीत?”
१९ तेव्हा येशू त्यांना म्हणाला: “नवरा मुलगा सोबत असेपर्यंत त्याच्या मित्रांना उपास करण्याची गरज असते का? नाही. नवरा मुलगा सोबत असेपर्यंत ते उपास करत नाहीत.
२० पण, असे दिवस येतील जेव्हा नवऱ्या मुलाला त्यांच्यापासून दूर केलं जाईल आणि त्या दिवशी ते उपास करतील.
२१ एखाद्या जुन्या झग्याला कोणीही नवीन कापडाचं ठिगळ लावत नाही. कारण नवीन कापड आकसतं आणि झग्याला पडलेलं छिद्र आणखीनच मोठं होतं.
२२ तसंच, कोणीही जुन्या बुधल्यांमध्ये* नवीन द्राक्षारस भरत नाही. कारण असं केलं, तर द्राक्षारसामुळे बुधल्या फाटतील आणि बुधल्यांसोबत द्राक्षारसही वाया जाईल. पण, नवीन द्राक्षारस नवीन बुधल्यांमध्ये भरला जातो.”
२३ मग शब्बाथाच्या दिवशी तो शेतांतून जात असताना त्याचे शिष्य जाताजाता धान्याची कणसे तोडू लागले.
२४ त्यामुळे परूशी त्याला म्हणाले: “हे पाहा! शब्बाथाच्या दिवशी नियमानुसार योग्य नाही अशी गोष्ट हे का करत आहेत?”
२५ पण, येशू त्यांना म्हणाला: “जेव्हा दावीद आणि त्याच्या माणसांना भूक लागली होती आणि त्यांच्याजवळ खायला काहीही नव्हतं तेव्हा त्याने काय केलं हे तुम्ही कधी वाचलं नाही का?
२६ मुख्य याजक अब्याथार याच्या वृत्तान्तात, दावीद कशा प्रकारे देवाच्या घरात गेला आणि समर्पित भाकरी* ज्या याजकांशिवाय कोणीही खाणं योग्य नव्हतं त्या त्याने खाल्ल्या आणि आपल्या माणसांनाही दिल्या, हे तुम्ही वाचलं नाही का?”
२७ मग तो त्यांना म्हणाला: “माणूस शब्बाथासाठी नाही, तर शब्बाथ माणसासाठी अस्तित्वात आला.”
२८ मनुष्याचा पुत्र तर शब्बाथाचाही प्रभू आहे.
तळटीपा
^ किंवा “पक्षाघात झालेल्या.”
^ शब्दार्थसूची पाहा.
^ प्राण्यांच्या कातडीपासून बनवलेल्या पिशव्या. शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा “समक्षतेच्या भाकरी.” शब्दार्थसूची पाहा.