यहूदा १:१-२५
१ देवपित्याला प्रिय असलेले आणि येशू ख्रिस्तासाठी राखून ठेवलेले असे जे बोलावण्यात आलेले आहेत, त्यांना येशू ख्रिस्ताचा दास आणि याकोबचा भाऊ यहूदा याच्याकडून:
२ देवाची करुणा, शांती आणि प्रेम तुमच्यावर विपुल प्रमाणात असो.
३ माझ्या प्रिय बांधवांनो, खरेतर आपल्या सर्वांच्या समान तारणाविषयी तुम्हाला लिहिण्याची माझी खूप इच्छा होती; पण त्याऐवजी, पवित्र जनांना सर्वकाळासाठी सोपवण्यात आलेल्या विश्वासाचे रक्षण करण्याचा तुम्ही आटोकाट प्रयत्न करावा, असे उत्तेजन या पत्राद्वारे तुम्हाला देण्याची मला गरज वाटली.
४ याचे कारण म्हणजे, शास्त्रवचनांनुसार पूर्वीच न्यायदंडासाठी नेमलेली काही माणसे, नकळत आपल्यामध्ये शिरली आहेत; ही अधार्मिक माणसे देवाच्या अपार कृपेचे निमित्त देऊन निर्लज्ज वर्तन* करतात आणि आपला एकच मालक आणि प्रभू, येशू ख्रिस्त याचा विश्वासघात करतात.
५ तुम्हाला या सर्व गोष्टी माहीतच आहेत, तरी मला तुम्हाला आठवण करून द्यावीशी वाटते, की यहोवाने* मिसर* देशातून आपल्या लोकांना वाचवले असले, तरी ज्यांनी विश्वास दाखवला नाही अशांचा त्याने नंतर नाश केला.
६ आणि जे देवदूत आपल्या नेमलेल्या सेवेत टिकून राहिले नाहीत, तर ज्यांनी आपले उचित निवासस्थान सोडून दिले, अशांना त्याने त्याच्या मोठ्या दिवसाच्या न्यायदंडाकरता सर्वकाळाच्या बंधनांनी घोर अंधकारात जखडून ठेवले आहे.
७ तसेच, सदोम व गमोरा आणि त्यांच्या आसपासच्या शहरांतील लोकांनी मोठ्या प्रमाणात अनैतिक लैंगिक कृत्ये* केली आणि ते अनैसर्गिक शारीरिक वासनांच्या मागे लागले; सर्वकाळाच्या अग्नीचा न्यायदंड भोगलेली ही शहरे आपल्याकरता इशारा देणारे उदाहरण आहे.
८ इतके असूनही, ही माणसेदेखील स्वप्नांत रमतात, शरीराला दूषित करतात, अधिकाराला तुच्छ लेखतात आणि देवाने सन्मानित केलेल्यांची निंदानालस्ती करतात.
९ पण जेव्हा आद्यदेवदूत* मीखाएल याचा सैतानासोबत* मोशेच्या मृतदेहासंबंधी वाद झाला, तेव्हा त्याने सैतानाविरुद्ध अपमानास्पद शब्दांत न्यायदंड घोषित करण्याचे धाडस केले नाही, तर “यहोवा* तुझा न्याय करो,”* असे तो म्हणाला.
१० पण ही माणसे, त्यांना खऱ्या अर्थाने समजत नाहीत अशा सर्व गोष्टींविषयी अपमानास्पद बोलतात; आणि निर्बुद्ध प्राण्यांप्रमाणे ज्या गोष्टी त्यांना उपजत बुद्धीने समजतात, त्या सर्व गोष्टींनी ते स्वतःला दूषित करत राहतात.
११ त्यांची केवढी दुर्दशा होईल! कारण ते काइनच्या मार्गाने चालत आहेत आणि आपल्या फायद्यासाठी ते बलामच्या वाईट मार्गाचे अनुकरण करायला मागेपुढे पाहत नाहीत; शिवाय, कोरहप्रमाणे त्यांनी अधिकारपदावर असलेल्यांच्या विरोधात बोलून नाश ओढवून घेतला आहे.
१२ तुमच्या मेजवान्यांमध्ये* तुमच्यासोबत खातपीत असलेली ही माणसे पाण्याखाली दडलेल्या खडकांसारखी आहेत. हे लोक निर्लज्जपणे स्वतःचेच पोट भरणाऱ्या मेंढपाळांसारखे, वाऱ्याने वाहणाऱ्या कोरड्या ढगांसारखे; हंगामात फळ न देणाऱ्या, पूर्णपणे सुकलेल्या* व समूळ उपटलेल्या झाडांसारखे आहेत.
१३ बेफाम लाटा ज्याप्रमाणे समुद्रातील घाण किनाऱ्यावर आणतात त्याप्रमाणे या माणसांची लज्जास्पद कामे उघड होतात; ज्यांच्यासाठी कायमचा काळाकुट्ट अंधार राखून ठेवला आहे अशा भटकणाऱ्या ताऱ्यांसारखे ते आहेत.
१४ आदामपासून सातवा पुरुष हनोख यानेही त्यांच्याबद्दल अशी भविष्यवाणी केली: “पाहा! यहोवा* आपल्या लाखो पवित्र देवदूतांसोबत आला;
१५ सर्वांचा न्याय करायला आणि दुष्ट लोकांनी दुष्टपणे केलेल्या दुष्टाईच्या कामांमुळे, आणि त्याच्याविरुद्ध या दुष्टांनी बोललेल्या सर्व धक्कादायक गोष्टींमुळे तो त्यांना दोषी ठरवायला आला आहे.”
१६ ही माणसे कुरकुर करणारी, स्वतःच्या परिस्थितीबद्दल सतत तक्रार करणारी, आपल्या वासनांप्रमाणे वागणारी आणि मोठमोठ्या गोष्टी करून बढाई मारणारी आहेत. ती स्वतःच्या फायद्यासाठी इतरांची वाहवा* करतात.
१७ पण, माझ्या प्रिय बांधवांनो, तुम्ही मात्र आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रेषितांनी पूर्वीच सांगून ठेवलेल्या गोष्टी* आठवणीत आणा,
१८ की कशा प्रकारे ते तुम्हाला सांगायचे: “शेवटल्या काळात, स्वतःच्या दुष्ट वासनांनुसार चालणारी थट्टेखोर माणसं येतील.”
१९ हीच माणसे फूट पाडतात आणि ती आध्यात्मिक मनोवृत्तीची* नसून केवळ शारीरिक गोष्टींचा विचार करणारी* आहेत.
२० पण, माझ्या प्रिय बांधवांनो तुम्ही मात्र आपला परमपवित्र विश्वास मजबूत करा व पवित्र आत्म्याच्या* साहाय्याने प्रार्थना करा.
२१ आणि सर्वकाळाच्या जीवनासाठी आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपेची वाट पाहत असताना देवाच्या प्रेमात टिकून राहा.
२२ तसेच, ज्यांच्या मनात शंका आहेत त्यांना दया दाखवत राहा;
२३ त्यांना नाशाच्या आगीतून बाहेर ओढून काढा व वाचवा. पण, इतरांना दया दाखवत असताना सावधगिरी बाळगा आणि त्यांच्या वाईट कामांमुळे डागाळलेल्या वस्त्रांचीही घृणा करा.
२४ शेवटी, तुम्ही अडखळून पडू नये म्हणून जो तुमचे रक्षण करायला आणि तुम्हाला त्याच्या गौरवशाली सान्निध्यात मोठ्या आनंदाने निष्कलंक असे उभे करायला समर्थ आहे,
२५ त्या एकमेव तारणकर्त्या देवाला आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे गौरव, वैभव, सामर्थ्य आणि अधिकार पूर्वी, आता आणि पुढेही सदासर्वकाळ मिळत राहो. आमेन.
तळटीपा
^ ग्रीक, अॅसेल्गेया. शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दार्थसूची पाहा.
^ म्हणजे, “इजिप्त.”
^ शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा “यहोवा तुला खडसावो.”
^ शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दशः “दियाबलासोबत.” म्हणजे, निंदा करणारा.
^ शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दशः “प्रीतिभोजनांत.”
^ शब्दशः “दोनदा मेलेल्या.”
^ शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा “व्यक्तिपूजा.”
^ किंवा “पूर्वी केलेल्या भविष्यवाण्या.”
^ किंवा “त्यांच्यात देवाचा आत्मा.”
^ किंवा “प्राण्यांसारखी.”
^ किंवा “देवाच्या क्रियाशील शक्तीच्या.” शब्दार्थसूची पाहा.