याकोब २:१-२६

  • भेदभाव करणे पाप आहे (१-१३)

    • प्रेम करण्याची राजाज्ञा ()

  • कार्यांशिवाय विश्‍वास निर्जीव (१४-२६)

    • देव आहे हे दुरात्मेही मानतात (१९)

    • अब्राहामला यहोवाचा मित्र म्हणण्यात आले (२३)

 माझ्या बांधवांनो, आपल्या गौरवशाली प्रभू येशू ख्रिस्तावर विश्‍वास ठेवण्यासोबतच तुम्ही भेदभाव तर करत नाही ना? २  समजा तुमच्या सभेला सोन्याच्या अंगठ्या व महागाचे कपडे घातलेला एखादा मनुष्य आला आणि त्याच वेळी मळकट कपडे घातलेला कोणी गरीब मनुष्यही आला, ३  तर महागाचे कपडे घातलेल्या मनुष्याकडे आदराने पाहून, “तुम्ही इथे या चांगल्या जागेवर बसा,” असे तुम्ही म्हणता का, आणि गरिबाला मात्र, “तू उभाच राहा,” किंवा “तू जमिनीवर बस,” असे म्हणता का? ४  असे तुम्ही करत असाल, तर तुमच्यामध्ये उच्चनीच असा भेदभाव नाही का? आणि तुम्ही दुष्टपणे न्यायनिवाडा करणारे न्यायाधीश ठरणार नाही का? ५  माझ्या प्रिय बांधवांनो, माझे ऐका. देवाने जगाच्या दृष्टीने गरीब असलेल्यांना विश्‍वासात श्रीमंत होण्यासाठी आणि त्याच्यावर प्रेम करणाऱ्‍यांना ज्या राज्याचे वचन दिले आहे, त्याचे वारस बनण्याकरता निवडले नाही का? ६  पण, तुम्ही गरिबांचा अनादर केला आहे. खरेतर, श्रीमंत लोकच तुमच्यावर जुलूम करत नाहीत का, आणि तुम्हाला न्यायालयांत ओढत नाहीत का? ७  तुम्हाला देण्यात आलेल्या चांगल्या नावाची हेच लोक निंदा करत नाहीत का? ८  “तू आपल्या शेजाऱ्‍यावर स्वतःसारखंच प्रेम कर,” ही शास्त्रवचनांत दिलेली राजाज्ञा* तुम्ही पाळत असाल तर फार चांगली गोष्ट आहे. ९  पण, जर तुम्ही भेदभाव करत राहिलात तर तुम्ही पाप करत आहात, आणि या नियमानुसार अपराधी आहात. १०  जर कोणी संपूर्ण नियमशास्त्राचे पालन करतो, पण त्यातील एखादी आज्ञा मोडतो, तर तो संपूर्ण नियमशास्त्राचेच उल्लंघन करणारा ठरतो. ११  कारण, “व्यभिचार करू नको,” असे ज्याने म्हटले त्यानेच “खून करू नको,” असेही म्हटले. आता, जर तुम्ही व्यभिचार केला नाही, पण खून केला, तर तुम्ही नियमशास्त्राचे उल्लंघन करणारे ठरला आहात. १२  स्वतंत्र लोकांच्या नियमानुसार* ज्यांचा न्याय केला जाणार आहे अशांसारखेच नेहमी बोला व वागा. १३  कारण जो दया दाखवत नाही त्यालाही, न्याय करताना दया दाखवली जाणार नाही. न्यायापेक्षा दया श्रेष्ठ आहे!* १४  माझ्या बांधवांनो, ‘मी विश्‍वास धरतो,’ असे जर एखादा म्हणत असेल, पण त्यानुसार कार्य करत नसेल, तर त्याचा काय उपयोग? असा विश्‍वास खरेच त्याला वाचवू शकेल का? १५  एखाद्या भावाकडे किंवा बहिणीकडे कपडे नाहीत* व दिवसापुरते अन्‍न नाही, १६  आणि तरी तुमच्यापैकी एखादा त्यांना म्हणतो: “शांतीने जा, सुखात राहा,”* पण ज्या गोष्टींची त्यांना गरज आहे त्या तुम्ही देत नाही तर त्याचा काय उपयोग? १७  त्याचप्रमाणे, कार्यांशिवाय नुसताच विश्‍वास निर्जीव आहे. १८  असे असूनही, एखादा म्हणेल: “तुझ्याजवळ विश्‍वास आहे, पण मी कार्ये करतो. कार्यांशिवाय तुझा विश्‍वास मला दाखव आणि मी माझ्या कार्यांवरून माझा विश्‍वास तुला दाखवेन.” १९  एकच देव आहे असे तू मानतोस ना? फार चांगली गोष्ट आहे. पण खरे पाहता दुरात्मेसुद्धा असे मानतात आणि थरथर कापतात. २०  अरे मूर्ख माणसा, कार्यांशिवाय विश्‍वास व्यर्थ आहे हे समजायला तुला पुरावा हवा आहे का? २१  आपला पिता अब्राहाम याने त्याच्या पुत्राला, इसहाकला अर्पण करण्यासाठी वेदीवर ठेवले तेव्हा त्याला कार्यांद्वारेच नीतिमान ठरवण्यात आले नाही का? २२  तर यावरून दिसते, की त्याच्या विश्‍वासाला कार्यांची जोड होती आणि त्याच्या कार्यांमुळेच त्याचा विश्‍वास परिपूर्ण झाला; २३  अशा रीतीने “अब्राहामने यहोवावर* विश्‍वास ठेवला आणि यामुळे त्याला नीतिमान ठरवण्यात आले,” हे शास्त्रवचन पूर्ण झाले व त्याला यहोवाचा* मित्र म्हणण्यात आले. २४  तर मग स्पष्टच आहे, की मनुष्य केवळ विश्‍वासाने नाही, तर कार्यांद्वारे नीतिमान ठरतो. २५  त्याचप्रमाणे, राहाब वेश्‍येने गुप्तहेरांचा पाहुणचार करून त्यांना वेगळ्या वाटेने पाठवून दिल्यामुळे तिलासुद्धा कार्यांद्वारेच नीतिमान ठरवण्यात आले नव्हते का? २६  म्हणून, शरीर ज्याप्रमाणे आत्म्याशिवाय* निर्जीव आहे, त्याप्रमाणे विश्‍वाससुद्धा कार्यांशिवाय निर्जीव आहे.

तळटीपा

किंवा “राजाने दिलेली महान आज्ञा.”
शब्दशः “स्वतंत्रतेच्या नियमानुसार.”
शब्दशः “दया न्यायावर विजय मिळवते.”
शब्दशः “उघडी आहे.”
शब्दशः “शांतीने जा, उबदार कपडे घाला आणि पोटभर जेवा.”
शब्दार्थसूची पाहा.
शब्दार्थसूची पाहा.
किंवा “श्‍वासाशिवाय.”