याकोब ५:१-२०
५ अरे श्रीमंत लोकांनो, तुमच्यावर येणाऱ्या संकटांमुळे रडा आणि आक्रोश करा.
२ तुमच्या मौल्यवान वस्तू कुजल्या आहेत आणि तुमच्या कपड्यांना कसर लागली आहे.
३ तुमचे सोने व तुमची चांदी गंजून गेली आहे आणि त्यांना लागलेला गंज तुमच्याविरुद्ध साक्ष देईल व तुमच्या शरीराला झिजवून टाकेल. खरेतर तुम्ही शेवटल्या दिवसांसाठी आग साठवली आहे.
४ पाहा! तुमच्या शेतांत कापणी करणाऱ्यांची तुम्ही अडवून ठेवलेली मजुरी दुःखाने ओरडत आहे, आणि त्या कामगारांचा आक्रोश सैन्यांचा देव यहोवा* याच्या कानी पोचला आहे.
५ या जगात तुम्ही ऐशआरामात राहिला आणि शारीरिक गोष्टी उपभोगण्याच्या मागे लागला. कत्तल करण्याच्या दिवसापर्यंत खाऊनपिऊन धष्टपुष्ट होणाऱ्या प्राण्यांसारखे तुम्ही* झाला.
६ नीतिमानाला दोषी ठरवून तुम्ही त्याला ठार मारले. तो तुमचा विरोध करत नाही का?
७ तेव्हा माझ्या बांधवांनो, प्रभूच्या उपस्थितीपर्यंत धीर धरा. पाहा! शेतकरी आपल्या शेतातील मौल्यवान पिकाची वाट पाहतो; पहिला व नंतरचा पाऊस* येईपर्यंत तो धीर धरतो.
८ तुम्हीसुद्धा धीर धरा; आपली मने खंबीर करा कारण प्रभूची उपस्थिती जवळ आली आहे.
९ बांधवांनो, एकमेकांविरुद्ध कुरकुर* करू नका म्हणजे तुम्हाला दोषी ठरवले जाणार नाही. पाहा! न्यायाधीश दाराजवळ उभा आहे.
१० बांधवांनो, यहोवाच्या* नावाने संदेश देणाऱ्या संदेष्ट्यांनी संकटे सोसण्याच्या व धीर धरण्याच्या बाबतीत जे उदाहरण मांडले ते डोळ्यांसमोर ठेवा.
११ पाहा! ज्यांनी धीराने संकटे सोसली ते धन्य!* ईयोबाच्या धीराविषयी तुम्ही ऐकले आहे आणि शेवटी यहोवाने* त्याला ज्या प्रकारे आशीर्वादित केले त्यावरून यहोवा* दयाळू व अतिशय कनवाळू* आहे हेही तुम्ही पाहिले आहे.
१२ माझ्या बांधवांनो, सर्वात मुख्य म्हणजे, स्वर्गाच्या किंवा पृथ्वीच्या नावाने शपथ घेण्याचे किंवा दुसऱ्या कशाचीही शपथ घेण्याचे सोडून द्या. तुम्ही दोषी ठरू नये म्हणून तुमचे म्हणणे, “हो” तर हो आणि “नाही” तर नाही असावे.
१३ तुमच्यामध्ये कोणी दुःख सोसत आहे का? त्याने प्रार्थना करत राहावी. तुमच्यामध्ये कोणी आनंदी आहे का? त्याने स्तुतिगीते गावीत.
१४ तुमच्यामध्ये कोणी आजारी* आहे का? त्याने मंडळीच्या वडिलांना बोलवावे आणि त्यांनी यहोवाच्या* नावाने त्याला तेल लावून त्याच्यासाठी प्रार्थना करावी.
१५ आणि विश्वासाची प्रार्थना त्या मनुष्याला* बरे करेल व यहोवा* त्याला त्याच्या आजारातून उठवेल. शिवाय, त्याने पापे केली असली, तर त्याला क्षमा केली जाईल.
१६ तेव्हा, तुम्ही निरोगी व्हावे म्हणून मनमोकळेपणाने एकमेकांजवळ आपली पापे कबूल करा आणि एकमेकांसाठी प्रार्थना करा. नीतिमान मनुष्याने केलेल्या याचनेत खूप ताकद* असते.
१७ एलीया हा आपल्यासारख्याच भावना असलेला मनुष्य होता; पण, पाऊस पडू नये म्हणून त्याने कळकळीने प्रार्थना केली, तेव्हा साडेतीन वर्षे देशात पाऊस पडला नाही.
१८ मग त्याने पुन्हा प्रार्थना केली आणि पाऊस पडला व जमिनीने फळ दिले.
१९ माझ्या बांधवांनो, तुमच्यापैकी कोणी सत्यापासून बहकला आणि दुसऱ्याने त्याला पुन्हा मार्गावर आणले,
२० तर हे लक्षात घ्या, की जो कोणी पापी मनुष्याला त्याच्या चुकीच्या मार्गापासून परत फिरवतो तो त्याला* मृत्यूपासून वाचवेल आणि पुष्कळ पापांची क्षमा मिळवण्यास* त्याला मदत करेल.
तळटीपा
^ शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दशः “तुमची मने.”
^ पहिला पाऊस ऑक्टोबरमध्ये, तर नंतरचा पाऊस एप्रिलमध्ये व्हायचा.
^ किंवा “कण्हू नका; तक्रार करू नका.” शब्दशः “उसासे टाकू नका.”
^ शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा “कृपाळू.”
^ शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा “सुखी.”
^ हे आध्यात्मिक आजाराविषयी म्हटले आहे असे दिसते.
^ शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा कदाचित, “थकलेल्या मनुष्याला.”
^ शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दशः “केलेली याचना ऐकली जात असल्यामुळे परिणामकारक ठरते.”
^ किंवा “त्याचा जीव.”
^ शब्दशः “पापे झाकण्यास.”