रोमकर १०:१-२१

  • देवाचे नीतिमत्त्व कसे मिळवावे? (१-१५)

    • सर्वांसमोर कबूल करणे (१०)

    • यहोवाला हाक मारल्यानेच वाचवले जाईल (१३)

    • प्रचार करणाऱ्‍यांचे सुंदर पाय (१५)

  • आनंदाचा संदेश नाकारला गेला (१६-२१)

१०  बांधवांनो, इस्राएलचे तारण व्हावे* अशी माझी मनापासून इच्छा आहे आणि त्यासाठी मी देवाकडे याचनासुद्धा करतो. २  कारण त्यांच्याविषयी मी स्वतः साक्ष देतो, की त्यांना देवाविषयी आवेश तर आहे, पण तो अचूक ज्ञानानुसार नाही. ३  देवाचे नीतिमत्त्व न ओळखून स्वतःचेच नीतिमत्त्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केल्यामुळे, त्यांनी स्वतःला देवाच्या नीतिमत्त्वाच्या अधीन केले नाही. ४  कारण ख्रिस्त हा नियमशास्त्राचा शेवट आहे; यासाठी की, जो कोणी विश्‍वास ठेवतो त्या प्रत्येकाला नीतिमत्त्व प्राप्त व्हावे. ५  कारण नियमशास्त्राद्वारे मिळणाऱ्‍या नीतिमत्त्वाविषयी मोशे असे लिहितो: “जो मनुष्य या गोष्टी करेल तो त्यांमुळे जगेल.” ६  पण, विश्‍वासाद्वारे मिळणाऱ्‍या नीतिमत्त्वाविषयी असे म्हटले आहे: “आपल्या मनात असं म्हणू नका, की ख्रिस्ताला खाली आणण्यासाठी ‘स्वर्गात कोण जाईल?’ ७  किंवा ख्रिस्ताला मेलेल्यांतून वर आणण्यासाठी ‘अथांग डोहात* कोण उतरेल?’” ८  पण शास्त्रवचन काय म्हणते? “ते वचन तुमच्याजवळ आहे, तुमच्याच मुखात आणि तुमच्याच अंतःकरणात आहे”; तेच विश्‍वासाचे “वचन” आहे, ज्याची आम्ही घोषणा करत आहोत. ९  कारण ख्रिस्त हाच प्रभू आहे, असे तुम्ही आपल्या तोंडाने सर्वांसमोर कबूल केले आणि देवाने त्याला मेलेल्यांतून उठवले असा अंतःकरणात विश्‍वास बाळगला, तर तुमचे तारण होईल.* १०  कारण अंतःकरणात विश्‍वास बाळगल्याने मनुष्य नीतिमान ठरतो, तर तोंडाने तो कबूल केल्याने तारण होते.* ११  कारण शास्त्रवचन म्हणते: “त्याच्यावर विश्‍वास ठेवणाऱ्‍या कोणाचीही निराशा होणार नाही.” १२  यहुदी आणि ग्रीक यांच्यात काहीच फरक नाही. कारण सर्वांचा प्रभू एकच असून त्याला हाक मारणाऱ्‍या* सर्वांना तो अनेक* आशीर्वाद देतो. १३  कारण “जो कोणी यहोवाचं* नाव घेऊन त्याला हाक मारेल, त्याला वाचवलं जाईल.”* १४  पण, जर त्यांनी त्याच्यावर विश्‍वासच ठेवला नाही, तर ते त्याला हाक कशी मारतील? आणि ज्याच्याविषयी त्यांनी कधी ऐकलेच नाही, त्याच्यावर ते विश्‍वास कसा ठेवतील? आणि कोणी प्रचार केल्याशिवाय ते कसे ऐकतील? १५  आणि जर त्यांना पाठवण्यात आले नाही, तर ते प्रचार कसा करतील? जसे लिहिण्यात आले आहे: “चांगल्या गोष्टींविषयीचा आनंदाचा संदेश घोषित करणाऱ्‍यांचे पाय किती सुंदर आहेत!” १६  पण, सगळ्यांनीच आनंदाचा संदेश स्वीकारला असे नाही. कारण यशया म्हणतो: “हे यहोवा,* आमच्याकडून ऐकलेल्या गोष्टीवर* कोणी विश्‍वास ठेवला आहे?” १७  तर मग, वचन ऐकल्यावरच विश्‍वास ठेवला जातो; आणि ख्रिस्ताविषयी प्रचार केल्यावरच वचन ऐकले जाते. १८  पण, मी तुम्हाला विचारतो, त्यांनी संदेश ऐकला नाही का? नक्कीच ऐकला. खरेतर, “त्यांचा आवाज सबंध पृथ्वीवर आणि त्यांचा संदेश पृथ्वीच्या कानाकोपऱ्‍यांत पोचला.” १९  पण मग, इस्राएलला समजले नाही का? नक्कीच समजले. आधी मोशे म्हणतो: “जे राष्ट्र नाही, त्याद्वारे मी तुम्हाला ईर्ष्येस पेटवेन; मी एका निर्बुद्ध राष्ट्राद्वारे तुमचा क्रोध भडकवेन.” २०  मग, यशया अगदी बेधडकपणे म्हणतो: “जे माझा शोध करत नव्हते, त्यांना मी सापडलो; जे माझ्याविषयी विचारत नव्हते, त्यांना मी प्रकट झालो.” २१  पण, इस्राएलविषयी तो म्हणतो: “आज्ञा न मानणाऱ्‍या व अडेल वृत्तीच्या लोकांकडे मी दिवसभर हात पसरले.”

तळटीपा

किंवा “इस्राएलला वाचवले जावे.”
शब्दार्थसूची पाहा.
किंवा “तुम्हाला वाचवले जाईल.”
किंवा “वाचवले जाते.”
किंवा “त्याचा धावा करणाऱ्‍या.”
किंवा “उदारपणे.”
शब्दार्थसूची पाहा.
किंवा “त्याचं तारण होईल.”
शब्दार्थसूची पाहा.
किंवा “बातमीवर.”