रोमकर ११:१-३६
११ तर मग, मी विचारतो, देवाने आपल्या लोकांना नाकारले का? मुळीच नाही! कारण मी स्वतःसुद्धा एक इस्राएली, अब्राहामच्या संततीचा* आणि बन्यामीनच्या वंशातला आहे.
२ देवाने सुरुवातीलाच ज्यांचा विचार केला होता, त्या आपल्या लोकांना त्याने नाकारले नाही. एलीयाविषयी शास्त्रवचन काय म्हणते ते तुम्हाला माहीत नाही का? तो इस्राएलविरुद्ध देवाकडे अशी तक्रार करतो:
३ “हे यहोवा,* त्यांनी तुझ्या संदेष्ट्यांना ठार मारलं, तुझ्या वेद्या पाडल्या आणि मी एकटाच उरलो आहे आणि आता ते माझ्याही जिवावर उठले आहेत.”
४ पण, देवाने त्याला काय म्हटले? “तिथे माझी अजूनही सात हजार माणसं आहेत ज्यांनी बआलपुढे गुडघे टेकले नाहीत.”
५ त्याचप्रमाणे आजसुद्धा, काही उरलेले आहेत ज्यांना देवाच्या अपार कृपेमुळे निवडण्यात आले आहे.
६ आणि जर ही निवड अपार कृपेमुळे आहे, तर यापुढे ती कार्यांमुळे होत नाही. तसे जर असते, तर अपार कृपा ही अपार कृपा राहिली नसती.
७ तर आता काय म्हणावे? जी गोष्ट मिळवण्याची इस्राएलने खटपट केली ती त्यांना मिळवता आली नाही. पण, निवडलेल्यांनी मात्र ती मिळवली; तर बाकीच्यांची मने कठोर झाली.
८ जसे लिहिण्यात आले आहे: “देवाने त्यांना जणू गाढ झोप लागू दिली आहे, पाहू न शकणारे डोळे आणि ऐकू न शकणारे कान दिले आहेत. आजपर्यंत त्यांची हीच स्थिती आहे.”
९ दावीदसुद्धा म्हणतो: “त्यांची मेजवानी* त्यांच्यासाठी पाश आणि सापळा; अडखळण्याचे आणि शिक्षेचे कारण बनो.
१० त्यांना दिसू नये म्हणून त्यांच्या डोळ्यांवर अंधारी येऊ दे, आणि त्यांची पाठ नेहमी ओझ्याने वाकलेली राहील, असे कर.”
११ तर मग मी विचारतो, ते कायमचा नाश होण्यासाठी अडखळून पडले का? मुळीच नाही! तर त्यांच्यात ईर्ष्या उत्पन्न व्हावी म्हणून त्यांच्या अपराधामुळे विदेशी लोकांना तारणाची* संधी मिळाली.
१२ आता जर त्यांच्या अपराधामुळे जगाला आशीर्वाद मिळाले आणि त्यांच्या कमी होण्यामुळे विदेशी लोकांना आशीर्वाद मिळाले, तर त्यांची संख्या पूर्ण झाल्यावर आणखी किती मिळतील!
१३ आता मी तुमच्याशी म्हणजे विदेशी लोकांशी बोलतो. मला प्रेषित म्हणून विदेशी लोकांकडे पाठवण्यात आले आहे आणि मी माझ्या सेवेचा गौरव* करतो.
१४ यामागचा उद्देश हा, की कसेही करून माझ्या स्वतःच्या लोकांमध्ये* ईर्ष्या उत्पन्न करून मी त्यांच्यापैकी काहींचे तारण करावे.*
१५ कारण, जर त्यांचा त्याग केल्याने जगातील लोकांचा समेट झाला, तर मग त्यांचा स्वीकार केला जाईल तेव्हा काय? मेलेल्यांतून जिवंत होण्यासारखे ते ठरेल.
१६ प्रथमफळ म्हणून अर्पण केल्या जाणाऱ्या पिठाचा काही भाग पवित्र असेल, तर संपूर्ण गोळाच पवित्र असेल; आणि जर झाडाचे मूळ पवित्र असेल, तर फांद्याही पवित्र असतील.
१७ पण, जर त्यांच्यातील काही फांद्या तोडून टाकण्यात आल्या आणि तुम्ही रानटी जैतून असूनही तुम्हाला त्यांच्यामध्ये कलम करण्यात आले, आणि तुम्ही जैतुनाच्या पौष्टिक मुळाचे भागीदार झालात,
१८ तरी त्या तोडलेल्या फांद्यांसमोर बढाई मारू नका.* आणि बढाई मारलीच,* तर हे लक्षात असू द्या, की मुळाला आधार देणारे तुम्ही नाही, तर ते तुम्हाला आधार देते.
१९ आता तू म्हणशील: “मला कलम करण्यासाठीच त्या फांद्या तोडण्यात आल्या.”
२० ते खरे आहे! त्यांच्या अविश्वासामुळे त्या तोडून टाकण्यात आल्या; पण, तू तुझ्या विश्वासामुळे उभा आहेस. तेव्हा, गर्व करू नकोस, तर भीती बाळग.
२१ कारण जर देवाने मूळ फांद्यांची गय केली नाही, तर तो तुझीसुद्धा गय करणार नाही.
२२ त्यामुळे, देवाचा दयाळूपणा आणि कठोरपणा विचारात घे. जे पडले त्यांच्याशी तो कठोरपणे वागला, पण तुझ्याशी तो दयाळूपणे वागतो. अर्थात, तू त्याच्या दयेत टिकून राहिले पाहिजे, नाहीतर तुलासुद्धा छाटून टाकण्यात येईल.
२३ आणि त्यांनीसुद्धा आपला अविश्वास सोडून दिला, तर त्यांनाही कलम केले जाईल, कारण देव त्यांना पुन्हा कलम करण्यास समर्थ आहे.
२४ कारण जर तुला रानटी जैतुनाच्या झाडावरून तोडून, चांगल्या जैतुनाच्या झाडावर निसर्ग नियमाविरुद्ध कलम करण्यात आले, तर मग मूळ फांद्यांना पुन्हा आपल्याच झाडावर किती सहजपणे कलम केले जाऊ शकते!
२५ बांधवांनो, या पवित्र रहस्याबद्दल तुम्ही अजाण असावे अशी माझी इच्छा नाही; यासाठी की, तुम्ही आपल्याच नजरेत बुद्धिमान बनू नये: इस्राएलमधील काही लोकांची मने कठोर झाली आहेत आणि विदेशी लोकांची संख्या पूर्ण होईपर्यंत ते तसेच राहतील.
२६ अशा रीतीने संपूर्ण इस्राएलला वाचवले जाईल.* जसे लिहिले आहे: “तारणकर्ता* सीयोनातून येईल, तो याकोबमधून सर्व दुष्ट कृत्ये नाहीशी करेल.
२७ त्यांची पापे नाहीशी केल्यावर मी त्यांच्याशी हा करार करेन.”
२८ हे खरे आहे, की आनंदाच्या संदेशाच्या दृष्टीने पाहता तुमच्या फायद्यासाठी ते शत्रू आहेत; पण, देवाच्या निवडीच्या बाबतीत पूर्वजांना दिलेल्या अभिवचनामुळे ते प्रिय आहेत.
२९ कारण कृपादाने आणि बोलावणे यांच्या बाबतीत देव कधीही आपले मत बदलत नाही.
३० एकेकाळी तुम्ही देवाची आज्ञा मानणारे नव्हता, पण त्यांनी आज्ञा न मानल्यामुळे आता तुम्हाला दया दाखवण्यात आली आहे.
३१ ज्याप्रमाणे, त्यांच्या आज्ञा न मानण्यामुळे तुम्हाला दया दाखवण्यात आली, त्याचप्रमाणे त्यांनाही दया दाखवली जाऊ शकते.
३२ सर्वांना दया दाखवण्यात यावी म्हणून देवाने त्यांना आज्ञाभंगाच्या तुरुंगात कोंडले आहे.
३३ देवाचे आशीर्वाद किती विपुल आहेत! त्याची बुद्धी व ज्ञान किती अफाट आहे! त्याचे निर्णय गहन आणि मार्ग आपल्या बुद्धीपलीकडे आहेत.
३४ कारण “यहोवाचं* मन कोणी ओळखलं आहे? किंवा त्याचा सल्लागार कोण बनला आहे?”
३५ किंवा, “त्याने परतफेड करावी म्हणून त्याला आधी कोणी दिलं आहे?”
३६ कारण सर्व गोष्टी त्याच्यापासून, त्याच्याद्वारे आणि त्याच्यासाठीच आहेत. त्यालाच सदासर्वकाळ गौरव मिळो. आमेन.
तळटीपा
^ शब्दशः “बीजाचा.”
^ शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दशः “मेज.”
^ किंवा “वाचण्याची.”
^ किंवा “महिमा.”
^ शब्दशः “माझ्या शरीरामध्ये.”
^ किंवा “काहींना वाचवावे.”
^ किंवा “गर्विष्ठ होऊ नका.”
^ किंवा “गर्विष्ठ झालाच.”
^ किंवा “इस्राएलचे तारण होईल.”
^ किंवा “सुटका करणारा.”
^ शब्दार्थसूची पाहा.