रोमकर १३:१-१४

  • अधिकाऱ्‍यांना अधीनता (१-७)

  • प्रेम नियमशास्त्राची पूर्णता (८-१०)

  • दिवसा शोभेल असे चाला (११-१४)

१३  प्रत्येकाने* वरिष्ठ अधिकाऱ्‍यांच्या अधीन असावे, कारण देवाकडून नाही असा कोणताही अधिकार नाही; जे काही अधिकार आहेत, ते देवानेच नेमले आहेत. २  त्यामुळे, जो कोणी अधिकाराचा विरोध करतो तो देवाने घालून दिलेल्या व्यवस्थेचा विरोध करतो; आणि देवाच्या व्यवस्थेचा विरोध करणारे स्वतःवर न्यायदंड ओढवतील. ३  कारण अधिकाऱ्‍यांची भीती चांगली कृत्ये करणाऱ्‍यांना नसते, तर वाईट कृत्ये करणाऱ्‍यांना असते. तुला अधिकाऱ्‍याची भीती वाटू नये अशी तुझी इच्छा आहे का? तर मग, चांगले ते करत राहा म्हणजे त्याच्याकडून तुझी प्रशंसा केली जाईल. ४  कारण तो तुझ्या भल्यासाठी नेमलेला देवाचा सेवक आहे. पण, तू जर वाईट काम करत असशील तर भीती बाळग, कारण तो काही उगीचच तलवार बाळगत नाही; तर वाईट कामे करत राहणाऱ्‍यांविरुद्ध क्रोध व्यक्‍त करण्यासाठी* तो सूड घेणारा देवाचा सेवक आहे. ५  म्हणून केवळ त्याच्या क्रोधामुळे नाही, तर आपल्या विवेकामुळेही तुम्ही त्याच्या अधीन राहणे आवश्‍यक आहे. ६  त्यामुळेच, तुम्ही करही भरता; कारण ते देवाचे जनसेवक आहेत आणि हेच काम करत असतात. ७  ज्याला जे द्यायचे आहे, ते त्याला द्या: ज्याला कर द्यायचा आहे त्याला कर द्या, ज्याला जकात द्यायची आहे त्याला जकात द्या, ज्याची भीती बाळगली पाहिजे त्याची भीती बाळगा, ज्याचा सन्मान केला पाहिजे त्याचा सन्मान करा. ८  एकमेकांवर प्रेम करणे, याशिवाय कोणाचे काही देणे ठेवू नका. कारण जो कोणी दुसऱ्‍यावर प्रेम करतो त्याने नियमशास्त्राचे पूर्णपणे पालन केले आहे. ९  कारण, “व्यभिचार करू नको, खून करू नको, चोरी करू नको, लोभ धरू नको” या आज्ञांचा आणि दुसरी कोणतीही आज्ञा असेल, तर तिचा सारांश: “आपल्या शेजाऱ्‍यावर स्वतःसारखंच प्रेम कर,” या एकाच वचनात आहे. १०  प्रेम आपल्या शेजाऱ्‍याचे वाईट करत नाही; म्हणून प्रेम नियमशास्त्राची पूर्णता आहे. ११  आणि काळ ओळखून हे करा. आता तुमची झोपेतून उठण्याची वेळ आहे, कारण आपण विश्‍वास स्वीकारला तेव्हापेक्षा आता आपले वाचवले जाणे* अधिक जवळ आहे. १२  रात्र सरत आली आहे आणि लवकरच दिवस उजाडणार आहे. तेव्हा, आपण अंधाराची कामे काढून टाकू या आणि प्रकाशाची शस्त्रसामग्री धारण करू या. १३  दिवसा शोभेल असे चालू या. बेलगाम मौजमस्ती* आणि दारूबाजी, अनैतिक लैंगिक संबंध आणि निर्लज्ज वर्तन,* भांडणतंटे आणि हेवा या गोष्टी आपण करू नये. १४  तर त्याऐवजी, प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान करा* आणि शरीराच्या वासना तृप्त करण्याच्या योजना करू नका.

तळटीपा

किंवा “प्रत्येक जिवाने.”
किंवा “न्यायदंड बजावण्यासाठी.”
किंवा “आपले तारण.”
किंवा “रंगेल पार्ट्या.”
ग्रीक, अॅसेल्गेया. शब्दार्थसूची पाहा.
किंवा “ख्रिस्ताच्या गुणांचे अनुकरण करा.”