रोमकर १४:१-२३
१४ ज्या मनुष्याचा विश्वास कमजोर आहे त्याचा स्वीकार करा, पण वैयक्तिक मतांवरून* कोणाचा न्याय करू नका.
२ एखाद्याचा विश्वास असा असतो, की तो सर्वकाही खातो, पण ज्याचा विश्वास कमजोर असतो तो फक्त भाजीपाला खातो.
३ जो खातो, त्याने न खाणाऱ्याला तुच्छ समजू नये; आणि जो खात नाही, त्याने खाणाऱ्याचा न्याय करू नये, कारण देवाने त्याचा स्वीकार केला आहे.
४ दुसऱ्याच्या सेवकाचा न्याय करणारा तू कोण? तो उभा राहिला काय किंवा पडला काय, तो त्याच्या मालकाचा प्रश्न आहे. त्याला नक्कीच उभे केले जाईल, कारण त्याला उभे करण्यास यहोवा* समर्थ आहे.
५ कोणी मनुष्य एखादा दिवस दुसऱ्या दिवसापेक्षा अधिक मानतो; तर कोणी सर्व दिवस सारखेच मानतो; प्रत्येकाने आपल्या मनाला पटेल असेच करावे.
६ जो कोणी दिवस पाळतो तो यहोवासाठी* पाळतो. जो खातो तोही यहोवासाठी* खातो, कारण तो देवाचे आभार मानतो; आणि जो खात नाही तो यहोवासाठी* खात नाही, आणि तरीसुद्धा तो देवाचे आभार मानतो.
७ खरेतर, आपल्यापैकी कोणीही स्वतःसाठी जगत नाही आणि कोणीही स्वतःसाठी मरत नाही.
८ कारण आपण जर जगतो, तर यहोवासाठी* जगतो; आणि जर मरतो, तर यहोवासाठी* मरतो. त्यामुळे, आपण जगलो किंवा मेलो, तरी यहोवाचेच* आहोत.
९ कारण ख्रिस्त मरण पावला व पुन्हा जिवंत झाला, यासाठी की त्याने मेलेल्यांचा व जिवंतांचा प्रभू असावे.
१० पण, तू आपल्या भावाचा न्याय का करतोस? किंवा तू आपल्या भावाला तुच्छ का समजतोस? कारण आपण सगळे जण देवाच्या न्यायासनासमोर उभे राहणार आहोत.
११ कारण असे लिहिले आहे: “‘मी माझ्या जिवाची शपथ घेऊन सांगतो,’ की ‘माझ्यापुढे प्रत्येक जण गुडघा टेकेल आणि मीच देव आहे असे प्रत्येक जीभ उघडपणे कबूल करेल,’ असे यहोवा* म्हणतो.”
१२ तर मग, आपल्यापैकी प्रत्येक जण स्वतःविषयी देवाला हिशोब देईल.
१३ म्हणून, यापुढे आपण एकमेकांचा न्याय करू नये; तर आपल्या भावासमोर ठेच लागण्यासारखे किंवा अडखळण्यासारखे काहीही न ठेवण्याचा निश्चय करू या.
१४ मला माहीत आहे आणि प्रभू येशूमध्ये माझी पक्की खातरी आहे, की मुळात कोणतीही गोष्ट अशुद्ध नाही; तर जो कोणी एखादी गोष्ट अशुद्ध मानतो, त्याच्यासाठी ती अशुद्ध आहे.
१५ कारण अन्नामुळे तुझा भाऊ दुखावला जात असेल, तर याचा अर्थ तू आता प्रेमाने वागत नाहीस. ज्याच्यासाठी ख्रिस्त मरण पावला त्याचा तुझ्या अन्नामुळे तू नाश करू नकोस.
१६ त्यामुळे, तुम्ही करत असलेल्या चांगल्या कामाची निंदा होऊ देऊ नका.
१७ कारण देवाच्या राज्याचा अर्थ खाणे-पिणे नाही, तर नीतिमत्त्व, शांती आणि पवित्र आत्म्याद्वारे मिळणारा आनंद आहे.
१८ जो कोणी अशा रीतीने ख्रिस्ताची सेवा करतो त्याचा देव स्वीकार करतो आणि लोक त्याची प्रशंसा करतात.
१९ तर मग, शांतीसाठी आणि एकमेकांच्या उन्नतीसाठी आपण होईल तितका प्रयत्न करू या.
२० केवळ अन्नासाठी देवाचे कार्य नष्ट करू नका. हे खरे आहे, की सर्व गोष्टी शुद्ध आहेत. पण, जर एखाद्याच्या अन्नामुळे कोणाला अडखळण होत असेल, तर ते हानिकारक* आहे.
२१ मांस न खाणे किंवा द्राक्षारस न पिणे किंवा तुझ्या भावाला अडखळण होईल असे काहीही न करणे हेच चांगले.
२२ या बाबतींत तुझा जो विश्वास आहे तो देवासमोर आपल्याजवळच बाळग. स्वतः पसंत केलेल्या गोष्टीमुळे जो मनुष्य स्वतःला दोषी ठरवत नाही तो सुखी आहे.
२३ पण, मनात शंका असल्यावरही जो खातो, तो दोषी ठरतो, कारण त्याचे असे करणे विश्वासावर आधारित नाही. आणि जे विश्वासावर आधारित नाही, ते पाप आहे.
तळटीपा
^ किंवा कदाचित, “प्रश्नांवरून.”
^ शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा “चुकीचे.”