रोमकर १५:१-३३
१५ पण विश्वासात बळकट असलेले आपण, बळकट नसलेल्यांच्या कमजोरपणाचा भार वाहिला पाहिजे; आपण केवळ स्वतःच्याच सुखाचा विचार करू नये,
२ तर आपल्यापैकी प्रत्येकाने आपल्या शेजाऱ्याची उन्नती होण्यासाठी त्याचे भले करून त्याच्या सुखाचा विचार केला पाहिजे.
३ कारण ख्रिस्तानेही स्वतःच्या सुखाचा विचार केला नाही. पण, जसे लिहिण्यात आले आहे: “तुझी निंदा करणाऱ्यांनी केलेली निंदा माझ्यावर आली आहे.”
४ आधीपासूनच लिहून ठेवलेल्या सर्व गोष्टी मुळात आपल्याला शिक्षण देण्याकरता लिहिण्यात आल्या होत्या; यासाठी की, आपल्या धीराने आणि शास्त्रवचनांतून मिळणाऱ्या सांत्वनाने आपल्याला आशा मिळावी.
५ तर आता धीर आणि सांत्वन देणारा देव तुम्हा सर्वांना ख्रिस्त येशूसारखी मनोवृत्ती बाळगण्यास साहाय्य करो;
६ यासाठी की, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव आणि पिता याचा तुम्ही एकजुटीने व एकमुखाने गौरव करावा.
७ त्यामुळे, देवाचा गौरव करण्याच्या उद्देशाने ख्रिस्ताने जसा तुमचा स्वीकार* केला, तसा तुम्हीसुद्धा एकमेकांचा स्वीकार करा.
८ कारण मी तुम्हाला सांगतो, ख्रिस्त हा देवाच्या सत्यतेसाठी सुंता झालेल्यांचा सेवक बनला; यासाठी की, देवाने त्यांच्या पूर्वजांना दिलेली अभिवचने भरवशालायक ठरावीत
९ आणि विदेशी राष्ट्रांनी त्यांना दाखवण्यात आलेल्या दयेमुळे देवाचा गौरव करावा. जसे शास्त्रात लिहिले आहे: “म्हणून विदेशी राष्ट्रांमध्ये मी उघडपणे तुझी महिमा करेन आणि तुझ्या नावाची स्तुतीगीते गाईन.”
१० आणि पुन्हा तो म्हणतो: “राष्ट्रांनो, त्याच्या लोकांसोबत आनंद करा.”
११ मग पुन्हा तो म्हणतो: “सर्व राष्ट्रांनो, यहोवाची* स्तुती करा, आणि सर्व लोक त्याची स्तुती करोत.”
१२ तसेच, यशयासुद्धा म्हणतो: “इशायला अंकुर फुटेल; तो राष्ट्रांवर राज्य करण्यास उभा राहील; त्याच्यावर राष्ट्रे आशा ठेवतील.”
१३ आता आशा देणारा देव, त्याच्यावर भरवसा ठेवणाऱ्या तुम्हाला भरपूर आनंद व शांती देवो; म्हणजे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तुमची आशा वाढत जाईल.*
१४ बांधवांनो, तुम्ही चांगुलपणाने आणि ज्ञानाने परिपूर्ण असून एकमेकांना शिकवण्यास* समर्थ आहात याची मला खातरी आहे.
१५ तरीसुद्धा, काही गोष्टींची तुम्हाला पुन्हा आठवण करून देण्यासाठी मी देवाकडून मिळालेल्या अपार कृपेने त्यांविषयी अगदी स्पष्टपणे लिहिले आहे.
१६ मी विदेशी राष्ट्रांसाठी ख्रिस्त येशूचा जनसेवक व्हावे म्हणून मला ही कृपा दाखवण्यात आली. मी या देवाचा आनंदाचा संदेश सांगण्याचे पवित्र कार्य करत आहे; यासाठी की, या विदेशी राष्ट्रांनी स्वतः पवित्र आत्म्याने पवित्र केलेले व देवाला स्वीकारयोग्य अर्पण असे ठरावे.
१७ म्हणून, माझ्याकडे देवाशी संबंधित असलेल्या गोष्टींवरून ख्रिस्त येशूमध्ये आनंद करण्याचे कारण आहे.
१८ विदेशी राष्ट्रांनी आज्ञा पाळाव्यात म्हणून ख्रिस्ताने माझ्याद्वारे जी कार्ये केली, त्यांशिवाय आणखी कशाविषयीही बोलण्याचे मी धाडस करणार नाही. त्याने माझ्या शब्दांद्वारे व कार्यांद्वारे,
१९ चिन्हांद्वारे व चमत्कारांद्वारे आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे असे केले. मी यरुशलेमपासून ते इल्लूरिकमपर्यंत ख्रिस्ताविषयीचा आनंदाचा संदेश सांगण्याचे कार्य पूर्ण केले आहे.
२० पण, दुसऱ्याने रचलेल्या पायावर मी बांधू नये म्हणून ज्या ठिकाणी ख्रिस्ताचे नाव आधीच सांगण्यात आले होते तिथे आनंदाचा संदेश सांगण्याचे मी जाणीवपूर्वक टाळले;
२१ पण जसे लिहिण्यात आले त्याप्रमाणे मी केले: “ज्यांना त्याच्याविषयी कधीच सांगण्यात आले नाही, ते पाहतील आणि ज्यांनी ऐकले नाही त्यांना समजेल.”
२२ यामुळे मला तुमच्याकडे येण्यापासून बरेचदा रोखण्यात आले.
२३ पण, मी प्रचार केला नाही असे एकही क्षेत्र आता या प्रदेशांत उरले नाही. शिवाय, बऱ्याच* वर्षांपासून मी तुम्हाला भेटण्यास आतुर आहे.
२४ त्यामुळे, मी जेव्हा स्पेनला जायला निघेन तेव्हा वाटेत तुम्हाला भेटून तुमच्या सहवासात काही वेळ घालवेन आणि मग काही अंतरापर्यंत तुम्ही माझ्यासोबत येऊन मला निरोप द्याल, अशी मी आशा करतो.
२५ पण, आता मी पवित्र जनांची सेवा करण्यासाठी यरुशलेमला निघणार आहे.
२६ कारण, यरुशलेममध्ये असलेल्या पवित्र जनांतील गरीबांना मदत करण्यासाठी मासेदोनिया आणि अखया इथल्या बांधवांनी स्वेच्छेने दान दिले आहे.
२७ हे नक्कीच त्यांनी आनंदाने केले; खरेतर, ते त्यांचे ऋणी* होते. कारण जर विदेशी राष्ट्रे या पवित्र जनांच्या आध्यात्मिक गोष्टींत सहभागी झाले, तर भौतिक गोष्टींत त्यांची मदत करणे हे त्यांचे कर्तव्यच आहे.
२८ त्यामुळे, हे काम पूर्ण केल्यावर आणि हे दान* सुरक्षितपणे त्यांच्यापर्यंत पोचवल्यावर मी तुमच्याच वाटेने स्पेनला जाईन.
२९ शिवाय, मला माहीत आहे, की तुमच्याकडे येताना मी ख्रिस्ताचा भरपूर आशीर्वाद घेऊन येईन.
३० आता बांधवांनो, मी आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे आणि पवित्र आत्म्याने उत्पन्न होणाऱ्या प्रेमाद्वारे तुम्हाला अशी विनवणी करतो, की माझ्याप्रमाणेच तुम्हीसुद्धा माझ्यासाठी देवाकडे कळकळून प्रार्थना करावी.
३१ यहुदीयातील विश्वास न ठेवणाऱ्यांच्या तावडीत मी सापडू नये आणि यरुशलेममधील पवित्र जनांनी माझी सेवा स्वीकारावी म्हणून माझ्यासाठी प्रार्थना करा,
३२ म्हणजे, देवाची इच्छा असल्यास मी आनंदाने तुमच्याकडे येईन आणि तुमच्या सहवासात माझ्या मनाला उभारी मिळेल.
३३ शांती देणारा देव तुम्हा सर्वांसोबत असो. आमेन.
तळटीपा
^ किंवा “स्वागत.”
^ शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा “ओसंडून वाहील.”
^ किंवा “बोध करण्यास.”
^ किंवा कदाचित, “काही.”
^ किंवा “कर्जदार.”
^ शब्दशः “फळ.”