रोमकर १६:१-२७

  • पौल, फीबीविषयी सांगतो (१, २)

  • रोममधील ख्रिश्‍चनांना नमस्कार (३-१६)

  • फुटी पाडणाऱ्‍यांना टाळण्याचा इशारा (१७-२०)

  • पौलच्या सहकर्मींकडून नमस्कार (२१-२४)

  • पवित्र रहस्य उघड करण्यात आले आहे (२५-२७)

१६  मी तुम्हाला किंख्रिया मंडळीत सेवा करणारी आपली बहीण, फीबी हिच्याविषयी सांगू इच्छितो;* २  म्हणजे, तुम्ही पवित्र जनांचे केले जावे तसे प्रभूमध्ये तिचे स्वागत करावे; तसेच, तिला जे काही साहाय्य लागेल ते करावे, कारण ती पुष्कळांच्या आणि माझ्यासुद्धा मदतीला धावून आली. ३  ख्रिस्त येशूमध्ये माझे सहकारी असलेल्या प्रिस्का आणि अक्विल्ला यांना माझा नमस्कार सांगा. ४  त्यांनी माझा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव* धोक्यात घातला आणि केवळ मीच नाही, तर विदेशी लोकांच्या सर्व मंडळ्याही त्यांचे आभार मानतात. ५  तसेच, त्यांच्या घरी जमणाऱ्‍या मंडळीलाही नमस्कार. आणि ख्रिस्तासाठी आशियाचे प्रथमफळ असलेला माझा प्रिय अपैनत यालाही माझा नमस्कार. ६  तुमच्यासाठी परिश्रम केलेल्या मरीयाला नमस्कार. ७  तसेच, जे माझ्यासोबत कैदेत होते ते माझे नातेवाईक अंद्रोनीक आणि युनिया यांनाही नमस्कार; प्रेषितांमध्ये त्यांच्याविषयी चांगले मत असून, ते माझ्याही आधीपासूनच ख्रिस्तासोबत ऐक्यात आहेत. ८  प्रभूमध्ये माझा प्रिय आंप्लियात याला माझा नमस्कार सांगा. ९  ख्रिस्तामध्ये आपला सहकारी असलेला उर्बान आणि माझा प्रिय स्ताखू यांना नमस्कार. १०  ख्रिस्ताची पसंती मिळालेला अपिल्लेस याला नमस्कार. अरिस्तबूलच्या घराण्यातील सर्वांना नमस्कार. ११  माझा नातेवाईक, हेरोदियोन याला नमस्कार. नार्किससच्या घराण्यातील जे सर्व प्रभूमध्ये आहेत त्यांना नमस्कार. १२  प्रभूमध्ये परिश्रम करणाऱ्‍या त्रुफैना आणि त्रुफोसा या स्त्रियांना माझा नमस्कार. आपली प्रिय पर्सिस हिला माझा नमस्कार, कारण प्रभूमध्ये तिने खूप परिश्रम केले आहेत. १३  प्रभूमध्ये निवडलेला रूफ याला आणि त्याच्या आईला माझा नमस्कार, जिला मीपण आई मानतो. १४  असुंक्रित, फ्लगोन, हर्मेस, पत्रबास, हर्मास आणि त्यांच्यासोबत असलेल्या बांधवांना माझा नमस्कार. १५  फिललग आणि युलिया, नीरिय आणि त्याची बहीण आणि ओलुंपास आणि त्यांच्यासोबतच्या सर्व पवित्र जनांना माझा नमस्कार. १६  एकमेकांना भेटताना बंधुप्रेमाचे चुंबन घ्या. ख्रिस्ताच्या सर्व मंडळ्यांचा तुम्हाला नमस्कार. १७  आता बांधवांनो, मी तुम्हाला अशी विनवणी करतो, की जे लोक तुम्ही शिकलेल्या गोष्टींविरुद्ध जाऊन फुटी पाडतात व इतरांसाठी अडखळण्याचे कारण बनतात अशांवर नजर ठेवा आणि त्यांना टाळा. १८  कारण अशा प्रकारची माणसे आपल्या प्रभू ख्रिस्ताचे दास नाहीत, तर स्वतःच्याच वासनांचे* दास आहेत. आणि ते गोड बोलून व खुशामत करून भोळ्याभाबड्या लोकांची मने भुलवतात. १९  तुमचा आज्ञाधारकपणा सगळ्यांच्या लक्षात आला आहे आणि म्हणून तुमच्याबद्दल मला आनंद वाटतो. पण, तुम्ही चांगल्या गोष्टींच्या बाबतीत सुज्ञ आणि वाईट गोष्टींच्या बाबतीत भोळे असावे अशी माझी इच्छा आहे. २०  शांती देणारा देव लवकरच सैतानाला तुमच्या पायांखाली चिरडून टाकेल. आपल्या प्रभू येशूची अपार कृपा तुमच्यावर असो. २१  माझा सहकारी तीमथ्य, तसेच माझे नातेवाईक लूक्य, यासोन आणि सोसिपतेर तुम्हाला नमस्कार सांगतात. २२  हे पत्र लिहिणारा मी तर्तिय, प्रभूमध्ये तुम्हाला नमस्कार सांगतो. २३  गायस, जो माझा आणि संपूर्ण मंडळीचा यजमान आहे, तो तुम्हाला नमस्कार सांगतो. शहराचा खजिनदार,* एरास्त तसेच त्याचा भाऊ क्वर्तसुद्धा तुम्हाला नमस्कार सांगतो. २४  * २५  आता, मी सांगत असलेल्या आनंदाच्या संदेशाद्वारे आणि येशू ख्रिस्ताच्या प्रचाराद्वारे देव तुम्हाला स्थिर करण्यास समर्थ आहे. हा आनंदाचा संदश त्या पवित्र रहस्यानुसार आहे, जे पुरातन काळापासून गुप्त ठेवण्यात आले होते, २६  पण आता प्रकट* केले जात आहे. अनंतकाळ जिवंत राहणाऱ्‍या देवाच्या आज्ञेनुसार हे रहस्य शास्त्रवचनांतील भविष्यवाण्यांद्वारे, सर्व राष्ट्रांना कळवले जात आहे, यासाठी की त्यांनी विश्‍वास ठेवून आज्ञा पाळाव्यात. २७  येशू ख्रिस्ताद्वारे त्या एकमेव बुद्धिमान देवाला युगानुयुग गौरव मिळो. आमेन.

तळटीपा

किंवा “शिफारस करतो.”
शब्दशः “स्वतःच्या माना.”
किंवा “पोटांचे.”
किंवा “कारभारी.”
बायबलच्या काही प्राचीन हस्तलिखितांमध्ये हे वचन आढळत नाही आणि त्यामुळे ते देवप्रेरित वचनांचा भाग नाही हे स्पष्ट आहे.
किंवा “उघड.”