रोमकर ३:१-३१
३ तर मग यहुदी असण्याचा आणि सुंतेचा काय फायदा?
२ बरेच फायदे आहेत. पहिली गोष्ट म्हणजे, देवाची पवित्र वचने यहुद्यांनाच सोपवण्यात आली होती.
३ पण, काहींनी विश्वास ठेवला नाही म्हणून काय झाले? त्यांच्या अविश्वासामुळे देवाची विश्वसनीयता व्यर्थ ठरेल का?
४ मुळीच नाही! उलट, प्रत्येक मनुष्य खोटा ठरला, तरी देव खरा ठरेल. कारण असे लिहिण्यात आले आहे: “तुझ्या शब्दांनी तू नीतिमान ठरावे आणि ते तुझ्यावर आरोप लावतील, तेव्हा तू त्यांना खोटे सिद्ध करावे.”
५ पण आपल्या अनीतिमानपणाने जर देवाचे नीतिमत्त्व अधिक ठळकपणे दिसून येत असेल, तर काय म्हणावे? देव त्याचा क्रोध व्यक्त करून अन्याय करत आहे, असे म्हणावे का? (मी मानवी दृष्टिकोनाने बोलत आहे.)
६ मुळीच नाही! नाहीतर, देव जगाचा न्याय कसा करेल?
७ पण मी खोटे बोलल्यामुळे जर देवाचे सत्य अधिक उठून दिसत असेल, आणि त्यामुळे जर त्याचा गौरव होत असेल, तर मग देव मला पापी का ठरवतो?
८ आणि, “चांगल्या गोष्टी घडून येत असतील तर चला, आपण वाईट गोष्टी करू,” असे का म्हणू नये? खरेतर, आम्ही असे म्हणत असल्याचा खोटा आरोप काही जण आमच्यावर करतात. अशा माणसांवर येणारा न्यायदंड देवाच्या न्यायाला धरून आहे.
९ तर मग काय म्हणावे? आपण इतरांपेक्षा वरचढ आहोत का? मुळीच नाही! कारण यहुदी आणि ग्रीक असे सर्वच जण पापाच्या अधीन आहेत, हे आपण याआधीच सिद्ध केले आहे;
१० आणि असे लिहिलेदेखील आहे, की “कुणीही मनुष्य नीतिमान नाही, एकसुद्धा नाही;
११ सखोल समज असलेला कुणीही नाही; एकही जण देवाचा शोध घेत नाही.
१२ सर्व माणसं बहकली आहेत, सर्व निरुपयोगी झाली आहेत; दयेने वागणारा कुणीही नाही, अगदी एकसुद्धा नाही.”
१३ “त्यांचा घसा जणू उघडी कबर आहे; त्यांनी आपल्या जिभेने फसवणूक केली आहे.” “त्यांच्या ओठांत सापांचं विष दडलेलं आहे.”
१४ “आणि त्यांचं तोंड शिव्याशापांनी व कडूपणाने भरलेलं आहे.”
१५ “त्यांची पावलं रक्तपात करण्यास घाई करतात.”
१६ “त्यांच्या मार्गांत विनाश आणि दुःख आहे,
१७ आणि त्यांनी शांतीचा मार्ग ओळखला नाही.”
१८ “त्यांच्या डोळ्यांत देवाची जराही भीती नाही.”
१९ नियमशास्त्रात सांगितलेल्या सर्व गोष्टी, नियमशास्त्राच्या अधीन असलेल्यांना उद्देशून आहेत हे आपल्याला माहीत आहे, यासाठी की प्रत्येकाचे तोंड बंद व्हावे आणि संपूर्ण जग देवाच्या न्यायदंडास पात्र ठरावे.
२० म्हणून, नियमशास्त्रातील कार्यांद्वारे कोणालाही देवासमोर नीतिमान ठरवले जाणार नाही, कारण नियमशास्त्रामुळे आपल्याला खऱ्या अर्थाने पापाची जाणीव होते.
२१ पण, नियमशास्त्राशिवाय एक व्यक्ती देवाच्या नजरेत नीतिमान ठरू शकते हे आता प्रकट करण्यात आले आहे, आणि नियमशास्त्र व संदेष्ट्यांची लिखाणेही याची साक्ष देतात.
२२ हो, येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याद्वारे एक व्यक्ती, खरेतर विश्वास ठेवणारे सर्व जण देवाच्या नजरेत नीतिमान ठरू शकतात. या बाबतीत कोणताही भेदभाव नाही.
२३ कारण सर्वांनीच पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला कमी पडतात,
२४ पण देव आपल्याला नीतिमान ठरवतो, ही त्याची अपार कृपा आहे आणि हे त्याच्याकडून मोफत मिळणारे कृपादान आहे. ख्रिस्त येशूने आपल्या सुटकेसाठी भरलेल्या खंडणीद्वारे देव आपल्याला नीतिमान ठरवतो.
२५ ख्रिस्ताच्या रक्तावरील विश्वासाद्वारे प्रायश्चित्त* होण्याकरता देवाने त्याला बलिदान म्हणून अर्पण केले. देवाने हे स्वतःचे नीतिमत्त्व दाखवून देण्याकरता केले, कारण पूर्वीच्या काळात घडलेल्या पापांची तो धीराने क्षमा करत होता.
२६ देवाने सध्याच्या काळात आपले नीतिमत्त्व दाखवून देण्याकरता हे केले, यासाठी की येशूवर विश्वास ठेवणाऱ्या मनुष्याला नीतिमान ठरवतानाही देव नीतिमान ठरावा.
२७ तर मग, बढाई मारण्याचे कारण काय? त्यासाठी जागाच उरत नाही. कोणत्या नियमामुळे? कार्यांना महत्त्व देणाऱ्या नियमामुळे? नाही, तर विश्वासाच्या नियमामुळे.
२८ कारण मनुष्य हा नियमशास्त्रात सांगितलेली कार्ये केल्याने नाही, तर विश्वासाने नीतिमान ठरतो असे आम्ही मानतो.
२९ देव काय फक्त यहुद्यांचाच आहे का? तो विदेशी लोकांचाही देव नाही का? हो, तो विदेशी लोकांचाही देव आहे.
३० देव एकच आहे, त्यामुळे तो सुंता झालेल्या लोकांना विश्वासामुळे नीतिमान ठरवेल, आणि सुंता न झालेल्या लोकांनाही विश्वासाद्वारे नीतिमान ठरवेल.
३१ तर मग, आपल्या विश्वासाद्वारे आपण नियमशास्त्र रद्द करतो का? मुळीच नाही! उलट, आपण नियमशास्त्राचे समर्थन करतो.
तळटीपा
^ किंवा “देवासोबत समेट.”