रोमकर ४:१-२५

  • अब्राहामला विश्‍वासाद्वारे नीतिमान ठरवण्यात आले (१-१२)

    • अब्राहाम, विश्‍वास ठेवणाऱ्‍यांचा पिता (११)

  • विश्‍वासामुळे वचन देण्यात आले (१३-२५)

 तसे असल्यास, आपला पूर्वज अब्राहाम याने काय मिळवले असे म्हणता येईल? २  उदाहरणार्थ, जर अब्राहामला त्याच्या कार्यांमुळे नीतिमान ठरवण्यात आले असते तर तो बढाई मारू शकला असता, पण देवासमोर नाही. ३  कारण शास्त्रवचन काय म्हणते? “अब्राहामने यहोवावर* विश्‍वास ठेवला आणि त्यामुळे त्याला नीतिमान ठरवण्यात आले.” ४  एखादा माणूस काम करतो, तेव्हा त्याला मिळणारी मजुरी ही त्याच्यावर केलेली कृपा* आहे असे समजले जात नाही, तर ती त्याची हक्काची कमाई असते. ५  पण, जो माणूस आपल्या कार्यांवर अवलंबून न राहता, पापी मनुष्यालाही नीतिमान ठरवणाऱ्‍या देवावर विश्‍वास ठेवतो, त्या माणसाला त्याच्या विश्‍वासामुळे नीतिमान ठरवण्यात येते. ६  देव ज्याला कार्यांशिवाय नीतिमान ठरवतो अशा माणसाला दावीदनेही सुखी म्हटले: ७  “ज्याच्या अपराधांची क्षमा करण्यात आली आहे आणि ज्याची पापे झाकण्यात आली आहेत* तो सुखी आहे; ८  ज्याच्या पापांचा यहोवा* हिशोब ठेवत नाही, असा माणूस सुखी आहे.” ९  तर मग हे सुख फक्‍त सुंता झालेल्यांनाच मिळते का, की सुंता न झालेल्यांनाही ते मिळते? कारण “अब्राहामच्या विश्‍वासामुळे त्याला नीतिमान ठरवण्यात आले,” असे आपण म्हणतो. १०  त्याला केव्हा नीतिमान ठरवण्यात आले? सुंता झाल्यावर की सुंता झालेली नसताना? सुंता झाल्यावर नाही, तर अजून त्याची सुंता झालेली नसताना त्याला नीतिमान ठरवण्यात आले. ११  सुंता ही त्याला देवाकडून मिळालेले चिन्ह होते. सुंता झालेली नसतानाही विश्‍वासाद्वारे नीतिमान ठरवण्यात आल्याचा तो जणू शिक्का* होता. यासाठी की, सुंता झालेली नसतानाही जे विश्‍वास दाखवतात, अशा सर्वांचा तो पिता ठरावा आणि त्यांनाही या विश्‍वासाद्वारे नीतिमान ठरवण्यात यावे; १२  आणि यासाठी की त्याने सुंता झालेल्यांचा पिता ठरावे. पण, जे केवळ सुंता करतात अशांचाच नाही, तर आपला पिता अब्राहाम याने सुंता झालेली नसताना दाखवलेल्या विश्‍वासाचे अनुसरण करून, जे सरळ मार्गाने चालतात अशांचाही तो पिता ठरावा. १३  कारण अब्राहाम एका जगाचा* वारस होईल हे वचन त्याला किंवा त्याच्या संततीला,* नियमशास्त्राद्वारे मिळाले नव्हते, तर विश्‍वासाने नीतिमान ठरवण्यात आल्यामुळे मिळाले होते. १४  कारण नियमशास्त्राला जडून राहणारे जर वारस आहेत, तर मग विश्‍वास व्यर्थ ठरतो आणि देवाने दिलेले वचन रद्द झाले आहे. १५  खरे पाहता, नियमशास्त्रामुळे देवाचा क्रोध उत्पन्‍न होतो, पण जिथे नियमशास्त्र नाही तिथे नियमांचे उल्लंघनही होत नाही. १६  अब्राहामला त्याच्या विश्‍वासामुळे ते वचन मिळाले आणि यातून देवाची अपार कृपाही प्रकट झाली. त्यामुळे, त्याच्या सर्व संततीला,* केवळ ज्यांनी नियमशास्त्राचे पालन केले त्यांनाच नाही, तर अब्राहामसारखा ज्यांचा विश्‍वास आहे त्यांनाही ते वचन मिळेल हे निश्‍चित होते. तो तर आपल्या सर्वांचा पिता आहे. १७  (जसे लिहिण्यात आले आहे: “मी तुला अनेक राष्ट्रांचा पिता म्हणून नेमलं आहे.”) ज्या देवावर त्याचा विश्‍वास होता, जो मेलेल्यांना जिवंत करतो आणि ज्या अजून घडल्या नाहीत अशा गोष्टींविषयी त्या घडल्याप्रमाणे* बोलतो, त्या देवासमोर हे झाले. १८  काहीही आशा नसताना, त्याने आशेच्या आधारावर असा विश्‍वास ठेवला की तो अनेक राष्ट्रांचा पिता बनेल, कारण असे सांगण्यात आले होते, की “अशाच प्रकारे तुझी संततीही* अगणित होईल.” १९  त्याने आपल्या स्वतःच्या शरीराचा विचार केला, जे एखाद्या मृत माणसासारखे झाले होते (कारण तो सुमारे शंभर वर्षांचा होता), तसेच, साराच्या वांझपणाचाही* त्याने विचार केला, पण त्याचा विश्‍वास कमकुवत झाला नाही. २०  देवाने वचन दिले असल्यामुळे त्याचा विश्‍वास डळमळला नाही, तर त्याच्या विश्‍वासामुळे त्याला सामर्थ्य मिळाले व त्याने देवाचा गौरव केला २१  आणि जे वचन देवाने दिले होते, ते पूर्ण करण्यास तो समर्थ आहे अशी पक्की खातरी त्याला होती. २२  म्हणूनच, “त्याला नीतिमान ठरवण्यात आले.” २३  पण, “त्याला नीतिमान ठरवण्यात आले” हे शब्द फक्‍त त्याच्यासाठीच लिहिण्यात आले नव्हते, २४  तर, ते आपल्यासाठीही लिहिण्यात आले आहेत. कारण, ज्या देवाने आपला प्रभू येशू याला मेलेल्यांतून जिवंत केले, त्याच्यावर आपला विश्‍वास असल्यामुळे आपल्यालाही नीतिमान ठरवण्यात येईल. २५  त्या प्रभू येशूला आपल्या पापांमुळे मरणाच्या स्वाधीन करण्यात आले, आणि आपल्याला नीतिमान ठरवण्याकरता मेलेल्यांतून जिवंत करण्यात आले.

तळटीपा

शब्दार्थसूची पाहा.
किंवा “अपार कृपा.”
किंवा “माफ करण्यात आली आहेत.”
शब्दार्थसूची पाहा.
किंवा “खातरी.”
किंवा “नव्या जगाचा.”
शब्दशः “बीजाला.”
शब्दशः “बीजाला.”
किंवा कदाचित, “ज्या अस्तित्वात नाहीत, त्या गोष्टी अस्तित्वात आणतो.”
शब्दशः “बीजही.”
किंवा “गर्भाशयाच्या मृत स्थितीचाही.”