रोमकर ५:१-२१
५ म्हणून आता आपल्याला विश्वासाने नीतिमान ठरवण्यात आले असल्यामुळे, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आपण देवासोबत शांतीचा संबंध टिकवून ठेवू या.
२ त्याच्याचद्वारे विश्वासाने आपल्याला देवासमोर येऊन ती अपार कृपा मिळवणे शक्य झाले आहे, जी आज आपल्यावर आहे. तेव्हा देवाच्या गौरवाची जी आशा आपल्याला मिळाली आहे, तिच्या आधारावर आपण आनंद करू या.*
३ आणि इतकेच नाही, तर संकटांत असतानाही आपण आनंद करू या,* कारण आपल्याला माहीत आहे की संकटामुळे धीर उत्पन्न होतो;
४ आणि धीरामुळे आपल्याला देवाची मान्यता मिळते; देवाची मान्यता मिळाल्यामुळे आशा निर्माण होते.
५ या आशेमुळे पुढे आपली निराशा होणार नाही, कारण आपल्याला देण्यात आलेल्या पवित्र आत्म्याद्वारे* आपल्या हृदयात देवाच्या प्रेमाचा वर्षाव करण्यात आला आहे.
६ कारण, खरे पाहता आपण अजून दुर्बळ असतानाच ख्रिस्त नियुक्त वेळी पापी लोकांसाठी मरण पावला.
७ एखाद्या नीतिमान माणसासाठी मरणारा क्वचितच कोणी सापडेल; आणि, चांगल्या माणसासाठी मरायला कदाचित कोणी तयार होईलही.
८ पण, आपण अजून पापी असतानाच ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला, यातूनच देव आपल्यावर असलेले त्याचे प्रेम दाखवून देतो.
९ तर मग, आता आपल्याला ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे नीतिमान ठरवण्यात आले असल्यामुळे, किती विशेषकरून देवाच्या क्रोधापासून वाचवले जाईल!
१० कारण आपण शत्रू असतानाच जर देवाच्या पुत्राच्या मृत्यूद्वारे आपला त्याच्याशी समेट झाला, तर मग आता समेट झाल्यानंतर त्याच्या जीवनाद्वारे आपल्याला किती विशेषकरून वाचवले जाईल!*
११ आणि इतकेच नाही, तर ज्याच्याद्वारे आता आपला समेट झाला आहे, त्या आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आपण देवामध्ये आनंदही करत आहोत.
१२ म्हणूनच, ज्या प्रकारे एका माणसाद्वारे पाप जगात आले आणि पापाद्वारे मरण आले, त्याच प्रकारे मरण सर्व माणसांमध्ये पसरले, कारण त्या सर्वांनी पाप केले होते.
१३ कारण नियमशास्त्राआधीच पाप जगात होते, पण जिथे नियमशास्त्र नाही तिथे पाप केल्याबद्दल कोणालाही दोषी ठरवले जात नाही.
१४ तरीपण, आदामपासून मोशेपर्यंत, ज्यांनी आदामच्या अपराधाप्रमाणे पाप केले नव्हते, अशांवरही मरणाने राजा म्हणून राज्य केले. आदाम तर जो येणार होता त्याच्यासारखा होता.
१५ पण देवाचे कृपादान त्या अपराधासारखे नाही. कारण जर एका मनुष्याच्या अपराधामुळे पुष्कळ लोकांना मरण आले, तर मग एका मनुष्याच्या, म्हणजेच येशू ख्रिस्ताच्या अपार कृपेमुळे, पुष्कळ लोकांना देवाची अपार कृपा आणि त्याचे मोफत कृपादान किती भरभरून* मिळते!
१६ तसेच, मोफत मिळणाऱ्या त्या कृपादानाचे फायदे, एका मनुष्याने केलेल्या पापाच्या परिणामांसारखे नाहीत. कारण, एका अपराधामुळे शिक्षेस पात्र ठरवले जाण्याचा न्याय झाला, पण पुष्कळ अपराधांनंतर नीतिमान ठरवले जाण्याचे कृपादान मिळाले.
१७ कारण एका मनुष्याच्या अपराधामुळे जर मरणाने राजा म्हणून त्याच्याद्वारे राज्य केले, तर मग, ज्यांना विपुल प्रमाणात अपार कृपा आणि नीतिमानपणाचे मोफत कृपादान लाभते, ते एका मनुष्याद्वारे, म्हणजेच येशू ख्रिस्ताद्वारे जीवन मिळाल्यामुळे किती विशेषकरून राजे म्हणून राज्य करतील!
१८ त्यामुळे, ज्या प्रकारे एका अपराधाद्वारे सर्व प्रकारच्या माणसांना दोषी ठरवण्यात आले, त्याच प्रकारे एका न्यायी कृत्यामुळे सर्व प्रकारच्या माणसांना जीवनाकरता नीतिमान ठरवण्यात येते.
१९ कारण जसे एका मनुष्याने आज्ञा मोडल्यामुळे पुष्कळ जण पापी ठरले, तसेच, एकाच मनुष्याच्या आज्ञापालनामुळे पुष्कळांना नीतिमान ठरवले जाईल.
२० नियमशास्त्र यासाठी आले की अपराधांत वाढ व्हावी. पण जेव्हा अपराधांत वाढ झाली, तेव्हा अपार कृपेचा आणखीनच जास्त वर्षाव झाला.
२१ कशासाठी? यासाठी, की ज्या प्रकारे पापाने मरणासोबत राजा म्हणून राज्य केले, त्याच प्रकारे अपार कृपेने नीतिमत्त्वामुळे, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे सर्वकाळाचे जीवन देण्यासाठी राजा म्हणून राज्य करावे.
तळटीपा
^ किंवा कदाचित, “आनंद करतो.”
^ किंवा कदाचित, “आनंद करतो.”
^ किंवा “देवाच्या क्रियाशील शक्तीद्वारे.” शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा “आपले किती विशेषकरून तारण होईल.”
^ किंवा “विपुल प्रमाणात.”