रोमकर ६:१-२३
६ तर मग, आता आपण काय म्हणावे? अपार कृपा वाढावी म्हणून आपण पाप करत राहावे का?
२ नक्कीच नाही! आपण पापाच्या संबंधाने मरण पावलो आहोत. तर मग, यापुढे आपण पापात कसे काय जगू शकतो?
३ ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा* झालेल्या आपल्या सर्वांचा त्याच्या मरणातही बाप्तिस्मा झाला आहे, हे तुम्हाला माहीत नाही का?
४ त्याच्या मरणात झालेल्या आपल्या बाप्तिस्म्याद्वारे आपल्याला त्याच्यासोबत पुरण्यात आले, यासाठी की पित्याच्या गौरवाद्वारे ज्या प्रकारे ख्रिस्ताला मेलेल्यांतून उठवण्यात आले, त्याच प्रकारे आपणही एक नवे जीवन जगावे.
५ त्याच्यासारखाच मृत्यू झाल्यामुळे आपण त्याच्यासोबत एक झालो आहोत. त्याचप्रमाणे, निश्चितच त्याच्यासारखे पुनरुत्थान* होण्याद्वारेही आपण त्याच्यासोबत एक होऊ.
६ कारण, आपल्याला माहीत आहे की आपले जुने व्यक्तिमत्त्व ख्रिस्तासोबत वधस्तंभावर* खिळण्यात आले, यासाठी की आपल्या पापी शरीराचा आपल्यावरील अधिकार संपून आपण यापुढे पापाचे दास राहू नये.
७ कारण जो कोणी मरण पावला, त्याला त्याच्या पापापासून निर्दोष ठरवण्यात आले आहे.*
८ शिवाय, जर आपण ख्रिस्तासोबत मरण पावलो आहोत, तर आपला असा विश्वास आहे की आपण त्याच्यासोबत जगूदेखील.
९ कारण आपल्याला हे माहीत आहे, की आता ख्रिस्ताला मेलेल्यांतून उठवण्यात आले असल्यामुळे तो पुन्हा कधीही मरणार नाही; मरणाचा आता त्याच्यावर अधिकार राहिला नाही.
१० कारण ख्रिस्त मरण पावला, तेव्हा तो पापाच्या संबंधाने* एकदाच मरण पावला. पण आता तो जे जीवन जगतो ते देवाकरता जगतो.
११ त्याच प्रकारे, तुम्हीदेखील स्वतःला पापाच्या संबंधाने मेलेले, तर देवाकरता ख्रिस्त येशूद्वारे जिवंत झालेले असे समजा.
१२ म्हणूनच, मरणाच्या अधीन असलेल्या तुमच्या शरीरात पापाला राजा म्हणून राज्य करू देऊ नका आणि आपल्या शरीराच्या वासनांच्या आहारी जाऊ नका.
१३ त्याच प्रकारे, आपल्या शरीराला* अनीतीचे साधन* होण्याकरता पापाच्या हाती सोपवू नका, तर मेलेल्यांतून जिवंत झालेले या नात्याने, आपले शरीर* नीतीमानपणाचे साधन होण्याकरता देवाच्या हाती सोपवा.
१४ आता तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नसून अपार कृपेच्या अधीन आहात. त्यामुळे, आता तुमच्यावर पापाने अधिकार चालवू नये.
१५ तर मग आता काय? आपण नियमशास्त्राच्या अधीन नसून, अपार कृपेच्या अधीन असल्यामुळे पाप करावे का? नक्कीच नाही!
१६ तुम्ही स्वतःला एखाद्याच्या स्वाधीन करून त्याच्या आज्ञा पाळल्यास, त्याचे दास ठरता हे तुम्हाला माहीत नाही का? तुम्ही एकतर पापाचे दास ठरता, ज्याचा परिणाम मृत्यू आहे; किंवा आज्ञापालनाचे दास ठरता, ज्यामुळे नीतिमान ठरवले जाते.
१७ पण जरी एकेकाळी तुम्ही पापाचे दास होता, तरी देवाच्या कृपेने, तुम्हाला सोपवण्यात आलेल्या शिक्षणाच्या नमुन्याचे तुम्ही मनापासून पालन केले.
१८ हो, तुम्हाला पापापासून मुक्त करण्यात आल्यामुळे तुम्ही नीतिमानपणाचे दास बनला.
१९ तुमच्या शरीराच्या दुर्बलतेमुळे मी मानवांच्या दृष्टिकोनातून बोलत आहे; पूर्वी, तुम्ही आपल्या अवयवांना अशुद्धतेचे व अनीतीचे दास होण्याकरता स्वाधीन केले व अनीतीने वागला. त्याच प्रकारे, आता आपल्या अवयवांना नीतिमानपणाचे दास होण्याकरता स्वाधीन करा, म्हणजे तुम्ही पवित्र कार्ये कराल.
२० कारण पापाचे दास असताना नीतिमानपणाच्या बाबतीत तुम्ही स्वतंत्र होता.
२१ तर मग, त्या वेळी तुम्ही कोणते फळ उत्पन्न करत होता? तुम्ही अशा गोष्टी करत होता, ज्यांची आता तुम्हाला लाज वाटते. कारण त्या गोष्टींचा परिणाम मृत्यू आहे.
२२ पण, तुम्हाला पापापासून मुक्त करण्यात आले असून आता तुम्ही देवाचे दास बनला आहात. त्यामुळे, तुम्ही पवित्रतेच्या मार्गात फळ उत्पन्न करत आहात आणि त्याचा परिणाम सर्वकाळाचे जीवन आहे.
२३ कारण पापाची मजुरी मृत्यू आहे, पण देवाचे कृपादान, ख्रिस्त येशू आपला प्रभू याच्याद्वारे सर्वकाळाचे जीवन हे आहे.
तळटीपा
^ शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा “मुक्त झाला आहे; त्याला क्षमा करण्यात आली आहे.”
^ अर्थात, पाप काढून टाकण्यासाठी.
^ शब्दशः “अवयवांना.”
^ शब्दशः “शस्त्रे.”
^ शब्दशः “अवयव.”