रोमकर ७:१-२५

  • नियमशास्त्रातून मुक्‍त होण्याविषयी उदाहरण (१-६)

  • नियमशास्त्रामुळे पाप काय हे समजले (७-१२)

  • पापाशी लढाई (१३-२५)

 बांधवांनो, (ज्यांना नियम माहीत आहेत अशांसोबत मी बोलत आहे) माणूस जिवंत असेपर्यंतच नियमशास्त्राचा त्याच्यावर अधिकार राहतो, हे तुम्हाला माहीत नाही का? २  उदाहरणार्थ, लग्न झालेली स्त्री तिचा पती जिवंत असेपर्यंत नियमांनुसार त्याला बांधील असते; पण पती मरण पावल्यास ती आपल्या पतीच्या नियमातून मुक्‍त होते. ३  त्यामुळे, तिचा पती जिवंत असताना ती दुसऱ्‍या पुरुषाची झाल्यास, तिला व्यभिचारिणी म्हटले जाईल. पण पतीचा मृत्यू झाल्यास ती त्याच्या नियमातून मुक्‍त होते, आणि जरी ती दुसऱ्‍या पुरुषाची झाली, तरीसुद्धा ती व्यभिचारिणी ठरत नाही. ४  त्याच प्रकारे माझ्या बांधवांनो, तुम्हीसुद्धा ख्रिस्ताच्या शरीराद्वारे नियमशास्त्राच्या संबंधाने मृत असे झाला, यासाठी की तुम्ही दुसऱ्‍याचे, अर्थात ज्याला मेलेल्यांतून उठवण्यात आले त्याचे व्हावे आणि आपल्याला देवाकरता फळ उत्पन्‍न करता यावे. ५  कारण आपण शरीरानुसार जगत होतो, तेव्हा नियमशास्त्राद्वारे उत्तेजित झालेल्या पापी वासना, मरणाचे फळ उत्पन्‍न करण्याकरता आपल्या शरीरात* कार्य करत होत्या. ६  पण आता आपण नियमशास्त्रातून मुक्‍त झालो आहोत, कारण जे आपल्यावर बंधन घालत होते, त्याच्या संबंधाने आपण मृत झालो आहोत, यासाठी की आपण लिखित नियमांद्वारे जुन्या अर्थाने नाही, तर आत्म्याद्वारे नव्या अर्थाने दास ठरावे. ७  तर मग, आपण काय म्हणावे? नियमशास्त्र पाप आहे का? निश्‍चितच नाही! खरे पाहता, नियमशास्त्र नसते तर पाप काय आहे हे मला समजले नसते. उदाहरणार्थ, “लोभ धरू नको,” असे नियमशास्त्रात म्हटले नसते, तर लोभ काय असतो हे मला समजले नसते. ८  पण आज्ञेमुळे मिळालेली संधी साधून पापाने माझ्यात सर्व प्रकारचा लोभ उत्पन्‍न केला, कारण नियमशास्त्राशिवाय पाप निर्जीव होते. ९  खरे पाहता, एकेकाळी मी नियमशास्त्राशिवाय जगत होतो. पण आज्ञा आल्यावर पाप पुन्हा जिवंत झाले, मी मात्र मरण पावलो. १०  आणि ज्या आज्ञेने जीवनाकडे न्यायला हवे होते, तिने मृत्यूकडे नेले असे मला दिसून आले. ११  कारण आज्ञेमुळे मिळालेली संधी साधून पापाने मला मोहात पाडले आणि त्याद्वारे मला मारून टाकले. १२  त्यामुळे, मुळात नियमशास्त्र हे पवित्र आहे आणि आज्ञा ही पवित्र, नीतिमान व चांगली आहे. १३  मग, जे चांगले आहे त्यामुळे मला मरण आले का? नक्कीच नाही! तर ते पापामुळे आले, यासाठी की जे चांगले त्याद्वारे पापच माझे मरण घडवून आणत असल्याचे दिसून यावे आणि अशा रीतीने आज्ञेद्वारे पापाचा वाईटपणा आणखीनच उठून दिसावा. १४  कारण नियमशास्त्र हे आध्यात्मिक* आहे हे आपल्याला माहीत आहे; पण, मी शारीरिक आणि पापाला विकलेला असा आहे. १५  कारण मी काय करत आहे हे मला समजत नाही. जे करण्याची माझी इच्छा असते ते मी करत नाही, पण ज्या गोष्टींची मला घृणा वाटते, त्याच मी करतो. १६  ज्या गोष्टी करण्याची इच्छा नसते त्या मी करतो, यावरून नियमशास्त्र चांगले आहे असे मी मान्य करतो. १७  तर, आता यापुढे ते कृत्य करणारा मी नसून, माझ्यात राहणारे पाप ते करत असते. १८  कारण मला माहीत आहे, की माझ्यात, म्हणजेच माझ्या शरीरात काहीही चांगले नाही; कारण चांगले करण्याची माझी इच्छा तर आहे, पण ते प्रत्यक्षात करणे मला जमत नाही. १९  कारण जे चांगले करण्याची माझी इच्छा असते ते मी करत नाही, पण ज्या वाईट गोष्टी करण्याची माझी इच्छा नसते, त्याच मी करत राहतो. २०  तर मग, ज्या गोष्टी करण्याची माझी इच्छा नसते त्याच मी करतो, तेव्हा त्या गोष्टी करणारा मी नसून, माझ्यात असणारे पाप त्या गोष्टी करत असते. २१  म्हणून मला माझ्या बाबतीत हा नियम दिसून येतो: योग्य ते करण्याची माझी इच्छा असते, तेव्हा मला स्वतःमध्ये वाईटच आढळते. २२  मला देवाचा नियम खरोखर, अगदी अंतःकरणापासून प्रिय वाटतो. २३  पण माझ्या शरीरात* मला दुसराच एक नियम दिसून येतो. तो माझ्या मनातील नियमाशी लढतो आणि मला माझ्या शरीरात* असलेल्या पापाच्या नियमाचा कैदी बनवतो. २४  खरोखर, माझी किती दयनीय स्थिती आहे! मरणाच्या अधीन असलेल्या माझ्या या शरीरापासून कोण माझी सुटका करेल? २५  आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे मी देवाचे आभार मानतो! तर मग, मनाने मी देवाच्या नियमाचा दास, पण शरीराने पापाच्या नियमाचा दास आहे.

तळटीपा

शब्दशः “अवयवांत.”
किंवा “देवाकडून.”
शब्दशः “अवयवांत.”
शब्दशः “अवयवांत.”