रोमकर ८:१-३९

  • आत्म्याद्वारे जीवन व स्वातंत्र्य (१-११)

  • दत्तकपणाचा आत्मा साक्ष देतो (१२-१७)

  • सृष्टी देवाच्या मुलांचे स्वातंत्र्य उपभोगण्याची वाट पाहते (१८-२५)

  • पवित्र आत्मा आपल्यासाठी विनंती करतो (२६, २७)

  • देवाने पूर्वीपासून नेमलेले (२८-३०)

  • देवाच्या प्रेमाद्वारे विजयी (३१-३९)

 त्यामुळे, जे ख्रिस्त येशूसोबत ऐक्यात आहेत ते शिक्षेस पात्र ठरवले जात नाहीत. २  कारण पवित्र आत्म्याचा जो नियम ख्रिस्त येशूद्वारे जीवन देतो, त्याने तुम्हाला पापाच्या व मृत्यूच्या नियमातून स्वतंत्र केले आहे. ३  मानवी दुर्बलतेमुळे नियमशास्त्राला जे साध्य करता आले नाही, ते देवाने केले. त्याने पाप दूर करण्यासाठी स्वतःच्या पुत्राला एका मानवाच्या रूपात* पाठवले आणि अशा रीतीने शरीरातील पापाला शिक्षेस पात्र ठरवले. ४  हे या उद्देशाने, की आपण जे शरीरानुसार नाही, तर पवित्र आत्म्यानुसार चालतो, त्या आपण नियमशास्त्रातील नीतिनियम पूर्ण करावेत. ५  कारण जे शरीराला अनुसरून चालतात ते शारीरिक गोष्टींकडे मन लावतात, पण जे पवित्र आत्म्याला अनुसरून चालतात ते आध्यात्मिक गोष्टींकडे मन लावतात. ६  कारण शरीराकडे मन लावल्याने मरण येते, पण पवित्र आत्म्याकडे मन लावल्याने जीवन व शांती मिळते; ७  शरीराकडे मन लावणे हे देवाबरोबर शत्रुत्व आहे, कारण शरीर हे देवाच्या नियमाच्या अधीन नाही आणि असूही शकत नाही. ८  म्हणूनच, जे शरीराला अनुसरून चालतात ते देवाला संतुष्ट करू शकत नाहीत. ९  देवाचा आत्मा खरोखरच तुमच्यामध्ये राहत असल्यास, तुम्ही शरीराला अनुसरून नाही, तर पवित्र आत्म्याला अनुसरून चालत आहात. पण, जर एखाद्यामध्ये ख्रिस्ताची मनोवृत्ती* नसेल, तर तो ख्रिस्ताचा नाही. १०  तुम्ही ख्रिस्तासोबत ऐक्यात असल्यास, पापामुळे शरीर जरी मृत असले, तरी पवित्र आत्मा नीतिमानपणामुळे तुम्हाला जीवन देतो. ११  तर आता, ज्या देवाने येशूला मेलेल्यांतून उठवले त्याचा पवित्र आत्मा तुमच्यामध्ये राहत असल्यास, ख्रिस्त येशूला मेलेल्यांतून उठवणारा देव तुमच्यामध्ये राहणाऱ्‍या त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे, मरणाच्या अधीन असलेल्या तुमच्या शरीरांनाही पुन्हा जिवंत करेल. १२  तेव्हा बांधवांनो, आपण कर्जदार आहोत, पण शरीराला अनुसरून जीवन जगण्याकरता शरीराचे कर्जदार नाही. १३  कारण तुम्ही शरीराला अनुसरून चालत असल्यास तुमचे मरण ठरलेले आहे; पण जर तुम्ही पवित्र आत्म्याद्वारे शरीराच्या कामांना मारून टाकले, तर तुम्ही जिवंत राहाल. १४  कारण देवाच्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार चालणारे सर्व जण देवाचे पुत्र आहेत. १५  कारण देवाचा पवित्र आत्मा आपल्याला दास करत नाही, तसेच आपल्या मनात भीतीही उत्पन्‍न करत नाही; उलट या आत्म्याद्वारे आपल्याला पुत्र म्हणून दत्तक घेतले जाते आणि याच पवित्र आत्म्याद्वारे आपल्याला “अब्बा,* बापा!” अशी हाक मारण्याची प्रेरणा मिळते. १६  तो आत्मा आपल्या अंतःकरणाला अशी साक्ष देतो, की आपण देवाची मुले आहोत. १७  तर मग, आपण मुले असल्यास वारसही आहोत, म्हणजे देवाचे वारस आहोत, आणि ख्रिस्तासोबत सहवारस आहोत. अर्थात, त्याच्यासोबत गौरवले जाण्याकरता आधी आपल्याला त्याच्यासोबत दुःखही सोसावे लागेल. १८  कारण आपल्यामध्ये जो गौरव प्रकट केला जाणार आहे, त्याच्या तुलनेत सध्याच्या काळातील दुःखे काहीच नाहीत असे मी मानतो. १९  कारण सृष्टी देवाच्या पुत्रांच्या प्रकट होण्याची आतुरतेने वाट पाहत आहे. २०  कारण सृष्टीला व्यर्थतेच्या स्वाधीन करण्यात आले, पण स्वतःच्या इच्छेने नाही तर, ज्याने तिला स्वाधीन केले त्याच्या इच्छेने; या आशेच्या आधारावर, की २१  सृष्टीदेखील नाशाच्या दास्यातून मुक्‍त केली जाईल आणि तिला देवाच्या मुलांचे गौरवी स्वातंत्र्य मिळेल. २२  कारण सर्व सृष्टी आजपर्यंत कण्हत व दुःख सोसत आहे हे आपल्याला माहीत आहे. २३  इतकेच नाही, तर ज्यांना प्रथम फळ अर्थात पवित्र आत्मा मिळाला आहे, ते आपणसुद्धा मनातल्या मनात कण्हतो. पण त्याच वेळी, खंडणीद्वारे आपल्या शरीरांतून सुटका मिळावी म्हणून आपण देवाचे पुत्र म्हणून दत्तक घेतले जाण्याची आतुरतेने वाट पाहत आहोत. २४  कारण याच आशेद्वारे आपल्याला पापापासून सोडवण्यात आले आहे; पण, डोळ्यांनी पाहिल्यावर आशा ही आशा राहत नाही. कारण, कोणी एखादी गोष्ट पाहतो, तेव्हा तो तिची आशा धरू शकतो का? २५  पण जे पाहिले नाही त्याची आपण आशा धरतो, तेव्हा आपण आतुरतेने व धीराने त्याची वाट पाहत राहतो. २६  त्याच प्रकारे, पवित्र आत्मासुद्धा आपल्यासोबत मिळून, दुर्बलतेत आपले साहाय्य करतो. कारण समस्या ही आहे, की प्रार्थना करण्याची गरज आहे याची जाणीव असूनही, कशासाठी प्रार्थना करावी हे आपल्याला कळत नाही. पण, जेव्हा आपण कण्हतो व शब्दही उच्चारू शकत नाही,* तेव्हा पवित्र आत्मा स्वतः आपल्यासाठी विनंती करतो. २७  आणि, जो हृदय पारखतो त्याला आत्म्याचा अर्थ कळतो, कारण हा आत्मा पवित्र जनांसाठी देवाच्या इच्छेनुसार विनंती करतो. २८  जे देवावर प्रेम करतात व ज्यांना त्याच्या संकल्पानुसार बोलावण्यात आले आहे, त्यांच्या भल्याकरता देव आपली सर्व कार्ये जुळवून आणतो, हे आपल्याला माहीत आहे; २९  कारण ज्यांच्याविषयी त्याने सुरुवातीलाच विचार केला होता, त्यांना त्याने आपल्या पुत्रासारखेच असण्याकरता पूर्वीपासून नेमले होते, यासाठी की तो पुष्कळ बांधवांमध्ये प्रथमपुत्र असा असावा. ३०  शिवाय, ज्यांना त्याने पूर्वीपासून नेमले त्यांनाच त्याने बोलावलेही; आणि ज्यांना त्याने बोलावले त्यांनाच त्याने नीतिमानही ठरवले. शेवटी, ज्यांना त्याने नीतिमान ठरवले, त्यांचा त्याने गौरवही केला. ३१  तर मग, या गोष्टींबद्दल आपण काय म्हणावे? जर देव आपल्या बाजूने आहे, तर आपल्या विरोधात कोण उभा राहू शकेल? ३२  त्याने तर स्वतःच्या पुत्रालाही राखून ठेवले नाही, तर आपल्या सर्वांकरता त्याला अर्पण केले. तर मग, त्याच्यासोबत तो इतर सर्व गोष्टीही आपल्याला देणार नाही का? ३३  देवाच्या निवडलेल्यांवर कोण आरोप करेल? देव स्वतः त्यांना नीतिमान ठरवतो. ३४  कोण त्यांना शिक्षेस पात्र ठरवेल? ख्रिस्त येशू मरण पावला, इतकेच नाही, तर त्याला मेलेल्यांतून उठवण्यात आले, आणि तो देवाच्या उजवीकडे असून आपल्याकरता विनंतीदेखील करतो. ३५  ख्रिस्ताच्या प्रेमापासून कोण आपल्याला वेगळे करू शकेल? संकट, दुःख, छळ, उपासमार, नग्नता,* धोके किंवा तलवार आपल्याला वेगळे करू शकेल का? ३६  जसे लिहिण्यात आले आहे: “तुझ्यामुळे दिवसभर आम्हाला मरणाला सामोरं जावं लागतं; ज्यांची कत्तल केली जाणार आहे, अशा मेंढरांसारखी आमची स्थिती आहे.” ३७  पण, ज्याने आपल्यावर प्रेम केले त्याच्या साहाय्याने आपण या सर्व गोष्टींमध्ये पूर्णपणे विजयी ठरत आहोत. ३८  कारण मला याची खातरी आहे, की ना मृत्यू, ना जीवन, ना देवदूत, ना कोणतेही सरकार, ना सध्याच्या गोष्टी, ना भविष्यातल्या गोष्टी, ना सामर्थ्य ३९  ना उंची, ना खोली, ना सृष्टीतील आणखी कोणतीही गोष्ट आपल्याला देवाच्या त्या प्रेमापासून वेगळे करू शकेल, जे त्याने प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे प्रकट केले आहे.

तळटीपा

शब्दशः “पापी शरीराच्या समानतेत.”
शब्दशः “आत्मा.”
हा ‘वडील’ या अर्थाचा हिब्रू किंवा अॅरामेईक भाषेतील शब्द आहे. सहसा मुले आपल्या वडिलांना संबोधण्यासाठी हा शब्द वापरतात.
किंवा “आपल्याला आपल्या भावना शब्दांत व्यक्‍त करता येत नाहीत.”
किंवा “अंगावर पुरेसे कपडे नसणे.”