रोमकर ९:१-३३
९ ख्रिस्तामध्ये मी खरे बोलतो, खोटे बोलत नाही. माझा स्वतःचा विवेक पवित्र आत्म्याद्वारे मला साक्ष देतो,
२ की मला भयंकर दुःख आहे आणि माझ्या अंतःकरणाला सतत वेदना होत आहेत.
३ मी तर माझ्या बांधवांऐवजी, म्हणजे शारीरिक दृष्ट्या जे माझे नातलग आहेत त्यांच्याऐवजी स्वतः शापित म्हणून ख्रिस्तापासून वेगळे होण्यास तयार आहे.
४ ते इस्राएली असून त्यांना पुत्र म्हणून दत्तक घेण्यात आले. आणि त्यांनाच गौरव, करार, नियमशास्त्र, पवित्र सेवा आणि अभिवचने देण्यात आली होती.
५ ते कुलप्रमुखांचे वंशज असून त्यांच्यातूनच ख्रिस्त मानवाच्या रूपात आला. देव, ज्याचा सर्वांवर अधिकार आहे, त्याची सदासर्वकाळ स्तुती असो. आमेन.
६ पण याचा अर्थ, देवाने दिलेले वचन निष्फळ ठरले असे नाही. कारण, इस्राएलपासून आलेले सर्व जण खरोखरच इस्राएली आहेत असे नाही.
७ तसेच, अब्राहामची संतती* असल्यामुळे ते सर्व त्याची मुले आहेत असेही नाही; तर असे म्हटले आहे, की “जे इसहाकच्या द्वारे उत्पन्न होतील त्यांना तुझी संतती* म्हणतील.”
८ याचा अर्थ, शारीरिक दृष्ट्या जन्मलेली मुले ही खऱ्या अर्थाने देवाची मुले नाहीत, तर अभिवचनानुसार जन्मलेल्या मुलांना संतती* म्हणण्यात आले आहे.
९ कारण असे अभिवचन देण्यात आले होते, की “याच वेळी मी परत येईन आणि साराला एक मुलगा होईल.”
१० तेव्हाच नाही, तर आपला पूर्वज इसहाक याच्यापासून रिबकाला जुळ्या मुलांचा गर्भ राहिला तेव्हाही हे वचन देण्यात आले.
११ निवड करण्याच्या बाबतीत देवाचा संकल्प पुढेही कार्यांवर नाही, तर बोलावणाऱ्याच्या इच्छेवर अवलंबून राहावा, म्हणून रिबकाच्या मुलांचा जन्म होण्याआधीच आणि त्यांनी चांगले-वाईट असे कोणतेही काम करण्याआधीच
१२ तिला असे सांगण्यात आले होते: “थोरला धाकट्याचा दास बनेल.”
१३ हे जसे लिहिण्यात आले होते त्याप्रमाणेच घडले: “याकोबवर मी प्रेम केलं, पण एसावचा द्वेष केला.”
१४ तर मग, आता काय म्हणावे? देव अन्यायी आहे का? मुळीच नाही!
१५ कारण तो मोशेला म्हणतो: “ज्या कोणावर दया करण्याची माझी इच्छा असेल, त्याच्यावर मी दया करेन; आणि ज्या कोणाला करुणा दाखवण्याची माझी इच्छा असेल, त्याला मी करुणा दाखवेन.”
१६ तर मग, एखाद्याच्या इच्छेवर किंवा त्याच्या प्रयत्नांवर नाही,* तर दया करणाऱ्या देवावर हे अवलंबून आहे.
१७ कारण फारोबद्दल शास्त्रवचन म्हणते: “तुझ्या बाबतीत माझं सामर्थ्य दाखवून द्यावं आणि सबंध पृथ्वीवर माझं नाव घोषित करावं या उद्देशानेच मी तुला अजून जिवंत ठेवलं आहे.”
१८ तर मग, त्याची इच्छा असेल त्याच्यावर तो दया करतो, पण ज्या कोणाला कठोर होऊ देण्याची त्याची इच्छा असेल त्याला तो कठोर होऊ देतो.
१९ यावरून कोणी म्हणेल: “मग तरीसुद्धा तो दोष का काढतो? कारण त्याच्या इच्छेपुढे कोणाचं काय चालू शकतं?”
२० पण हे माणसा, देवाला उलट उत्तर देणारा तू कोण? घडवण्यात आलेली वस्तू आपल्या घडवणाऱ्याला, “तू मला असं का बनवलंस?” असे म्हणेल का?
२१ कुंभाराला मातीच्या एकाच गोळ्यापासून एक पात्र आदरणीय* कामासाठी, तर दुसरे अपमानाच्या* कामासाठी बनवण्याचा अधिकार नाही का?
२२ देवाला आपला क्रोध व्यक्त करण्याची आणि आपले सामर्थ्य दाखवून देण्याची इच्छा असताना, नाशासाठी योग्य असलेल्या क्रोधाच्या पात्रांचे त्याने मोठ्या धीराने सहन केले नाही का?
२३ त्याने गौरवासाठी ज्यांना आधीच तयार केले त्या दयेच्या पात्रांवर अपार गौरव प्रकट करण्यासाठी जर असे केले तर काय?
२४ त्याने दयेच्या त्या पात्रांना म्हणजेच आपल्याला केवळ यहुद्यांमधूनच नाही, तर राष्ट्रांमधून बोलावले.
२५ होशेयच्या पुस्तकात त्याने म्हटले त्याप्रमाणेच हे आहे: “जे माझे लोक नव्हते, त्यांना मी ‘माझे लोक’ म्हणेन; आणि जी प्रिय नव्हती, तिला ‘प्रिय’ म्हणेन.
२६ तसेच, ‘तुम्ही माझे लोक नाहीत,’ असे ज्या ठिकाणी म्हटले होते, तिथे त्यांना ‘जिवंत देवाचे पुत्र’ असं म्हटलं जाईल.”
२७ शिवाय, इस्राएलच्या बाबतीत यशया असे घोषित करतो: “इस्राएलच्या पुत्रांची संख्या समुद्राच्या वाळूइतकी असली, तरी त्यांच्यापैकी केवळ काहींचंच तारण होईल.
२८ कारण यहोवा* पृथ्वीवर हिशोब घेईल आणि ते काम पूर्ण करून आटोपते घेईल.”*
२९ तसेच, यशयाने भाकीत केल्याप्रमाणे: “सेनाधीश यहोवाने* आपल्यासाठी संतती* राहू दिली नसती, तर आपण सदोमासारखे झालो असतो आणि आपली अवस्था गमोरासारखीच झाली असती.”
३० तर मग आपण काय म्हणावे? हेच की राष्ट्रांतील लोकांनी, नीतिमत्त्व मिळवण्याचा प्रयत्न करत नसतानाही विश्वासाने प्राप्त होणारे नीतिमत्त्व मिळवले;
३१ पण इस्राएल लोकांनी मात्र नीतिमत्त्वाच्या नियमानुसार चालण्याचा प्रयत्न करूनही ते त्या नियमापर्यंत पोचले नाही.
३२ असे का? कारण त्यांनी ते विश्वासाद्वारे नाही, तर कार्यांद्वारे मिळवण्याचा प्रयत्न केला. ते “ठेच लागण्याच्या दगडावर” अडखळले;
३३ जसे लिहिण्यात आले होते त्याप्रमाणेच हे घडले: “पाहा! मी सीयोनमध्ये ठेच लागण्याचा दगड आणि अडखळणाचा खडक ठेवत आहे; पण, जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याची कधीच निराशा होणार नाही.”
तळटीपा
^ शब्दशः “बीज.”
^ शब्दशः “बीज.”
^ शब्दशः “बीज.”
^ शब्दशः “जो इच्छा करतो त्याच्यावर नाही किंवा जो धावतो त्याच्यावरही नाही.”
^ किंवा “महत्त्वाच्या.”
^ किंवा “हलक्या.”
^ शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा “वेगाने न्यायदंड बजावेल.”
^ शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दशः “बीज.”