लूक १:१-८०

  • थियफिलला उद्देशून (१-४)

  • गब्रीएल देवदूत बाप्तिस्मा देणाऱ्‍या योहानच्या जन्माचे भाकीत करतो (५-२५)

  • गब्रीएल देवदूत येशूच्या जन्माचे भाकीत करतो (२६-३८)

  • मरीया अलीशिबाला भेटायला जाते (३९-४५)

  • मरीया यहोवाची स्तुती करते (४६-५६)

  • योहानचा जन्म व त्याला नाव दिले जाते (५७-६६)

  • जखऱ्‍याची भविष्यवाणी (६७-८०)

 हे आदरणीय थियफील, आपल्याला ज्यांची पक्की खातरी आहे त्या गोष्टींचा वृत्तान्त लिहून काढण्याचे काम अनेकांनी हाती घेतले आहे. २  आणि जे सुरुवातीपासून या गोष्टींचे प्रत्यक्ष साक्षीदार होते व देवाच्या वचनाचे सेवक होते त्यांनी आपल्यापर्यंत पोचवलेल्या गोष्टींप्रमाणेच तो वृत्तान्त आहे. ३  त्यामुळे, मीसुद्धा या सर्व गोष्टी तुम्हाला व्यवस्थित क्रमाने लिहिण्याचा निश्‍चय केला, कारण मी त्यांचा सुरुवातीपासून अचूकपणे शोध लावला आहे. ४  यासाठी, की ज्या गोष्टी तुम्हाला तोंडी शिकवण्यात आल्या आहेत त्यांच्या सत्यतेविषयी तुम्हाला पूर्णपणे खातरी पटावी. ५  यहूदीयाचा राजा, हेरोद* याच्या काळात अबीयाच्या याजक-वर्गातील जखऱ्‍या नावाचा एक याजक होता. त्याच्या बायकोचे नाव अलीशिबा असून ती अहरोनच्या वंशातली होती. ६  ते दोघे यहोवाच्या* नजरेत नीतिमान होते आणि त्याच्या सर्व आज्ञांचे व कायद्यांचे काटेकोरपणे पालन करायचे. ७  पण त्यांना मूलबाळ नव्हते, कारण अलीशिबा वांझ होती; शिवाय, त्या दोघांचेही वय झाले होते. ८  एकदा असे झाले, की जखऱ्‍या देवासमोर याजक म्हणून सेवा करत होता, कारण मंदिरात काम करण्याची त्याच्या याजक-वर्गाची पाळी होती. ९  आणि याजकांच्या ठरलेल्या रिवाजाप्रमाणे* त्याची निवड करण्यात आली तेव्हा तो धूप जाळण्यासाठी यहोवाच्या* मंदिरातील पवित्र स्थानात गेला. १०  धूप जाळण्याच्या वेळी सर्व लोक बाहेर प्रार्थना करत होते. ११  इतक्यात, यहोवाचा* दूत जखऱ्‍यासमोर प्रकट झाला; तो धूपवेदीच्या उजव्या बाजूला उभा होता. १२  त्याला पाहून जखऱ्‍या चकित झाला आणि अतिशय घाबरला. १३  पण, देवदूत त्याला म्हणाला: “जखऱ्‍या घाबरू नकोस, कारण तुझी याचना देवाने ऐकली आहे. तुझी बायको अलीशिबा हिच्यापासून तुला एक मुलगा होईल आणि तू त्याचं नाव योहान ठेव. १४  तू आनंदित व अतिशय हर्षित होशील आणि त्याच्या जन्मामुळे पुष्कळ लोक उल्लास करतील, १५  कारण यहोवाच्या* नजरेत तो महान होईल. पण, त्याने कधीच द्राक्षारस किंवा मद्य पिऊ नये आणि आपल्या आईच्या गर्भापासूनच* तो पवित्र आत्म्याने* परिपूर्ण होईल. १६  तो इस्राएलच्या पुत्रांपैकी अनेकांना त्यांचा देव यहोवा* याच्याकडे पुन्हा वळवेल. १७  तसेच, तो एलीयाच्या आत्म्याने* व सामर्थ्याने देवापुढे जाईल. तो वडिलांची मने मुलांकडे व आज्ञा न मानणाऱ्‍या लोकांना नीतिमानांच्या सुबुद्धीकडे वळवेल. यासाठी, की यहोवाकरता* योग्य अशी प्रजा बनण्यास लोकांना तयार करावे.” १८  तेव्हा जखऱ्‍या देवदूताला म्हणाला: “पण, असं नक्की घडेल हे कशावरून? कारण मी तर म्हातारा झालो आहे आणि माझ्या बायकोचंही वय झालं आहे.” १९  देवदूत त्याला म्हणाला: “मी देवाजवळ उभा राहणारा गब्रीएल आहे; आणि तुझ्याशी बोलण्याकरता आणि तुला ही आनंदाची बातमी देण्याकरताच मला पाठवण्यात आलं आहे. २०  पण पाहा! या गोष्टी घडेपर्यंत तू मुकाच राहशील आणि तुला बोलता येणार नाही, कारण नियुक्‍त वेळी पूर्ण होणार असलेल्या माझ्या शब्दांवर तू विश्‍वास ठेवला नाहीस.” २१  इकडे, लोक अजूनही जखऱ्‍याची वाट पाहत होते आणि पवित्र स्थानात त्याला इतका वेळ का लागला याचे त्यांना आश्‍चर्य वाटत होते. २२  तो बाहेर आला तेव्हा त्याला त्यांच्याशी बोलता येईना. तेव्हा, पवित्र स्थानात त्याला नक्कीच काहीतरी अद्‌भुत दर्शन झाले असावे हे त्यांनी ओळखले. तो त्यांना खाणाखुणा करत होता, पण तो मुकाच राहिला. २३  शेवटी, मंदिरातील त्याच्या पवित्र सेवेचे* दिवस संपले तेव्हा तो आपल्या घरी परत गेला. २४  मग काही दिवसांनंतर त्याची बायको अलीशिबा गरोदर राहिली आणि पाच महिन्यांपर्यंत ती घराबाहेर पडली नाही. ती असे म्हणाली: २५  “यहोवाने* माझ्यासाठी हे घडवून आणलं आहे. लोकांमध्ये झालेला माझा अपमान दूर करण्यासाठी त्याने माझ्याकडे लक्ष दिलं आहे.” २६  तिच्या सहाव्या महिन्यात देवाने गब्रीएल देवदूताला गालीलमधील नासरेथ नावाच्या शहरात एका कुमारीकडे पाठवले. २७  दावीदच्या घराण्यातील योसेफ नावाच्या पुरुषाशी तिची मागणी झाली होती. त्या कुमारीचे नाव मरीया होते. २८  देवदूत तिच्याकडे आत येऊन म्हणाला: “हे आशीर्वादित कुमारी! तुला शांती असो. यहोवा* तुझ्यासोबत आहे.” २९  पण, ते ऐकून ती मोठ्या गोंधळात पडली आणि देवदूताच्या या शब्दांचा काय अर्थ असू शकेल असा विचार करू लागली. ३०  तेव्हा, देवदूताने तिला म्हटले: “मरीया, घाबरू नकोस, कारण देवाने तुझ्यावर कृपा केली आहे. ३१  आणि पाहा! तू गर्भवती होशील आणि एका पुत्राला जन्म देशील. तू त्याचे नाव येशू ठेव. ३२  तो महान होईल आणि त्याला सर्वोच्च देवाचा पुत्र म्हणतील आणि यहोवा* त्याला त्याच्या पित्याचे अर्थात दावीदचे सिंहासन देईल, ३३  आणि राजा या नात्याने तो याकोबच्या घराण्यावर सदासर्वकाळ राज्य करेल आणि त्याच्या राज्याचा कधीच अंत होणार नाही.” ३४  पण, मरीया देवदूताला म्हणाली: “हे कसं शक्य आहे? कारण मी अजून कुमारी आहे.”* ३५  तेव्हा देवदूत तिला म्हणाला: “पवित्र आत्मा* तुझ्यावर येईल आणि सर्वोच्च देवाचं सामर्थ्य तुझ्यावर छाया करेल. आणि म्हणूनच जो जन्माला येईल त्याला पवित्र व देवाचा पुत्र असं म्हटलं जाईल. ३६  पाहा! तुझ्या नात्यातल्या अलीशिबालाही पुत्रगर्भ राहिला आहे आणि तेसुद्धा तिच्या म्हातारपणी. जिला वांझ म्हटलं जायचं तिचा हा सहावा महिना आहे. ३७  कारण देवाला कोणतीही गोष्ट* अशक्य नाही.” ३८  तेव्हा मरीया म्हणाली: “पाहा! मी यहोवाची* दासी आहे! तुम्ही सांगितल्याप्रमाणेच माझ्या बाबतीत घडो.” मग, देवदूत तिथून निघून गेला. ३९  त्या दिवसांत, मरीया घाईघाईने डोंगराळ प्रदेशातील यहूदाच्या एका शहरात जायला निघाली, ४०  आणि जखऱ्‍याच्या घरात प्रवेश करून तिने अलीशिबाला अभिवादन केले.* ४१  अलीशिबाने मरीयेचे अभिवादन ऐकताच तिच्या पोटातील बाळाने उडी मारली आणि अलीशिबा पवित्र आत्म्याने* परिपूर्ण झाली, ४२  व ती मोठ्याने म्हणाली: “स्त्रियांमध्ये तू धन्य आहेस आणि तुझ्या पोटचे फळदेखील धन्य आहे! ४३  माझ्या प्रभूच्या आईने मला भेटायला यावं, हा माझ्यासाठी किती मोठा सन्मान आहे! ४४  कारण पाहा! तुझ्या अभिवादनाचा आवाज माझ्या कानांवर पडताच माझ्या पोटातील बाळाने आनंदाने उडी मारली. ४५  आणि जिने विश्‍वास ठेवला ती धन्य! कारण यहोवाने* तिला जे काही सांगितलं आहे ते सर्व पूर्ण होईल.” ४६  तेव्हा मरीया म्हणाली: “माझा जीव* यहोवाचा* जयजयकार करतो, ४७  आणि माझं अंतःकरण* माझ्या तारणकर्त्या देवामुळे अत्यानंद करतं, ४८  कारण त्याने आपल्या दासीच्या दयनीय अवस्थेकडे पाहिलं आहे. पाहा! यापुढे सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील, ४९  कारण सामर्थ्यशाली देवाने माझ्यासाठी महान गोष्टी केल्या आहेत; त्याचं नाव पवित्र आहे, ५०  जे त्याचं भय धरतात त्यांच्यावर तो पिढ्या न्‌ पिढ्या दया करतो. ५१  त्याने आपल्या हाताने आपला पराक्रम दाखवला आहे; जे आपल्या मनात गर्विष्ठ कल्पना बाळगतात अशांची त्याने पांगापांग केली आहे. ५२  त्याने अधिपतींना सिंहासनांवरून उतरवलं आहे आणि दीनदुबळ्यांना उंचावलं आहे; ५३  त्याने उपाशी असलेल्यांना चांगल्या गोष्टींनी अगदी तृप्त केलं आहे आणि श्रीमंतांना रिकाम्या हाती पाठवून दिलं आहे. ५४  सदासर्वकाळ त्याची दया आठवून तो आपला सेवक इस्राएल याच्या साहाय्याला आला आहे, ५५  आमच्या वाडवडिलांना, अब्राहामला व त्याच्या संततीला* वचन दिल्याप्रमाणे त्याने केलं आहे.” ५६  मरीया सुमारे तीन महिने अलीशिबाकडे राहून आपल्या घरी परतली. ५७  अलीशिबाचे दिवस भरल्यानंतर तिने एका मुलाला जन्म दिला. ५८  यहोवाने* तिच्यावर किती दया केली आहे हे तिचे शेजारीपाजारी आणि नातेवाईक यांनी ऐकले आणि त्यांनी तिच्यासोबत आनंद केला. ५९  मग, आठव्या दिवशी ते मुलाची सुंता करण्यासाठी आले आणि त्याचा पिता, जखऱ्‍या याच्या नावावरून ते त्याचे नाव ठेवणार होते. ६०  पण त्याची आई म्हणाली: “नाही! त्याचं नाव योहान असेल.” ६१  तेव्हा ते तिला म्हणाले: “तुमच्या नातेवाइकांपैकी कोणाचंही हे नाव नाही.” ६२  मग, मुलाचे नाव काय ठेवावे हे त्यांनी खाणाखुणा करून त्याच्या वडिलांना विचारले. ६३  तेव्हा त्याने एक पाटी मागितली आणि त्यावर असे लिहिले: “याचं नाव योहान आहे.” तेव्हा त्या सर्वांना फार आश्‍चर्य वाटले. ६४  त्याच क्षणी, त्याचे तोंड उघडून त्याची जीभ मोकळी झाली आणि तो बोलू लागला व देवाची स्तुती करू लागला. ६५  तेव्हा, जवळपास राहणाऱ्‍या सर्व लोकांमध्ये भीती पसरली आणि यहूदीयाच्या सबंध डोंगराळ प्रदेशात या गोष्टींविषयी चर्चा होऊ लागली. ६६  आणि जितक्यांनी हे ऐकले त्यांनी या गोष्टी मनात जपून ठेवल्या आणि ते म्हणाले: “हा मुलगा मोठा होऊन कोण बनेल?” कारण यहोवाचा* हात खरोखरच त्याच्यावर होता. ६७  मग त्याचा पिता जखऱ्‍या पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाला आणि त्याने अशी भविष्यवाणी केली: ६८  “इस्राएलचा देव, यहोवा* धन्यवादित असो, कारण त्याने आपल्या लोकांकडे लक्ष वळवून त्यांची सुटका केली आहे. ६९  त्याचा सेवक दावीद याच्या घराण्यात त्याने आमच्यासाठी तारणाचं शिंग* उभारलं आहे; ७०  त्याने प्राचीन काळातल्या आपल्या पवित्र संदेष्ट्यांच्या तोंडून सांगितल्याप्रमाणे केलं आहे. ७१  त्याने सांगितलं होतं, की तो आमच्या शत्रूंपासून आणि आमचा द्वेष करणाऱ्‍या सर्वांच्या हातून आम्हाला सोडवेल; ७२  आणि आमच्या वाडवडिलांवर दया करून तो आपला पवित्र करार, ७३  अर्थात आमचा पूर्वज, अब्राहाम याला वाहिलेली शपथ आठवेल, ७४  आणि त्यानुसार आमच्या शत्रूंपासून सोडवल्यानंतर आम्हाला निर्भयपणे त्याची पवित्र सेवा, ७५  एकनिष्ठेने व नीतीने सर्वकाळ करत राहण्याचा बहुमान देईल. ७६  पण माझ्या मुला, तुला सर्वोच्च देवाचा संदेष्टा म्हणतील, कारण तू यहोवाच्या* पुढे जाऊन त्याचे मार्ग तयार करशील, ७७  आणि त्याच्या लोकांना तारणाविषयीचा संदेश सांगशील. त्यांच्या पापांच्या क्षमेद्वारे, ७८  आपल्या देवाच्या कोमल दयेमुळे त्यांना हे तारण मिळेल. याच दयेमुळे स्वर्गातून पहाटेचा प्रकाश उजाडताना आपण पाहू. ७९  आणि तो अंधारात व मृत्यूच्या छायेत बसलेल्यांना उजेड देईल आणि आपल्या पावलांना शांतीचा मार्ग दाखवेल.” ८०  मग तो लहान मुलगा वाढत गेला आणि आत्म्याने सामर्थ्यशाली झाला. आणि इस्राएल लोकांसमोर उघडपणे प्रकट होण्याची त्याची वेळ येईपर्यंत तो ओसाड प्रदेशातच राहिला.

तळटीपा

शब्दार्थसूची पाहा.
शब्दार्थसूची पाहा.
किंवा “प्रथेप्रमाणे.”
शब्दार्थसूची पाहा.
शब्दार्थसूची पाहा.
शब्दार्थसूची पाहा.
किंवा “जन्माच्या आधीपासूनच.”
किंवा “देवाच्या क्रियाशील शक्‍तीने.” शब्दार्थसूची पाहा.
शब्दार्थसूची पाहा.
किंवा “आवेशाने.”
शब्दार्थसूची पाहा.
किंवा “जनसेवेचे.”
शब्दार्थसूची पाहा.
शब्दार्थसूची पाहा.
शब्दार्थसूची पाहा.
किंवा “माझे पुरुषासोबत लैंगिक संबंध नाहीत.”
किंवा “देवाची क्रियाशील शक्‍ती.” शब्दार्थसूची पाहा.
किंवा “कोणतेही वचन.”
शब्दार्थसूची पाहा.
किंवा “नमस्कार केला.”
किंवा “देवाच्या क्रियाशील शक्‍तीने.” शब्दार्थसूची पाहा.
शब्दार्थसूची पाहा.
शब्दार्थसूची पाहा.
शब्दार्थसूची पाहा.
किंवा “आत्मा.”
शब्दशः “बीजाला.”
शब्दार्थसूची पाहा.
शब्दार्थसूची पाहा.
शब्दार्थसूची पाहा.
किंवा “सामर्थ्यशाली तारणकर्ता.” शब्दार्थसूचीत “शिंग” पाहा.
शब्दार्थसूची पाहा.