लूक १०:१-४२
१० यानंतर, प्रभूने आणखी सत्तर जणांना निवडले आणि ज्या प्रत्येक नगरात व ज्या ज्या ठिकाणी तो स्वतः जाणार होता, त्या त्या ठिकाणी त्याने त्यांना जोडीजोडीने आपल्यापुढे पाठवले.
२ मग तो त्यांना म्हणाला: “पीक तर भरपूर आहे, पण कामकरी थोडे आहेत. म्हणून, पिकाच्या मालकाने कापणी करण्यासाठी कामकरी पाठवावेत अशी त्याला विनंती करा.
३ जा, पण पाहा! लांडग्यांमध्ये मेंढरांना पाठवावं तसं मी तुम्हाला पाठवत आहे.
४ पैशांचा बटवा किंवा शिदोरी किंवा जास्तीचे जोडे सोबत घेऊ नका; आणि रस्त्याने जाताना कोणाला नमस्कार करू नका.*
५ कोणत्याही घरात गेल्यावर आधी असे म्हणा: ‘या घराला शांती असो.’
६ आणि जर तिथे कोणी शांतिप्रिय असेल, तर तुमची शांती त्याच्यावर राहील. पण नसेल तर तुमची शांती तुमच्याकडे परत येईल.
७ म्हणून, त्याच घरात मुक्काम करा आणि ते जे काही तुम्हाला देतील ते खा व प्या; कारण, कामकऱ्याला त्याची मजुरी मिळण्याचा हक्क आहे. आणि वारंवार एका घरातून दुसऱ्या घरात मुक्काम हलवू नका.
८ तसंच, एखाद्या शहरात गेल्यानंतर त्यांनी तुमचं स्वागत केलं, तर ते जे काही तुम्हाला वाढतील ते खा
९ आणि तिथे असलेल्या आजारी लोकांना बरं करा आणि त्यांना सांगा: ‘देवाचं राज्य तुमच्या जवळ आलं आहे.’
१० पण, एखाद्या शहरात गेल्यानंतर त्यांनी तुमचं स्वागत केलं नाही, तर शहराच्या मुख्य रस्त्यांवर जा आणि म्हणा:
११ ‘तुम्हाला इशारा मिळण्यासाठी आमच्या पायांना लागलेली तुमच्या शहराची धूळदेखील आम्ही पुसून* टाकत आहोत. पण, हे लक्षात ठेवा, देवाचं राज्य जवळ आलं आहे.’
१२ मी तर तुम्हाला सांगतो, न्यायाच्या दिवशी सदोमला त्या शहरापेक्षा सोपं जाईल.
१३ हे खोराजिन! तुझा धिक्कार असो! हे बेथसैदा! तुझा धिक्कार असो! कारण तुमच्यामध्ये जी अद्भुत कार्ये घडली आहेत ती सोर व सीदोन इथे घडली असती, तर त्यांनी केव्हाच गोणपाट घालून व राखेत बसून पश्चात्ताप केला असता.
१४ म्हणूनच, न्यायाच्या दिवशी सोर आणि सीदोन यांना तुमच्यापेक्षा सोपं जाईल.
१५ आणि हे कफर्णहूम! तुला काय स्वर्गापर्यंत उंचावलं जाईल? नाही, तू खाली कबरेत* जाशील!
१६ जो कोणी तुमचं ऐकतो, तो माझं ऐकतो. आणि जो कोणी तुमचा अनादर करतो, तो माझा अनादर करतो. शिवाय, जो माझा अनादर करतो, तो ज्याने मला पाठवलं त्याचाही अनादर करतो.”
१७ मग, ते सत्तर शिष्य आनंदाने परत आले आणि म्हणाले: “प्रभू, तुझ्या नावाने दुरात्मेसुद्धा आमच्या अधीन होतात.”
१८ तेव्हा, येशू त्यांना म्हणाला: “मला तर सैतान आताच आकाशातून विजेसारखा खाली पडलेला दिसत आहे.
१९ पाहा! मी सापांना व विंचवांना पायाखाली तुडवण्याचा आणि शत्रूंच्या सामर्थ्यावर मात करण्याचा अधिकार तुम्हाला दिला आहे; आणि कोणतीच गोष्ट तुमचं नुकसान करू शकणार नाही.
२० पण, दुरात्मे तुमच्या अधीन करण्यात आले आहेत यामुळे आनंदी होऊ नका, तर स्वर्गात तुमची नावं लिहिण्यात आली आहेत यामुळे आनंदी व्हा.”
२१ त्याच वेळी, तो पवित्र आत्म्याद्वारे* अतिशय आनंदित होऊन म्हणाला: “हे पित्या, आकाशाच्या आणि पृथ्वीच्या प्रभू, मी जाहीरपणे तुझी स्तुती करतो, कारण तू या गोष्टी ज्ञानी आणि बुद्धिमान लोकांपासून काळजीपूर्वक गुप्त ठेवून बालकांना प्रकट केल्या आहेत. हो पित्या, कारण तुला हेच योग्य वाटलं.
२२ माझ्या पित्याने सर्व गोष्टी माझ्या स्वाधीन केल्या आहेत आणि पुत्र कोण आहे हे पित्याशिवाय कोणालाही माहीत नाही; तसंच, पिता कोण आहे हे पुत्राशिवाय, आणि ज्या कोणाला तो पित्याविषयीचं ज्ञान प्रकट करू इच्छितो, त्याच्याशिवाय कोणालाही माहीत नाही.”
२३ मग शिष्यांकडे वळून त्याने म्हटले: “तुम्ही पाहत आहात त्या गोष्टी जे आपल्या डोळ्यांनी पाहतात, ते सुखी!
२४ कारण मी तुम्हाला सांगतो, तुम्ही पाहत असलेल्या गोष्टी पाहण्याची आणि तुम्ही ऐकत असलेल्या गोष्टी ऐकण्याची अनेक संदेष्ट्यांनी व राजांनी इच्छा बाळगली होती, पण त्यांना त्या पाहता व ऐकता आल्या नाहीत.”
२५ आणि पाहा! नियमशास्त्राचा जाणकार असलेला एक मनुष्य उभा राहिला आणि त्याची परीक्षा पाहण्यासाठी म्हणाला: “हे गुरू, सर्वकाळाचं जीवन मिळवण्यासाठी मी काय केलं पाहिजे?”
२६ तो त्याला म्हणाला: “नियमशास्त्रात काय लिहिलं आहे? तुझ्या वाचण्यात काय आलं आहे?”
२७ त्याने उत्तर दिले: “‘तू आपला देव, यहोवा* याच्यावर आपल्या पूर्ण मनाने, आपल्या पूर्ण जिवाने,* आपल्या पूर्ण शक्तीने आणि आपल्या पूर्ण बुद्धीने प्रेम कर’ आणि ‘आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखंच प्रेम कर.’”
२८ येशूने त्याला म्हटले: “तू योग्य उत्तर दिलंस; हेच करत राहा म्हणजे तुला जीवन मिळेल.”
२९ पण, आपण नीतिमान आहोत हे सिद्ध करण्यासाठी तो माणूस येशूला म्हणाला: “मुळात माझा शेजारी कोण?”
३० येशूने त्याला उत्तर दिले: “एक माणूस यरुशलेमहून खाली यरीहोला जात असताना लुटारूंच्या हाती सापडला. त्यांनी त्याचे कपडे काढून त्याला मारहाण केली आणि त्याला अर्धमेल्या अवस्थेत सोडून निघून गेले.
३१ मग, एक याजक त्या रस्त्याने खाली जात होता. पण, त्याने त्या माणसाला पाहिलं तेव्हा तो रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने निघून गेला.
३२ त्याच प्रकारे, एक लेवी तिथे आला आणि त्याने त्या माणसाला पाहिलं, तेव्हा तोसुद्धा रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने निघून गेला.
३३ पण, त्याच रस्त्याने जाणारा एक शोमरोनी तिथे आला, तेव्हा त्या माणसाला पाहून त्याला त्याचा कळवळा आला.
३४ त्यामुळे, तो त्याच्याजवळ गेला आणि त्याने त्याच्या जखमांवर तेल व द्राक्षारस ओतून त्यांवर पट्ट्या बांधल्या. मग, त्याला आपल्या गाढवावर टाकून त्याने त्याला एका धर्मशाळेत आणले आणि त्याची काळजी घेतली.
३५ मग, दुसऱ्या दिवशी त्याने दोन दिनार* काढून धर्मशाळेच्या मालकाला दिले आणि म्हटले: ‘त्याची काळजी घ्या आणि याहून अधिक खर्च झाला, तर परत आल्यावर मी तुम्हाला देईन.’
३६ मग तुझ्या मते या तिघांपैकी, लुटारूंच्या हाती सापडलेल्या माणसाचा खरा शेजारी असल्याचं कोणी दाखवून दिलं?”
३७ तो म्हणाला: “जो त्याच्याशी दयाळूपणे वागला त्याने.” तेव्हा येशू त्याला म्हणाला: “तर मग जा, आणि तूही असंच कर.”
३८ मग, पुढे गेल्यावर ते एका गावात आले. इथे मार्था नावाच्या एका स्त्रीने येशूचे आपल्या घरात स्वागत केले.
३९ तिला मरीया नावाची एक बहीणसुद्धा होती, जी प्रभूच्या पायांजवळ बसून त्याचे* ऐकत होती.
४० पण, मार्था मात्र बरीच कामे करण्यात व्यस्त होती. म्हणून ती येशूजवळ येऊन म्हणाली: “प्रभू, माझ्या बहिणीने सगळी कामं माझ्या एकटीवर टाकली आहेत याचं तुला काहीच वाटत नाही का? मला मदत करायला तिला सांग.”
४१ तेव्हा, येशूने तिला म्हटले: “मार्था, मार्था, तू पुष्कळ गोष्टींविषयी चिंता व दगदग करतेस.
४२ थोड्याच गोष्टींची गरज आहे, खरंतर एकच गोष्ट पुरेशी आहे. मरीयाने जे अधिक चांगलं ते निवडलं आहे आणि ते तिच्याकडून काढून घेतलं जाणार नाही.”
तळटीपा
^ किंवा “मिठी मारून नमस्कार करू नका.”
^ किंवा “झटकून.”
^ किंवा “हेडीसमध्ये.” अर्थात, मृत्यूनंतर सर्व मानव जिथे जातात असे लाक्षणिक ठिकाण. शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा “देवाच्या क्रियाशील शक्तीद्वारे.” शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दशः “त्याचे वचन.”