लूक १२:१-५९

  • परूश्‍यांचे खमीर (१-३)

  • देवाला भ्यावे, माणसाला नाही (४-७)

  • ख्रिस्तावर विश्‍वास असल्याचे कबूल करणे (८-१२)

  • मूर्ख श्रीमंत माणसाचे उदाहरण (१३-२१)

  • चिंता करण्याचे सोडून द्या (२२-३४)

    • लहान कळप (३२)

  • जागृत राहणे (३५-४०)

  • विश्‍वासू कारभारी आणि अविश्‍वासू कारभारी (४१-४८)

  • शांती आणायला नाही, तर फूट पाडायला (४९-५३)

  • काळाचा अर्थ ओळखण्याची गरज (५४-५६)

  • सलोखा करा (५७-५९)

१२  इकडे, हजारोंच्या संख्येने लोक जमा झाले आणि ते एकमेकांना अक्षरशः चेंगरत होते. येशू लोकांना शिकवू लागला आणि सर्वात आधी आपल्या शिष्यांकडे वळून म्हणाला: “परूश्‍यांच्या खमिरापासून, म्हणजे त्यांच्या ढोंगीपणापासून सांभाळा. २  पण, काळजीपूर्वक लपवून ठेवलेली अशी कोणतीही गोष्ट नाही, जी उघडकीस येणार नाही आणि अशी कोणतीही गुप्त गोष्ट नाही, जी उजेडात येणार नाही. ३  म्हणून, तुम्ही जे काही अंधारात बोलता ते उजेडात ऐकलं जाईल, आणि आतल्या खोल्यांत जे काही कुजबुजता ते घरांच्या छतांवरून घोषित केलं जाईल. ४  माझ्या मित्रांनो, मी तुम्हाला हेही सांगतो, की जे शरीर नष्ट करतात, पण नंतर यापेक्षा जास्त काही करू शकत नाहीत त्यांना भिऊ नका. ५  पण, कोणाला भ्यावं हे मी तुम्हाला सांगतो: जिवे मारल्यानंतर गेहेन्‍नात* टाकण्याचा ज्याला अधिकार आहे त्याला भ्या. हो, मी तुम्हाला सांगतो, त्यालाच भ्या. ६  दोन पैशांना* पाच चिमण्या विकल्या जातात की नाही? तरीपण, त्यांपैकी एकीलाही देव विसरत नाही.* ७  खरंतर, तुमच्या डोक्यावरचे सगळे केससुद्धा मोजलेले आहेत. म्हणून, भिऊ नका; पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुमचं मोल जास्त आहे. ८  मी तुम्हाला सांगतो, जो कोणी माझ्यावर विश्‍वास असल्याचं लोकांसमोर स्वीकारतो, त्याला मनुष्याचा पुत्रसुद्धा देवाच्या दूतांसमोर स्वीकारेल. ९  पण, जो कोणी लोकांसमोर मला नाकारतो, त्याला देवाच्या दूतांसमोर नाकारलं जाईल. १०  आणि जो कोणी मनुष्याच्या पुत्राविरुद्ध काही बोलतो, त्याला क्षमा केली जाईल, पण जो पवित्र आत्म्याची निंदा करतो त्याला क्षमा केली जाणार नाही. ११  ते तुम्हाला जनसभांसमोर,* शासकांसमोर किंवा अधिकाऱ्‍यांसमोर आणतील तेव्हा आपल्या बचावासाठी काय बोलावं किंवा कसं बोलावं याची चिंता करू नका, १२  कारण तुम्ही काय बोलावं हे पवित्र आत्मा त्याच वेळी तुम्हाला शिकवेल.” १३  मग, जमलेल्या लोकांपैकी एक जण त्याला म्हणाला: “गुरुजी, आम्हाला वारशाने मिळालेल्या संपत्तीची वाटणी करायला माझ्या भावाला सांगा.” १४  तो त्याला म्हणाला: “मला तुमचा न्यायाधीश किंवा वाटणी करणारा म्हणून कोणी नेमलं?” १५  मग, तो त्यांना म्हणाला: “आपले डोळे उघडे ठेवा आणि सर्व प्रकारच्या लोभापासून सांभाळा, कारण एखाद्याकडे भरपूर संपत्ती असली, तरी त्याची संपत्ती त्याला जीवन देऊ शकत नाही.” १६  तेव्हा, त्याने त्यांना एक उदाहरण दिले: “एका श्रीमंत माणसाच्या जमिनीने भरपूर पीक दिलं. १७  त्यामुळे, तो आपल्या मनात विचार करू लागला, ‘इतकं धान्य साठवण्यासाठी जागा नाही, मग आता मी काय करावं?’ १८  तेव्हा तो म्हणाला, ‘मी असं करेन: माझी धान्याची कोठारे पाडून मी मोठी कोठारे बांधीन आणि तिथे माझं सर्व धान्य व मालमत्ता साठवीन. १९  मग मी स्वतःला* म्हणेन: “पुढची अनेक वर्षं पुरतील इतक्या उत्तम गोष्टी तू* साठवल्या आहेत; तेव्हा काळजी करू नकोस, खा, पी आणि मौजमजा कर.”’ २०  पण, देव त्याला म्हणाला, ‘अरे मूर्खा! आज रात्री तू मरशील.* मग, तू साठवलेल्या या सर्व गोष्टी कोणाच्या होतील?’ २१  जो माणूस स्वतःसाठी धनसंपत्ती साठवतो, पण देवाच्या दृष्टीने श्रीमंत नाही त्याची हीच गत होईल.” २२  मग तो आपल्या शिष्यांना म्हणाला: “म्हणूनच मी तुम्हाला सांगतो: काय खावं अशी आपल्या जिवाबद्दल किंवा काय घालावं अशी आपल्या शरीराबद्दल चिंता करण्याचं सोडून द्या. २३  कारण अन्‍नापेक्षा जीव आणि कपड्यांपेक्षा शरीर जास्त महत्त्वाचं आहे. २४  कावळ्यांचं उदाहरण घ्या: ते पेरणी किंवा कापणी करत नाहीत; त्यांच्याजवळ धान्याची कोठारे किंवा गोदाम नसतात; तरीसुद्धा देव त्यांना खाऊ घालतो. तुमचं मोल पक्ष्यांपेक्षा जास्त नाही का? २५  चिंता करून कोणी आपलं आयुष्य हातभर वाढवू शकतो का? २६  जर एवढीशी गोष्ट तुम्ही करू शकत नाही, तर मग इतर गोष्टींची चिंता तुम्ही का करावी? २७  रानातली फुलं कशी वाढतात याचा विचार करा: ती कष्ट करत नाहीत किंवा सूतही कातत नाहीत; पण मी तुम्हाला सांगतो, की शलमोननेसुद्धा आपल्या सर्व वैभवात या फुलांसारखा सुंदर पेहराव केला नव्हता. २८  रानातली झाडंझुडपं, जी आज आहेत आणि उद्या भट्टीत* टाकली जातात, त्यांना जर देव इतकं सुंदर सजवतो, तर अरे अल्पविश्‍वासी* लोकांनो, तो तुम्हाला किती विशेषकरून घालायला कपडे देईल! २९  म्हणून, काय खावं आणि काय प्यावं याविषयी काळजी करण्याचं आणि अवाजवी चिंता करण्याचं सोडून द्या. ३०  कारण जगातले लोक या गोष्टी मिळवण्याची धडपड करत आहेत. पण, तुम्हाला या गोष्टींची गरज आहे, हे तुमच्या स्वर्गातील पित्याला माहीत आहे. ३१  त्याऐवजी, देवाचं राज्य मिळवण्याचा प्रयत्न करत राहा, म्हणजे या गोष्टीही तुम्हाला मिळतील. ३२  लहान कळपा, भिऊ नको, कारण तुम्हाला राज्य देण्यास तुमच्या पित्याला आनंद वाटला. ३३  म्हणून, आपली मालमत्ता विकून गरिबांना दान द्या. आणि जे झिजणार नाहीत, असे पैशांचे बटवे तयार करा; म्हणजेच स्वर्गात अशी संपत्ती साठवा जी कधीच संपणार नाही, जिथे चोर पोचू शकणार नाही किंवा जिथे तिला कसर लागणार नाही. ३४  कारण जिथे तुझं धन, तिथे तुझं मनही असेल. ३५  कंबर कसून तयार राहा आणि आपले दिवे पेटते ठेवा. ३६  आपला मालक लग्नाहून परत येण्याची वाट पाहणाऱ्‍या माणसांसारखे असा; कारण तो परत येऊन ठोठावताच त्याच्यासाठी दार उघडायला ते तयार असतात. ३७  मालक आल्यावर जे दास जागृत असलेले त्याला आढळतील ते सुखी! मी तुम्हाला खरं सांगतो, तो स्वतः त्यांची सेवा करण्यासाठी कंबर कसेल; आणि त्यांना जेवणाच्या मेजावर बसायला सांगून तो त्यांच्याजवळ उभा राहील व त्यांची सेवाचाकरी करेल. ३८  तो दुसऱ्‍या प्रहरी,* इतकंच काय तर तिसऱ्‍या प्रहरी* आल्यावरही जे तयार असलेले त्याला आढळतील ते सुखी! ३९  पण हे लक्षात घ्या, की चोर केव्हा येणार आहे, हे जर घराच्या मालकाला माहीत असतं, तर त्याने त्याला आपलं घर फोडू दिलं नसतं. ४०  तुम्हीसुद्धा तयार असा, कारण तुम्ही अपेक्षा केली नसेल अशा वेळी मनुष्याचा पुत्र येत आहे.” ४१  मग पेत्र म्हणाला: “प्रभू, तू हे उदाहरण फक्‍त आम्हालाच सांगत आहेस, की सर्वांना?” ४२  तेव्हा प्रभूने म्हटले: आपल्या घरातील सेवकांना योग्य वेळी, योग्य प्रमाणात अन्‍न पुरवत राहण्यासाठी मालक ज्याला नेमेल, असा विश्‍वासू आणि बुद्धिमान* कारभारी* खरोखर कोण आहे? ४३  मालक परत आल्यावर तो त्याला असं करताना आढळला, तर तो दास आशीर्वादित ठरेल! ४४  मी तुम्हाला खरं सांगतो, तो त्याला आपल्या सर्व मालमत्तेवर नियुक्‍त करेल. ४५  पण जर त्या दासाने कधी आपल्या मनात असं म्हटलं, की ‘माझ्या मालकाला परत यायला उशीर लागत आहे,’ आणि जर तो घरातल्या दास व दासींना मारहाण करू लागला आणि खाऊपिऊ लागला व दारूडा झाला, ४६  तर त्याने अपेक्षाही केली नसेल अशा दिवशी आणि त्याला कल्पनाही नसेल अशा वेळी त्याचा मालक येईल, आणि तो त्याला सर्वात कडक अशी शिक्षा देईल आणि अविश्‍वासू लोकांमध्ये त्याला वाटा देईल.* ४७  मग, आपल्या मालकाची इच्छा काय आहे हे समजूनही जो दास तयार नव्हता किंवा ज्याने त्याला दिलेलं काम केलं नाही* त्याला पुष्कळ फटके मारले जातील. ४८  पण, ज्याला आपल्या मालकाची इच्छा काय आहे हे माहीत नव्हतं आणि त्यामुळे त्याने फटके खाण्यालायक काम केलं, त्याला कमी फटके मारले जातील. खरोखर, ज्याला जास्त देण्यात आलं होतं त्या प्रत्येकाकडून जास्त मागितलं जाईल, आणि ज्याला बऱ्‍याच गोष्टींवर नेमण्यात आलं होतं, त्याच्याकडून आणखीनच जास्त मागितलं जाईल. ४९  मी पृथ्वीवर आग पेटवायला आलो आहे आणि जर ती आधीच पेटली असेल, तर मला आणखी काय पाहिजे? ५०  हो, मला एक बाप्तिस्मा घ्यावा लागणार आहे आणि माझा हा बाप्तिस्मा पूर्ण होईपर्यंत मी खूप अस्वस्थ असेन! ५१  तुम्हाला काय वाटतं, मी पृथ्वीवर शांती आणण्यासाठी आलो आहे का? नाही. मी तर तुम्हाला सांगतो, की उलट मी फूट पाडायला आलो आहे. ५२  कारण आतापासून एका घरातल्या पाच जणांमध्ये फूट पडेल. तिघांविरुद्ध दोघं आणि दोघांविरुद्ध तिघं अशी फूट पडेल. ५३  मुलाविरुद्ध बाप आणि बापाविरुद्ध मुलगा, मुलीविरुद्ध आई आणि आईविरुद्ध मुलगी, सुनेविरुद्ध सासू आणि सासूविरुद्ध सून अशी त्यांच्यात फूट पडेल.” ५४  आणखी तो लोकसमुदायाला म्हणाला: “पश्‍चिमेकडून ढग वर येताना तुम्ही पाहता तेव्हा लगेच तुम्ही म्हणता, ‘वादळ येणार आहे,’ आणि तसंच घडतं. ५५  आणि दक्षिणेचा वारा वाहू लागतो तेव्हा तुम्ही म्हणता, ‘आता उष्णतेची लाट येईल,’ आणि तसंच घडतं. ५६  अरे ढोंग्यांनो! पृथ्वी आणि आकाशाचं स्वरूप पाहून हवामान कसं असेल हे तर तुम्ही अचूक ओळखता, पण या विशिष्ट काळाचा अर्थ तुम्हाला का समजत नाही? ५७  आणि तुमच्यासाठी काय योग्य आहे हे तुम्हाला स्वतःला का ठरवता येत नाही? ५८  उदाहरणार्थ, तुझ्याविरुद्ध खटला भरणाऱ्‍यासोबत तू एखाद्या अधिकाऱ्‍याकडे जात असताना, वाटेतच त्याच्याशी समेट करण्याची खटपट कर. नाहीतर तो तुला न्यायाधीशासमोर नेईल आणि न्यायाधीश तुला शिपायाच्या हाती सोपवेल आणि शिपाई तुला तुरुंगात डांबेल. ५९  मी तुला सांगतो, तू त्याची एकेक दमडी* फेडेपर्यंत तुला तिथून मुळीच सुटका मिळणार नाही.”

तळटीपा

शब्दार्थसूची पाहा.
शब्दशः “दोन असारियन,” एक असारियन म्हणजे एका दिवसाच्या मजुरीचा सोळावा भाग.
किंवा “दुर्लक्ष करत नाही.”
किंवा “सभास्थानांसमोर.”
किंवा “माझ्या जिवाला.”
किंवा “माझ्या जिवा, तू.”
किंवा “तुझा जीव मागितला जाईल.” शब्दार्थसूची पाहा, ‘जीव.’
किंवा “आगीत.”
किंवा “कमी विश्‍वास असलेल्या.”
रात्री सुमारे नऊ वाजेपासून मध्यरात्रीपर्यंत.
मध्यरात्रीपासून पहाटे सुमारे तीन वाजेपर्यंत.
किंवा “समजदार.”
अर्थात, घराची व्यवस्था पाहणारा.
किंवा “अविश्‍वासू लोकांसारखीच त्याची अवस्था करेल.”
किंवा “मालकाच्या इच्छेप्रमाणे केलं नाही.”
शब्दशः “शेवटचे लेप्टन नाणे.” शब्दार्थसूची पाहा, लेप्टन.’