लूक १४:१-३५
१४ आणखी एका प्रसंगी, तो शब्बाथाच्या दिवशी परूश्यांच्या एका अधिकाऱ्याच्या घरी जेवायला गेला आणि त्यांचे त्याच्यावर बारीक लक्ष होते.
२ आणि पाहा! जलोदर* नावाचा रोग झालेला एक मनुष्य त्याच्यासमोर होता.
३ तेव्हा येशूने नियमशास्त्राचे जाणकार आणि परूशी यांना विचारले: “शब्बाथाच्या दिवशी एखाद्याला बरं करणं नियमानुसार योग्य आहे की नाही?”
४ पण ते शांतच राहिले. तेव्हा येशूने त्या मनुष्याला स्पर्श करून बरे केले आणि त्याला पाठवून दिले.
५ मग तो त्यांना म्हणाला: “तुमच्यापैकी असा कोण आहे, ज्याचा मुलगा किंवा बैल शब्बाथाच्या दिवशी विहिरीत पडल्यास तो त्याला लगेच बाहेर ओढून काढणार नाही?”
६ तेव्हा ते त्याला काहीही उत्तर देऊ शकले नाहीत.
७ मग मेजवानीला आलेले लोक बसण्यासाठी सर्वात प्रमुख जागा निवडून घेत आहेत हे पाहून त्याने त्यांना एक उदाहरण सांगितले. तो त्यांना म्हणाला:
८ “कोणी तुम्हाला लग्नाच्या मेजवानीचं आमंत्रण दिल्यास, सर्वात प्रमुख ठिकाणी जाऊन बसू नका. कारण, कदाचित तुमच्यापेक्षाही महत्त्वाच्या एखाद्या व्यक्तीला मेजवानीला बोलावण्यात आलं असेल.
९ मग ज्याने तुम्हा दोघांनाही आमंत्रण दिलं तो येऊन तुला म्हणेल, ‘या मनुष्याला तुझ्या जागेवर बसू दे.’ तेव्हा तुला लाजेने मान खाली घालून सर्वात खालच्या जागेवर जाऊन बसावं लागेल.
१० म्हणून, जेव्हा तुला आमंत्रण दिलं जातं तेव्हा सर्वात खालच्या जागी जाऊन बस. म्हणजे तुला आमंत्रण देणारा येऊन म्हणेल, ‘मित्रा, जा तिथे वरती जाऊन बस.’ तेव्हा, सर्व पाहुण्यांच्या देखत तुझा सन्मान होईल.
११ कारण जो कोणी स्वतःला उंच करतो त्याला नमवलं जाईल आणि जो कोणी स्वतःला नम्र करतो त्याला उंचावलं जाईल.”
१२ त्यानंतर ज्या मनुष्याने आमंत्रण दिले होते त्याला येशू म्हणाला: “जेव्हाही तू दुपारच्या किंवा संध्याकाळच्या जेवणाची मेजवानी देशील, तेव्हा तुझ्या मित्रांना, भावांना, नातेवाइकांना किंवा तुझ्या श्रीमंत शेजाऱ्यांना बोलावू नकोस. नाहीतर, तेदेखील तुला आमंत्रण देतील आणि अशा रीतीने त्यांनी तुझी परतफेड केल्यासारखं होईल.
१३ त्याऐवजी, तू मेजवानी देशील तेव्हा जे गरीब, लंगडेलुळे व आंधळे आहेत त्यांना आमंत्रण दे.
१४ म्हणजे तू आनंदी होशील, कारण तुझी परतफेड करण्यासाठी त्यांच्याजवळ काहीही नाही. जेव्हा नीतिमान लोकांचं पुनरुत्थान* होईल तेव्हा तुझी परतफेड केली जाईल.”
१५ या गोष्टी ऐकून पाहुण्यांपैकी एक जण त्याला म्हणाला: “जो देवाच्या राज्यात मेजवानीला बसेल* तो किती धन्य!”
१६ येशू त्याला म्हणाला: “एका मनुष्याने संध्याकाळच्या जेवणाची मोठी मेजवानी आयोजित केली आणि त्याने पुष्कळ लोकांना आमंत्रण दिलं.
१७ जेवण सुरू करण्याची वेळ आली तेव्हा त्याने आपल्या दासाला आमंत्रण दिलेल्या लोकांकडे असं सांगण्यासाठी पाठवलं, की ‘चला, सर्व तयारी झाली आहे.’
१८ पण ते सर्वच्या सर्व निमित्त सांगू लागले. पहिला म्हणाला, ‘मी एक शेत विकत घेतलं आहे आणि मला ते पाहायला जायचं आहे. कृपा करून, मला माफ कर.’
१९ दुसरा म्हणाला, ‘मी बैलांच्या पाच जोड्या विकत घेतल्या आहेत आणि त्या व्यवस्थित आहेत की नाही याची खातरी करायला मला जायचं आहे. कृपा करून मला माफ कर.’
२० आणखी एक जण म्हणाला, ‘माझं नुकतंच लग्न झालं आहे आणि त्यामुळे मी येऊ शकणार नाही.’
२१ मग, दासाने परत येऊन मालकाला हे सर्व सांगितलं. तेव्हा मालकाला राग आला आणि तो आपल्या दासाला म्हणाला, ‘लगेच जा आणि शहराच्या मुख्य रस्त्यांवर आणि गल्लीबोळांत जाऊन जे गरीब, लंगडेलुळे आणि आंधळे आढळतील त्यांना इथे घेऊन ये.’
२२ परत आल्यावर तो दास म्हणाला, ‘मालक, तुम्ही सांगितल्याप्रमाणे झालं आहे, पण अजूनही जागा शिल्लक आहे.’
२३ तेव्हा मालक दासाला म्हणाला, ‘रस्त्यांवर व गल्ल्यांमध्ये जा आणि लोकांना आग्रह करून घेऊन ये म्हणजे माझं घर भरून जाईल.
२४ कारण मी तुम्हाला सांगतो, आमंत्रण दिलेल्यांपैकी एकालाही माझ्या मेजवानीतलं काही चाखायला मिळणार नाही.’”
२५ त्याच्याबरोबर मोठ्या संख्येने लोक जात होते. तेव्हा त्याने वळून त्यांना म्हटले:
२६ “जर कोणी माझ्याकडे येतो, पण आपले वडील, आई, बायको, मुले, भाऊ व बहिणी यांचा, इतकंच काय तर स्वतःचाही* द्वेष* करत नाही, तर तो माझा शिष्य होऊ शकत नाही.
२७ जो आपला वधस्तंभ* उचलून माझ्यामागे येत नाही तो माझा शिष्य होऊ शकत नाही.
२८ उदाहरणार्थ, तुमच्यापैकी असा कोण आहे की ज्याला एक बुरूज बांधायचा असल्यास, तो आधी बसून खर्चाचा हिशोब लावणार नाही; आणि तो पूर्ण करण्याची आपली ऐपत आहे की नाही याची खातरी करणार नाही?
२९ नाहीतर पाया घातल्यावर त्याला बांधकाम पूर्ण करता येणार नाही आणि सर्व लोक त्याची थट्टा करू लागतील
३० आणि म्हणतील: ‘या मनुष्याने बांधकाम सुरू तर केलं, पण याला पूर्ण करता आलं नाही.’
३१ किंवा असा कोणता राजा असेल की जो लढाईत दुसऱ्या राजाचा सामना करायला जाताना, त्याच्या वीस हजार सैनिकांचा मी आपल्या दहा हजार सैनिकांच्या साहाय्याने सामना करू शकेन की नाही, याविषयी आधी बसून विचार करणार नाही?
३२ जर त्याला सामना करणं शक्य नसेल, तर दुसरा राजा दूर असतानाच तो त्याच्याकडे आपले राजदूत पाठवून समेट करण्याचा प्रयत्न करेल.
३३ त्याच प्रकारे, याची खातरी बाळगा की तुमच्यापैकी जो कोणी आपल्या सर्व संपत्तीकडे पाठ फिरवत नाही* तो माझा शिष्य होऊ शकत नाही.
३४ मीठ नक्कीच चांगलं आहे, पण जर मिठाचाच खारटपणा गेला तर त्याचा स्वाद कशाने आणता येईल?
३५ ते जमिनीसाठी किंवा खतासाठी उपयोगी राहणार नाही आणि लोक ते फेकून देतील. ज्याला कान आहेत त्याने ऐकावं.”
तळटीपा
^ शरीरात पाण्याचे प्रमाण वाढल्यामुळे हातापायांना सूज येणे.
^ शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दशः “भाकर खाईल.”
^ किंवा “आपल्या जिवाचाही.”
^ किंवा “तुलनेने कमी प्रेम.”
^ शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा “संपत्तीचा त्याग करत नाही.”