लूक १५:१-३२
१५ आता सर्व जकातदार आणि पापी लोक त्याचे ऐकण्यासाठी त्याच्याभोवती गर्दी करू लागले.
२ तेव्हा परूशी आणि शास्त्री अशी कुरकुर करू लागले: “हा माणूस पापी लोकांना जवळ करतो आणि त्यांच्यासोबत बसून जेवतो.”
३ मग त्याने त्यांना एक उदाहरण सांगितले. तो म्हणाला:
४ “तुमच्यापैकी असा कोण आहे ज्याच्याजवळ शंभर मेंढरं असून त्यांपैकी एक हरवल्यास, तो नव्याण्णव मेंढरांना रानात सोडून ते हरवलेलं मेंढरू शोधायला जाणार नाही आणि ते सापडेपर्यंत त्याचा शोध घेणार नाही?
५ ते सापडल्यावर तो त्याला अतिशय आनंदाने आपल्या खांद्यावर घेतो.
६ मग घरी गेल्यावर तो आपल्या मित्रांना व शेजाऱ्यांना बोलावतो आणि त्यांना म्हणतो, ‘माझ्यासोबत आनंद करा कारण माझं हरवलेलं मेंढरू मला सापडलं आहे.’
७ त्याचप्रमाणे मी तुम्हाला सांगतो, की ज्यांना पश्चात्तापाची गरज नाही अशा नव्याण्णव नीतिमान माणसांपेक्षा, पश्चात्ताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल स्वर्गात जास्त आनंद केला जाईल.
८ किंवा अशी कोणती स्त्री असेल जिच्याजवळ दहा चांदीची नाणी* असून त्यांपैकी एक नाणं हरवल्यास ती दिवा लावून व आपलं घर झाडून, ते नाणं सापडेपर्यंत मन लावून त्याचा शोध घेणार नाही?
९ नाणं सापडल्यावर ती आपल्या मैत्रिणींना व शेजाऱ्यांना बोलावते आणि त्यांना म्हणते, ‘माझ्यासोबत आनंद करा कारण माझं हरवलेलं नाणं* मला सापडलं आहे.’
१० त्याचप्रमाणे मी तुम्हाला सांगतो की पश्चात्ताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल देवाच्या दूतांमध्ये असाच आनंद व्यक्त केला जातो.”
११ मग तो म्हणाला: “एका मनुष्याला दोन मुलं होती.
१२ त्यांपैकी धाकटा मुलगा एकदा आपल्या वडिलांना म्हणाला, ‘बाबा, मालमत्तेतून माझा वाटा मला द्या.’ त्यामुळे त्या मनुष्याने आपल्या मालमत्तेची त्यांच्यात वाटणी केली.
१३ काही दिवसांनी त्या धाकट्या मुलाने आपल्या हक्काचं सर्वकाही गोळा केलं आणि तो एका दूर देशी निघून गेला. तिथे त्याने आपली सगळी संपत्ती ऐशआरामात उधळून टाकली.
१४ त्याने सगळी संपत्ती खर्चून टाकल्यावर त्या सबंध देशात भयंकर दुष्काळ पडला आणि तो अडचणीत आला.
१५ शेवटी तो त्या देशातल्या एका रहिवाशाकडे काम करायला गेला. त्याने त्याला आपल्या शेतांत डुकरं चारण्यासाठी पाठवलं.
१६ तेव्हा डुकरं खात असलेल्या शेंगा खाऊन पोट भरण्याची त्याची फार इच्छा व्हायची. पण, त्याला कोणीही खायला देत नव्हतं.
१७ तो भानावर आला तेव्हा मनात विचार करू लागला, ‘माझ्या वडिलांकडे काम करणारे मजूरसुद्धा पोटभर भाकर खातात आणि मी मात्र इथे उपाशी मरत आहे!
१८ मी आपल्या वडिलांकडे जाईन आणि त्यांना म्हणेन: “बाबा, मी देवाविरुद्ध* आणि तुमच्याविरुद्ध पाप केलं आहे.
१९ तुमचा मुलगा म्हणवून घेण्याची माझी आता लायकी नाही. मला मजूर म्हणून ठेवून घ्या.”’
२० मग तो उठून आपल्या वडिलांकडे गेला. तो अजून दूर असतानाच त्याच्या वडिलांनी त्याला पाहिलं आणि त्यांना त्याचा कळवळा आला. त्यांनी धावत जाऊन त्याला मिठी मारली आणि* प्रेमाने त्याचे मुके घेतले.
२१ तेव्हा मुलगा आपल्या वडिलांना म्हणाला, ‘बाबा, मी देवाविरुद्ध आणि तुमच्याविरुद्ध पाप केलं आहे. तुमचा मुलगा म्हणवून घेण्याची माझी आता लायकी नाही.’
२२ पण वडिलांनी नोकरांना म्हटलं, ‘लवकर जा! आणि सर्वात चांगला झगा आणून याला घाला आणि याच्या हातात अंगठी आणि पायांत जोडे घाला.
२३ आणि एक धष्टपुष्ट वासरू आणून ते कापा म्हणजे आपण सर्व जण मिळून खाऊ-पिऊ व आनंद साजरा करू,
२४ कारण माझा हा मुलगा मेला होता पण तो पुन्हा जिवंत झाला आहे; तो हरवला होता आणि आता सापडला आहे.’ तेव्हा ते सर्व जण आनंद करू लागले.
२५ आतापर्यंत त्याचा मोठा मुलगा शेतात होता. तो शेतातून परत आला तेव्हा घराजवळ येताच त्याला नाच-गाण्याचा आवाज ऐकू आला.
२६ म्हणून त्याने नोकरांपैकी एकाला बोलावून, काय चाललं आहे याविषयी विचारपूस केली.
२७ तो त्याला म्हणाला, ‘तुझा भाऊ आला आहे आणि आपला मुलगा धडधाकट स्थितीत* परत मिळाला म्हणून तुझ्या वडिलांनी धष्टपुष्ट वासरू कापलं आहे.’
२८ पण त्याला राग आला आणि तो घरात जायला तयार होईना. तेव्हा त्याचे वडील बाहेर आले व त्याची समजूत घालू लागले.
२९ तो आपल्या वडिलांना म्हणाला, ‘मी इतक्या वर्षांपासून तुमची सेवाचाकरी करत आहे आणि एकदाही मी तुमचा शब्द टाळला नाही. पण आजपर्यंत तुम्ही मला माझ्या मित्रांसोबत मौजमजा करण्यासाठी साधं कोकरूसुद्धा दिलं नाही.
३० पण वेश्यांसोबत तुमची संपत्ती उधळणारा* हा तुमचा मुलगा परत येताच तुम्ही त्याच्यासाठी धष्टपुष्ट वासरू कापलं.’
३१ तेव्हा वडील मुलाला म्हणाले, ‘माझ्या मुला, तू तर नेहमीच माझ्यासोबत राहिला आहेस आणि माझं जे काही आहे ते तुझंच आहे.
३२ पण तुझा भाऊ मेला होता आणि पुन्हा जिवंत झाला आहे; हरवला होता आणि सापडला आहे, मग आपण त्याच्यासाठी आनंद साजरा करायला नको का?’”
तळटीपा
^ शब्दशः “द्राख्मा.” शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दशः “द्राख्मा.” शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दशः “स्वर्गाविरुद्ध.”
^ शब्दशः “त्याच्या गळ्यात पडून.”
^ किंवा “सुखरूप.”
^ शब्दशः “खाऊन टाकणारा.”