लूक १६:१-३१

  • अनीतिमान कारभाऱ्‍याचे उदाहरण (१-१३)

    • जो सर्वात लहान गोष्टीत विश्‍वासू, तो मोठ्या गोष्टींतही विश्‍वासू (१०)

  • नियमशास्त्र आणि देवाचे राज्य (१४-१८)

  • श्रीमंत माणूस आणि लाजर याचे उदाहरण (१९-३१)

१६  मग त्याने आपल्या शिष्यांना असेही म्हटले: “एका श्रीमंत माणसाचा एक कारभारी* होता. हा कारभारी तुमचे पैसे उधळतो, असं श्रीमंत माणसाला सांगण्यात आलं. २  त्यामुळे त्याने त्याला बोलावून म्हटले, ‘हे मी तुझ्याविषयी काय ऐकतो आहे? आपल्या कारभाराचा हिशोब दे, कारण आता तू माझ्या घराची व्यवस्था पाहण्यास योग्य नाही.’ ३  तेव्हा कारभारी स्वतःशीच विचार करू लागला, ‘मालक तर मला कारभाऱ्‍याच्या पदावरून काढून टाकणार आहे, आता मी काय करू? शेतात कष्ट करण्याइतकी ताकद माझ्याकडे नाही आणि भीक मागायची मला लाज वाटते. ४  हो, आता मला सुचलं मी काय करायला हवं! कारभाऱ्‍याच्या पदावरून काढून टाकल्यावर, लोकांनी मला आपल्या घरांत घ्यावं म्हणून मी असं करतो . . .’ ५  मग त्याने आपल्या मालकाच्या सर्व कर्जदारांना बोलावले व पहिल्या कर्जदाराला तो म्हणाला, ‘माझ्या मालकाचं तुझ्यावर किती कर्ज आहे?’ ६  तो म्हणाला, ‘शंभर मापे* जैतुनाचं तेल.’ तो त्याला म्हणाला, ‘हे घे तुझं करारपत्र आणि लवकर बसून त्यावर पन्‍नास मापे असं लिही.’ ७  मग तो आणखी एकाला म्हणाला, ‘तुझ्यावर किती कर्ज आहे?’ तो म्हणाला, ‘शंभर मोठी मापे* गहू.’ तो त्याला म्हणाला, ‘हे घे तुझं करारपत्र आणि त्यावर ऐंशी मापे असं लिही.’ ८  तेव्हा तो कारभारी अनीतिमान असूनही, त्याने व्यावहारिक बुद्धीचा वापर केल्यामुळे* त्याच्या मालकाने त्याची प्रशंसा केली; कारण या जगाच्या व्यवस्थेचे* पुत्र इतर लोकांशी व्यवहार करण्यात प्रकाशाच्या पुत्रांपेक्षा जास्त बुद्धिमान आहेत. ९  मी तुम्हाला हेही सांगतो: अनीतिमान धनाने आपल्यासाठी मित्र करा, म्हणजे हे धन नष्ट झाल्यावर ते मित्र तुम्हाला सर्वकाळाच्या निवासस्थानांत घेतील. १०  जो सर्वात लहान गोष्टीत विश्‍वासू असतो तो मोठ्या गोष्टींतही विश्‍वासू असतो आणि जो सर्वात लहान गोष्टीत अनीतिमान असतो तो मोठ्या गोष्टींतही अनीतिमान असतो. ११  त्यामुळे, जर तुम्ही अनीतिमान धनाच्या बाबतीत विश्‍वासू असल्याचं दाखवून दिलं नसेल, तर मग जे खरं धन आहे ते तुम्हाला कोण सोपवून देईल? १२  आणि दुसऱ्‍याच्या मालकीचं जे आहे त्या बाबतीत जर तुम्ही विश्‍वासू असल्याचं दाखवून दिलं नसेल, तर मग जे तुमच्यासाठी राखून ठेवलं आहे ते तुम्हाला कोण देईल? १३  कोणताही सेवक दोन मालकांची सेवा करू शकत नाही. कारण एकतर तो त्यांपैकी एकाचा द्वेष करेल आणि दुसऱ्‍यावर प्रेम करेल किंवा एकाशी एकनिष्ठ राहून दुसऱ्‍याला तुच्छ लेखेल. तुम्ही एकाच वेळी देवाची आणि धनाची सेवा करू शकत नाही.” १४  धनलोभी असलेले परूशी या सर्व गोष्टी ऐकत होते आणि ते त्याची थट्टा करू लागले. १५  म्हणून तो त्यांना म्हणाला: “तुम्ही माणसांपुढे स्वतःला नीतिमान ठरवता, पण देव तुमची अंतःकरणे ओळखतो. कारण माणसांना ज्या गोष्टी मोठेपणाच्या वाटतात त्या देवाच्या दृष्टीने तुच्छ आहेत. १६  नियमशास्त्रातील व संदेष्ट्यांच्या लिखाणांतील गोष्टी योहानच्या काळापर्यंत होत्या. तेव्हापासून देवाच्या राज्याचा आनंदाचा संदेश घोषित केला जात आहे आणि प्रत्येक जण त्या राज्यात जाण्याचा प्रयत्न करत आहे. १७  एकवेळ आकाश व पृथ्वी नाहीशी होतील, पण नियमशास्त्रातील लहानातले लहान अक्षर किंवा एक टिंबसुद्धा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. १८  जो कोणी आपल्या पत्नीला घटस्फोट देऊन दुसरीशी लग्न करतो तो व्यभिचार करतो, आणि जो अशा घटस्फोटित स्त्रीशी लग्न करतो तो व्यभिचार करतो. १९  एक श्रीमंत माणूस होता, जो जांभळे व रेशमी कपडे घालायचा आणि दररोज अगदी ऐशआरामात राहायचा. २०  पण त्याच्या फाटकाजवळ लाजर नावाच्या एका भिकाऱ्‍याला आणून ठेवलं जायचं. त्या भिकाऱ्‍याच्या संपूर्ण शरीरावर फोड होते. २१  आणि श्रीमंत माणसाच्या मेजावरून पडणाऱ्‍या तुकड्यांतून आपल्याला काही मिळेल, अशी तो भिकारी आस लावून असायचा. आणि कुत्रे येऊन त्याचे फोड चाटायचे. २२  काही काळाने असं झालं की तो भिकारी मेला आणि देवदूतांनी त्याला अब्राहामच्या जवळ* नेलं. मग श्रीमंत माणूसही मेला आणि त्याला पुरण्यात आलं. २३  तो कबरेत* तळमळत असताना त्याने डोळे वर करून पाहिले तेव्हा खूप दूर अंतरावर त्याला अब्राहाम दिसला आणि त्याच्याजवळ* लाजरही दिसला. २४  म्हणून तो हाक मारून म्हणाला, ‘हे पिता, अब्राहाम! माझ्यावर दया कर आणि लाजरने आपल्या बोटाचं टोक पाण्यात बुडवून माझी जीभ थंड करावी म्हणून त्याला माझ्याकडे पाठव, कारण मी या धगधगत्या आगीत तडफडत आहे.’ २५  पण अब्राहाम म्हणाला: ‘मुला, तू आपल्या आयुष्यात बऱ्‍याच चांगल्या गोष्टी उपभोगल्या, पण लाजरच्या वाट्याला दुःखेच आली. आता त्याला इथे विश्रांती लाभली आहे पण तू मात्र तडफडत आहेस. २६  शिवाय, आमच्यात व तुमच्यात एक मोठी दरी तयार करण्यात आली आहे, त्यामुळे ज्यांना इथून तिथे जायचं आहे ते जाऊ शकत नाहीत आणि तिथूनही लोक इथे येऊ शकत नाहीत.’ २७  तेव्हा श्रीमंत माणूस म्हणाला, ‘असं असेल, तर हे पित्या, त्याला माझ्या वडिलांच्या घरी पाठव अशी मी विनंती करतो. २८  कारण मला पाच भाऊ आहेत आणि त्याने त्यांना चांगल्या प्रकारे सर्व समजावून सांगितल्यास त्यांना या ठिकाणी येऊन तडफडावं लागणार नाही.’ २९  पण अब्राहाम म्हणाला, ‘त्यांच्याजवळ मोशे व संदेष्टे यांची वचने आहेत; त्यांनी त्यांचं ऐकावं.’ ३०  पण तो म्हणाला, ‘नाही पिता अब्राहाम, जर मेलेल्यांमधून कोणी त्यांच्याकडे गेलं तर ते पश्‍चात्ताप करतील.’ ३१  तेव्हा अब्राहाम त्याला म्हणाला, ‘जर ते मोशेचं आणि संदेष्ट्यांचं ऐकत नाहीत, तर कोणी मेलेल्यांमधून उठून त्यांच्याकडे गेलं तरी ते विश्‍वास ठेवणार नाहीत.’”

तळटीपा

अर्थात, घराची व्यवस्था पाहणारा.
किंवा “बथ मापे.” एक बथ म्हणजे २२ लिटर (५.८१ गॅलन).
किंवा “कोर मापे.” एक कोर म्हणजे २२० लिटर (२०० घन क्वॉर्ट).
किंवा “तो धूर्तपणे वागल्यामुळे; सुज्ञपणे वागल्यामुळे.”
किंवा “सध्याच्या काळाचे.” शब्दार्थसूची पाहा.
शब्दशः “अब्राहामच्या उराशी.”
किंवा “हेडीसमध्ये.” अर्थात, मृत्यूनंतर सर्व मानव जिथे जातात असे लाक्षणिक ठिकाण. शब्दार्थसूची पाहा.
शब्दशः “त्याच्या उराशी.”