लूक १७:१-३७
१७ मग तो आपल्या शिष्यांना म्हणाला: “अडखळणे येतील हे तर अटळ आहे, पण ज्या मनुष्याद्वारे अडखळणं येतात त्याचा धिक्कार असो!
२ या लहानांपैकी एकालाही त्याने अडखळायला लावावं, यापेक्षा त्याच्या गळ्यात जात्याचा दगड बांधून त्याला समुद्रात टाकून दिलं जावं, हेच त्याच्यासाठी चांगलं ठरेल.
३ स्वतःला सांभाळा. तुझ्या भावाने पाप केल्यास त्याची कानउघाडणी कर, आणि त्याने पश्चात्ताप केल्यास त्याला क्षमा कर.
४ त्याने दिवसातून सात वेळा तुझ्याविरुद्ध पाप केलं आणि सात वेळा तुझ्याकडे येऊन, ‘मला क्षमा कर’ असं म्हटलं, तर तू त्याला क्षमा केली पाहिजे.”
५ आता प्रेषित प्रभूला म्हणाले: “आमचा विश्वास वाढव.”
६ तेव्हा प्रभू म्हणाला: “तुमच्याजवळ मोहरीच्या दाण्याएवढा विश्वास असला, तर तुम्ही या झाडाला* ‘इथून उपटून समुद्रात लावलं जा’ असं म्हणाल आणि ते तुमचं ऐकेल.
७ तुमच्यापैकी असा कोण आहे की ज्याचा दास नांगरणी करून किंवा मेंढरांना चारून परत आल्यावर तो त्याला म्हणेल, ‘लगेच इकडे ये आणि जेवायला बस?’
८ उलट, तो असं म्हणणार नाही का, की ‘माझ्या संध्याकाळच्या जेवणाची तयारी कर आणि माझं खाणं-पिणं होईपर्यंत कंबर बांधून माझी सेवा कर आणि मग तू खाऊ-पिऊ शकतोस’?
९ आणि सांगितलेली कामं केल्याबद्दल तो दासाचे उपकारही मानणार नाही, मानेल का?
१० त्याच प्रकारे, तुम्हाला सांगितलेल्या सर्व गोष्टी केल्यानंतर असं म्हणा: ‘आम्ही केवळ दास आहोत आणि आमची काहीही योग्यता नाही. आम्ही जे केलं ते आमचं कर्तव्यच होतं.’”
११ यरुशलेमला जात असताना एकदा तो शोमरोन व गालीलच्या सीमेवरून जात होता.
१२ एका गावात जात असताना त्याला दहा कुष्ठरोगी भेटले, पण ते त्याच्यापासून दूरच उभे राहिले.
१३ आणि ते मोठमोठ्याने म्हणू लागले: “हे गुरू, येशू, आमच्यावर दया कर!”
१४ त्यांना पाहून येशू म्हणाला: “जा आणि स्वतःस याजकांना दाखवा.” मग तिथून जात असताना ते शुद्ध झाले.
१५ आपण बरे झालो आहोत हे पाहून त्यांच्यापैकी एक जण परत आला आणि मोठ्याने देवाची स्तुती करू लागला.
१६ आणि येशूच्या पाया पडून त्याने त्याचे उपकार मानले. खरेतर हा मनुष्य शोमरोनी होता.
१७ तेव्हा येशू म्हणाला: “दहाचे दहा शुद्ध झाले नव्हते का? मग बाकीचे नऊ कुठे आहेत?
१८ देवाचा गौरव करण्यासाठी या परराष्ट्रीय माणसाशिवाय आणखी कोणीही परत आलं नाही का?”
१९ मग तो त्याला म्हणाला: “ऊठ आणि आपल्या मार्गाने जा; तुझ्या विश्वासाने तुला बरं केलं आहे.”
२० देवाचे राज्य केव्हा येईल असे परूश्यांनी त्याला विचारले तेव्हा त्याने उत्तर दिले: “देवाचं राज्य सर्वांच्या लक्षात येईल इतक्या उघडपणे येणार नाही;
२१ किंवा, ‘पाहा, ते इथे आहे!’ अथवा ‘तिथे आहे!’ असं लोक म्हणणार नाहीत. कारण देवाचं राज्य खरंतर तुमच्यामध्ये आहे.”
२२ मग तो आपल्या शिष्यांना म्हणाला: “असे दिवस येत आहेत, जेव्हा तुम्ही मनुष्याच्या पुत्राच्या काळातील एक दिवस पाहण्याची इच्छा धराल, पण तुम्हाला तो पाहता येणार नाही.
२३ आणि लोक तुम्हाला म्हणतील, ‘पाहा, तो इथे आहे!’ अथवा ‘तिथे आहे!’ पण, त्यांच्यामागे जाऊ नका किंवा त्यांच्या नादी लागू नका.
२४ कारण वीज जशी आकाशाच्या एका टोकापासून चमकून दुसऱ्या टोकापर्यंत चकाकत जाते, तसंच मनुष्याचा पुत्र प्रकट होण्याच्या दिवशी घडेल.
२५ पण आधी त्याला बरीच दुःखे सहन करावी लागतील आणि या पिढीकडून त्याला नाकारले जाईल.
२६ शिवाय, नोहाच्या दिवसांत जसं घडलं तसंच मनुष्याच्या पुत्राच्या दिवसांतही घडेल:
२७ कारण नोहा जहाजात* गेला त्या दिवसापर्यंत सर्व लोक खातपीत होते आणि स्त्रीपुरुषांची लग्नं होत होती. मग, जलप्रलय आला आणि सर्व लोक त्यात वाहून गेले.
२८ त्याच प्रकारे, लोटच्या दिवसांत घडलं तसंच त्या वेळी घडेल: तेव्हाही लोक खात-पीत होते, खरेदी-विक्री करत होते, शेतांत पेरणी करत होते आणि घरं बांधत होते.
२९ पण लोट सदोममधून बाहेर गेला त्या दिवशी आकाशातून अग्नीचा व गंधकाचा वर्षाव झाला आणि त्या सर्वांचा नाश झाला.
३० मनुष्याचा पुत्र प्रकट होण्याच्या दिवशीही असंच घडेल.
३१ त्या दिवशी एखादा मनुष्य घराच्या छतावर असेल आणि त्याच्या वस्तू घरात असतील, तर त्याने त्या घेण्यासाठी खाली येऊ नये. त्याच प्रकारे, शेतात असलेल्या माणसानेही मागे राहिलेल्या वस्तूंसाठी परत येऊ नये.
३२ लोटच्या बायकोला आठवणीत ठेवा.
३३ जो कोणी आपला जीव सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करतो तो त्यास गमावेल, पण जो कोणी आपला जीव गमावेल तो त्यास सुरक्षित ठेवेल.
३४ मी तुम्हाला सांगतो, त्या रात्री दोन जण एकाच बिछान्यावर झोपलेले असतील; एकाला घेतलं जाईल आणि दुसऱ्याला सोडून दिलं जाईल.
३५ दोन स्त्रिया एकाच जात्यावर दळत असतील; एकीला घेतलं जाईल आणि दुसरीला सोडून दिलं जाईल.”
३६ *—
३७ हे ऐकून ते त्याला म्हणाले: “कुठे प्रभू?” तो त्यांना म्हणाला: “जिथे प्रेत आहे तिथेच गिधाडं जमतील.”
तळटीपा
^ हे तुतीचे झाड जवळजवळ २० फूट उंचीचे भरदार झाड होते. त्याची पाने बदामी आकाराची असून त्याला गडद लाल किंवा काळ्या रंगाची फळे लागायची.
^ मत्तय २४:३८ तळटीप पाहा.
^ बायबलच्या काही प्राचीन हस्तलिखितांमध्ये हे वचन आढळत नाही आणि त्यामुळे ते देवप्रेरित वचनांचा भाग नाही हे स्पष्ट आहे.