लूक १८:१-४३

  • चिकाटी दाखवणाऱ्‍या विधवेचे उदाहरण (१-८)

  • परूशी व जकातदार (९-१४)

  • येशू आणि लहान मुले (१५-१७)

  • एका श्रीमंत अधिकाऱ्‍याचा प्रश्‍न (१८-३०)

  • येशूच्या मृत्यूविषयी पुन्हा भाकीत (३१-३४)

  • आंधळ्या भिकाऱ्‍याची दृष्टी परत येते (३५-४३)

१८  मग, सतत प्रार्थना करत राहण्याच्या आणि धीर न सोडण्याच्या गरजेविषयी सांगण्याकरता त्याने त्यांना एक उदाहरण दिले. २  तो म्हणाला: “एका शहरात एक न्यायाधीश होता. त्याला ना देवाची भीती होती ना लोकांची पर्वा होती. ३  त्याच शहरात एक विधवाही होती, जी सारखीच त्याच्याकडे जाऊन त्याला म्हणायची, ‘माझ्याविरुद्ध खटला भरणाऱ्‍यापासून मला वाचवा. कसंही करून मला न्याय मिळवून द्या.’ ४  काही काळापर्यंत तो तयार झाला नाही. पण नंतर त्याने मनात म्हटले, ‘मला देवाची भीती नाही आणि लोकांचीही पर्वा नाही, ५  तरीपण, ही विधवा सारखीच मला त्रास देत असल्यामुळे मी तिला न्याय मिळवून देईन; म्हणजे ती पुन्हा पुन्हा येऊन मला बेजार करणार नाही.’” ६  मग प्रभू म्हणाला: “अनीतिमान असूनही त्या न्यायाधीशाने काय म्हटलं याकडे लक्ष द्या! ७  तर मग, देवसुद्धा रात्रंदिवस त्याचा धावा करणाऱ्‍या त्याच्या निवडलेल्या लोकांना न्याय मिळवून देणार नाही का? तो त्यांच्याशी धीराने व्यवहार करत असला, तरी तो नक्कीच त्यांचे ऐकेल. ८  मी तुम्हाला सांगतो, तो लवकरात लवकर त्यांना न्याय देईल. पण, मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा त्याला खरोखरच पृथ्वीवर हा विश्‍वास* आढळेल का?” ९  ज्यांना स्वतःच्या नीतिमत्त्वावर फार भरवसा होता आणि जे इतरांना अगदीच तुच्छ लेखायचे त्यांना त्याने हे उदाहरणही सांगितले: १०  “दोन माणसं वर मंदिरात प्रार्थना करायला गेली. एक परूशी होता आणि दुसरा जकातदार. ११  परूशी उभा राहून मनातल्या मनात अशी प्रार्थना करू लागला, ‘हे देवा, इतर लोक लुबाडणारे, अनीतिमान आणि व्यभिचारी आहेत. पण, मी त्यांच्यासारखा, किंवा या जकातदारासारखाही नाही, म्हणून मी तुझे आभार मानतो. १२  मी आठवड्यातून दोन वेळा उपास धरतो आणि माझ्या सर्व मिळकतीचा दशांशही देतो.’ १३  पण काही अंतरावर उभा असलेला जकातदार मात्र मान वर करून आकाशाकडे पाहायलाही धजत नव्हता. तो पुन्हा पुन्हा छाती बडवून म्हणत होता, ‘हे देवा, मी पापी आहे, माझ्यावर दया कर.’* १४  मी तुम्हाला सांगतो, हा माणूस त्या परूश्‍यापेक्षा जास्त नीतिमान ठरून खाली आपल्या घरी गेला. कारण जो कोणी स्वतःला उंच करतो त्याला नमवलं जाईल आणि जो कोणी स्वतःला नम्र करतो त्याला उंचावलं जाईल.” १५  मग येशूने आपल्या लहान* मुलांवर हात ठेवावा, म्हणून लोक त्यांना त्याच्याजवळ आणत होते. पण शिष्य त्यांना रागावू लागले. १६  येशूने मात्र मुलांना आपल्याजवळ बोलावून म्हटले: “मुलांना माझ्याकडे येऊ द्या, त्यांना अडवू नका. कारण देवाचं राज्य अशांचंच आहे. १७  मी तुम्हाला खरं सांगतो, जो कोणी एखाद्या लहान मुलासारखा होऊन देवाच्या राज्याचा स्वीकार करत नाही, तो त्यात कधीच जाऊ शकणार नाही.” १८  एका अधिकाऱ्‍याने त्याला असे विचारले: “हे उत्तम गुरू, सर्वकाळाचं जीवन मिळवण्यासाठी मी काय केलं पाहिजे?” १९  येशू त्याला म्हणाला: “मला उत्तम का म्हणतोस? कारण देवाशिवाय कोणीही उत्तम नाही. २०  तुला तर आज्ञा माहीतच आहेत: ‘व्यभिचार करू नको, खून करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको, फसवणूक करू नको, आपल्या वडिलांचा व आईचा आदर कर.’” २१  तेव्हा तो म्हणाला: “हे गुरू, या सर्व आज्ञा तर मी लहानपणापासूनच पाळत आलो आहे.” २२  हे ऐकून येशू त्याला म्हणाला, “तुझ्यात अजूनही एका गोष्टीची कमी आहे: म्हणून जा आणि जे काही तुझ्या मालकीचं आहे ते विकून गरिबांमध्ये वाटून टाक, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल; आणि ये, माझा शिष्य हो.” २३  हे ऐकल्यावर त्याला अतिशय दुःख झाले, कारण तो खूप श्रीमंत होता. २४  येशूने त्याच्याकडे पाहून म्हटले: “ज्यांच्याजवळ पैसा आहे त्यांना देवाच्या राज्यात प्रवेश करणं किती कठीण जाईल! २५  श्रीमंत माणसाला देवाच्या राज्यात जाण्यापेक्षा एका उंटाला सुईच्या नाकातून जाणं सोपं आहे.” २६  हे ऐकल्यावर लोक म्हणाले: “तर मग, कोणाचं तारण होणं शक्य आहे?” २७  तो म्हणाला: “माणसांना जे अशक्य आहे, ते देवाला शक्य आहे.” २८  पण पेत्र म्हणाला: “पाहा! आम्ही आमचं सर्वकाही सोडून तुझ्यामागे आलो आहोत.” २९  तो त्यांना म्हणाला: “मी तुम्हाला खरं सांगतो, देवाच्या राज्यासाठी ज्यांनी घरदार, बायको, भाऊ, आईवडील किंवा मुलंबाळं यांचा त्याग केला आहे, ३०  त्यांच्यापैकी प्रत्येकाला सध्याच्या काळात कित्येक पटींनी हे सर्व आणि येणाऱ्‍या जगाच्या व्यवस्थेत* सर्वकाळाचं जीवन मिळाल्याशिवाय राहणार नाही.” ३१  मग येशूने आपल्या बारा शिष्यांना बाजूला घेऊन त्यांना म्हटले: “पाहा! आपण वर यरुशलेमला जात आहोत आणि मनुष्याच्या पुत्राबद्दल संदेष्ट्यांनी लिहिलेल्या सर्व गोष्टी पूर्ण होणार आहेत. ३२  उदाहरणार्थ, त्याला विदेश्‍यांच्या हाती सोपवलं जाईल आणि ते त्याची थट्टा करतील, त्याचा अपमान करतील आणि त्याच्यावर थुंकतील. ३३  मग त्याला फटके मारल्यावर ते त्याला ठार मारतील, पण तिसऱ्‍या दिवशी तो पुन्हा उठेल.” ३४  पण त्यांना यांपैकी कोणत्याही गोष्टीचा अर्थ समजला नाही कारण ही वचने त्यांच्यापासून गुप्त ठेवण्यात आली होती. त्यामुळे, त्यांना सांगितलेल्या या गोष्टी कळल्या नाहीत. ३५  मग येशू यरीहो शहराजवळ आला तेव्हा एक आंधळा माणूस रस्त्याच्या कडेला बसून भीक मागत होता. ३६  गर्दीतल्या लोकांचा आवाज ऐकून, काय चालले आहे असे तो विचारू लागला. ३७  त्यांनी त्याला सांगितले: “नासरेथकर येशू जात आहे!” ३८  तेव्हा तो मोठ्याने ओरडून म्हणाला: “हे येशू, दावीदपुत्रा, माझ्यावर दया कर!” ३९  तेव्हा पुढे जाणारे लोक त्याला दटावून गप्प राहायला सांगू लागले, पण तो आणखीनच मोठ्याने ओरडू लागला: “हे दावीदपुत्रा, माझ्यावर दया कर!” ४०  मग येशू थांबला आणि त्या मनुष्याला आपल्याजवळ आणावे अशी त्याने आज्ञा दिली. तो आला तेव्हा येशूने त्याला विचारले: ४१  “मी तुझ्यासाठी काय करावं अशी तुझी इच्छा आहे?” तो म्हणाला: “प्रभूजी, माझी दृष्टी परत येऊ द्या.” ४२  तेव्हा येशू त्याला म्हणाला: “तुझी दृष्टी परत येवो; तुझ्या विश्‍वासाने तुला बरं केलं आहे.” ४३  आणि त्याच क्षणी त्याची दृष्टी परत आली आणि तो देवाचा गौरव करत येशूच्या मागे चालू लागला. तसेच, हे पाहून सर्व लोकही देवाची स्तुती करू लागले.

तळटीपा

किंवा “अशा प्रकारचा विश्‍वास.”
किंवा “माझ्यावर कृपा कर.”
शब्दशः “तान्ह्या.”
किंवा “येणाऱ्‍या काळात.” शब्दार्थसूची पाहा.