लूक १९:१-४८
१९ मग, येशू यरीहोत आला आणि त्या शहरातून पुढे जाऊ लागला.
२ तिथे जक्कय नावाचा मनुष्य होता; तो एक प्रमुख जकातदार असून श्रीमंत होता.
३ हा येशू आहे तरी कोण, हे पाहण्याचा तो प्रयत्न करत होता, पण गर्दीमुळे त्याला दिसत नव्हते कारण तो बुटका होता.
४ येशू त्या मार्गाने जाणार असल्यामुळे त्याला पाहण्यासाठी तो पुढे धावत जाऊन एका उंबराच्या झाडावर चढला.
५ येशू तिथे आला तेव्हा त्याने वर पाहिले आणि तो त्याला म्हणाला: “जक्कय, लवकर खाली उतर, कारण आज मी तुझ्या घरी येणार आहे.”
६ तेव्हा तो लगेच खाली आला आणि त्याने अतिशय आनंदाने येशूचे आपल्या घरी स्वागत केले.
७ त्यांनी हे पाहिले तेव्हा ते सर्व जण कुरकुर करू लागले: “तो एका पापी माणसाच्या घरी पाहुणचाराला गेला.”
८ पण जक्कय उभा राहिला आणि प्रभूला म्हणाला: “प्रभू, पाहा! मी माझी अर्धी संपत्ती गरिबांना देत आहे. आणि ज्या कोणाकडून मी काही लुबाडले* असेल, त्याला मी चौपट परत करत आहे.”
९ तेव्हा येशू त्याला म्हणाला: “आज देवाने या माणसाचं व त्याच्या घराण्याचं तारण केलं आहे कारण हासुद्धा अब्राहामचा पुत्र आहे.
१० हरवलेल्यांना शोधण्यासाठी आणि त्यांचं तारण करण्यासाठीच मनुष्याचा पुत्र आला आहे.”
११ ते या गोष्टी ऐकत असतानाच त्याने आणखी एक उदाहरण सांगितले, कारण तो यरुशलेमजवळ होता आणि देवाचे राज्य लगेचच प्रकट होणार आहे असा त्यांचा समज होता.
१२ म्हणून तो म्हणाला: “राजघराण्यातला एक माणूस होता. तो राज्याधिकार मिळवून परत येण्याच्या उद्देशाने एका दूर देशी गेला.
१३ आपल्या दासांपैकी दहा जणांना जवळ बोलावून त्याने त्यांना दहा चांदीची नाणी* दिली आणि असं सांगितलं, ‘मी परत येईपर्यंत यांवर व्यापार करा.’
१४ पण त्याच्या देशाचे लोक त्याचा द्वेष करत होते आणि त्यांनी त्याच्यामागे राजदूतांना असं सांगून पाठवलं, की ‘हा मनुष्य आमचा राजा व्हावा अशी आमची इच्छा नाही.’
१५ नंतर जेव्हा तो राज्याधिकार* मिळवून परत आला तेव्हा ज्यांना पैसे* दिले होते, त्या दासांना त्याने बोलावलं. त्यांनी व्यापारातून कमवलेल्या पैशांचा त्याला हिशोब मागायचा होता.
१६ तेव्हा, पहिला दास पुढे येऊन म्हणाला, ‘प्रभू, तुम्ही दिलेल्या नाण्यावर मी आणखी दहा नाणी मिळवली.’
१७ तो त्याला म्हणाला, ‘शाब्बास, चांगल्या दासा! अगदी लहानशा गोष्टीत तू आपला विश्वासूपणा सिद्ध करून दाखवलास, म्हणून मी तुला दहा शहरांवर अधिकार देतो.’
१८ मग दुसरा दास आला व म्हणाला, ‘प्रभू, तुमच्या नाण्यावर मी आणखी पाच नाणी कमवली.’
१९ तेव्हा यालाही तो म्हणाला, ‘तुलादेखील मी पाच शहरांचा अधिकार देतो.’
२० पण आणखी एक दास येऊन म्हणाला, ‘प्रभू, हे घ्या तुमचं नाणं. मी ते कापडात गुंडाळून लपवून ठेवलं होतं.
२१ खरं सांगायचं तर, मला तुमची भीती वाटत होती. कारण तुम्ही कठोर आहात; तुम्ही जमा केले नव्हते असे पैसे काढता, आणि जे तुम्ही पेरलं नव्हतं त्याची कापणी करता.’
२२ तेव्हा तो माणूस त्या दासाला म्हणाला, ‘अरे दुष्ट दासा, मी तुझ्याच शब्दांनी तुझा न्याय करतो. मी कठोर आहे, आणि मी जमा केले नव्हते असे पैसे काढतो व जे पेरलं नव्हतं त्याची कापणी करतो, हे तुला माहीत होतं ना?
२३ मग तू माझे पैसे* सावकाराकडे का ठेवले नाहीस? म्हणजे परत आल्यावर मला ते व्याजासकट मिळाले असते.’
२४ तेव्हा तो तिथे उभे असलेल्यांना म्हणाला, ‘याच्याकडून ते नाणं घ्या आणि ज्याच्याजवळ दहा नाणी आहेत त्याला द्या.’
२५ पण ते त्याला म्हणाले, ‘प्रभू, त्याच्याजवळ तर आधीच दहा नाणी आहेत . . .’
२६ ‘मी तुम्हाला सांगतो, ज्याच्याजवळ आहे त्याला आणखी देण्यात येईल, पण ज्याच्याजवळ नाही, त्याच्याकडे जे आहे तेसुद्धा काढून घेतलं जाईल.
२७ तसंच, मी राजा होऊ नये असं ज्या माझ्या शत्रूंना वाटत होतं, त्यांना माझ्यापुढे हजर करा आणि माझ्यासमोर त्यांना मृत्युदंड द्या.’”
२८ या गोष्टी सांगितल्यावर तो वर यरुशलेमकडे निघून गेला.
२९ मग जेव्हा तो जैतुनांच्या डोंगराजवळील बेथफगे व बेथानी या गावांजवळ आला, तेव्हा त्याने आपल्या दोन शिष्यांना पुढे पाठवले
३० आणि म्हटले: “समोरच्या गावात जा आणि तिथे जाताच तुम्हाला गाढवाचं एक पिल्लू बांधलेलं दिसेल. त्याच्यावर आतापर्यंत कोणी बसलेलं नाही. ते सोडून इकडे आणा.
३१ आणि जर कोणी तुम्हाला विचारलं, की ‘त्याला का सोडता?’ तर म्हणा, ‘प्रभूला त्याची गरज आहे.’”
३२ तेव्हा ज्यांना पाठवण्यात आले होते, ते गेले आणि येशूने जसे सांगितले होते अगदी तसेच त्यांना आढळले.
३३ ते गाढवाच्या पिल्लाला सोडत असताना त्याचे मालक त्यांना म्हणाले: “तुम्ही गाढवाच्या पिल्लाला का सोडत आहात?”
३४ ते म्हणाले: “प्रभूला गरज आहे.”
३५ मग त्यांनी गाढवाच्या पिल्लाला येशूजवळ आणले आणि आपली बाह्य वस्त्रे त्याच्यावर टाकून येशूला त्याच्यावर बसवले.
३६ तो पुढे जात असताना लोक रस्त्यावर आपली बाह्य वस्त्रे पसरवू लागले.
३७ मग तो जैतुनांच्या डोंगरावरून खाली जाणाऱ्या रस्त्याजवळ पोचताच शिष्यांचा सर्व समुदाय आनंदाने जयघोष करू लागला आणि जी महान कृत्ये त्यांनी पाहिली होती, त्यांबद्दल मोठ्याने देवाची अशी स्तुती करू लागला:
३८ “यहोवाच्या* नावाने येणारा राजा आशीर्वादित असो! स्वर्गात शांती असो आणि स्वर्गात राहणाऱ्या देवाला गौरव मिळो!”
३९ पण, गर्दीतून परूश्यांपैकी काही जण त्याला म्हणू लागले: “गुरुजी, तुमच्या शिष्यांना शांत राहायला सांगा.”
४० पण तो त्यांना म्हणाला: “मी तुम्हाला सांगतो, जर हे शांत राहिले तर दगड ओरडतील.”
४१ मग शहराजवळ आल्यावर त्याने त्यावर नजर टाकली आणि तो रडू लागला,
४२ व म्हणाला: “तू, हो तू जर आज शांतीच्या गोष्टी समजून घेतल्या असत्या, तर किती बरं झालं असतं; पण आता त्या तुझ्यापासून लपवून ठेवण्यात आल्या आहेत.
४३ कारण असे दिवस येत आहेत, जेव्हा तुझे शत्रू तुझ्याभोवती टोकदार खांबांची भिंत उभारतील, तुला वेढतील आणि सर्व बाजूंनी तुला अडवतील.*
४४ ते तुला जमीनदोस्त करतील व तुझ्या मुलाबाळांना चिरडून टाकतील आणि तुझ्यात एकाही दगडावर दगड राहणार नाही, कारण तुझा न्याय* करण्याची वेळ तू ओळखली नाही.”
४५ मग तो मंदिरात आला आणि तिथे विक्री करणाऱ्यांना त्याने हाकलून लावले
४६ व तो त्यांना म्हणाला: “‘माझ्या घराला प्रार्थनेचं मंदिर म्हणतील,’ असं लिहिलं आहे, पण तुम्ही तर याला लुटारूंची गुहा करून टाकली आहे.”
४७ तो दररोज मंदिरात जाऊन शिकवत राहिला. पण मुख्य याजक, शास्त्री व लोकांचे नेते त्याला ठार मारण्याचा मार्ग शोधत होते;
४८ पण हे कसे करावे हे त्यांना सुचत नव्हते कारण सर्व लोक त्याचे ऐकण्यासाठी सतत त्याच्या अवतीभवती असायचे.
तळटीपा
^ किंवा “खोटा आरोप लावून लुबाडले.”
^ शब्दशः “मिना.” ग्रीक चलनानुसार एका मिनाची किंमत मजुराच्या सुमारे तीन महिन्यांच्या मजुरीइतकी होती. शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा “राज्य.”
^ शब्दशः “चांदी.”
^ शब्दशः “माझी चांदी.”
^ शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा “जाचतील.”
^ शब्दशः “तुझी तपासणी.”