लूक २१:१-३८

  • गरीब विधवेची दोन नाणी (१-४)

  • भविष्यातील घटनांचे चिन्ह (५-३६)

    • लढाया, मोठे भूकंप, साथीचे रोग, दुष्काळ (१०, ११)

    • यरुशलेमला सैन्यांचा वेढा (२०)

    • विदेश्‍यांचे नियुक्‍त काळ (२४)

    • मनुष्याच्या पुत्राचे येणे (२७)

    • अंजिराच्या झाडाचे उदाहरण (२९-३३)

    • जागे राहा (३४-३६)

  • येशू मंदिरात शिकवतो (३७, ३८)

२१  मग त्याने वर पाहिले, तेव्हा श्रीमंत लोक दानपात्रांत आपापले दान टाकताना त्याला दिसले. २  तेव्हा त्याला एक गरीब विधवा फार कमी किमतीची दोन छोटीशी नाणी* टाकताना दिसली. ३  तो म्हणाला: “मी तुम्हाला खरं सांगतो की इतर सर्वांपेक्षा या गरीब विधवेने जास्त पैसे टाकले. ४  कारण त्या सर्वांनी त्यांच्याजवळ असलेल्या जास्तीच्या पैशांतून दान टाकले, पण तिने मात्र आपल्या गरजेतून, म्हणजे पोट भरण्यासाठी तिच्याजवळ होते नव्हते ते सर्व टाकले.” ५  नंतर काही जण मंदिराविषयी आणि ते कशा प्रकारे सुंदर दगडांनी व समर्पित वस्तूंनी सजवलेले आहे याविषयी बोलू लागले. ६  तेव्हा तो म्हणाला: “असे दिवस येत आहेत, जेव्हा तुम्ही पाहत असलेल्या या सर्व गोष्टी राहणार नाहीत आणि इथे एकाही दगडावर दगड राहणार नाही, प्रत्येक दगड खाली पाडला जाईल.” ७  तेव्हा त्यांनी त्याला विचारले: “हे गुरू, या गोष्टी नेमक्या केव्हा होतील आणि या गोष्टी घडणार असल्याचं चिन्ह काय असेल?” ८  तो म्हणाला: “तुम्हाला कोणी फसवू नये म्हणून सावध असा. कारण माझ्या नावाने बरेच जण येतील आणि ‘मीच तो आहे,’ व ‘नियुक्‍त वेळ आली आहे’ असं म्हणतील. पण त्यांच्यामागे जाऊ नका. ९  तसंच, तुम्ही लढायांबद्दल व दंगलींबद्दल* ऐकाल तेव्हा घाबरून जाऊ नका. कारण आधी या गोष्टी घडणं आवश्‍यक आहे पण लगेचच अंत येणार नाही.” १०  मग तो त्यांना म्हणाला: “एका राष्ट्रावर दुसरं राष्ट्र आणि एका राज्यावर दुसरं राज्य हल्ला करेल. ११  मोठमोठे भूकंप होतील आणि ठिकठिकाणी दुष्काळ आणि रोगांच्या साथी येतील; तसंच भयानक दृश्‍ये आणि आकाशात मोठी चिन्हे दिसतील. १२  पण या सर्व गोष्टी घडण्याअगोदर लोक तुम्हाला धरून तुमचा छळ करतील आणि तुम्हाला सभास्थानांच्या स्वाधीन करतील व तुरुंगांत डांबतील. माझ्या नावामुळे तुम्हाला राजांच्या व राज्यपालांच्या समोर आणलं जाईल. १३  यामुळे तुम्हाला साक्ष देण्याची संधी मिळेल. १४  म्हणून, स्वतःच्या बचावात काय बोलावं याची आधीपासूनच तयारी न करण्याचा मनात निश्‍चय करा, १५  कारण मी तुम्हाला असे शब्द व बुद्धी देईन की तुमचे सर्व विरोधक एक झाले, तरी त्यांना तुमचा प्रतिकार करायला किंवा तुमच्याविरुद्ध बोलायला जमणार नाही. १६  शिवाय आईवडील, भाऊ, नातेवाईक व मित्रसुद्धा तुम्हाला धरून देतील* आणि तुमच्यापैकी काहींना ते ठार मारतील. १७  आणि माझ्या नावामुळे सर्व लोक तुमचा द्वेष करतील. १८  पण, तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. १९  तुम्ही आपल्या धीराने आपला जीव वाचवाल. २०  पण, जेव्हा तुम्ही यरुशलेमला सैन्यांनी वेढलेलं पाहाल, तेव्हा ते ओसाड पडण्याची वेळ जवळ आली आहे हे ओळखा. २१  तेव्हा, जे यहूदीयात आहेत त्यांनी डोंगरांकडे पळून जाण्यास सुरुवात करावी आणि जे यरुशलेममध्ये आहेत त्यांनी बाहेर जावं व जे शेतांत आहेत त्यांनी शहरात जाऊ नये. २२  कारण ते न्यायदंड बजावण्याचे* दिवस असतील, जेणेकरून लिहिलेल्या सर्व गोष्टी पूर्ण व्हाव्यात. २३  त्या दिवसांत गरोदर आणि अंगावर पाजणाऱ्‍या स्त्रियांची फार दुर्दशा होईल! कारण देशावर मोठं संकट येईल आणि या लोकांवर क्रोध भडकेल. २४  आणि ते तलवारीच्या धारेने पडतील आणि त्यांना बंदिवान करून सर्व राष्ट्रांत नेलं जाईल; विदेश्‍यांकरता* नियुक्‍त केलेले काळ पूर्ण होईपर्यंत यरुशलेमला विदेश्‍यांच्या* पायांखाली तुडवलं जाईल. २५  तसंच सूर्य, चंद्र व तारे यांत चिन्हे घडून येतील आणि समुद्राच्या गर्जनेमुळे व उसळणाऱ्‍या लाटांमुळे पृथ्वीवरील राष्ट्रे संकटात सापडतील आणि त्यांना काही मार्ग सुचणार नाही. २६  भीतीने आणि सबंध पृथ्वीवर येणार असलेल्या गोष्टींच्या धास्तीमुळे लोकांचे हातपाय गळून जातील कारण आकाशातील शक्‍तींना हादरे बसतील. २७  आणि मग, ते मनुष्याच्या पुत्राला आकाशातील ढगावर सामर्थ्याने व मोठ्या वैभवाने येताना पाहतील. २८  पण या गोष्टी घडू लागल्यावर डोकं वर करून ताठ उभे राहा, कारण तुमच्या सुटकेची वेळ जवळ येत आहे.” २९  तेव्हा त्याने त्यांना एक उदाहरण सांगितले: “अंजिराचं झाड आणि इतर सर्व झाडं पाहा. ३०  त्यांना पालवी फुटते तेव्हा तुमचं तुम्हीच ओळखता की आता उन्हाळा जवळ आला आहे. ३१  त्याच प्रकारे, जेव्हा तुम्ही या गोष्टी घडताना पाहाल तेव्हा देवाचं राज्य जवळ आलं आहे हे ओळखा. ३२  मी तुम्हाला खरं सांगतो, सर्व गोष्टी पूर्ण होईपर्यंत ही पिढी मुळीच नाहीशी होणार नाही. ३३  आकाश आणि पृथ्वी नाहीशी होतील पण माझे शब्द पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाहीत. ३४  पण अतिप्रमाणात खाणे व पिणे आणि जीवनाच्या चिंता यांमुळे तुमची मने भारावून जाऊ नयेत आणि तो दिवस पाशाप्रमाणे अचानक तुमच्यावर येऊ नये, म्हणून स्वतःकडे लक्ष द्या. ३५  कारण तो दिवस सबंध पृथ्वीवर राहणाऱ्‍या लोकांवर येईल. ३६  म्हणून, जागे राहा आणि घडणार असलेल्या या सर्व गोष्टींतून बचावून तुम्हाला मनुष्याच्या पुत्रासमोर उभं राहता यावं, अशी सतत याचना करत राहा.” ३७  अशा प्रकारे येशू दिवसा मंदिरात शिकवायचा आणि रात्री तो जैतुनांच्या डोंगरावर जाऊन राहायचा. ३८  आणि सर्व लोक मंदिरात त्याचे ऐकण्यासाठी सकाळीच यायचे.

तळटीपा

शब्दशः “दोन लेप्टा.”
किंवा “अराजकतेबद्दल; बंडांबद्दल.”
किंवा “विश्‍वासघाताने धरून देतील.”
किंवा “सूड उगवण्याचे.”
किंवा “राष्ट्रांकरता.”
किंवा “राष्ट्रांच्या.”