लूक ३:१-३८

  • योहानच्या कार्याची सुरुवात (१, २)

  • योहान बाप्तिस्म्याबद्दल घोषणा करतो (३-२०)

  • येशूचा बाप्तिस्मा (२१, २२)

  • येशू ख्रिस्ताची वंशावळ (२३-३८)

 तिबिर्य कैसर याच्या राज्याच्या पंधराव्या वर्षी, जेव्हा पंतय पिलात यहूदीयाचा राज्यपाल होता आणि हेरोद हा गालीलचा प्रांताधिकारी होता; तसेच, हेरोदचा* भाऊ फिलिप्प हा इतुरीया व त्राखोनीती या भागांचा प्रांताधिकारी होता आणि लूसनिय अबिलेनेचा प्रांताधिकारी होता, २  शिवाय, हन्‍ना व कयफा हे मुख्य याजकांपैकी होते; त्याच काळात, जखऱ्‍याचा पुत्र योहान याला ओसाड प्रदेशात देवाचे वचन प्राप्त झाले. ३  त्यामुळे, तो यार्देन नदीच्या आसपासच्या सर्व प्रदेशांत गेला आणि पापांच्या क्षमेसाठी पश्‍चात्तापाचे चिन्ह म्हणून बाप्तिस्मा* घ्या, अशी घोषणा करू लागला. ४  हे यशया संदेष्ट्याच्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणेच झाले: “ओसाड प्रदेशात घोषणा करणाऱ्‍या एकाचा आवाज ऐकू येत आहे: ‘यहोवासाठी* मार्ग तयार करा! त्याच्यासाठी रस्ते मोकळे करा. ५  प्रत्येक दरी भरून काढली जाईल आणि प्रत्येक डोंगर व टेकडी सपाट केली जाईल; वाकडेतिकडे मार्ग सरळ केले जातील आणि खडबडीत मार्ग सपाट केले जातील; ६  आणि सर्व माणसं देवाने केलेलं तारण* पाहतील.’” ७  बाप्तिस्मा घेण्यासाठी योहानकडे येणाऱ्‍या लोकांच्या समुदायाला तो म्हणायचा: “अरे विषारी सापाच्या पिल्लांनो! देवाच्या येणाऱ्‍या क्रोधापासून तुम्ही निसटू शकता असं तुम्हाला कोणी सांगितलं? ८  आधी तुमचा पश्‍चात्ताप तुमच्या कार्यांतून दाखवून द्या.* ‘आपण तर अब्राहामचे वंशज आहोत,’ असं आपल्या मनात म्हणू नका. कारण मी तुम्हाला सांगतो, देवाला पाहिजे असेल तर तो अब्राहामसाठी या दगडांपासूनसुद्धा मुलं उत्पन्‍न करू शकतो. ९  पाहा! कुऱ्‍हाड तर केव्हाच झाडाच्या मुळाशी ठेवण्यात आली आहे. जे झाड चांगलं फळ देत नाही ते तोडून आगीत टाकलं जाईल.” १०  तेव्हा लोक त्याला विचारायचे: “तर मग, आम्ही काय करावं?” ११  तो त्यांना म्हणायचा: “ज्याच्याजवळ दोन झगे आहेत* त्याने त्यातला एक, अशा माणसाला द्यावा ज्याच्याजवळ एकही नाही आणि ज्याच्याजवळ खाण्यासाठी काही आहे त्यानेही असंच करावं.” १२  तसेच, जकातदारसुद्धा त्याच्याकडे बाप्तिस्मा घ्यायला आले आणि त्यांनी त्याला विचारले: “गुरुजी, आम्ही काय करावं?” १३  तो त्यांना म्हणाला: “नेमून दिलेल्या करापेक्षा जास्त मागू नका.”* १४  सैन्यात असलेल्यांनी त्याला विचारले: “आम्ही काय करावं?” तेव्हा तो त्यांना म्हणाला: “कोणाला छळू नका* किंवा कोणावर खोटा आरोप लावू नका, तर तुम्हाला मिळणाऱ्‍या पगारात* समाधानी राहा.” १५  त्या काळात लोक ख्रिस्त* येण्याची वाट पाहत होते आणि सर्व लोक योहानबद्दल मनोमन असा विचार करत होते, की “हाच तर ख्रिस्त नसेल?” १६  योहानने त्या सर्वांना म्हटले: “मी तुम्हाला पाण्याने बाप्तिस्मा देतो, पण जो येणार आहे त्याला माझ्यापेक्षा जास्त अधिकार आहे आणि त्याच्या जोड्यांचे बंद सोडण्यासही मी योग्य नाही. तो तर तुम्हाला पवित्र आत्म्याने* व अग्नीने बाप्तिस्मा देईल. १७  त्याच्या हातात धान्यापासून भुसा वेगळा करण्याचं फावडं आहे आणि तो त्याचे खळे* पूर्णपणे स्वच्छ करेल. तो गहू कोठारांत जमा करेल, तर भुसा अशा आगीत जाळून टाकेल, जी विझवता येत नाही.” १८  याशिवाय, त्याने इतर अनेक गोष्टी त्यांना शिकवल्या आणि तो आनंदाचा संदेश घोषित करत राहिला. १९  पण, योहानने प्रांताधिकारी हेरोद याच्या भावाची बायको हेरोदिया हिच्यासंबंधी आणि हेरोदने केलेल्या इतर सर्व दुष्ट कार्यांसंबंधी त्याची कानउघाडणी केल्यामुळे, २०  त्याने योहानला तुरुंगात डांबले आणि अशा रीतीने आपल्या दुष्ट कार्यांत आणखी भर घातली. २१  मग सर्व लोक बाप्तिस्मा घेत असताना येशूचाही बाप्तिस्मा झाला. तो प्रार्थना करत असताना आकाश उघडले गेले २२  आणि पवित्र आत्मा* एका कबुतरासारखा त्याच्यावर आला आणि स्वर्गातून असा आवाज ऐकू आला: “तू माझा परमप्रिय पुत्र आहेस; तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे.” २३  येशूने आपल्या कार्याला सुरुवात केली तेव्हा तो साधारण तीस वर्षांचा होता. आणि असे समजले जात होते, की तोयोसेफचा पुत्र होता,योसेफ एलीचा, २४  एली मत्ताथचा,मत्ताथ लेवीचा,लेवी मल्खीचा,मल्खी यन्‍नयचा,यन्‍नय योसेफचा, २५  योसेफ मत्तिथ्याचा,मत्तिथ्या आमोसचा,आमोस नहूमचा,नहूम हेस्लीचा,हेस्ली नग्गयचा, २६  नग्गय महथचा,महथ मत्तिथ्याचा,मत्तिथ्या शिमयीचा,शिमयी योसेखचा,योसेख योदाचा, २७  योदा योहानानचा,योहानान रेशाचा,रेशा जरूब्बाबेलचा,जरूब्बाबेल शल्तीएलचा,शल्तीएल नेरीचा, २८  नेरी मल्खीचा,मल्खी अद्दीचा,अद्दी कोसामचा,कोसाम एल्मदामचा,एल्मदाम एरचा, २९  एर येशूचा,येशू अलियेजरचा,अलियेजर योरीमचा,योरीम मत्ताथचा,मत्ताथ लेवीचा, ३०  लेवी शिमोनचा,शिमोन यहूदाचा,यहूदा योसेफचा,योसेफ योनामचा,योनाम एल्याकीमचा, ३१  एल्याकीम मलआचा,मलआ मिन्‍नाचा,मिन्‍ना मत्ताथाचा,मत्ताथा नाथानचा,नाथान दावीदचा, ३२  दावीद इशायचा,इशाय ओबेदचा,ओबेद बवाजचा,बवाज सल्मोनचा,सल्मोन नहशोनचा, ३३  नहशोन अम्मीनादाबचा,अम्मीनादाब अर्णयचा,अर्णय हेस्रोनचा,हेस्रोन पेरेसचा,पेरेस यहूदाचा, ३४  यहूदा याकोबचा,याकोब इसहाकचा,इसहाक अब्राहामचा,अब्राहाम तेरहचा,तेरह नाहोरचा, ३५  नाहोर सरूगचा,सरूग रऊचा,रऊ पेलेगचा,पेलेग एबरचा,एबर शेलहचा, ३६  शेलह केनानचा,केनान अर्पक्षदचा,अर्पक्षद शेमचा,शेम नोहाचा,नोहा लामेखचा, ३७  लामेख मथुशलहचा,मथुशलह हनोखचा,हनोख यारेदचा,यारेद महललेलचा,महललेल केनानचा, ३८  केनान अनोशचा,अनोश शेथचा,शेथ आदामचा,आदाम देवाचा पुत्र होता.

तळटीपा

अर्थात, हेरोद अंतिपा, शब्दार्थसूची पाहा.
शब्दार्थसूची पाहा.
शब्दार्थसूची पाहा.
किंवा “तारण करण्याचा देवाचा मार्ग.”
शब्दशः “पश्‍चात्तापाला शोभणारी फळे उत्पन्‍न करा.”
किंवा “जास्तीचा झगा आहे.”
किंवा “गोळा करू नका.”
किंवा “कोणाकडून पैसे उकळू नका.”
किंवा “पुरवल्या जाणाऱ्‍या गोष्टींत.”
किंवा “मसीहा.”
किंवा “देवाच्या क्रियाशील शक्‍तीने.” शब्दार्थसूची पाहा.
अर्थात, धान्याची झोडपणी करण्याचे ठिकाण. शब्दार्थसूची पाहा.
किंवा “देवाची क्रियाशील शक्‍ती.” शब्दार्थसूची पाहा.