लूक ५:१-३९

  • चमत्कारीक रीतीने पकडलेले मासे; पहिले शिष्य (१-११)

  • एका कुष्ठरोग्याला बरे केले जाते (१२-१६)

  • लकवा मारलेल्या मनुष्याला येशू बरे करतो (१७-२६)

  • येशू लेवीला बोलवतो (२७-३२)

  • उपास करण्याविषयी प्रश्‍न (३३-३९)

 एकदा येशू गनेसरेतच्या सरोवराजवळ* देवाचे वचन शिकवत असताना लोकांचा समुदाय त्याच्याभोवती गर्दी करू लागला. २  तेव्हा, किनाऱ्‍याला लावलेल्या दोन नावा त्याला दिसल्या आणि कोळी नावांतून उतरून आपली जाळी धूत होते. ३  त्यांतील एका नावेत म्हणजे शिमोनच्या नावेत तो चढला आणि त्याने शिमोनला नाव किनाऱ्‍यापासून थोडी आत न्यायला सांगितले. मग, तो नावेत बसून लोकांच्या समुदायाला शिकवू लागला. ४  त्याचे बोलणे संपल्यावर तो शिमोनला म्हणाला: “पाणी जिथे खोल आहे तिथे नाव ने आणि मासे धरण्यासाठी आपली जाळी पाण्यात सोड.” ५  पण, शिमोनने त्याला म्हटले: “गुरू, आम्ही रात्रभर कष्ट केले, पण काहीच हाती लागलं नाही, तरी तुझ्या सांगण्यावरून मी जाळी पाण्यात सोडतो.” ६  त्यांनी असे केले तेव्हा भरपूर मासे जाळ्यांत आले. ते इतके होते, की त्यांची जाळी फाटू लागली. ७  त्यामुळे, त्यांनी दुसऱ्‍या नावेतील आपल्या साथीदारांना इशारा करून मदत करण्यासाठी बोलावले. तेव्हा, ते आले आणि दोन्ही नावा माशांनी इतक्या भरल्या की त्या बुडू लागल्या. ८  हे पाहून शिमोन पेत्र येशूच्या पाया पडून म्हणाला: “हे प्रभू, माझ्यापासून दूर जा, कारण मी पापी माणूस आहे.” ९  इतक्या मोठ्या प्रमाणात पकडलेले मासे पाहून त्याला आणि त्याच्यासोबत असलेल्यांना आश्‍चर्याचा धक्का बसला होता. १०  तसेच, शिमोनच्या व्यापारात भागीदार असलेली जब्दीची मुले, याकोब आणि योहान यांचीही तीच अवस्था होती. पण, येशू शिमोनला म्हणाला: “घाबरू नकोस; कारण आतापासून तू जिवंत माणसं धरणारा होशील.” ११  मग, त्यांनी आपल्या नावा पुन्हा किनाऱ्‍यावर आणल्या आणि सर्वकाही सोडून ते त्याच्यामागे चालू लागले. १२  आणखी एका प्रसंगी येशू एका शहरात असताना, पाहा! तिथे एक मनुष्य होता ज्याचे संपूर्ण शरीर कुष्ठरोगाने भरले होते. येशूला पाहताच, तो पालथा पडला आणि गयावया करू लागला: “प्रभुजी, तुमची इच्छा असेल, तर तुम्ही मला शुद्ध करू शकता.” १३  तेव्हा, त्याने आपला हात पुढे करून त्याला स्पर्श केला आणि म्हणाला: “माझी इच्छा आहे! शुद्ध हो.” आणि त्याच क्षणी त्याचा कुष्ठरोग नाहीसा झाला. १४  मग, याविषयी कोणालाही सांगू नकोस असे बजावून येशू त्याला म्हणाला: “पण जा, आणि याजकाकडे जाऊन स्वतःला दाखव, आणि त्यांना साक्ष मिळावी म्हणून शुद्ध होण्यासाठी मोशेने सांगितलेलं अर्पण वाहा.” १५  पण, येशूची ख्याती दूरपर्यंत पसरत गेली आणि त्याचे ऐकण्यासाठी आणि आपले रोग बरे करून घेण्यासाठी लोक मोठ्या संख्येने त्याच्याकडे येऊ लागले. १६  तो मात्र प्रार्थना करण्यासाठी बऱ्‍याचदा एकांत ठिकाणी जायचा. १७  एकदा येशू लोकांना शिकवत होता. त्या वेळी, गालील व यहूदीयाच्या प्रत्येक गावातून आणि यरुशलेमहून आलेले परूशी* व नियमशास्त्राचे शिक्षकही तिथे बसले होते. यहोवाने* रोग्यांना बरे करण्याचे सामर्थ्य येशूला दिले होते. १८  इतक्यात, काही जण लकवा मारलेल्या एका मनुष्याला खाटेवर घेऊन आले. ते त्याला आत आणून येशूच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करत होते. १९  पण, लोकांच्या गर्दीमुळे त्याला आत नेणे शक्य नसल्याने ते घराच्या छतावर चढले आणि कौले काढून त्यांनी त्याची खाट लोकांच्या गर्दीत येशूच्या समोर खाली सोडली. २०  त्यांचा विश्‍वास पाहून येशू म्हणाला: “मित्रा, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.” २१  तेव्हा, शास्त्री व परूशी असा विचार करू लागले: “देवाची निंदा करणारा हा कोण आहे? देवाला सोडून पापांची क्षमा आणखी कोण करू शकतो?” २२  पण, त्यांच्या मनातले विचार ओळखून येशू त्यांना म्हणाला: “तुम्ही आपल्या मनात काय विचार करत आहात? २३  ‘तुझ्या पापांची क्षमा झाली आहे,’ असं म्हणणं जास्त सोपं आहे, की ‘ऊठ आणि चालायला लाग,’ असं म्हणणं जास्त सोपं आहे? २४  पण, मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे हे तुम्हाला कळावं म्हणून . . .” मग लकवा मारलेल्या माणसाला तो म्हणाला: “मी तुला सांगतो, ऊठ, आपली खाट उचल आणि घरी जा.” २५  तेव्हा तो त्यांच्यासमोर उठून उभा राहिला आणि ज्या खाटेवर तो झोपला होता ती उचलून तो देवाचा गौरव करत आपल्या घरी गेला. २६  हे पाहून सर्व जण थक्क झाले. ते देवाचा गौरव करू लागले आणि अगदी भारावून जाऊन म्हणू लागले: “आज आम्ही अद्‌भुत गोष्टी पाहिल्या आहेत!” २७  यानंतर येशू बाहेर गेला, तेव्हा कर गोळा करणारा लेवी, जकात नाक्यावर बसलेला त्याला दिसला आणि येशूने त्याला म्हटले: “माझ्यामागे ये आणि माझा शिष्य हो.” २८  तेव्हा, तो उठला आणि सर्वकाही सोडून त्याच्यामागे चालू लागला. २९  मग, लेवीने आपल्या घरी त्याच्यासाठी एक मोठी मेजवानी दिली. जकातदार व इतर लोकांचा मोठा जमावही त्यांच्यासोबत जेवायला बसला होता. ३०  तेव्हा, परूशी व त्यांचे शास्त्री येशूच्या शिष्यांजवळ अशी कुरकुर करू लागले: “तुम्ही जकातदारांसोबत व पापी लोकांसोबत का खाता-पिता?” ३१  त्यावर येशूने त्यांना उत्तर दिले: “जे निरोगी असतात त्यांना वैद्याची गरज नसते, तर आजाऱ्‍यांना असते. ३२  मी नीतिमान लोकांना नाही, तर पापी लोकांना पश्‍चात्तापासाठी बोलवायला आलो आहे.” ३३  ते त्याला म्हणाले: “योहानचे शिष्य वारंवार उपास व याचना करतात, आणि परूश्‍यांचे शिष्यही तसंच करतात, पण तुमचे शिष्य मात्र खातपीत असतात.” ३४  येशू त्यांना म्हणाला: “नवरा मुलगा सोबत असेपर्यंत तुम्ही त्याच्या मित्रांना उपास करायला लावू शकत नाही, लावू शकता का? ३५  पण, असे दिवस येतील जेव्हा नवऱ्‍या मुलाला त्यांच्यापासून दूर केलं जाईल; मग त्या दिवसांत ते उपास करतील.” ३६  येशूने त्यांना एक उदाहरणही दिले: “कोणीही नवीन झग्याचा तुकडा कापून जुन्या झग्याला लावत नाही. कारण असं केलं, तर तो तुकडा फाटून निघून जाईल; शिवाय, नव्या झग्याचं कापड जुन्या झग्याशी जुळणार नाही. ३७  तसंच, कोणीही जुन्या बुधल्यांमध्ये* नवीन द्राक्षारस भरत नाही. कारण असं केलं, तर नव्या द्राक्षारसामुळे बुधल्या फाटून द्राक्षारस सांडेल आणि बुधल्या खराब होतील. ३८  त्यामुळे नवीन द्राक्षारस नव्या बुधल्यांमध्येच भरावा. ३९  जुना द्राक्षारस प्यायल्यानंतर कोणालाही नवा द्राक्षारस नको असतो, कारण ‘जुनाच चांगला,’ असं तो म्हणतो.”

तळटीपा

अर्थात, गालील समुद्र.
शब्दार्थसूची पाहा.
शब्दार्थसूची पाहा.
प्राण्यांच्या कातडीपासून बनवलेल्या पिशव्या. शब्दार्थसूची पाहा.