लूक ६:१-४९
६ मग, एका शब्बाथाच्या दिवशी तो शेतांतून चालला असताना त्याचे शिष्य धान्याची कणसे तोडून ती हातांवर चोळून खात होते.
२ तेव्हा काही परूशी म्हणाले: “शब्बाथाच्या दिवशी नियमानुसार योग्य नाही अशी गोष्ट तुम्ही का करत आहात?”
३ पण, येशूने त्यांना उत्तर दिले: “जेव्हा दावीद आणि त्याच्या माणसांना भूक लागली होती तेव्हा त्याने काय केलं हे तुम्ही कधी वाचलं नाही का?
४ दावीद कशा प्रकारे देवाच्या घरात गेला आणि समर्पित भाकरी* त्याला देण्यात आल्या, तेव्हा ज्या याजकांशिवाय कोणीही खाणं योग्य नव्हतं त्या भाकरी त्याने खाल्ल्या व आपल्या माणसांनाही दिल्या, हे तुम्ही वाचलं नाही का?”
५ मग, तो त्यांना म्हणाला: “मनुष्याचा पुत्र शब्बाथाचा प्रभू आहे.”
६ दुसऱ्या एका शब्बाथाच्या दिवशी तो सभास्थानात गेला व शिकवू लागला. तेव्हा तिथे एक मनुष्य होता ज्याचा उजवा हात वाळलेला* होता.
७ तेव्हा, येशू शब्बाथाच्या दिवशी रोग बरे करतो का, हे पाहण्यासाठी शास्त्री व परूशी त्याच्यावर बारकाईने नजर ठेवून होते; कारण त्यांना त्याच्यावर काही ना काही आरोप लावायचा होता.
८ पण, त्यांच्या मनातले विचार ओळखून तो त्या वाळलेल्या* हाताच्या माणसाला म्हणाला: “ऊठ, इथे मधे येऊन उभा राहा.” तेव्हा तो उठला आणि तिथे उभा राहिला.
९ मग, येशू त्यांना म्हणाला: “मी तुम्हाला विचारतो, शब्बाथाच्या दिवशी काय करणं योग्य आहे? एखाद्याचं भलं करणं की वाईट करणं? एखाद्याचा जीव वाचवणं की जीव घेणं?”
१० मग सगळ्यांकडे पाहिल्यानंतर तो त्या माणसाला म्हणाला: “आपला हात लांब कर.” त्याने तो लांब केला आणि त्याचा हात बरा झाला.
११ तेव्हा शास्त्री व परूशी रागाने वेडेपिसे होऊन येशूचे काय करावे याबद्दल आपसात चर्चा करू लागले.
१२ त्या दिवसांत, एकदा तो डोंगरावर प्रार्थना करण्यासाठी गेला आणि रात्रभर देवाला प्रार्थना करत राहिला.
१३ मग, दिवस उजाडल्यावर त्याने आपल्या शिष्यांना बोलावले आणि त्यांच्यातील या बारा जणांना निवडून त्यांना प्रेषित असे नाव दिले:
१४ शिमोन ज्याला त्याने पेत्र असेही नाव दिले, त्याचा भाऊ अंद्रिया, याकोब, योहान, फिलिप्प, बर्थलमय,
१५ मत्तय, थोमा, अल्फीचा मुलगा याकोब, शिमोन ज्याला “आवेशी” म्हटले आहे,
१६ याकोबचा मुलगा यहूदा, आणि यहूदा इस्कर्योत, जो दगाबाज निघाला.
१७ मग तो त्यांच्यासोबत डोंगरावरून खाली उतरला आणि एका सपाट जागेवर उभा राहिला. तेव्हा, त्याच्या शिष्यांचा एक मोठा समुदाय तिथे होता. तसेच, यहूदीया व यरुशलेम आणि समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या सोर व सीदोनच्या प्रदेशांतील लोकांचा मोठा समुदायसुद्धा त्याचे ऐकण्यासाठी आणि आपले रोग बरे करून घेण्यासाठी तिथे जमला होता.
१८ अशुद्ध आत्म्यांनी पीडित असलेलेसुद्धा बरे झाले.
१९ आणि त्याला स्पर्श करण्यासाठी गर्दीतील सर्व लोकांची धडपड चालली होती, कारण त्याच्यातून सामर्थ्य निघून त्या सर्वांना बरे करत होते.
२० मग आपल्या शिष्यांकडे पाहून तो बोलू लागला:
“तुम्ही जे गरीब आहात, ते तुम्ही सुखी! कारण देवाचं राज्य तुमचं आहे.
२१ तुम्ही जे सध्या उपाशी आहात, ते तुम्ही सुखी! कारण तुम्हाला तृप्त केलं जाईल.
तुम्ही जे आता रडता, ते तुम्ही सुखी! कारण तुम्ही हसाल.
२२ मनुष्याच्या पुत्रामुळे जेव्हा लोक तुमचा द्वेष करतात, तुम्हाला एकटं पाडतात, तुमचा अपमान करतात आणि दुष्ट म्हणून तुमची बदनामी करतात* तेव्हा तुम्ही सुखी आहात.
२३ कारण तुमच्याआधी होऊन गेलेल्या संदेष्ट्यांसोबतही त्यांनी हेच केलं होतं; उलट, त्या दिवशी हर्ष व आनंद करा,* कारण पाहा! स्वर्गात तुमचं प्रतिफळ मोठं आहे.
२४ पण तुम्ही जे श्रीमंत आहात, तुमचा धिक्कार असो! कारण तुमच्या वाट्याचं सुख तुम्हाला अगोदरच मिळालं आहे.
२५ तुम्ही जे आता तृप्त आहात, तुमचा धिक्कार असो! कारण तुम्ही उपाशी राहाल.
तुम्ही जे आता हसत आहात, तुमचा धिक्कार असो! कारण तुम्ही शोक कराल व रडाल.
२६ सर्व लोक जरी तुमची प्रशंसा करत असले, तरी तुमचा धिक्कार असो! कारण हेच त्यांच्या पूर्वजांनी खोट्या संदेष्ट्यांच्या बाबतीतही केलं.
२७ पण तुम्ही जे ऐकत आहात तुम्हाला मी असं सांगतो: आपल्या शत्रूंवर प्रेम करत राहा आणि तुमचा द्वेष करणाऱ्यांचं भलं करत राहा,
२८ तुम्हाला शाप देणाऱ्यांना आशीर्वाद देत राहा आणि तुमचा अपमान करणाऱ्यांसाठी प्रार्थना करत राहा.
२९ जो तुमच्या एका गालावर चापट मारतो, त्याच्यापुढे दुसराही गाल करा; आणि जो तुमचं बाह्य वस्त्र घेतो, त्याला तुमचा झगाही घेण्यास मना करू नका.
३० जे तुम्हाला मागतात त्या प्रत्येकाला द्या, आणि जो तुमच्या वस्तू घेऊन जातो, त्याला त्या परत मागू नका.
३१ त्याच प्रकारे, लोकांनी तुमच्याशी जसं वागावं असं तुम्हाला वाटतं तसंच तुम्हीही त्यांच्याशी वागा.
३२ तुमच्यावर प्रेम करणाऱ्यांवर जर तुम्ही प्रेम करत असाल, तर त्यात विशेष असं काय? कारण पापी लोकही त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांवर प्रेम करतात.
३३ आणि तुमचं भलं करणाऱ्यांचं जर तुम्ही भलं केलं, तर त्यात विशेष असं काय? कारण पापी लोकही तेच करतात.
३४ तसंच, ज्यांच्याकडून तुम्हाला परत मिळण्याची आशा आहे अशांना जर तुम्ही उसनं दिलं,* तर त्यात विशेष असं काय? कारण पापी लोकसुद्धा पूर्ण रक्कम परत मिळण्याच्या अपेक्षेने इतर पापी लोकांना उसनं देतात.
३५ याउलट, तुमच्या शत्रूंवर प्रेम करत राहा आणि इतरांचं भलं करत राहा आणि परत मिळण्याची आशा न बाळगता उसनं देत राहा, म्हणजे तुम्हाला मोठं प्रतिफळ मिळेल आणि तुम्ही सर्वोच्च देवाचे पुत्र व्हाल. कारण, तो उपकार न मानणाऱ्यांवर व दुष्ट लोकांवरही दया करतो.
३६ जसा तुमचा पिता दयाळू आहे तसेच तुम्हीसुद्धा इतरांवर दया करत राहा.
३७ त्याच प्रकारे, इतरांचे दोष काढण्याचं सोडून द्या म्हणजे तुमचे दोष काढले जाणार नाहीत, इतरांना दोषी ठरवण्याचं सोडून द्या म्हणजे तुम्हाला दोषी ठरवलं जाणार नाही. क्षमा* करत राहा, म्हणजे तुम्हालाही क्षमा* केली जाईल.
३८ इतरांना देत राहा म्हणजे तेही तुम्हाला देतील. ते तुमच्या पदरात भरपूर माप, हलवून, दाबून व ओसंडून वाहेपर्यंत ओततील. कारण ज्या मापाने तुम्ही इतरांना मापून देत आहात, त्याच मापाने तेही तुम्हाला मापून देतील.”
३९ मग त्याने त्यांना एक उदाहरणही दिले: “एक आंधळा दुसऱ्या आंधळ्याला मार्ग दाखवू शकत नाही, दाखवू शकतो का? जर दाखवला, तर दोघंही खड्ड्यात पडणार नाहीत का?
४० शिष्य* आपल्या गुरूपेक्षा श्रेष्ठ नसतो, पण पूर्ण प्रशिक्षण मिळालेला प्रत्येक जण आपल्या गुरूसारखा होईल.
४१ तर मग, तुझ्या स्वतःच्या डोळ्यातला ओंडका न बघता, तू तुझ्या भावाच्या डोळ्यातली बारीकशी काडी का बघतोस?
४२ तुझ्या स्वतःच्या डोळ्यातला ओंडका न पाहता, ‘भावा, मला तुझ्या डोळ्यातली काडी काढू दे,’ असं तू आपल्या भावाला कसं काय म्हणू शकतोस? अरे ढोंगी माणसा! आधी स्वतःच्या डोळ्यातला ओंडका काढ, म्हणजे मग तुझ्या भावाच्या डोळ्यातली काडी तुला स्पष्ट दिसेल.
४३ कारण कोणतंही चांगलं झाड कुजकं फळ देत नाही, आणि कोणतंही किडलेलं झाड चांगलं फळ देत नाही.
४४ कारण प्रत्येक झाडाची ओळख त्याच्या फळावरून होते. उदाहरणार्थ, लोक काटेरी झुडपांतून अंजीर किंवा द्राक्षं काढत नाहीत.
४५ चांगला मनुष्य आपल्या अंतःकरणात साठवलेल्या चांगल्या गोष्टी बाहेर काढतो, तर वाईट मनुष्य आपल्या अंतःकरणात साठवलेल्या वाईट गोष्टी बाहेर काढतो; कारण अंतःकरणात जे भरलेलं असतं तेच तोंडातून बाहेर पडतं.
४६ तर मग, तुम्ही मला ‘प्रभू, प्रभू!’ असं म्हणता, पण मी सांगितलेल्या गोष्टी का करत नाही?
४७ जो कोणी माझ्याकडे येतो आणि माझी वचनं ऐकून त्यांप्रमाणे वागतो, तो कोणासारखा आहे हे मी तुम्हाला सांगतो:
४८ तो अशा एका माणसासारखा आहे ज्याने घर बांधताना खोलवर खोदून, खडकावर पाया घातला. मग, पूर आला तेव्हा नदीचं पाणी घरावर आदळलं, पण ते त्या घराला हलवू शकलं नाही, कारण ते घर मजबूत बांधलं होतं.
४९ याउलट, जो कोणी ऐकतो, पण त्याप्रमाणे करत नाही तो अशा एका माणसासारखा आहे ज्याने पाया न घालताच घर बांधलं. मग, नदीचं पाणी त्यावर आदळलं आणि ते घर लगेच कोसळून पडलं आणि पूर्णपणे उद्ध्वस्त झालं.”
तळटीपा
^ किंवा “समक्षतेच्या भाकरी.” शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा “लकवा मारल्यामुळे लुळा झालेला.”
^ किंवा “लकवा मारल्यामुळे लुळ्या झालेल्या.”
^ किंवा “तुम्हाला वाळीत टाकतात.”
^ शब्दशः “आनंदाने उड्या मारा.”
^ अर्थात, बिनव्याजाने.
^ किंवा “सुटका.”
^ किंवा “तुमचीही सुटका.”
^ किंवा “विद्यार्थी.”