लूक ७:१-५०
७ लोकांना जे सांगायचे होते ते सर्व सांगून झाल्यावर येशू कफर्णहूमला आला.
२ तिथे सैन्यातल्या एका अधिकाऱ्याचा आवडता दास खूप आजारी होता आणि मरायला टेकला होता.
३ त्या अधिकाऱ्याने येशूबद्दल ऐकले तेव्हा आपल्याकडे येऊन आपल्या दासाला बरे करावे, अशी विनंती करण्यासाठी त्याने यहुद्यांच्या काही वडीलजनांना येशूकडे पाठवले.
४ ते येशूकडे आले आणि त्याला अशी कळकळीची विनंती करू लागले: “कृपा करून त्याला मदत करा, कारण तो एक चांगला माणूस आहे.
५ आपल्या राष्ट्रातल्या लोकांवर त्याचं प्रेम आहे आणि त्याने आपल्यासाठी सभास्थानसुद्धा बांधून दिलं आहे.”
६ त्यामुळे, येशू त्यांच्याबरोबर गेला. पण, तो सैन्यातल्या अधिकाऱ्याच्या घरापासून काही अंतरावर असताना अधिकाऱ्याने आपल्या मित्रांना असा निरोप देऊन येशूकडे पाठवले: “प्रभू, त्रास घेऊ नका, कारण तुम्ही माझ्या घरी यावं इतकी माझी लायकी नाही.
७ खरंतर, याच कारणामुळे मी स्वतःला तुमच्याकडे येण्यास लायक समजलो नाही. तुम्ही फक्त तोंडातून शब्द काढा म्हणजे माझा नोकर बरा होईल.
८ कारण मी स्वतः दुसऱ्याच्या अधिकाराखाली असलेला माणूस असून माझ्या हाताखालीदेखील सैनिक आहेत; आणि मी त्यांच्यापैकी एकाला ‘जा!’ म्हटलं तर तो जातो आणि दुसऱ्याला ‘ये!’ म्हटलं तर तो येतो आणि माझ्या दासाला मी, ‘अमुक कर!’ असं म्हटलं तर तो ते करतो.”
९ येशूने हे ऐकले तेव्हा त्याला खूप आश्चर्य वाटले आणि त्याच्यामागे येणाऱ्या लोकांकडे वळून तो म्हणाला: “मी तुम्हाला सांगतो, मला इस्राएलातसुद्धा एवढा मोठा विश्वास पाहायला मिळाला नाही!”
१० आणि ज्यांना त्याच्याकडे पाठवण्यात आले होते ते घरी परतले तेव्हा तो दास बरा झाल्याचे त्यांना आढळले.
११ याच्या थोड्याच काळानंतर, तो नाईन नावाच्या गावी गेला आणि त्याचे शिष्य व लोकांचा मोठा समुदाय त्याच्यासोबत होता.
१२ तो शहराच्या प्रवेशद्वाराजवळ आला तेव्हा पाहा! लोक एका मेलेल्या माणसाला नेत होते. तो आपल्या आईचा एकुलता एक मुलगा होता. शिवाय, ती विधवा होती. आणि शहरातील पुष्कळ लोक तिच्यासोबत होते.
१३ तिला पाहताच प्रभूला तिचा कळवळा आला आणि तो तिला म्हणाला: “रडू नकोस.”
१४ मग जवळ जाऊन त्याने तिरडीला स्पर्श केला तेव्हा तिरडी वाहून नेणारे थांबले. मग तो म्हणाला: “मुला, मी तुला सांगतो, ऊठ!”
१५ तेव्हा तो उठून बसला व बोलू लागला आणि येशूने त्याला त्याच्या आईच्या स्वाधीन केले.
१६ हे पाहून सर्व लोकांना भीती वाटली आणि ते असे म्हणून देवाचा गौरव करू लागले: “आपल्यामध्ये एक महान संदेष्टा प्रकट झाला आहे,” आणि “देवाने आपल्या लोकांकडे लक्ष वळवलं आहे.”
१७ आणि त्याच्याबद्दलची ही बातमी संपूर्ण यहूदीयात व आसपासच्या सर्व प्रदेशांत पसरली.
१८ आता योहानच्या शिष्यांनी या सर्व गोष्टी त्याला सांगितल्या.
१९ तेव्हा, त्याने आपल्या दोन शिष्यांना बोलावून त्यांना प्रभूकडे असे विचारण्यास पाठवले: “जो येणार होता तो तूच आहेस का, की आम्ही दुसऱ्याची वाट पाहावी?”
२० ती माणसे येशूजवळ येऊन म्हणाली: “बाप्तिस्मा देणाऱ्या योहानने आम्हाला असं विचारण्यास तुझ्याकडे पाठवलं आहे, की ‘जो येणार होता तो तूच आहेस का, की आम्ही दुसऱ्याची वाट पाहावी?’”
२१ त्याच वेळी, येशूने अनेक लोकांचे आजार व गंभीर रोग बरे केले, त्यांच्यातून दुरात्मे काढले आणि बऱ्याच आंधळ्यांना दृष्टीचे दान दिले.
२२ तेव्हा येशूने त्यांना असे उत्तर दिले: “तुम्ही जे काही पाहिलं व ऐकलं ते जाऊन योहानला सांगा: आंधळे आपल्या डोळ्यांनी पाहत आहेत, लंगडे चालत आहेत, कुष्ठरोगी शुद्ध केले जात आहेत, बहिऱ्यांना ऐकू येत आहे, मेलेल्यांना जिवंत केलं जात आहे आणि गोरगरिबांना आनंदाचा संदेश सांगितला जात आहे.
२३ ज्याला माझ्यात अडखळण्याचं कारण सापडत नाही* तो मनुष्य सुखी!”
२४ योहानचा निरोप घेऊन आलेली माणसे परत गेली तेव्हा येशू जमलेल्या लोकांशी योहानबद्दल बोलू लागला: “ओसाड प्रदेशात तुम्ही काय पाहायला गेला होता? वाऱ्याने हेलकावणारी गवताची काडी?
२५ मग काय पाहायला गेला होता? मऊ मखमली कपडे* घातलेला माणूस? असे सुंदर कपडे घालणारे आणि ऐशआरामात राहणारे तर राजमहालात असतात.
२६ तर मग, खरंच, काय पाहायला गेला होता तुम्ही? संदेष्ट्याला? हो, मी तुम्हाला सांगतो, जो संदेष्ट्यांहूनही श्रेष्ठ त्याला.
२७ हा तोच आहे ज्याच्याबद्दल असं लिहिण्यात आलं: ‘पाहा! मी माझ्या दूताला तुझ्यापुढे* पाठवत आहे. तो तुझ्यापुढे जाऊन तुझ्यासाठी मार्ग तयार करेल.’
२८ मी तर तुम्हाला सांगतो, स्त्रियांपासून जन्मलेल्यांमध्ये योहानपेक्षा श्रेष्ठ कोणी नाही; पण, देवाच्या राज्यात जो अगदी लहान तो त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे.”
२९ (जेव्हा सर्व लोकांनी व जकातदारांनी हे ऐकले तेव्हा देव नीतिमान असल्याचे त्यांनी कबूल केले, कारण त्यांना योहानचा बाप्तिस्मा देण्यात आला होता.
३० पण, परूशी आणि नियमशास्त्राचे जाणकार यांनी त्यांच्यासाठी असलेला देवाचा संकल्प नाकारला, कारण त्यांनी योहानकडून बाप्तिस्मा घेतला नव्हता.)
३१ “त्यामुळे, या पिढीतल्या लोकांची तुलना मी कोणाशी करू? ते कोणासारखे आहेत?
३२ बाजारात बसलेल्या लहान मुलांसारखे ते आहेत, जे एकमेकांना हाक मारून म्हणतात: ‘आम्ही तुमच्यासाठी बासरी वाजवली, पण तुम्ही नाचला नाहीत; आम्ही मोठ्याने रडलो, पण तुम्ही रडला नाहीत.’
३३ त्याचप्रमाणे, बाप्तिस्मा देणारा योहान भाकरी खात किंवा द्राक्षारस पीत आला नाही, तरी ‘त्याच्यात दुरात्मा आहे,’ असं तुम्ही म्हणता.
३४ मनुष्याचा पुत्र खातपीत आला आणि तरी तुम्ही म्हणता, ‘पाहा! हा खादाड आणि दारुडा! जकातदारांचा आणि पापी लोकांचा मित्र!’
३५ पण, बुद्धी ही तिच्या सर्व परिणामांवरून* सिद्ध होते.”*
३६ मग, परूश्यांपैकी एक जण त्याला आपल्या घरी जेवायला येण्याचा आग्रह करू लागला. तेव्हा, तो त्या परूश्याच्या घरी गेला आणि जेवायला बसला.
३७ त्या शहरात एक पापी व बदनाम स्त्री होती. येशू त्या परूश्याच्या घरी जेवायला आला आहे असे तिने ऐकले, तेव्हा ती सुगंधी तेलाची बाटली* घेऊन तिथे आली.
३८ ती येशूच्या मागे त्याच्या पायांजवळ गुडघे टेकून रडू लागली आणि आपल्या अश्रूंनी त्याचे पाय भिजवू लागली व आपल्या केसांनी ते पुसू लागली. तसेच, त्याच्या पायांचे चुंबन घेऊन तिने त्यांवर सुगंधी तेल लावले.
३९ हे पाहून, ज्या परूश्याने येशूला आमंत्रण दिले होते तो मनातल्या मनात म्हणू लागला: “हा माणूस जर खरंच संदेष्टा असता, तर त्याला स्पर्श करणारी ही स्त्री कोण आहे आणि कशी आहे, म्हणजे ती पापी आहे हे त्याला समजलं असतं.”
४० पण, येशूने त्याला म्हटले: “शिमोन, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे.” तो म्हणाला: “बोला गुरुजी!”
४१ “एक सावकार होता आणि त्याचे दोन कर्जदार होते; एका कर्जदारावर पाचशे दिनारांचं,* तर दुसऱ्यावर पन्नास दिनारांचं* कर्ज होतं.
४२ पण, हे कर्ज फेडायला त्यांच्याजवळ काहीच नव्हतं, तेव्हा सावकाराने त्या दोघांचंही कर्ज माफ केलं. तर मग, यांच्यापैकी कोण त्याच्यावर जास्त प्रेम करेल?”
४३ शिमोनने उत्तर दिले: “मला वाटतं, ज्याच्यावर जास्त कर्ज होतं तो.” त्यावर येशू त्याला म्हणाला: “तू बरोबर ओळखलंस.”
४४ मग, त्या स्त्रीकडे वळून तो शिमोनला म्हणाला: “या स्त्रीला पाहतोस ना? मी तुझ्या घरी आलो तेव्हा तू मला पाय धुवायला पाणी दिलं नाही. पण, या स्त्रीने आपल्या अश्रूंनी माझे पाय ओले केले आणि आपल्या केसांनी ते पुसले.
४५ तू माझं चुंबन घेतलं नाही, पण ही स्त्री मी आत आल्यापासून माझ्या पायांचं चुंबन घेत आहे.
४६ तू माझ्या डोक्याला तेल लावलं नाही, पण या स्त्रीने माझ्या पायांवर सुगंधी तेल ओतलं.
४७ म्हणूनच मी तुम्हाला सांगतो, तिने बरीच पापं केली असली, तरी त्यांची क्षमा करण्यात आली आहे; याच कारणामुळे, तिने जास्त प्रेम दाखवलं आहे. पण, ज्याला कमी क्षमा करण्यात येते तो कमी प्रेम करतो.”
४८ मग तो तिला म्हणाला: “तुझ्या पापांची क्षमा करण्यात आली आहे.”
४९ तेव्हा, त्याच्यासोबत जेवायला बसलेले आपसात म्हणू लागले: “हा कोण आहे, जो पापांचीसुद्धा क्षमा करतो?”
५० पण, तो त्या स्त्रीला म्हणाला: “तुझ्या विश्वासाने तुला वाचवलं आहे; शांतीने जा.”
तळटीपा
^ किंवा “जो माझ्याविषयी कोणतीही शंका घेत नाही.”
^ किंवा “महागडी वस्त्रे.”
^ शब्दशः “तुझ्या मुखापुढे.”
^ शब्दशः “मुलांद्वारे.”
^ किंवा “नीतिमान ठरते.”
^ अर्थात, अलाबास्त्र नावाच्या दगडापासून बनवलेली बाटली. शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दार्थसूची पाहा.