१ करिंथकर १:१-३१

  • नमस्कार (१-३)

  • करिंथच्या बांधवांकरता पौल देवाचे आभार मानतो (४-९)

  • एकता राखण्याचा सल्ला (१०-१७)

  • ख्रिस्त, देवाच्या सामर्थ्याचा व बुद्धीचा पुरावा (१८-२५)

  • केवळ यहोवामुळे बढाई मारणे (२६-३१)

 ज्याला देवाच्या इच्छेनुसार ख्रिस्त येशूचा एक प्रेषित होण्यासाठी बोलावण्यात आले तो पौल आणि आपला भाऊ सोस्थनेस यांच्याकडून, २  करिंथमध्ये असलेल्या देवाच्या मंडळीला. म्हणजे, पवित्र जन होण्याकरता ख्रिस्त येशूचे शिष्य या नात्याने ज्यांचे पवित्रीकरण करण्यात आले आहे, त्या तुम्हाला; तसेच सर्व ठिकाणी, आपल्या सर्वांचा प्रभू असलेल्या येशू ख्रिस्ताचे नाव घेऊन त्याला हाक मारतात त्या सगळ्यांना: ३  देव जो आपला पिता आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त यांच्याकडून तुम्हाला अपार कृपा व शांती लाभो. ४  ख्रिस्त येशूमध्ये तुमच्यावर झालेल्या देवाच्या अपार कृपेमुळे मी नेहमीच माझ्या देवाचे आभार मानतो; ५  कारण बोलण्याचे पूर्ण सामर्थ्य व पूर्ण ज्ञान यांसोबतच इतर सर्व गोष्टींमध्ये तुम्हाला त्याच्याद्वारे समृद्ध करण्यात आले आहे; ६  तसेच, ख्रिस्ताविषयीची साक्ष तुमच्यामध्ये चांगल्या प्रकारे मुळावली आहे, ७  आणि यामुळे, आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रकट होण्याची आतुरतेने वाट पाहत असताना तुम्ही कोणत्याही कृपादानात कमी पडला नाहीत. ८  त्याच प्रकारे, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या दिवशी तुमच्यावर कोणताही आरोप येऊ नये, म्हणून देव तुम्हाला शेवटपर्यंत स्थिर राहण्यासही साहाय्य करेल. ९  देव विश्‍वासू आहे आणि त्याच्यामुळेच तुम्हाला त्याचा पुत्र व आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्यासोबत भागीदार* होण्याकरता बोलावण्यात आले आहे. १०  बांधवांनो, आता मी तुम्हाला आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने अशी विनंती करतो, की तुमच्या सर्वांच्या बोलण्यात समानता असावी व तुमच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या फुटी असू नयेत; तर, तुमची मते व विचारसरणी एकसारखीच असून तुम्ही पूर्णपणे ऐक्यात राहावे. ११  कारण माझ्या बांधवांनो, ख्लोवे हिच्या घराण्यातील काहींनी मला तुमच्याविषयी असे सांगितले आहे, की तुमच्यामध्ये मतभेद आहेत. १२  म्हणजे मला असे म्हणायचे आहे की तुमच्यापैकी प्रत्येक जण, “मी पौलचा,” “मी अपुल्लोचा,” “मी तर केफाचा,”* “मी तर ख्रिस्ताचा,” असे म्हणतो. १३  ख्रिस्त असा विभागलेला आहे का? वधस्तंभावर* तुमच्यासाठी पौलला मृत्युदंड देण्यात आला होता का? किंवा, तुम्ही पौलच्या नावाने बाप्तिस्मा* घेतला होता का? १४  तुमच्यापैकी क्रिस्प व गायस यांच्याशिवाय मी कोणालाही बाप्तिस्मा दिला नाही, याबद्दल मी देवाचे आभार मानतो. १५  कारण तुम्ही माझ्या नावाने बाप्तिस्मा घेतला, असे आता कोणालाही म्हणता येणार नाही. १६  हो, स्तेफना याच्या घराण्यालाही मी बाप्तिस्मा दिला होता. पण, बाकीच्या कोणालाही बाप्तिस्मा दिल्याचे मला आठवत नाही. १७  कारण ख्रिस्ताने मला बाप्तिस्मा देण्यासाठी नाही, तर आनंदाचा संदेश घोषित करण्यासाठी पाठवले; पण बुद्धिवंतांच्या भाषेत* नाही, यासाठी की ख्रिस्ताचा वधस्तंभ व्यर्थ ठरू नये. १८  कारण ज्यांचा नाश होत आहे त्यांना वधस्तंभाविषयीचा संदेश मूर्खपणा वाटतो; पण ज्यांना वाचवले जात आहे* त्या आपल्यासाठी तो देवाच्या सामर्थ्याचा पुरावा आहे. १९  कारण असे लिहिले आहे: “मी बुद्धिवंतांची बुद्धी नाहीशी करेन, आणि ज्ञानी लोकांचे ज्ञान धुडकावून लावेन.”* २०  कुठे आहेत बुद्धिवंत? कुठे आहेत शास्त्री?* कुठे आहेत या जगाच्या व्यवस्थेतील* वादविवाद करणारे? देवाने या जगाच्या बुद्धीला मूर्खपणा ठरवले नाही का? २१  या जगाला स्वतःच्या बुद्धीने देवाची ओळख घडली नाही. पण, लोकांना मूर्खपणा वाटणाऱ्‍या संदेशाद्वारे विश्‍वास ठेवणाऱ्‍यांना वाचवणे* देवाला योग्य वाटले, यातून देवाची बुद्धी दिसून येते. २२  कारण यहुदी लोक चमत्कार* दाखवण्याची मागणी करतात आणि ग्रीक लोक बुद्धीच्या शोधात आहेत; २३  पण, आपण मात्र वधस्तंभावर खिळण्यात आलेल्या ख्रिस्ताविषयी घोषणा करतो, जो यहुद्यांकरता अडखळण्याचे कारण, तर विदेश्‍यांकरता मूर्खपणा आहे. २४  पण ज्यांना बोलावण्यात आले आहे, त्या यहुदी व ग्रीक लोकांसाठीही ख्रिस्त हा देवाच्या सामर्थ्याचा व बुद्धीचा पुरावा आहे. २५  कारण देवाची जी गोष्ट मूर्खपणाची वाटते, ती माणसांना वाटणाऱ्‍या बुद्धीच्या गोष्टीपेक्षा श्रेष्ठ आहे, आणि देवाची जी गोष्ट दुर्बलतेची वाटते, ती माणसांना शक्‍तिशाली वाटणाऱ्‍या गोष्टीपेक्षा अधिक बलवान आहे. २६  कारण बांधवानो, तुम्ही स्वतःच्याच बाबतीत ही गोष्ट पाहू शकता, की जे शारीरिक रीतीने* बुद्धिमान, शक्‍तिशाली व उच्च घराण्यातले आहेत, अशा पुष्कळांना देवाने बोलावले नाही, २७  तर बुद्धिवंतांना लज्जित करण्यासाठी देवाने जगातल्या मूर्ख गोष्टींना निवडले; आणि शक्‍तिशाली गोष्टींना लज्जित करण्यासाठी देवाने जगातल्या दुर्बल गोष्टींना निवडले; २८  आणि जगातल्या कवडीमोल व तुच्छ लेखल्या जाणाऱ्‍या व लोकांच्या नजरेत काहीच नाहीत अशा* गोष्टींना निवडले, यासाठी की त्यांद्वारे महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्‍या* गोष्टींना धुळीस मिळवावे, २९  म्हणजे कोणालाही देवापुढे बढाई मारता येणार नाही. ३०  पण तुम्ही देवामुळेच ख्रिस्त येशूसोबत ऐक्यात आहात. ख्रिस्ताने देवाची बुद्धी, तसेच त्याचे नीतिमत्त्व आपल्याला प्रकट केले व आपल्याला पवित्र करून खंडणीद्वारे मुक्‍त केले, ३१  यासाठी की जे लिहिण्यात आले होते ते पूर्ण व्हावे: “जो कोणी बढाई मारतो, त्याने यहोवामुळे* बढाई मारावी.”

तळटीपा

किंवा “वाटेकरी.”
ज्याला पेत्र असेही म्हणतात.
शब्दार्थसूची पाहा.
शब्दार्थसूची पाहा.
किंवा “चलाखीने बोलून.”
किंवा “ज्यांचे तारण होत आहे.”
किंवा “बाजूला सारेन.”
अर्थात, नियमशास्त्राचे जाणकार.
किंवा “सध्याच्या काळातील.” शब्दार्थसूची पाहा.
किंवा “ठेवणाऱ्‍यांचे तारण करणे.”
शब्दशः “चिन्हे.”
किंवा “मानवी दर्जांनुसार.”
किंवा “व ज्या नाहीत अशा.”
किंवा “त्यांद्वारे ज्या आहेत अशा.”
शब्दार्थसूची पाहा.